Showing posts with label पुस्तक परीक्षण. Show all posts
Showing posts with label पुस्तक परीक्षण. Show all posts

Jun 28, 2024

करुणेशी नातं सांगणारं 'उलट्या कडीचं घर'









आजच्या महाराष्ट्र टाईम्स मध्ये प्रकाशित Sunil Ubale  यांच्या कविता संग्रहाच मी केलेलं पुस्तकं परीक्षण. जागेअभावी बराच भाग edit झाला आहे...  संपूर्ण परीक्षण text स्वरूपात इथे प्रकाशित करतो आहे!

पत्रकार मित्र तुषार Tushar Bodkhe यांच्या सहकार्याबद्धल विशेष आभार!

.............................

करुणेशी नातं सांगणारं  'उलट्या कडीचं घर'

मी पुस्तक वाचत असताना नेहमीच एक पेन्सिल सोबत ठेवतो .... आवडलेल्या ओळी अधोरेखित करण्यासाठी... आज ही सोबत होती... पण ओळी अधोरेखित करता करता अख्खं पुस्तक रंगून गेलंय... असं अभावानंच होतं कधीतरी.    

‘मी कितीतरी इमारतीला 

लटकून मारलेत रंग

मी जमिनीशी नातं तोडून 

जगलो बऱ्याचदा’


‘लोकं भलेही लपवून ठेऊद्यात

सोनं ताळेबंद तिजोरीत 

म्या खेळत्या वयात भाकरीचे 

तुकडे लपवून ठेवले होते 

उद्याची उपासमार टाळण्यासाठी...’


अश्या काही ओळी वाचल्या की सुन्न व्हायला होतं आणि आपण जमिनीवर असतानाही जमिनीशी नातं सांगू शकत नाही असं वाटतं ... 

या ओळी आहेत सुनील उबाळे यांच्या, खरं तर ‘कवी सुनील उबाळे’ म्हणजेच आपल्या नावापुढे 'कवी' हा शब्द अभिमानानं अन जबाबदारीनं मिरवणाऱ्या कवीच्या. 


कवी सुनील उबाळे यांचा ‘उलट्या कडीचं घर’ हा कविता संग्रह अथक प्रयत्नानंतर नुकताच प्रकाशित झाला आहे. उबाळे यांच्या कवितांची भाषा अतिशय ओघवती आणि सहज आहे .... यात रूपक आहे, उपमा आहे, प्रतीकं आहेत तरी ही कविता कृत्रिमतेच्या आणि अनावश्यक कलात्मकतेच्या जवळही न जाता वाचकांच्या काळजाला हात घालते.        


कवीचं बालपण, कवीचं काम, पोटापाण्यासाठीचा संघर्ष, कुटुंब आणि भवताल हे साधेच विषय कवितेचे असतानाही कवीची भाषा वैश्विक वाटत राहते ही खरं तर या कवीच्या सांगण्यातली जादू आहे जी वाचकांना कवितेगनिक झपाटत जाते. 

     

सुतारानं चुकून दाराची कडी उलट्या बाजूनं लावावी आणि आजीनं कुठलंही स्तोम न माजवता ते बनचुकेपण बिनदिक्कत मिरवावं तसच आजीचं शहाणपण मिरवताना कवी म्हणतो ....


‘असंख्य तज्ञांचे दावे

उधळून लावलेस तू 

आणि

अजरामर केलंस माझं करंट जगणं

उलट्या कडीच्याघरात...’


आजीवर नितांत प्रेम असणारा कवी आजीचा शब्द नेहमीच प्रमाण मनात आलाय, त्या आजीच्या शब्दातून कविला जगण्याचं मर्म सापडत जात तेंव्हा ती निरक्षर आजी त्याला कुठल्याची तत्ववेत्यापेक्षा श्रेष्ठ वाटत राहते .... म्हणून ‘आजी’ या कवितेत कवी म्हणतो कि ....    


‘तिचा प्रश्न छोटाच होता

माझं आयुष्य कमी पडलं

त्याचं उत्तर शोधता शोधता’ 

...


‘ती दमून थकून बसायची 

घरात भिंतीना टेकून तेंव्हा,

त्या भिंतीनाही देवपण 

येऊन जायचं आपोआप’


कवी आपल्या सहचारीनिबद्दल लिहिताना म्हणतो कि,   


‘ती रोजंच वाटत असते पाट्यावर 

हिरव्या मिरच्यासोबत

तिचं नसीब’


तर कधी म्हणतो की,


‘तू घासातला घास भरवतेस अन

राहतेस अर्धपोटी हे कळतं मलाही 

पण 

तुला कळू देत नाही 

दिवस भिरकावून देतो 

पाण्यात दगड नाचवल्यासारखा 

आणि 

चिंतेचे वर्तुळं पोहचतात 

तुझ्या मनाच्या अथांग सागरापर्यंत’ 

 

पुढं एका कवितेत कवी आपल्यातलं कोणी तरी अचानक निघून गेल्याचं आणि एकटेपणाचं दु:ख मांडताना लिहितो कि,  


'तू निघून गेलास तेंव्हापासून 

सारेच म्हणायचे

आम्ही तुमच्या मागे आहोत 

पण 

..

