Showing posts with label ग्रामीण साहित्य. Show all posts
Showing posts with label ग्रामीण साहित्य. Show all posts

Dec 12, 2018

पत्रोत्तर


मित्रा,
तुझे पत्र मिळाले
तू मजेत आहेस हे समजले.
आम्ही ही इकडे मजेत आहोत ....
फरक फक्त हाच की मागच्यापेक्षा ....
यावेळीचा उन्हाळा जरा जास्तच कोरडा आहे.
तु म्हणतोस, ‘गावाकडं यायचंय ...’
‘‘कशाला येतोस ?
फार उशीर झाला आहे रे आता ..
आपण दिवसभर डुंबायचो ती विहीर
कधीच आटली आहे.
पुर्वी नवविवाहीता मोठ्या विश्वासाने
पाणी भरायच्या त्या विहीरीवर...
दरम्यानच्या काळात त्यातील कित्येकजणींनी
आत्महत्या केलीय .. त्याच विहीरीत उडी घेऊन.
तू म्हणतोस ...
ती विहिरीवरची ‘मोट’ही कधीच लुप्त झालीय,
अन् त्यासोबत पाटाच्या पाण्याचा झुळझुळ आवाजही.
झाडाखालची आपली शाळा, आता पार बदलून गेलीय.
आख्खं आयुष्य शाळेसाठी देणारे देशपांडे मास्तर गेले,
तेव्हा आठवणं आली होती तुझी ...
कारण तू म्हणायचासं ‘मास्तर, मी पण मास्तर होणार,
आपल्या शाळेत शिकवणार’
आता शाळेत कित्येक सर आहेत...
पण एक मास्तर भेटत नाहीत !
आपण दिवसभर ज्याच्याभोवती हुंदडायचो
तो पिंपळपाराचा कट्टा नावापुरताच उरलाय
अन् कट्टयावचा पिंपळही कधीच इतिहासजमा ठरलाय.
म्हातारी खोडं आता कट्ट्यावती बसत नाहीत...,
खोडं एकटीं कारण नातवंही सोबत दिसत नाहीत.
कधीकाळी भल्या पहाटं खांद्यावर फावडं टावूâन
निघणाऱ्या शेतकऱ्याची तरुण पोरं ...
आता दिवसभर गावातच फिरत असतात ...
कधी या झेंड्याखाली तर कधी त्या झेंड्याखाली.
भविष्य हरवलेल्या खेड्यागत.
मित्रा,
तू मागे सोडून गेलास ते तुझं गाव...
आज तुला सापडेलच असं नाही.
अन् माझं म्हणशील तर...
मीही आज कुणाला माझ्या गावाची ओळख देत नाही.
तू गाव सोडलंस तेव्हा अडवलं होतं मी तुला...
मोठ-मोठ्या आदर्शाच्या गोष्टी सांगून.
तू ऐकल नाहीस ... निघून गेलास ...
गावं मागं सोडून ... तुझ्यासोबत कित्येकजणांना घेऊन ...
मी राहिलो इथेच ... प्रत्येकाला विरोध करतं,
आदर्शाच्या गोष्टी पेरत.
मित्रा,
तू जिंकलास
मी हरलोय !
वाईट फक्त एकच वाटतय की,
तू सोडून गेलास ते तुझं गाव...
मी तुला परत देऊ शकत नाही.’’
- रमेश ठोंबरे

