Sep 30, 2011

दादागिरी ते गांधीगिरी (व्हाया सेंट्रल जेल)

तो झोपड़पट्टीत रहायचा ...
अन मिल्लेनिअमची स्वप्न पहायचा.
देश्याचे नेते दिल्लीत पाणी प्रश्नासाठी बोलायचे ..,
हा गल्लीत पाण्यासाठी भांडायचा.

दादा दादांची टक्कर होताच ..
हा गुह्नेगारित उतरला
खंडनी, हप्प्ता वसूली करतानाच ...
आता चाकू ही हातात धरला.

गुह्नेगारी वाढत गेली, दादागिरी वाढत गेली....
डाकूगिरी, गुंडागिरीत हा कधीच नाही हरला.
आत - बाहेरचा खेळ खेळ्ताना अखेर ...
एक दिवस सौंशयित दहशतवादी ठरला.

जामिन आता मिळत नव्हता, तुरंगवास टळत नव्हता...
तेंव्हा सापडले त्याला गंधिवादाचे घबाड.
'माझे सत्याचे बोल' ... टाइमपास म्हणुन हाती घेतले..
अन वाचता वाचता त्याने सम्पूर्ण गांधिच वाचले.

काय असतो गुह्ना, का द्यावी गुह्न्याची कबूली ?
दादाच्याही डोक्यात गांधीगिरी सुरु झाली.
दिली लगेच कबूली, भोगला त्याने तुरुंगवास,
चार वर्ष्यांची शिक्षा ठरली पुस्तकांचा सहवास.

आता तो बदललाय.., गाँधी वाचून हललाय,
गाँधी विचार आचारतो, गांधीगिरी प्रचारतो.
तुरुंगातील कैध्याना तो आज विचारांची दिशा देतो,
गाँधी विचार जिवंत आहेत याचीच एक आशा देतो.

चाकू धरल्या हातानी... आता चरखा ही शिक्लाया,
त्याने स्ववलम्बनासाठी... नौकरी वर विश्वास टाकलाय.
पहिला जर 'लक्ष्मनदादा' आता विश्वास कसा बसेल,
कारन चाकू धरल्या हातामधे आता नवे पुस्तक दिसेल.

- रमेश ठोंबरे (Ramesh Thombre)
दि. २०/०५/२००९

(सत्येकथेवर आधारित)

|| लेकीच्या ओव्या ||


काय सांगू शेजीबाई, माझ्या लेकीचं कवतिक
घरासाठी तिनं बाई, खस्ता काढल्या कितीक

होती लहान ती जवा, सांभाळले भाऊराया,
झाली लेकराची माय, घास त्याला भरवाया.

भाऊ शाळेमंदी जातो, गिरवतो यक दोन,
त्याले शिकवते तीन, त्याची आडाणी बहीन.

आली वयामंदी जवा, लाज अंगात मायीना,
चाले नाकाम्होरं पोर, वर करून पाहीना.

हात पिवळे करण्या, बाप बोलला झोकात,
देण्या-घेण्याच्या रीवाजी, त्याचं मोडलं पेकाट.

चाले लगनाची घाई, गेली मोहरून पोर,
लळा मायीचा सुटेना, तिला आईचाच घोर !

जाता सासराला लेक, झाली दादल्याची राणी,
तिच्या पावलांनी तिथं, लक्ष्मी भरतेया पाणी.

लेक माझी ग गुणाची, नाही नाही ग कुणाची,
तिचा जीव माह्यापाशी, लेक मायीच्या मनाची.

लेक व्हाढतो ग ताट, लेक भरवते घास,
लेक कोरडा कोरडा, लेक पान्हाळली कास

- रमेश ठोंबरे
(Ramesh Thombre)
(अक्षरछंद)

Sep 27, 2011

~ अजून बाकी ~


धुंद जाहली, कुंद जाहली, परी भाळणे अजून बाकी
चिंब जाहलो आठवणींनी, पाउस भिजणे अजून बाकी.