कळत नाही एक माणूस निघून गेल्यावर 

आपलंच घर का पाठ्मोऱ्ह होतं

आपल्यासाठी'


अश्या असंख्य ओळी या संग्रहातून जागो जागी भेटतात ज्यांना ओलांडताना आपलं मन तिथेच कुठे तरी घुटमळत राहत कितीतरी वेळ ....

याच संग्रहातली ही एक कविता, यातली कुठली ओळ अधोरेखित करावी हे मला समजलं नाही .... प्रत्येक ओळ म्हणजे कविता आणि कवितेच व्याकरण आहे ही कविता म्हणून संपूर्ण कविताच इथे देण्याचा आगाऊपणा करत आहे ....


‘मी कबरी खोदल्यात स्मशानांत...’


ठेकेदाराच्या दावणीला बांधलेले दिवस सोडवून घेतले 

मुठभर काजवे सोडलेत अंधारलेल्या घरात 

कात टाकून सळसळण्याचा कित्येकदा 

केलाय प्रयत्न

दु:ख बिलगून राहिलं अंगभर 

कवितेसारखं

मी कबरी खोदल्यात स्मशानात

आणि 

झोपून बघितले मापा करीता 

मी वेदनेच्या तळाची मुठभर माती

खिश्यात ठेवली कायम 

माझ्या हसऱ्या चेहऱ्यामाग

आसवांचा पोळा असतो फुटलेला

माझ्या कविता भरल्या नदीत 

चाळणी लावून पकडतील खपाट पोटाची मुलं

मला जळूनही काही होणार नाही 

आणि 

पुरल्यानंतरही उगवेल मी 

मी कविता पाहिलेला जादुई माणूस आहे’ 


या कवितेतल्या कितीतरी ओळी उपमा, अलंकार आणि रूपकं आपसूक घेऊन आल्या आहेत असच वाटत राहत....  अशीच आणखी एक कविता या संग्रहात आहे ‘मांजराच पिल्लू आणि मी’ मुद्दामहून इथे देत नाही पण नक्की वाचा .... कवितेशी एकरूप झाल्यानंतर कवितेची भाषा कशी असू शकते याच उदाहरण आहेत या कविता. कवितेचे सगळे सगळे अलंकार पानोपानी लेवून या संग्रहातली एक एक कविता बाभळीची पिवळी हळदुली फुलं कानात घालून आपल्याच टेचात मिरवणाऱ्या निरागस मुली सारखी बागडत असते.   


कवी ‘शाळा’ नावाच्या कवितेत म्हणतो कि,  


‘हि कसली बेचैनी बांधून

नाचाया लागलो 

दारिद्र्याच्या अंगणात ...’


...‘एक पाटी एक पेन्सिल नव्हती 

माझं भविष्य लिहिण्यासाठी 

एक शाळा होती 

माझ्या कुटुंबाकडं पाठ फिरवलेली’


तेंव्हा वाटतं कि ज्याच्या कुटुंबाकडे शाळेने आजन्म पाठ फिरवलेली असताना आपल्या जगण्यातलं हे कमालीचं दुःख आणि कारुण्य एवढ्या जादुई शब्दात मांडणार कवी नेमका कुठल्या शाळेत शिकला असावा ?


संपूर्ण संग्रहात कवी व्यवस्थेवर बोट ठेवत असतानाही व्यवस्थेकडं बोट करत नाही, व्यवस्थेवर आग-पापड न करता आपल म्हणन मांडत जातो. पण स्वाभिमानानं जगणं इतकं सोपं थोडंच असत, तेंव्हा कवी म्हणतो,    

 


‘स्वाभिमान कुणाची भाकर 

होत नसतो

आत्मसन्मान गधड्याच्या 

दावणीला बांधून

जगावं लागतं हल्ली’ 


‘स्वभिमानापेक्षा गडद होत जातो 

आपल्या भुकेचा महाकाय प्रश्न’


आणि अश्या पिळवटलेल्या दिवसात कधी तरी संयम सुटतोच सुटतो, आणि तेंव्हा कसलीच भाषा न समजणाऱ्या व्यवस्थेवर कवी लिहितो,  


‘मी इथल्या व्यवस्थेच्या 

तोंडावर थुंकून

सांगून देईल

माझ्या आतील घुसमट’


भूक आणि भाकरीची लढाई कवी हार न मानता लढत असतो, त्याची तक्रार ही नसतेच खरे तर  ...  


‘हे रखरखतं ऊनही मला 

थांबवू शकलं नाही घरात

लेकरांच्या भूकेपुढे 

सूर्यही शीतल असतो’


‘मनाची भीती तर 

कधीच वाटली नाही 

पोट भरलेली लेकरं

पहिली की हा जन्म सार्थकी वाटतो !’


पण एक वेळ अशी येती कि पोटापाण्याच्या संघर्षाच्या दिवसांमध्ये जेंव्हा भाकरीचा प्रश्न मोठा होत जातो तेंव्हा कवी लिहितो की,  


'दिवसभर बैलासारखं राबल्यावरही

रात्रभर डोळ्याला डोळा लागत नाही 

आत्महत्तेची कितीतरी पत्रे 

लिहिली आणि फाडून टाकली 

बिनघोर झोपलेल्या मुलींना पाहून'


देशातला कामगार काय किंवा शेतकरी काय भाकरीचा आणि जगण्याचा प्रश्न बिकट झाला कि आत्महत्तेचा मार्ग निवडतात .... पण एक कवी कधीच आत्महत्या करत नाही ... त्याला त्याच्या ‘बिनघोर झोपलेल्या मुलींमध्ये’ त्याची कविता दिसत असते. 