Aug 15, 2018

ओल

सगळं उन्हाळी काम यंदा ट्रॅक्टर वर उरकलं होतं. मागच्या सहा महिन्यात दशरथ नानानं जवळपासचे सगळे जनावराचे बाजार पालथे घातले पण, मानाजोगी बैलजोडी मिळाली नाही म्हणून सगळीकडून परत आला.  बैलजोडी तरी कशी पसंत पडणार, ज्या त्या बाजारात तो गुण्या-सोन्यालाच बघायचा. गुण्या-सोन्या त्याच्या नजरं आड होत नव्हते.  बाजारात नवीन जोडी बघीतली की नाना तिची गुण्या-सोन्या सोबत तुलना करायचा. शेवटी निराश होऊन रिकाम्या हातानी आन भरल्या डोळ्यांनी घरला परतायचा. मागच्या सहा महिन्यांपासून हे आसच चाललं होतं. कुणीतरी कुठल्यातरी बाजाराचा ठेपा आणायचा. नाना पैश्याची थैली उचलायचा. बाजाराला जायचा अन पुन्हा संध्याकाळी रिकाम्या हातानं घरी परत यायचा. बैलजोडी तरी कशी पसंत येणार ! सोन्या-गुण्याच्या आठवणी अजून नानाच्या काळजात ओल्या होत्या. नानाला त्या विसरणं शक्य नव्हतं. बैलजोडी जराशी पसंत पडली की, मनात तुलना व्ह्यायची ...अन काहीतरी कारण सांगून नाना सौदा सोडून द्यायचा.

पेरणीचे दिवस जवळ आले होते. बैलजोडी वाचून सगळी मशागतीची कामं खोळंबली होती. शेत नीट करणं, नांगरट घालणं सगळं तसच होतं. नानाची मानसिकता रामाला कळत होती पण आजूबाजूला सगळ्या लोकांची मशागतीची कामं जोरात सुरू होती अन आपलं शेत मात्र अजून तसंच पडून होतं. आजवर नाना स्वतः पुढाकार घेऊन काम करून घ्यायचा, लहाना मुलगा रामा दिवसभर राबायचा. मोठा शिवा बीडच्या कॉलेजात वकिलीचं शिक्षण घेतो. महिन्या पंधरा दिवसाला गावाकडं आला की तो सुद्धा दिवसभर राबतो. सगळे मिळून काम करतात म्हणून शेत सोनं पिकवतं. नानाला दहाबारा एकर जमीन ! पण जमीन नंबर एकची, मेहनतीला फळ देणारी. उन्हाळ्याचे दोन तीन महिने सोडले तर पाण्याखाली असणारं शेत. उन्हाळ्यात तेवढ दोन तीन महिने हिर तळ गाठते. माणसांना आणि जनावरांना पिण्यापूरतच पाणी हिरीला रहायच. हाहा म्हणता उन्हाळा सरायचा. शेतीची मशागत संपायची आणि पावसाचं आगमन व्हायचं. सगळ्या शिवारात पेरण्यांची लगबग सुरू व्हायची अन आठवड्यात पेरण्या उरकून झाल्या की पुढच्या आठ दिवसात काळं रान नवं रूप घेवून हिरवं व्ह्यायचं.

औंदा सुद्धा सगळीकडं अशीच लगबग सुरू होती, पण मागच्या वर्षी गुण्या-सोन्याला गमावल्यापासून दशरथ नानानं हाय खाल्ली होती. गुण्यासोन्या बिगर शेतात त्याचं मनच लागत नव्हतं. रामान मागच्या महिन्यापर्यंत बापाच्या बैलजीडीची वाट बघीतली आणि नंतर बापाला काही न बोलताच सरळ जिल्हा बँकेतून कर्जाची जुळवाजुळव करून एक दिवस ट्रॅक्टरच दारात उभं केलं. नानींन ट्रॅक्टर ची पूजा केली. शिवानं नारळ फोडलं. सगळ्या भावकीत प्रसाद वाटला. दशरथ नानाच्या पोरानं गावात ट्रॅक्टर आणल्याची बातमी सगळ्या गावात पसरली ! नानाच्या अन पोरांच्या मेहनतीचं गावातल्या जुन्या खोडानी कौतुक केलं. दुसऱ्या दिवसापासून ट्रॅक्टरनं गुण्या-सोन्याची जागा घेतली. गुण्या सोन्याच्या दावणीच्या जागेत आता ट्रॅक्टर दिमाखात उभं राहू लागलं. आधुनिकतेनं परंपरेवर मात केली की परंपरा इतिहासजमा व्हायला लागतात. इथं तर परंपरेनच जागा मोकळी करून दिली होती मग आणखी काय वेगळं होणार होतं ?