रक्त सांडले दुबळ्यांचे अन, जीवे मारले रक्षणकर्त्या
देश आमुचा पोसत बसतो, फास अवळणे अजून बाकी.

उंच उंच इमले, आदर्शाचे, पचउन कुठला ढेकर येतो
आगडोंब ज्या उदरी वसतो, घास भरवणे अजून बाकी.

तुझे दिलासे, तुझे उसासे, तुझे खुलासे मोजत बसतो
पहिल्या वहिल्या पत्राचे पण, उत्तर मिळणे अजून बाकी.

भाव भुकेला विठू एकटा, वाट पाहतो भक्तगणांची
दलाल दिसले, बडवे दिसले, विठ्ठल दिसणे अजून बाकी.

रदीफ सारे जुळून येता, किती रमेशा गजला लिहिल्या
काळीज पार करणारा एक, शेर गिरवणे अजून बाकी.

- रमेश ठोंबरे
Ramesh Thombre

Sep 24, 2011

२५ सप्टेंबर रविवार ..............

 

हा रविवार सगळ्यांसाठी असणारेय खास ......
ज्यांच्या लेकी लहान आहेत त्यांचा वर्तमान सांगणार्या 
ज्यांच्या मोठ्या झल्या आहेत आपल्या घरी गेल्या आहेत त्यांच्या गोजिरवाण्या आठवणी जगवणाऱ्या ......
आणि होऊ घातलेल्या आई  बाबांना सुखद भविष्याची स्वप्ने दाखवणारा ....
हसता हसता तिच्या आठवणीनी डोळ्यात पाणी आणणारा 
एक खूप खास रविवार .......

आपल्या बाहुलीला सजवा शब्दालान्कारानी आणि सामील व्हा 
मराठी कविता समूहाच्या 

२५ सप्टेंबर २०११ पासून सकाळी ........

plzzz lavakar reply dya aplzzzzzzz

Sep 23, 2011

~ फाळणी (तरही) ~

राखण्या अस्तित्व ते, जाहले समर होते
या इथे कधीकाळी, देखणे शहर होते.

दोन झाले देश अन, दोन झाल्या अस्मिता
भिन्न धर्म जात परी, एकीचे बहर होते.

मृत या मनात माझ्या, गाडल्या संवेदना
लढले, शहीद झाले, तेवढे अमर होते

कल्पतरू वाण दिधले, अमृती घट शिंपले
स्वागती तेथ माझ्या, 'दहशती' जहर होते

माझाच होता देश, माझीच ती माणसे
का कुण्या परकीयांशी, छेडले गदर होते ?

हातात काय उरले, आज मग उभयतांच्या ?
'भूत' होता फाळणी, प्रश्न ते हजर होते.

- रमेश ठोंबरे
(Ramesh Thombre) 
 
 

Sep 22, 2011

मी लाडाची पाडाची बिजली

मी लाडाची पाडाची बिजली
भल्या भल्यांची मशाल इजली !
माझ्या पुढं र मशाल इजली !

माझा रंग गोरापान
तुझे उडालेले भान
हि रात सारी इष्कात भिजली || धृ ||
मी लाडाची पाडाची बिजली .........

डोळ्यात काजळ वेली
गाली र गुलाब लाली
माझ्या रुपाची नाशा हि झाली
तिथं बाटली आडवी निजली .....||१||
मी लाडाची पाडाची बिजली .........

माझा कसलेला घाट
तुझा बाणा लई ताठ
असा पाहुनिया थाट
आता माझी बी नियत लाजली ||२||
मी लाडाची पाडाची बिजली .........