इथे कवी सोबततर त्याची कविता असते ... पण त्याच्या वस्तीतल्या इतर कामगारांच काय होत असेल ... ते कोणाशी संवाद साधत असतील...    

 


तेंव्हा कवी लिहितो,  


‘व्यसनाने बरबटलेली असतात

हि मेहनतीनं लदबदलेली माणसं

दिवसभर बैलासारखं राबल्यावर

माणूस होणं शक्य नसतं

प्रत्येकालाच ....'

...

'मी कितीतरी दंश करून घेत असतो 

माझ्या अंगाखांद्यावर शब्दांचे 

हि कवितेची नशा उतरता कामा नये !’


जिथे अंग मेहनतीन दमलेली माणसांना नशेशिवाय पर्याय उरत नाही तेंव्हा ... कविसोबत मात्र त्याच्या कवितेची नशा असते, म्हणून कवीला त्याची कविता सुफी संतासारखी वाटते  


‘तू कित्येकदा भारून टाकलेत रस्ते माझे 

तू माझ्या डोक्यावर हात ठेवून 

फुंकर मारत असते एखाद्या 

सुफी संतासारखी’


म्हणून कवी म्हणतो कि माझ्या रितेपणात माझ्या सोबत कोणीच नसलं तरी कविता मला रीतं होऊ देणार नाही, मला एकटं पडणार नाही !  


‘जेंव्हा आपल्याकडे काहीच नसतं ना

कुणाला देण्यासाठी

तेंव्हा सापासारखी कात टाकून 

परकी होतात सारीच्यासारी नाती 


तुही थांबू नकोस,

परत जा आल्या रस्त्याने 

माझी कविता आहे तोवर

मला काहीच होणार नाही’ 


पुढच्या काही ओळीही असंच कवी आणि कवितेचं नात सांगणाऱ्या आहेत, प्रत्येक ४-८ ओळींमध्ये कवी नकळतपणे कवी– कविता आणि कवितेच्या पलीकडचं काहीतरी सांगत असतो ...

जसं की,  


‘रक्ताचं विष झाल्यावरही

जीभेतला गोडवा 

ठेवला कायम 

एक अदृश्य कविता 

माझा सांभाळ करत आहे ! 


शब्दाचं  ऍसिड अंगावर घेवून 

जाळून टाकलं स्वतःला 

तर

धमन्यात रक्ताएवजी 

कविता धावू लागल्यात !’


हे असलं काही तरी कवी कवितेच्या प्रत्येक ओळीतून सांगत असतो ... आणि आपण झपाटल्यासारखं वाचत राहतो ..


कवी म्हणतो की,   


'एक वैश्विक कविता 

लिहून झाल्यावर

मी पेटवून घेईल स्वतःला 

पैसच्या खांबासहीत

...

मी खांद्यावर कविता घेवून 

उभा राहिल

कुठल्याही लढ्याला 

माझ्या आतलं पिंपळपान काढून 

संपणार नाही माझ्यातली 

करुणा'


‘ही कवितेची भूक आणि करुणेची विरक्त भावना कुठून आली असेल कवीच्या कवितेत’ असलं काहीतरी आपण स्वतःलाच विचारत असतो तर कवी त्याच्या ‘वेदनेचे महाकाय जंगल’ या कवितेत लिहितो कि,  


‘मी माझ्याच पाठीवर, माझ्याच हातांनी

लिहून ठेवली, एक अजरामर कविता

जिला मी कधीच डोळे भरून 

पाहू शकलो नाही 

....

..

मी कधीच पाच बोटं, फिरवली नाही 

रांगोळीच्या असंख्य रंगावर

माझ्या काळजातून उडालेली 

फुलपाखरं

काळाच्या माथ्यावर भरतील 

समानतेचे रंग’


कवी त्याच्या माणूस नावाच्या कवितेत म्हणतो कि,  


'मी गमावून बसलोय 

सुख जिंकण्याची बाजी 

मी माती झटकून उठलेला 

माणूस आहे 

...

..

येथे वाहणारा वारा

आणि 

धावणारी माणसे राहतात 

मी जमिनीखालून रंगणारा 

माणूस आहे' 


मला तर या ओळी म्हणजे कधी कधी ‘दुःखाची ग्राफिटी वाटत राहतात !

आणि मग कवीच कधी कधी बुद्ध, ज्ञानेश्वर, तुकाराम तर कधी बहिणाई सोबतच आपलं नातं कवितेतून मांडत राहतो  


‘मी दगड झालो तर 

एखादा भाग होईल धरणाचा

जर पाऊस झालो तर

ओलाचिंब ठेवीन नदीचा पदर 

मला वाचू पाहणारे मेंदू

गंज लागुस्तर 

करतील समीक्षा 

मी बहिणाईच्या जात्यातून 

निसटलेली ओळ जगू पाहतोय !!’


