Jan 29, 2014

गांधी म्हणजे ...



गांधी म्हणजे तुमच्या आमच्या बापांचा बाप,
गांधी म्हणजे हिंसेवर ओढलेला चाप.

गांधी म्हणजे संयम आणि कणखरतेचा कणा,
गांधी म्हणजे जगत्गुरु तुकोबाची वीणा.

गांधी म्हणजे लोकशाहीत शांततेचा दूत,
गांधी म्हणजे स्वावलंबी चरख्यावरच सूत.

गांधी म्हणजे त्याग आणि सहिष्णुतेची मूर्ति,
गांधी म्हणजे सत्य आणि सत्याग्रहाची स्फूर्ति.

गांधी म्हणजे शांती आणि क्रांतीचा आधारस्तंभ
गांधी म्हणजे तिरंग्यातील तो़च शुभ्र रंग.

गांधी म्हणजे नेहमीच एक विचार 'नेक'
गांधी म्हणजे कधी कधी ग्यांनबाची मेख.

गांधी म्हणजे आहे एक अजब कोड़,
सोड्वायच तर सोडाच, आताशी कळलय थोड़.

गांधी म्हणजे काळाच्या भाळावरचा ठसा,*
तुम्ही आम्ही कोण कुठले, काळही पुसणार कसा ?

गांधी म्हणजे गांधीच.. त्यांना तोलणार कसं
स्वातंत्र्याचे भाष्य.. गांधीशिवाय बोलणार कसं ?

- रमेश ठोंबरे
दि. २४ मे २००९
(महात्मा गांधी पुण्यतिथी निमित्त एक जुनीच रचना)

Jan 27, 2014

प्रिय बापू

प्रिय बापू,

स.न.वि.वि. 

बापू बऱ्याच दिवसापासून विचार करतोय 
तुम्हाला पत्र लिहिण्याचा … 
समोर कागदांची भेंडोळी अन शाई भरलेलं पेन घेवून बसलोय खरा … 
पण मेंदू मात्र रिकामाच आहे. 
कदाचित मन भरून आलं कि होत असाव असं. 
परवा नेल्सन मंडेला तुमच्याकडे पोहचल्याचं कळल … 
वाटलं पत्र लिहून ठेवलं असतं तर बरं झालं असतं 
मंडेलांसोबत पाठवता तरी आलं असतं तुमच्याकड. 
यात दोन फायदे होते. 
एकतर तुमच्याच अनुयायाच्या हस्ते ते तुम्हाला मिळालं असतं 
आणि दुसरा फायदा असा कि . . . 
ते तुम्हाला खात्रीनं मिळाल असतं. 
काय आहे बापू …. 
मोठ मोठ्या शहरात हरवत चालली आहेत माणसं,
सध्या मोठ मोठ्या माणसांचेहि पत्ते सापडत नाहीत… 
खुद्द पोस्टमनला सुद्धा. 
तुमच्याकडहि असंच असणार म्हणून शंका आली. 

असो… 
देशात कुठं काही भलं बुरं घडलं कि… 
चिंता वाटायला लागते भविष्याची. 
लिहावं वाटतं एक पत्र 
सांगाव वाटतं देशाचं वर्तमान …. 
कारण हा देश तुमचा आहे, 
हे 'एक रुपया चांदी का, 
देश हमारा गांधी का !' 
म्हणण्याच्या वयापासून रुजलय मनावर. 
म्हणून जे घडतंय ते तुमच्याशी 'शेअर' करावं 
असं वाटतं बर्याचदा. 

माहित आहे मला, 
तुम्हाला हे सगळं वर्तमान समजत असेलच. 
पण संवादही व्ह्यायलाच हवेत ना ? 
म्हणून लिहायचं म्हणतोय एक पत्र !
जे विचार आहेत मनात ते येतील निदान कागदावर तरी !