माझी नागमोडी चाल
करी दिलाचे र हाल
त्यात ज्वानीची कमाल !
आता इष्काची बिर्याणी शिजली ||३||

तुझा डाव मला ठाव
नको उगी बडेजाव
डाव पांगण्याचा भ्याव
बघ भीती ही डोळ्यात सजली ||४||
मी लाडाची पाडाची बिजली .........
भल्या भल्यांची मशाल इजली !
माझ्या पुढं र मशाल इजली !

- रमेश ठोंबरे
Ramesh Thombre

Sep 20, 2011

आता मला ती मशाल द्या रे



पुरे जाहली आता तुतारी
अन शांतीचे डोस पाजणे
शस्त्रा पुढती शस्त्र टाकणे
नामर्दाचे ठरेल जिने ||

देश खाती अन पचवति
अजगर हे सुस्तावले
जनतेच्या टाळूचे लोणी
खाऊन पुरते निर्ढावले ||

भ्रष्टाचारी षंड माजता
दंड तयांना देणार मी
ढुंगनावरी लाथ मारण्या
समीप त्यांच्या जाणार मी |

घोट घेयील त्या नरडीचा
सोयच त्यांची करेल मी
आता त्यांची उठेल तिरडी
नच चौथा खांदा ठरेल मी ||

चिरून टाकीन उभे नि आडवे
ख्यातीच्या त्या गुंडांना
उडवील त्यांची आता शकले
जाऊन सांगा षंडाणा ||

पुरे जाहली आता तुतारी
पहा क्रांतीचे विरले वारे
जाळून टाकील भ्रष्टाचारी
आता मला ती मशाल द्या रे ||

- रमेश ठोंबरे
(Ramesh Thombre) 

Sep 18, 2011

.....................









दिनांक - तू माझ्या प्रेमात पडलीस तो (वर्तमानकाळ)

प्रती,
प्राणप्रिये - प्राणेश्वरी,
दिलात माझ्या तुझी छबी,
या इथे खालून-वरी, डावीकडे.
तू म्हणशील काय हे परत परत तेच ते ...
पण या वेळेचा feel वेगळा आहे ग ..!

तू म्हणशील 'मी प्रेमात कधी पडले ....?'
.... आग ते असं कळत थोडंच ...?
आता तूच बघ ...
'थातूर - मातुर, पत्र - सत्र'
जमलंच कि तुला ....
यमक जुळलं ... झालीस कवी ....
आणि कवी काय प्रेमात पडल्याशिवाय होता येत ....?
एक तर प्रेम करावं लागता नाहीतर प्रेमात 'पडावं' लागतं.
आता तू म्हणशील मी प्रेम केलंच नाही ...
मग प्रेमात 'पडली' असशील ...!
पण प्रेमात पडायचे तर ... आधी प्रेम करावे लागतेच ना ...
हे म्हणजे कसंय माहिताय का ... ?
A = B & B = C ....
म्हणून .... A = C
समजलीस का .... ?
नाही ना ...
सोड ना ते ....
बस ... तू प्रेमात पडलीस ...
एवढच सांगायचं ... होतं....
कबुल आहे न ....? तू गप्पं का ... ?
बहुतेक मान्य केलंस तू ...
...
.....
नाहीतर लगेच म्हणाली असतीस ...
पत्रास कारण कि ...



--- माझी प्रतीक्षा संपली !

तुझाच .... प्राणनाथ ..!


- रमेश ठोंबरे 
(Ramesh Thombre) 