कवितेविषयी कृतज्ञता व्यक्त करताना काय मागतो तर .... 


‘मी तुझ्या पायाची 

धूळ होतो, आहे आणि 

कायम राहिल,

तू फक्त माझ्या श्वासातून 

विभक्त होवू नकोस कधीही !’


आणि शेवटी आपली मुलींबद्दलच्या एका कवितेत कवी लिहितो कि,  


`माझ्या पोरी खेळल्या नाही कधी 

लाकडी घोड्यावर, पांगळ गाड्यासंग

त्याही खेळत आल्या भुकेशी लपंडाव 

परीस्थीशी केले दोन हात 

....

बाजारातून आणलेल्या खाऊसारखं

दुःख वाटून घेत असतो त्यांच्या संग

आणि 

त्याही फिरवतात हात माझ्या पाठीवरून 

माझ्या बापानं फिरवल्यासारखा...`


हे वाचताना नकळतच अभावाचं आणि करुणेचं एक वर्तुळ पूर्ण झाल्यासारखं वाटतं राहत उगाच !  


हा कविता संग्रह कैलास पब्लिकेशनने अतिशय दिमाखदार बनवला आहे. सरदार जाधव यांनी केलेलं संग्रहाच मुखपृष्ठ ही बोलकं आहे, मराठीतील महत्वाचे कवी आणि समीक्षक पी. विठ्ठल यांनी संग्रहाची पाठराखण केली आहे. एका हातांच्या बोटावर मोजन्यांइतक्या काही शुद्धलेखनाच्या आणि व्यकरणाच्या चुका सोडल्या तर ठळक असं काहीच उणेपण संग्रहात जाणवत नाही. हा कविता संग्रह मराठी साहित्यात नक्कीच महत्वाचा ठरणार आहे.


- रमेश ठोंबरे (संभाजीनगर) 

मोबाईल. ९८२३१९५८८९ 

---------------------------------------------------------------------------------------------------------------

कविता संग्रह : उलट्या कडीचं घर 

कवी : सुनील उबाळे 

प्रकाशक : कैलास पब्लिकेशन्स

पृष्ठ संख्या : ११५

किमत : १५०

May 22, 2018

कोषांतर : एका हिरकणीचा गझल प्रवास


"हिरकणी इतकीच फरफट रोज होते
फक्त अमुचा पाठ अभ्यासात नाही"

सुप्रिया जाधव यांचा हा शेर काही वर्षांपूर्वी मी वाचला  आणि त्याच क्षणी तो विलक्षण आवडला, बालभारतीच्या पुस्तकातील 'कोणासाठी .... बाळासाठी' अश्या काहीतरी नावाचा पाठ क्षणात आठवला, क्षणात आठवली अभेद्य कडा उतरून बाळापर्यंत पोहचणारी हिरकणी... आणि दुसरीकडे पुन्हा डोळ्यासमोर आली आजची स्त्री, तिची होणारी फरफट... आणि या वेळी ग्रामीण आणि नागरी स्त्री हा भेद सुद्धा शिल्लक न राहता तो एक अखिल स्त्री वर्गाची फरफट मांडणारा शेर ठरतो. हे सगळं या शेरात फार प्रभावीपणे आलं आहे.

सुप्रिया जाधव यांच्या गझला या पूर्वीही मी वाचल्या होत्या, त्यांच्या कविता तर मी ओर्कुटच्या जमान्यापासून वाचत आहे. त्या कवितेकडून गझलेकडे वळल्या.... सुरुवातीच्या गझलतंत्र शिक्षणापासून ... सुरुवातीच्या साधारण गझलपासून त्यांच्या आजच्या तरल आणि उत्कृष्ट गझल लिखाणाचा मी मूक साक्षीदार आहे.
*
पाच शेरांची गझल मागू नको तू
लाख दुःखे सोसल्यावर शेर होतो
*
हा शेर वाचला आणि मी एकदम भूतकाळात गेलो .... सुप्रिया जाधव यांच्या आयुष्यात आलेलं दुर्दैवी वादळ आणि त्या वादळांन मुळापासून हदरवलेलं त्यांचं भावविश्व ...डोळ्यासमोरून सरकत गेलं... या वादळात एक दुःख, एक सल कायमची त्यांच्याकडं आली आणि यातून काही अंशी त्यांना बाहेर काढण्याच काम गझलेनं केलं. त्यांच्या संवेदना या दरम्यान आणखी प्रगल्भ झाल्या, जबाबदाऱ्या वाढल्या, आणि एक सल कायम बोचत राहिली. जो अर्ध्यावर सोडून गेला तोच आता मनात रुंजी घालू लागतो, त्याच्या आठवाणीत कधी जगणं असह्य तर कधी सुसह्य होत जातं....

हा शेर पहा

सुमार आहे दिसायला मी कबूल करते
विचार त्याचा मनात येतो सुरेख दिसते !

खूप सुंदर आहे .... अजून काही सांगायलाच नको !
या संग्रहात तो / त्याचा विचार मधून मधून भेटत राहतो ....या संग्रहाला सुंदर बनवत जातो ...

