Showing posts with label कवीच्या कविता. Show all posts
Showing posts with label कवीच्या कविता. Show all posts

Apr 15, 2015

कवीनं लिहू नयेत कविता

कवीनं लिहू नयेत कविता
गलिच्छ राजकारणावर …
अन नासवू नयेत आपले शब्द !

कवीनं लिहावं
उमलणाऱ्या कळीवर
गालावरच्या खळीवर !
फुलावर  पानावर … काळ्या रानावर.
खूपच दाटून आलं तर  
येणाऱ्या, नयेणाऱ्या पावसावर
एखाद्या निस्तेज दिवसावर.

कवीनं लिहावं स्वतःवर
स्वतःच्या हातावर.
खोलवर मातीत शिरून
मातीची कूस उजवनाऱ्या
नांगराच्या दातावर

खूपच भरून आलं तर ….
खोदत बसावा भूतकाळ,
ओढत राहावं वर्तमान ….
अन नोंदवून ठेवावं आपणच न पाहिलेलं भविष्य
आपल्या नंतरच्या पिढ्यांसाठी मार्गदर्शक म्हणून.

कवीनं लिहावं ….
वैष्णवांच्या दिंडीवर
माणसांच्या झुंडीवर
अन खूपच असह्यच झालं तर
बुधवार पेठेतल्या रंडीवर.
.
.  
भांडवलदारांच्या सुबत्तेवरही लिहू शकतो कवी
अंगठा बहाद्दरांच्या गुणवत्तेवरही लिहू शकतो कवी
इतकंच काय तर …
सध्य-परीस्थीती अन वर्तमानाचं भान म्हणून …
शेतकऱ्याच्या आत्महत्तेवरही लिहू शकतो कवी !
.
.
मतदानाच कर्तव्य म्हणून
एकदा बटन दाबून निर्धास्त व्हावं कवीनं
होवू द्यावेत देशाचे हाल …
पाहत राहावा जाती धर्माच्या नावाने चाललेला
स्वार्थाचा बाजार.
विसरून जावी शब्दांची भाषा,
विसरून जावा शब्दांनी युद्धे जिंकल्याचा इतिहास !
.
.
कवीनं जपावं आपल्या शब्दांना …
अभिजात मराठीच्या कोंदणात…,
अन झुलत राहावं शासन पुरस्कृत
साहित्य संमेलनाच्या मांडवाखालून.
पण ….
कवीनं लिहू नयेत कविता
गलिच्छ राजकारणावर …
अन नासवू नयेत आपले शब्द !



- रमेश ठोंबरे

Aug 2, 2013

अनुभूती


तुझं हळूच कुशीत शिरणं, 
रजईशी खेळणं, 
नाक, डोळ्यांचं चुंबन घेणं, 
कधी दोन्ही पाय अंगावर टाकणं,
ओठातल्या ओठात पुटपुटणं….
अन माझी जराशीच मान वळली,
दुर्लक्ष झालं कि ....
"माझ्याकडं बघा ना !" असं हक्कानं सांगणं,
आता चांगलच अंगवळणी पडलंय !

पुन्हा एकदा बालपणाची अनुभूती….
किती सुखद असते नाई ?

- रमेश ठोंबरे
(अनुभवसाठी…. )
www.rameshthombre.com

Nov 4, 2011

सावधान येथे कवी राहतो आहे !

थोडे जपून, थोडे सावरून ...
थोडे सावध पाऊल ठेवा.
थोडे शांत, निवांत ...
दुरूनच .... कानोसा घ्यावा.
खरच तो तुचीच वाट पाहतो आहे ,
सावधान येथे कवी राहतो आहे !

कालपासून अस्वस्थ आहे,
हजार फेऱ्या झाल्या.
श्रोंता कुणी मिळेना ...
कित्तेक कविता व्याल्या.
तुमच्यासाठीच हि वेदना साहतो आहे,
सावधान येथे कवी राहतो आहे !

काल भेटला एक प्रेमी
त्याच्या पुढे सर्व कविता वाचल्या,
तोही अगदी शांत होता
जश्या सर्वच त्याला कळत होत्या.
एक फ्यान मिळाला म्हणून आनंदे नाहतो आहे,
सावधान येथे कवी राहतो आहे !

एक भेटला ठार बहिरा
कानाचा करून पोहरा
दिवस भर सोसत होता....
डोळ्यांचे सुद्धा करून कान
सर्व कविता ऐकत होता.
बहिर्याचे हि भरून कान शब्द फुले वाहतो आहे,
सावधान येथे कवी राहतो आहे !

या असे इकडून या ...
घाबरू नका,
फार काही घेणार नाही ...
जास्त कष्ट देणार नाही ...,
आज तुमचीच वाट पाहतो आहे
सावधान येथे कवी राहतो आहे !

- रमेश ठोंबरे 
Ramesh Thombre 

Sep 4, 2011

शहीदांसाठी करणार काय ?


शहीदांसाठी आम्ही काय कराव ?
जे करायचे ते त्यांनी केलं.
ते त्यांच कर्त्तव्य होतं ,
म्हणुन आम्हाला स्वातंत्र्य केलं.

पारतंत्र्य त्यानीच घेतलं,
परकीयांना थारा देवून
स्वातंत्र्य ही त्यांनीच घेतलं
क्रांतीचा वारा पिवून.

ते विशेष कोणी नव्हते
फ़क्त आमचे पूर्वज होते.
परकियांच्या सोयीसाठी,
गुलामगिरीचे सावज होते.

टिळक, नेताजी आणि गोखले
चौका - चौकात उभे केले.
कसले शुर म्हणता त्यांना,
जे ट्राफिक पाहून घाबरले ?

गांधी, नेहरू आणि फूले,
नावे कित्येक रस्ते झाले.
तरी चिड्वुनी उगीच पुसता
म्हणे, विशेष काय तुम्ही केले ?

आम्ही त्यांची पूजा करतो,
कधी चुकून धरतो पाय,
या पेक्षा आणखी जास्त
शहीदांसाठी करणार काय ?

- रमेश ठोंबरे
Ramesh Thombre
(महात्म्याच्या कविता)