तू समोर असताना

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
पाऊस
तुझ्या अंगणात पडतो,
तसाच माझ्या अंगणात पडतो.
पाऊस
मस्जिदिवर पडतो ..
तसाच मंदिरावरही पडतो.
पाऊस करत नाही कुठलाच भेदभाव.
..
...
पाऊस
कधी थेंब थेंब पाण्यासाठी
आभाळाकड पाहायला लावतो ...
पाऊस कधी कधी
पाण्यातच राहायला लावतो..,
पाऊस करत नाही कसलाच विचार !
..
...
पाऊस
संततधार बरसत असतो ...
अगदी मुक्काम सुद्धा ठोकून बसतो.
पाऊस ...कधी येतो आणि जातो ...
जसा चार घरचा पाहुणाच असतो.
पाऊस पाहत नाही कसलाच आधार
..
...
पाऊस
चोर पावलानं येतो ...
अगदी शांत ... अगदी निवांत....
पाऊस तांडव करत येतो ...
अगदी अचानक ... अगदी भयानक
पाऊस जोडत नाही कसलंच नातं.
..
...
हे असच असतं पावसाचं वागणं ....
तू समोर नसताना !
..
पाऊस ...करू लागतो भेदभाव
पाऊस ... करू लागतो विचार
पाऊस ....शोधू लागतो आधार ...
पाऊस ...जोडू लागतो नातं ..!
तू समोर असताना !

- रमेश ठोंबरे 
(Ramesh Thombre)

Sep 17, 2011

पाऊस मला भेटला .....

















||१||
दूरवर उंच उंच .. अलगद खाली येणारा,
आभाळाचा थेंब घेऊन धरतीला देणारा.
उजाड उजाड ... उदास उदास माळावर ....,
पाऊस मला भेटला
कणखर, बेडर डोंगराच्या भाळावर. 
||२||
बेधुंद आवेगाने झरझर कोसळणारा,
उतावीळ, अधीर अल्लड फेसाळणारा.
चिंब ओल्या काळ्याशार केसांच्या दाटीत ....,
पाऊस मला भेटला
धुंद, मदहोश प्रेयशीच्या मिठीत. 
||३||
रस्ता चुकलेला.. एकटाच मनमोज्जी
अडउन धरतो वाट ... एकांडा फौजी.
अज्ञात निर्जन अनोळखी वाटेवर .....,
पाऊस मला भेटला
स्वछंदी, आनंदी वार्याच्या लाटेवर.
||४||
काळ्या मातीस भेटण्यास आतुर,
बंद मुठीत प्रेमाचं काहूर.
सळसळनार्या हिरव्यागर्द शेतावर ....,
पाऊस मला भेटला
राकट, दनगट शेतकऱ्याच्या हातावर.
||५||
पावलो पावली अडखळनारा,
जीव मुठीत घेऊन ढासळणारा.
एकसंघ...एकसाची जुनाट किल्लीमध्ये ...
पाऊस मला भेटला
अरुंद, खोलगट अश्वासक गल्लीमध्ये.
||६||
नित्य-नेमाने डोंगररस्ता गाठणारा,
भक्ती भावाने ओत प्रोत भिजणारा.
भोळा भाबडा...दर्शनाच्या तयारीतला ...
पाऊस मला भेटला
भक्तीमय, शक्तीमय पंढरीच्या वारीतला.
||७||
स्वच्छ, नितळ, पांढरा शुभ्र भासणारा
नोकरदाराच्या फजितीवर हसणारा
रात्रभर जगलेला..दिवसाच्या झोपेतला
पाऊस मला भेटला
घड्याळावर चालणाऱ्या नियोजनबद्ध शहरातला
||८||
वेगाला भावणारा, धावत्याला शिवणारा,
ज्याचा वेग चुकला त्यालाच पावणारा.
साखरमान्याच्या टोपीत, चाकरमान्याच्या झब्यात
पाऊस मला भेटला
वक्तशीर, दाटीवाटीच्या लोकलच्या डब्यात.
||९||
स्वच्छंदी, उनाड वर वरच्या प्रेमाचा
मौज मजा अन सुट्टीच्या नेमाचा.
भेल, पाणी पुरी, आईस्क्रीमच्या पाटीवर
पाऊस मला भेटला
सजल्या गजबजल्या मुंबईच्या चौपाटीवर
||१०||
सात्विक, शुद्ध सांस्कृतीक चालीचा,
तर्कट, हेकट शहाणपणाच्या ढालीचा.
सरळ मार्गातील वाकड्या वाटेतला.....
पाऊस मला भेटला
रुंद अरुंद वक्तशीर पुणेरी पेठेतला. 
||११||
जीर्ण नाती मनापासून जोडणारा,
आयुष्याचे दिवस कसे तरी ओढणारा.
पोट भरल्यानंतर लाथाडलेल्या ताटावर ....
पाऊस मला भेटला,
निराधार, निराश्रित म्हातारीच्या बेटावर.
||१२||
अथांग, दूर दूरपर्यंत पसरलेला,
लाज, लज्जा सर्व सर्व विसरलेला.
बेभान, बेपर्वा आयुष्याच्या पिचवर....
पाऊस मला भेटला
उघड्या, नागड्या, थिल्लर विलासी बीचवर.
||१३||
बेरहम, बेदरकार एकट एकट गाठणारा
बेमालूम, बेसावध शेवटचं भेटणारा.
अवघं जगणं जिंकताना हरलेल्या मरणावर....
पाऊस मला भेटला,
मरनासन्न, असहाय, प्रेतावरच्या सरणावर.
||१४||
तरुण, तडफदार होयबानसोबत फिरणारा,
नाटकी, बेगडी पण सर्वांचा आवाज ठरणारा.
विरोधासाठी विरोध म्हणून चाललेल्या चर्चांवर
पाऊस मला भेटला
कष्टकरी, कामगारांच्या विकल्या गेलेल्या मोर्च्यांवर.
- रमेश ठोंबरे
(Ramesh Thombre)