विचारावरून आठवल बापू, 
गांधी विचारांना विरोध होता तेंव्हाही आणि 
विरोध होतोय आजही … 
तेंव्हाचा विचारपूर्वक असायचा … आजचा निरर्थक आहे 
आज गांधी विचारांना विरोध म्हणजे 
आधुनिकतेच लक्षण मानलं जातं, 
अन गांधी म्हणजे आजच्या तरुण पिढीसाठी 
कॉलेज कट्ट्यावरचा चेष्टेचा विषय झालाय, 
एवढाच काय तो फरक !

आज कधी चेष्टा तर फ्यशन म्हणून होत असते गांधीगिरी. 
हातात जळत्या मेणबत्त्या घेवून दिला जातो शांतीचा संदेश !
आत्मक्लेश आणि सत्याग्रह राहिला नाही आता. 
उपोषण तेवढं सुरु असतं अधून मधून …
शहरात अजीर्ण म्हणून आणि 
खेड्यात दोन वेळचं खायला मिळत नाही म्हणून.

तुम्ही म्हणाला होतात 'खेड्याकडे चला' 
खेडी बदलण्याचं तुमचं स्वप्नं ! 
पण आजची खेडी बिघडलीयत बापू …
तांबड फुटायच्या आत शेतावर निघणारा शेतकरी …. 
उन डोक्यावर येईपर्यंत हुंदडत असतो गावभर, 
अन दुपारनंतर शहरातल्या रस्त्यावर !
काय हरवलाय ? माहित नाही 
काय शोधतोय ? माहित नाही. 
शेतकऱ्यांच्या पोरांची …. 
ना खेड्याची … ना शहराची … अशी गत झालीय,
दिवसभर कुठल्यातरी झेंड्याच्या आधारावर 
कुठल्यातरी टोळी सोबत फिरत असतात … 
वर्तमान हरवल्यासारखी !

राजकारण नावाच वार सहज घुसतं डोक्यात,
जे आयुष्य मातीत गेलं तरी समजत नाही यांना. 
राजकारण करणारे राजकारण करत राहतात
देश विकून पुन्हा वरमानेन चरत राहतात. 
अन हि पोर सैरभैर फिरत असतात,
रस्ता चुकलेल्या वासरासारखी. 

राजकारण राजकारण करत असताना 
समाज … समाजकारण विसरलाय बापू, 
सत्य, अहिंसा आणि प्रेम !
हे पुस्तकातले शब्द … 
आता पुस्तकातून हि बाद होतात कि काय 
याचीच भीती वाटतेय बापू !

माणूस स्वार्थी झालाय,
समाजात राहून समाजापासून दूर पळतोय माणूस !
देशात राहून देशाला विकतोय माणूस, 
माणूस असून माणसाला फसवतोय मानून !
म्हणून चिंता वाटते मला तुमच्या देशाची, 
हो तुमच्याच देशाची … 
कारण कदाचित आजची आम्ही हा देश तुमचाच मानतो, 
आमच्या नाकर्तेपणाच खापर तुमच्या नावे फोडण्यासाठी !

पण अगदीच आणि सगळाच निराशाजनक आहे असं हि म्हणता येणार नाही, 
कारण … काही लोकांचं काम पाहिल कि, 
वाटतं याच लोकांच्या बळावर … 
करतो आहे देश थोडीफार प्रगती !
सगळा देश स्वार्थाला कवटाळून बसला असताना …. 
सगळी सगळी भौतिक सुखं नाकारून अन 
दुर्गम आणि दुर्लक्षित भागाला आपली कर्मभूमी मानून 
आयुष्य खर्ची घालतात ही लोक समाजसेवेसाठी …
तेंव्हा करावा वाटतो यांच्या कार्याला 
निदान एक नपुंसक सलाम तरी !
तशी त्यांना आशा नसतेच कशाची …. 
"आलात तर तुमच्या सोबत 
नाही आलात तर तुमच्या शिवाय" 
या एकाच जिद्दीवर सुरु असतो यांचा प्रवास …
जगाच्या रहाटगाडग्यापासून दूर, 
माणुसकी विसरलेल्या माणसांपासून अलिप्त !
हे बोलतात फक्त कृतीतून, 
ते हि स्वतःशीच, आत्ममग्न ! 