आणखी काही शेर
*
जेंव्हा त्याच्या अस्तित्वावर घेते संशय
तेंव्हा तेंव्हा तो असल्याचा येतो प्रत्यय
*
माझ्या तुझ्या नात्यातले पावित्र्य सांभाळू असे
तू देव गाभाऱ्यातला मी देवळाची पायरी
*
रोज पहाटे स्वप्नामध्ये
तो साराच्या सारा येतो
*
त्याच्यावर मिसरा सुचताना
मोरपीशी शहारा येतो
*
तू असल्याच्या आभासांवर तगले आहे
तुझ्याविना मन रमवायाला शिकले आहे

जाणून आहे कुणी कुणाचे नसते येथे
येउन बघ ना कुठे कशी भरकटले आहे
*
कुठुनही पोचते त्याच्याचपाशी
कधी संपायच्या ह्या येरझारा ?

दिसत नसला तरी आहेच आहे
तुझ्या श्वासांवरी त्याचा पहारा
*
डोळ्यात फार माझ्या शोधू नका स्वतःला
वसते अजून तेथे त्याची छबी गव्हाळी
*

या सगळ्या शेरांमधून तो कायम डोकावत राहतो.... त्याचं ते गझलेत येत राहणं अपरिहार्य आहे .. ही गझल त्याच्यामुळेच इतकी सुंदर आणि तरल आहे.
पण बऱ्याचदा त्याचं पुन्हा पुन्हा हे डोकावत राहणं, दु:खावरची खपली काढत राहणं, हे त्याच डोकावणं तिचं आयुष्य असह्य आणि एकसुरी बनवतय का ? याचं उत्तर सुद्धा ती शोधण्याचा प्रयत्न करते .... तेंव्हा लोकांचे डोळे बोलत राहतात ....

*
म्हणाले लोक,त्याच्यावर पुरे झाले सतत लिहिणे
म्हणाले दुःख , येऊ देत जे भंडावते आहे
*

पण त्याच्यावर लिहिणं बंद केलं, त्याचं हे डोकावणं बंद झालं तर काय होईल आणि मुळात हे शक्य आहे का ?

त्याचं उत्तर तिला माहीत आहे .... पण लोकांसाठी ते देणं गरजेचं आहे ...
*
गझल होते पोरकी माझी स्वतःला
नेमका उल्लेख त्याचा टाळल्यावर
*
त्याच्या उल्लेखाशिवाय ही गझल पोरकी आहे आणि हे पुन्हा पुन्हा हा संग्रह वाचताना जाणवतं.

पण हे सगळं स्वतःच दुःख, जगणं मांडताना गझलकारा बऱ्याच ठिकाणी ते इतक्या त्रयस्थपणे मांडते की ते तिचं वयक्तिक न राहता समस्त स्त्री वर्गाचं जगणं आणि भोगण होतं ! इंग्लिश मध्ये सांगायचं तर 'most personal is most universal' असं काहीतरी होत जातं

खाली दिलेले काही शेर याची उत्तम उदाहरणं आहेत

*
शेजेवर ती जिवंत जळते
घरात जेंव्हा सरपण नसते
*
उर्मिला विरहात जळते एकटीने
जानकीचा गाजतो वनवास नुसता

उर्मिलेच्या दुःखाच, उर्मिलेच्या विरहाच हे अस उदाहरण अभावानेच वाचायला मिळू शकतं, या शेराला अनेक कंगोरे आहेत, दुःख, विरह, विद्रोह, घुसमट .... आणि अश्या कितीतरी पीडित स्त्रियांचं मूक रुदन या शेरात अत्यंत समर्थपणे मांडलं आहे.

अशी अनेक उदाहरण या संग्रहात आहेत ... ज्यात स्त्रीचं जगणं अतिशय समर्थपणे मांडलं गेलं आहे. खाली आणखी काही उदाहरणं दिली आहेत

*
तिसरीच कोणी जन्मले मी ही
त्याच्या चितेवर वेगळी गेली
*
युगांची सोसली असणार घुसमट
टिपेला पोचला होता तिचा स्वर
*
असावा दोष अपुल्या कुंडलीचा
मिळाला जन्म हा ताटातुटीचा
*
विझू घातला सवतीमत्सरही शिलगवते
सिगारेटचे थोटुक त्याच्या ओठांमधले
*

स्त्री जीवन मांडताना ते किती वेगळ्या पद्धतीनं मांडलंय हे खूप महत्वाच आहे, ते कुठं ही अंगावर येत नाही, विद्रोह असला तरी त्यात आक्रस्ताळेपणा जाणवत नाही. बऱ्याच ठिकाणी प्रतिकांचा आणि प्रतिमांचा खूप चपखल पद्धतीने वापर केला आहे त्यामुळं हे शेर मनाच्या कोपऱ्यात घर करून राहतात, विचार करायला भाग पडतात.
*
उजवीकडे, डावीकडे ताटात नक्की मी कुठे ?
पक्वान्न आवडते तुझे की फक्त तोंडीलावणे ?
*
पाहिले आहे तिचा मी धूर होताना
आगपेटीतील काडी पेट घेताना
*
एका शुल्लक पण पेट घेतल्यावर तितक्याच प्रखर वाटणाऱ्या कडीपेटीच्या काडीचं दुःख जास्त वेदनादायी असेल की एका पीडित स्त्रीचं ! होवू शकते का तुलना ? नाही !