Sep 16, 2011

सखे ग !



तुझे मोहमयी डोळे
त्यांचे वेगळाले चाळे
वर भाव किती भोळे
सखे ग ...!

तुझ्या रूपाचा खजिना
त्यात रुपगर्वी बाणा 
झालो त्याचाची दिवाणा

सखे ग ...!

तुझा ढळतो पदर
माझी अधीर नजर
जरा ठेव कि कदर
सखे ग ...!

तुझी दाटलेली चोळी
त्यात जीवघेणी खळी
माझं अंग अंग जाळी
सखे ग ...!

तुझी बारीक कंबर
तिचे दिवाणे  हजार
जरा लावकी नंबर
सखे ग ...!

- रमेश ठोंबरे
Ramesh Thombre


28 || भेटली भेटली ||


भेटली भेटली
प्रिया ती भेटली
स्वप्नच वाटली
पहाटेचे || १ ||

प्रियेची चाहूल
लागली पहा रे
स्तब्ध झाले सारे
प्राणी-पक्षी || २ ||

मनी हूर हूर
ऐकिला मी दूर
नाद तो मधुर
पैंजणाचा || ३ ||

वात तो थांबला
मेघ बावरले
नीर शांत झाले
जलाशयी || ४ ||

आजवर होती
भक्ती एक तर्फी
आता कुठे बर्फी
गोड झाली || ५ ||

- रमेश ठोंबरे 
(Ramesh Thombre)

Sep 14, 2011

२७. || भेदिले कुंपण ||


भेदिले कुंपण
पोलादाचे दार
केला मग वार
नयनांचा || १ ||

आळविला भाव
दवडीली भक्ती
लावलीच शक्ती
प्राण-पणे || २ ||

केली आराधना
केला फार दंगा
घातला मी पिंगा
प्रियेसाठी || ३ ||

होउनि आसक्त
केला मग त्याग
आकर्षण योग
जपीयला || ४ ||

भेटणार प्रिया
आता रामेशाला
साक्षात्कार झाला
शेवटाला || ५ ||

- रमेश ठोंबरे 
(Ramesh Thombre)

नाम उनका 'पाक' है !














हरलेला कुत्रा आता,
गल्लीत जाऊन भुंकतो आहे.
खालमानेने गेला आता,
वर तोंडाने थुंकतो आहे.

