May 20, 2014

हे… नववारी साडी न पोलकं

हे…  नववारी साडी न पोलकं
त्यात टपोरी टग्यांच टोळकं
मला माहित हाय हे सार
हे गाव लई मुलखाच बेरकं …. धृ


या गावाची रीत लय न्यारी
हात धरत्यात भरल्या दुपारी
नाही माहित होणार काही
कधी घेतील तुमची सुपारी
…. हे गाव लई मुलखाच बेरकं … १  


काय सांगू  ह्या गावाची गोष्ट
हे गाव लई खरच फास्ट    
याच भरलंय खरच पाप
याला लागलाय दुहीचा शाप
…. हे गाव लई मुलखाच बेरकं … २  


माझी इमेज हाय लय गोरी
करा खुशाल हवी ती चोरी
आता कश्याला करताय लेट
आज रातीला होवू दया भेट
…. हे गाव लई मुलखाच बेरकं … ३ 


मला भेटाया पाव्हणं थेट
जरा लावा कि इंटरनेट
पेन Drive लावून पुढं
करा व्हीडीओं डावूनलोड
…. हे गाव लई मुलखाच बेरकं … ४  




May 17, 2014

शेतकऱ्याच्या छातीवरचा घाम गझल

शेतकऱ्याच्या छातीवरचा घाम गझल
भगवंताच्या भव्य ललाटी 'नाम' गझल

व्याकूळ राधा शोधत फिरते चहुकडे
राधेच्या हृदयात हरवला 'शाम' गझल

शब्द पाळूनी पित्यास केले धन्य जरी
पुत्र शोभतो कौशल्लेचा 'राम' गझल

रोज उचलतो ओझे आम्ही बळे बळे
आवडते जर असेल तर ते काम गझल

भरली मैफ़ल सोडून जाणे सभ्य कसे ?
आयुष्याला ओतून बनतो 'जाम' गझल

मुक्त बनुनी स्वैर जाहले काव्य जरी
रदिफ़, काफिया, अलामतीवर ठाम गझल

- रमेश ठोंबरे

May 16, 2014

शोध - २


मी बंद करून घेतलंय स्वतःला
घनदाट काळोखाच्या खोलीत …
मी नाकारलंय इथल्या सूर्याला,
त्याच्या सुर्यकिरणांसहित
मला ऐकायच्या नाहीत स्वकीयांच्या हाका,
मला ऐकायच्या नाहीत परकियांच्या धमक्या.
मला नकोय,
झऱ्याच्या पाण्याचा खळखळ आवाज,
झाडांच्या पानगळीची सळसळ,
उघड्या अंगावर तापणाऱ्या उन्हाचा चटका,
थंडगार वार्याची अनाहूत झुळूक.
मी नाकारलंय या सगळ्यांना,
मी विसरू पाहतोय या जगाचं अस्तित्व,
स्वतःचा शोध घेण्यापुरत.

म्हणून मी बंद करून घेतलंय स्वतःला
घनदाट काळोखाच्या खोलीत …
पण … पण काळोख पिच्छा सोडतच नाही !
- रमेश ठोंबरे

May 7, 2014

- आभाळ फाटल्याची गोष्ट -


मी माझ्या आज्या पंज्याकडून 
अन त्यांनी त्यांच्या सात पिढ्यानकडून ऐकलीय
आभाळ फाटल्याची गोष्ट 
दावणीला बांधलेलं माणसाचं जगणं …. 
खुंटीला अडकवून ठेवलेलं भविष्य, 
अन रांगेत उभे असलेले अगणित, अनपेक्षित भोग.

हे सगळं सोबत घेवून जगत राहिलेत माझे पूर्वज 
संकल्प पूर्तीच्या स्वप्नाच्या बळावर
त्यांनी वेळोवेळी केलेले कितीतरी संकल्प
अधुरेच आहेत वर्षानुवर्षापासून ….

मी कधी भूतकाळात शिरलो कि,
तपासून पाहतो माझ्या पूर्वजांच जगणं
अधुऱ्या संकल्पांच्या डायरीची फडफडणारी असंख्य पानं
मी जवळ गेलो कि जखडून टाकतात मला त्यांच्या भूतकाळात,
मला जाणवू लागतं त्याचं उपेक्षित जग
त्यांच्या मनातली तगमग.

अन ते पुन्हा सांगू लागतात,
कधी ओलावा आटल्याची गोष्ट
तर कधी 'आभाळ फाटल्याची गोष्ट'

- रमेश ठोंबरे 

9823195889