'त्याच्या' शिवाय 'तीच' जगणं, काय आणि कसं असू शकतं हे एका स्त्री शिवाय कोण मांडू शकतं ?  दुर्दैवानं सुप्रिया जाधव यांच्या वाटेला आलेल्या अनुभवानं हे या संग्रहातून अतिशय समर्थपणे मांडल्या गेलं आहे आणि मराठी गझलेला समृद्ध करणार आहे. तो सोबत नसताना या समाजात स्त्रीचं एकटीच जगणं म्हणजे अतिशय खडतर परीक्षा आणि रोजचा संघर्ष आहे.

हे एकाकीपण आणि इथल्या नजरा साहताना गझलकारा खूप आतलं आणि बोचरं सत्य मांडते

*
शाकारल्या मनाचे छप्पर उडून जाते
दररोज एक वादळ दारावरून जाते
*
वेल ही वृक्षाविना दिसल्याबरोबर
ओंडका अन ओंडका बहरून आला

पांढरे होताक्षणी हे भाळ माझे
रंग दुनियेचा खरा समजून आला
*
ही फार बिकट परिस्थिती आहे, एकट्या बाईकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन बऱ्याचदा वाईटच असतो, ही बाब गझलकारा अतिशय ताकदीने मांडते आहे. हे मांडत असताना योजलेल्या प्रतिमा अतिशय चपखल आहेत.
*
तो गेल्यावर गाडी अडली
जात दाखल्यावरची नडली

स्थान दिले मी मनात त्याला
मग नेमाने वारी घडली
*
ताकदीने घेतला मी उंच झोका
चांदवा हातात आपणहून आला

खूप सुंदर शेर आहे हा, अगदी मिसर्यातल्या 'आपणहून' आलेल्या शब्दसारखा हा संपूर्ण शेर आला असावा असं वाटून जातं.
*
वाट एकाकी निघाली निग्रहाने
सोबतीची खुमखुमी जिरली असावी
*
गती संपली संपला गोडवाही
कशास्तव नदी सागराला मिळाली ?

असे शेर हाच या गझल संग्रहाचा खरा गोडवा आहे, जे काही मांडायचं ते अतिशय समर्थपणे मांडले आहे, हे मांडताना कुठे ही पसरटपणा किंवा शब्दबंबाळपणा जाणवत नाही.

*
पुस्तकांची जाहली पारायणे
माणसांचे राहिले वाचन तुझे

चाल माझी वाटते उलटी तुला ?
सोड बाबा सोड शीर्षासन तुझे
*
वेदना रक्तात थोड्या ओत माझ्या
जीर्ण झाला जाणिवांचा पोत माझ्या
*

गळतानाही गिरकी घेते
लोभसवाणी दिसे पानगळ

अतिशय लोभस शेर आहे, वाचताच क्षणी प्रेमात पाडणारा, सृष्टीच्या सूक्ष्म निरीक्षणाला जीवन मूल्यांची जोड देवून मांडलेला, जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याची शिकवण देणारा.

तसं पाहिलं तर कवयित्रीला अतिशय नाजूक परिस्थितीतून जावे लागूनही या संपूर्ण गझल संग्रहाचा मूड सकारात्मक आहे. स्त्री मनाला बोचणाऱ्या बऱ्याच गोष्टी अत्यंत संयत शब्दात मांडल्या आहेत, जे वाचता क्षणी वाचकाच्या संवेदनांना विना ओरखडा स्पर्शून जातं आणि विचार करायला भाग पाडतं.

संग्रहातील ओळ न ओळ (मिसरा) वाचनीय आहे, नेटकं मनोगत, अभ्यासपूर्ण आणि अनौपचारिक प्रस्तावना (भूषण कटककर), मार्गदर्शक पाठराखण (म.भा. चव्हाण) इत्यादी. संपूर्ण गझल संग्रहाच्या निर्मितीवर अतिशय मेहनत घेतलेली पानोपानी दिसून येते, संग्रहात कुठे ही टायपो अर्थात छपाई किंवा व्याकरणातील दोष दिसून आले नाहीत. या संग्रहाशी जोडल्या गेलेली नावं ही या क्षेत्रातील अतिशय प्रथितयश आणि अभ्यासू मंडळी आहेत त्यामुळे हा गझल संग्रह सगळयाच दृष्टीने संग्राह्य आणि नवीन गझल लिहिणाऱ्यांसाठी तसेच सभ्यासकांसाठी मार्गदर्शक आहे.

लिहिण्याच्या ओघात बरेच शेर इथे दिले गेले आहेत, आणखी किती तरी (एकूण 100 गझला आणि 60 सुटे शेर) अप्रतिम शेर आणि गझला या संग्रहात पानोपानी वाचकांच्या मनाचा ठाव घेण्यास सज्ज आहेत, त्या सर्वच बाबींवर इथे लिहिणे शक्य आणि योग्यही नाही म्हणून शेवटी आणखी काही सुटे शेर देऊन थांबतो !