कधी गोड कधी कडू,
गरळ अशी ओकशील किती ?
हा असा, तो तसा,
धूळ उगा फेकशील किती ?

तुमच्यासारखे नाहीच आम्ही ...
हे अगदी खरं आहे.
तुमच्या आमच्यात फरक राहो
हेच शेवटी बरं आहे.

तुमची बरोबरी हवी कशाला,
आम्ही खूप पुढे आहोत.
पाठीमागून वार कश्याला
छाती काढून खडे आहोत !

नळीत घाला, नळी वाकेल
जग हे पाहणार आहे !
'ना-पाक' इरादेवाल्या तुझे
शेपूट वाकडेच राहणार आहे !

अल्लाह अब तू बता ..
कैसा तेरा इन्साफ है ...?
ना-पाक इरादे है जिनके
नाम उनका 'पाक' है !



- रमेश ठोंबरे
दि. ०४ / ०४ / २०११

Sep 13, 2011

. .



.
.
.
दिनांक - (तू वाचशील तेंव्हाचा .... !)

प्रती,
प्राणप्रिये - प्राणेश्वरी, (सदैव)
दिलात माझ्या तुझी छबी,
या इथे खालून-वरी, डावीकडे.
(अजून तरी तिकडेच राहतेस म्हणून)

पत्रास कारण की,
अजून तरी नसेल प्राणनाथ .....
पण म्हणूनच आशा आहे ...
आशा कसली ...? विश्वास आहे ..!
खुळा म्हनशील, वेडा म्हनशील
(मला तर म्हणालीस .... माझ्या विश्वासालाही...)

तुझी नजर तुला कशी समजणार .....?
ज्याला लागते ... त्याला कळते ...
म्हणून ... पुन्हा तुझ्या अजाणतेपनावर माझा जीव जडतो.

माझ्या नजरेच काय घेऊन बसलीस ....?
असेल निलाजरी ..... भामटी ...
पण तुला कधीच लागणार नाही ती ....!

उपमा देऊन दिलात शिरायला मी काय कवी आहे ?
आणि पोहायच म्हणलीस तर ....
तू सोबत असशील तर ...
आठवा समुद्रही शोधील मी.
पण तुझ्या गालावरच्या खळीत मात्र मी डूबलेलाच बरा.

तुझ्या बटांचा फास होतो ....!
अगं खरच आहे ते ...
पण तक्रार थोडीच आहे ती ... ?

असो ...
मी जवळ येता .....
तुझं घाबरणं असतंच तसं नजाकतीच...
मी तरी त्याला मोहरनच म्हणेल ...!

'रोज डार्लिंग' ... अग तूच निघून गेल्यावर
कसले आलेत गुलाब ...
आणि असले तरी त्यांना पाहणार कोण .... ?

गैरसमज...?
कधीच नव्हते ...
पण तू तुझे दूर कर ....
तुझे शब्द हळवेच आहेत
म्हणूनच मला हे लिहायला भाग पाडतेस ... !

तू आता लिहू नकोस म्हणालीस ...
आणि मी लिहित सुटलो ....
कारण तुझे शब्दच होते तसे ..
बघ ना काय म्हणाली होतीस ...?
'आता मात्र यावर काही लिहू नकोस
मी वाचणार नाहीये..

नाहीतर बसशील लगेच लिहायला'


आता हे तू वाचणार आणि ...
लिहिणार सुद्धा ....
म्हणूनच लिहिलं न ...



तुझाच ..
(तू लिहिशील ते वाचायला अतुर असलेला ...)

...
...
..

रमेश ठोंबरे

निषेध


आम्हाला वेळोवेळी डिवचलं जातंय
कधी आमच्या भागात केली जाते घूसखोरी
तर कधी पळवल जातं आमचं विमान
कधी उडवल्या जातात आमच्या सैनिकांच्या छावण्या
तर कधी केला जातो बुद्ध मुर्तिंचा अवमान.
पण आम्ही शांत आहोत.
आमचा देश शांत आहे !