कृतीशिवाय सगळंच फोल… 
हे सांगितलत तुम्ही तुमच्या कृतीतून 
त्याचा वारसा पुढे चालवत आहेत हे लोक
अन हे माहित असताना हि 
शब्दांचे खेळ करणारा … 
माझ्यासारखा फुटकळ कवी लिहितो गांधीवादावर फक्त कविता !
सांगतो सत्य आणि असत्याच्या गोष्टी … 
सांगतो हिंसा आणि अहिंसेच्या कथा. 
निर्दयतेचा उद्रेक होतो आणि अशांतीच अराजक माजत तेंव्हा 
मांडतो पानो पानी शांती आणि करुणेच्या व्यथा. 

ज्याप्रमाणे कोणी नेता आपला भूतकाळ गुंडाळून …
चारित्र्यावर गोमुत्र शिंपडून, 
डोक्यावर गांधी टोपी घालून … 
बोलू लागतो 'गांधीवादाची भाषा' 
तुमच्या शिकवणीची, 
तुमच्या तीन माकडांच्या शिकवणीची आठवण म्हणून !

मग आम्हीहि पांढर्या शुभ्र खादीतील नेता पहिला कि,
त्याच्या भूतकाळावर बोलणं सोडून देतो,
आणि भविष्याचा वेध घेतो. 
जे दिसतं त्याला सत्य समजून स्वीकारतो आणि … 
जे कानावर पडतं ते पवित्र करून घेतो !
कारण तुमच्या माकडांची शिकवण थोडी सकारात्मक 
करून घेतली आहे आम्ही आमच्याच सोयीसाठी …!

'सकारात्मकता' हा तर तुमच्या जीवन शैलीचा एक भाग, 
म्हणून काही नाही तर निदान लिहील एक पत्र … 
आणि तेवढ्याच अधिकारांन लिहिली शेवटी …
कुठे काही असह्य घडलं कि, अन तुमची आठवण आली कि, 
तुमच्या गांधीवादावर फक्त कविता लिहिणारा … 

तुमचा,
फुटकळ कवी

- रमेश ठोंबरे 

ता.क. : डोक्यात विचारांची नव्याने जंत्री आहेच ….
शब्दांची जमवाजमव झाली कि, लिहितोच एक पत्र

Jan 5, 2014

बेड्या



तुझ्या पायात भिंगरी आहे 
दिवसभर घरात गर गर फिरण्यासाठी.
तुझ्या पायात बांधले आहेत चाळ,
घरात घरात फक्त आमच्या मर्जीखातर नाचण्यासाठी,
आम्हाला काय हवं ... काय नको ते पाहण्यासाठी.
घरातल्या घरात घरभर गर गर फिरत जा.
घरातल्या घरात आमच्या तालावर नाचत जा !
यातच तुझं भलं आहे ....
आणि समाजाचं ही !

तू कधी विद्रोहाचा विचार ही करू नकोस
कारण तुझ्या दुसर्या पायात ...
आम्ही ठोकल्या आहेत बेड्या ... संस्कृतीच्या.
आता तूच ठरव ...
त्या तोडायच्या आहेत तुला ?
तोडायच्या तर खुशाल तोड ...
पण त्या आधी ध्यानात ठेव ....
तुझ्या पायातील या संस्कृतीच्या बेड्या तू तोडल्यास तर ...
तुला रस्त्या रस्त्यावर जे दिसेल ...
ते कदाचित आजच्यापेक्षा किती तरी जास्त विदारक असेल.

- रमेश ठोंबरे