" पाच शेरांची गझल मागू नको तू
लाख दुःखे सोसल्यावर शेर होतो"

-  हे जरी खरं असलं तरी संग्रहात शेवटी दिलेल्या सर्वच सुट्या शेरांना त्यांची हक्काची गझल सुद्धा मिळो अशी इच्छा व्यक्त करून सुप्रिया (ताई) जाधव यांच्या पुढील लेखनास शुभेच्छा देतो !
*
एक तर दुष्काळ दे किंवा मला वाहून ने
पावसा तू सोसवत नाहीस रे मध्यम मला
*
लागला नाही सुगावा वादळाचा
मी किनारे गाठले असते कदाचित
*
आता नवी जागा बघा माझ्याकडे राहू नका
देताय दुःखानो तुम्ही भाडे तसेही वाजवी
*
राहू दे कोळ्याचे जाळे
घर त्याचेही बनते आहे
*
पिशवीमध्ये एकच पालेभाजी आहे
निघून गेल्या दिवसांची सय ताजी आहे
*
दोन सरींच्या मधे चालते
ठक्क कोरडी उरण्यासाठी
*
मलाही नाव दे तू घेतलेल्या औषधाचे
मला विसरायचे आहे तुला मी भेटल्याचे
*
भासलेलेे चिवट पण तुटलेच नाते
तन्यता सरतेच ... इतके ताणल्यावर

---------------------------------------------
गझल संग्रह : कोषांतर
सुप्रिया मिलिंद जाधव
पृथ्वीराज प्रकाशन, पुणे
पृष्ठे : 128
किंमत: 150/-
- रमेश ठोंबरे




Oct 14, 2013

"मनाच्या काठावरून"... मन-गाभाऱ्यात ...


'मन' या विषयावर कितीतरी साहित्य आजपर्यंत अनेक भाषांमध्ये आले आहे आणि येतच आहे. "मन म्हणजे न सुटणारा गुंता तर कधी उलगडता उलगडता कोड्यात टाकणारे कोडे, ज्याचा थांग विज्ञानालाहि लागला नाही ! मन म्हणजे कोणासाठी कुतूहलाचा, तर कोणासाठी संशोधनाचा विषय. जिथ कित्येक पुस्तकांचा वाचून चोथा करणाऱ्या शिक्षिताला मनाच्या आसपास हि भटकता येत नाही तिथ बहिणाईसारख्या जिवनाच तत्वज्ञान जगण्याच्या शाळेत शिकणाऱ्या, तुमच्या आमच्या दृष्टीने अशिक्षित असणार्या कवियत्रीला मनाचा थांग लागतो !

परवाच्या डोंबिवली मेळाव्यात Manisha Silam 'मनीषा सिलम' यांचा 'मनाच्या काठावरून' या कविता संग्रह हातात पडला. मुखपृष्टाच देखणेपण आधीचा मनात भरलं होतं आणि आत्ता संग्रह वाचण्याची उत्सुकता होती…!

'काठावरून डोहात उतरताना ….' असे शीर्षक असलेली 'अशोक बागवे' यांची अतिशय बोलकी प्रस्तावना या पुस्तकास लाभली आहे, प्रस्तावना वाचतानाच आपल्या हातात कवियत्रीने कुठल्या आशय आणि विषयाच्या कविता ठेवल्या आहेत आणि त्याचा दर्जा काय असणार आहे याची काल्पना येते. 

एकूण ४९ रचनांमधून मनीषा सिलम यांनी मनाचे पदर उलगडण्याचा प्रयत्न या कवितासंग्रहात केला आहे. 'अपूर्णता' या रचनेत त्या सुरवातीलाच म्हणतात …. 
'प्रत्येक अपूर्णतेला पूर्णत्वाची आस आहे 
खर तर पूर्णत्व हाही एक भासच आहे !' … किती बोलक्या ओळी आहेत या 
कवियत्री पुढे सांगते कि, सगळ्याच गोष्टी पूर्ण करायच्या नसतात… कारण अपुर्नतेलाहि एक वेगळ मोल असत.

'कैफ' नावाच्या कवितेत कैफ फक्त सुखाचाच नसतो तर दु:खाचाहि एक कैफ असतो , म्हणूनच आपण बर्याचदा आपलं दु:खच गोंजारत बसतो. कारण ते सेफ आणि चिरंतर आहे !

'मनातलं मुल' हि कविता अतिशय सुंदर आहे, मला आवडली ! 
कारण ती वाचताना मला माझ्याच एका कवितेतील ओळी नकळत आठवल्या 
" तुमच्या आमच्या मनात 
एक तान्ह मुल रांगत असतं, 
मी अजून लहान आहे … 
हेच नव्याने सांगत असतं" 
आणि या सोबतच आठवली पाडगावकरांची जिप्सी हि रचना !
आपल्या मनात लपलेल लहान मुलाच निष्पाप मन याच वर्णन करून 'ज्यांन त्यानं जपावं आपल्यातलं लहान मुल' असा अतिशय मोलाचा सल्ला हि कविता देते.