तलवारींनी केल जातंय शिरस्तान
अन तोफानी घेतले जातात हजारो निरापराध्यांचे प्राण .
मारतानाही केला जातो अमानुष विचार,
अन हिंसेलाही लाजवतिल असे भयानक अत्त्याचार.
तरीही आम्ही शांत आहोत...
आमचा देश शांत आहे ...!
आमचा देश अहिंसक आहे !

पाकिस्तान कुरापती काढतो आहे,
चीन ही कधी कधी लढतो आहे ..
आणि आता तर ..
ज्यांचे नावही नकाश्यावर लवकर सापडणार नाही ..
असे ही करत आहेत उघड - उघड हल्ले.
आम्ही त्याना उत्तर देतो..
पाठवतो एखाद प्रेमपत्र.
आमचा प्रेमाचा संदेश
आमच्या देशाचा प्रेमाचा संदेश !

एवढ सगळ झाल्यावर ....
आम्ही धरतो आग्रह.... सत्याचा....,
आम्हालाच गिळंकृत करू पाहणाऱ्या
महासत्ताक दलालांकडे.
त्यांच्या समोर मांडतो सगळ सत्य...!
अन करतो सत्याग्रह.

डीवचतानाही शांत राहतो.
हिंसेत ही अहिंसा पाळतो
द्वेष करणार्यांना प्रेम-पत्र देतो
आणि नेहमी सत्याचा आग्रह धरतो.
अन झाल्याप्रकाराबद्दल खुपच संताप आला तर ...
पत्रकार परिषद् बोलावून,
भिंतीवर निरागस हास्य करत लटकना-या...
महात्म्याच्या साक्षीने
व्यक्त करतो तीव्र निषेध !

- रमेश ठोंबरे 
(Ramesh Thombre) 

२६ || भेटी लागी जीवा ||


भेटी लागी जीवा
लागलीची आस
संपेना प्रवास
योजलेला || १ ||

शिणले हे नेत्र
व्याकुळले मन
एक एक क्षण
जड झाला || २ ||

भेटीची मी आस
धरियली खास
अडखळे श्वास
दर्शनात || ३ ||

देवा माझे ध्येय
तुलाच रे ठावे
आता पूर्ण व्हावे
एकदाचे || ४ ||

त्याचं साठी बघ
घेतली समाधी
भक्तीस या साधी
म्हणू नको || ५ ||

- रमेश ठोंबरे 
(Ramesh Thombre) 

Sep 5, 2011

तुझी भेट व्हावी

तुझी भेट व्हावी नदीच्या किनारी
जिथे दाट गर्दी तरुंचीच भारी


तुझी भेट व्हावी एकांत रानी
जिथे वात गातो मंजुळ गाणी


तुझी भेट व्हावी ऋतू पावसाळी
जिथे गच्च ओली करवंद जाळी


तुझी भेट व्हावी फुलांच्या प्रदेशी
जिथे भृंग रमतो अश्या गंधकोशी


तुझी भेट व्हावी तिथे सांजवेळी
जिथे सूर्य उतरे धरेच्या कपाळी


तुझी भेट व्हावी माझ्याच दारी
जिथे 'माप भरले' 'कुठे तू'? विचारी !


- रमेश ठोंबरे
Ramesh Thombre 
 

Sep 4, 2011

शहीदांसाठी करणार काय ?


शहीदांसाठी आम्ही काय कराव ?
जे करायचे ते त्यांनी केलं.
ते त्यांच कर्त्तव्य होतं ,
म्हणुन आम्हाला स्वातंत्र्य केलं.

पारतंत्र्य त्यानीच घेतलं,
परकीयांना थारा देवून
स्वातंत्र्य ही त्यांनीच घेतलं
क्रांतीचा वारा पिवून.