'नरक' या कवितेत संवेदनशील मनाची घुसमट मांडली आहे, समाजसेवेच्या नावाखाली, हार तुरे मिरवणारे नेते असोत कि सामाजिक कार्यकर्ते किंवा सिग्नल वर एखादा आशाळभूत चेहरा पाहून त्याच्या हातावर दोन रुपयाचे नाणे ठेवणारा सामान्य मानूस …आपल्या सगळ्याची समाजसेवा हि याचा मार्गाने जाते आणि इथेच संपते. आपल्याच सारखे काही विचारवंत यावर पानभर लेख लिहितात किंवा प्रसवतात एखादी वांझोटी कविता, जी कधीच यांच्यापर्यंत पोचत नाही, खावू च्या खालचा कागद होवून ! त्यामुळे कवियत्री इथे एक व्यथा मांडते कृतीशिवाय होत असलेल्या प्रयत्नाची, हि कविता आहे त्या भुकेल्या जीवनासाठी, ज्यांच्यासाठी मुलभूत गरजा भागवणे हाच सर्वात मोठा प्रश्न आहे. इथे कवियत्री नकळत जेंव्हा दोन सामाजिक स्तरावर जावून तुलनात्मक विचार करू लागते तेंव्हा, तिला एकीकडे दिसतात भुकेसाठी वणवण करणारी कोवळ्या वयात कामाला लागलेली हात, तर दुरीकडे दुधातुपात न्हाणारी उच्चभूंची लेकरं ! आणि हे सगळ कवियत्री अतिशय कमी शब्दात आणि समर्पक रित्या मांडते हेच या रचनेच वैशिष्ट्य आहे. 

पुन्हा एकदा पाडगावकर माझ्या मनात डोकावतात (कवियत्रीच्या मनात डोकावले असतील का ?) जेंव्हा मी …. 
"आयुष्य कस ? 
ज्याला जसं 
उमगलं तसं … " या ओळी वाचतो 
वेगळ्या फोर्म मधली कविता आहे, आयुष्याविषयीचे तत्वज्ञान अगदी सोप्या आणि मोजक्या शब्दात मांडते हि कविता. 

'शाप' 
हि इन-मीन दहा ओळींची कविता … पुन्हा एकदा आयुष्या विषयी बोलते , शाप कुठला असू शकतो … जमिनीवर घट्ट पाय रोवण्याचा कि आकाशात भरार्या न घेण्याचा ? कि वर्तमानात जगण्याचा !

'जग हे संधीसाधूंचे' या कवितेतून एक धाडसी विधान कवियत्रीने केले आहे, आजची परिस्थिती पाहता याचा प्रतेय हि पावलो पावली येतो. प्रत्येकजन मुळात संत असतो पण त्याच्या मनात एक रावणही निद्रिस्त अवस्थेत असतोच असतो …. आणि त्याला संधी मिळायलाच अवकाश तो जागृत होतो … आता काही लोक अश्या कितीतरी संधी सोडतात हि …. म्हणूनच कवियत्री पुढे म्हणते कि, 
" संधी मिळायलाच अवकाश कि,
गरीब वाटणारा माणूसहि 
बनतो हुकुमशहा !"

पुढील एक रचनेत दु:ख आणि पावूस यांची साथ कशी असते हे रेखाटले आहे, 

"ज्याची तिची राधा अन 
जिचा तिचा कृष्ण" 

"नाती तुटताना आवाज होत नाही"

"कुठल्या हि गोष्टीचा प्रवास सुंदरच असतो… 
पण हे आपल्याला प्रवास संपल्यावरच उमगतं …"

अश्या किती तरी सुंदर ओळी पुढील कवितांमधून वाचनात येतात आणि … 
मनाच्या काठावरून फेरफटका मारताना आपण … "मन गाभार्यात प्रवेश करतो …." आणि कविता संग्रह संपतो… !

एक विलक्षण उत्सुकता बाकी राहते… मन गाभार्यातल्या काळोखातील मनाचे पदर आणखी उलगडले जायला हवे होते असते वाटते … पण कदाचित वाचकाची हि उत्सुकता …. कवियत्रीने जाणूनच वाढवली आहे, त्यामुळे 'मनीषा सिलम' यांच्या पुढील लेखनात आपल्याला मनाचे आणखी काही पदर उलगडताना दिसतील अशी आशा करायला काहीच हरकत नाही 

कविता संग्रह वाचून संपवला आणि 
पुन्हा एकदा 
कधी "मन वढाय वढाय" 

तर कधी 
"मन काळोखाची गुंफा
मन तेजाचे राऊळ
मन सैतानाचा हात
मन देवाचे पाऊल" 

या प्रसिद्ध गीतांच्या ओळी मनात फेर धरत गेल्या 

हा छोटेखानी कवितासंग्रह अतिशय सुंदर झाला आहे … मात्र आणखी काही कविता यात हव्या होत्या असे वाटते, मुखपृष्ठ चांगले आहे. 
पुढील संग्रहासाठी काढताना या कवितांसाठी वापरलेला टाईप (फोन्ट) टाळून … साधा फोन्ट घ्यावा जो (संपूर्ण प्रस्तावनेसाठी वापरला आहे) आणि पुस्तकाचा कागद न्याचरल शेड चा असल्यास कवितासंग्रह आणखी देखणा होईल. 

कविता संग्रह : मनाच्या काठावरून 
कवियत्री : मनीषा सिलम 
प्रकाशक : उद्वेली बुक्स, ठाणे 
मुल्य : ८० रु. 

- रमेश ठोंबरे