ते विशेष कोणी नव्हते
फ़क्त आमचे पूर्वज होते.
परकियांच्या सोयीसाठी,
गुलामगिरीचे सावज होते.

टिळक, नेताजी आणि गोखले
चौका - चौकात उभे केले.
कसले शुर म्हणता त्यांना,
जे ट्राफिक पाहून घाबरले ?

गांधी, नेहरू आणि फूले,
नावे कित्येक रस्ते झाले.
तरी चिड्वुनी उगीच पुसता
म्हणे, विशेष काय तुम्ही केले ?

आम्ही त्यांची पूजा करतो,
कधी चुकून धरतो पाय,
या पेक्षा आणखी जास्त
शहीदांसाठी करणार काय ?

- रमेश ठोंबरे
Ramesh Thombre
(महात्म्याच्या कविता)

Sep 3, 2011

२५ || अडणार नाही ||


अडणार नाही
आता कीर्तनात
देव दर्शनात
दिसेचिना || १ ||

नको मला पुन्हा
संताचे वचन
अपुरे हे ज्ञान
प्रेमाविण || २ ||

नको धर्म ग्रंथ
नको ती पंढरी
प्रिया ज्ञानेश्वरी
मज साठी || ३ ||

कर्म धर्म सर्व
सोडिले मी आता
साक्षात्कार व्हावा
प्रेयसीचा || ४ ||

साधू संत भजे
देवाचीच भक्ती
प्रिये साठी युक्ती
कोण सांगे || ५ ||

- रमेश ठोंबरे
(Ramesh Thombre)
२१ डीसे- २००९

Sep 1, 2011

४) || प्रियेचे श्लोक ||


प्रिया शोधण्याचे जगी तेच अड्डे,
जिथे ती मिळावी तिथे चार खड्डे |
चला आज पाहू कुठे ती दिसावी,
परी सावधानी जरा बाळगावी || १६ ||

कधी पहिला का न कॉलेज कट्टा,
कधी काढिली का प्रियेचीच थट्टा ?
अरे त्याच तेथे प्रिया भेटते रे ...,
उगा छेडताना खुली खेटते रे ... || १७ ||

नका वाट लाऊ उगा त्या क्षणांची,
जिथे बात होते खुल्या या मनांची |
किताबे जराशी दुरुनी पहा रे,
इथे प्रेम थोडे करुनी पहा रे || १८ ||]

प्रिया शोधण्याला पुन्हा आज या रे
कुठे ती मिळावी जरासे शिका रे
तिची याद येता सिनेमास जावे
जरा सोबतीला धरुनी असावे || १९ ||

तिच्या सोबतीची मिळावीच जागा
सिने सुंदरीशी असे गोड वागा.
अता सोबतीला खिळूनी बसावे
जरा ओळखीचे वळूनी हसावे || २० ||

सिनेमा कुणाला, कसा नाद लावी
मिळताच संधी तिला दाद ध्यावी
सिनेमा पहावा, उगी रे झुरावे
फुलावे असे की, तिने मोहरावे || २१ ||

चला मंदिरीरे प्रिया पाहण्याला,
मनीच्या सखीला फुले वाहण्याला |
बहाणा करावा उगा अस्तिकाचा,
मनी भाव ठेवा, जरी तो फुकाचा || २२ ||

जिथे देव नांदे तिथे ती दिसावी
तिच्या दर्शनाने मती गुंग व्हावी |
कधी पाहिला का हरी मंदिराशी ?
तिच्या या रूपाने हरी भेट व्हावी || २३ ||

नका नाट लाऊ हरी पायरीला,
जिथे भाव आहे, मनी दाटलेला |
प्रिया काय सांगा उगा हासते का ?
इथे त्या हरीची कमी भासते का ! || २४ ||

- रमेश ठोंबरे
(Ramesh Thombre)