आता ट्रॅक्टर आल्यावर पोरांना नव्यानं उत्साह आला होता. मोठा शिवा सुद्धा भावाला मशागतीसाठी अन पेरणीसाठी मदत म्हणून कॉलेजला दांडी मारून आला होता. दुसऱ्या दिवशी दोघं भाऊ ट्रॅक्टर घेऊन तालुक्याला गेले. ट्रॅक्टरसाठी लागणारं डिजल, आईल काय काय ते सारं महिनाभर पुरंल एवढं एकदाच घेवून आले. पुढं एकदा कामाला लागलं की पेरणी करूनच दम घ्यायचा असं ठरवलं होतं. मोठं टीपाड भरून डिजल आणलं, कॅन भरून आईल आणलं. सगळं गोठ्यात ठिवलं. शेणामातीच्या गोठ्याला आता डिजलचा वास येऊ लागला. परंपरेच्या खुणा अजूनच धूसर होवू लागल्या.

दुसऱ्या दिवशी सकाळीच नव्यानं डिजल पेलेलं ट्रॅक्टर  धड धड करीत शेतावर हजर झालं. आजूबाजूचे पोरं सोरं काम धंदे सोडून बैलाच्या जागेवर ट्रॅक्टर कसं काम करतंय ते बगायला आले. रामान पुन्हा एक नारळ फोडलं, आर्ध बंधावरच्या देवाला ठेवलं, एक तुकडा झाडाखाली बसलेल्या नानाला दिला, नानाच्या पाया पडला. बाकीचं नारळ जमलेल्या पोरांना दिलं. दोघा भावानं मिळून ट्रॅक्टरला नांगर जोडला. ट्रॅक्टर चालू झालं. एक एक तास घेत ट्रॅक्टर रान नांगरू लागलं. आतापर्यंत दिसलं नाही असं काळंखप्प रान दिसू लागलं. दशरथ नाना लांब सावलीला बसून सारं बघत होता. आता बैलांचा प्रश्न मिटला होता, काम सुरू झालं होतं. आता या शेतात कधीच गुण्या-सोन्या दिसणार नाहीत ह्या ईचारांनं नाना आतून गलबलून गेला होता. पोरांचा दोष नव्हता, पण हे सगळं इतक्या लवकर घडल अस नानाला वाटलं नव्हतं. काळाशी जुळवून घ्यायला नानाचं मन आजही तयार नव्हतं.

नारळाचा तुकडा तोंडात टाकून गुडघ्यावर हात देऊन नाना उठला बांधाबांधान शेताच्या दुसऱ्या बाजूला आला, अन जास्त चालवलं न गेल्यानं कोपऱ्यातल्या लिंबाच्या झाडाखालच्या बारक्या जुळ्या समाधीला पाठ लावून बसून राहिला. इकडं त्याच शेताच्या तुकड्यावर रामा शिवाच ट्रॅक्टर रान तय्यार करण्याच काम सुरू होतं, ते समोर पाहात असतांनाच नानाच मन भूतकाळात जातं.....

त्यादिवशी असच तय्यार झालेल्या रानात, मोठ्या उत्साहात पेरणी सुरू होती. आठ दिवसापूर्वी चांगला पाऊस झाला होता. सगळीकडं पेरणीची कामं सुरू होती. नानाची पेरणी सुद्धा आता उरकत आली होती. तो पेरणीचा शेवटचा दिवस होता. गुण्या सोन्या हिमतीनं तिफण ओढत होते, नाना चाड्यावर हात धरून चालत होता. रामा शिवा मदत करीत होते, मागच्या चार दिवसांपासून पेरणी सुरू होती, त्या आधी पंधरा वीस दिवस शेत तय्यार करण्यासाठी गुण्या सोन्या जुंपले गेले होते. आज सकाळपासून गुण्याचं अंग गरम लागतं होतं, त्याला नीट चालता येत नव्हतं. नानाच्या लक्षात आलं होतं पण शेवटचा दिवस होता पेरणीचा, म्हणून नाईलाज होता. एकदा पेरणी संपली की तालुक्याचा डॉक्टर आणून औषधपाणी करू असा विचार करून, गुण्या सोन्याच्या अंगानं काम सुरू होतं. सोन्यासुद्धा जमेल तेवढ गुण्याच्या बाजूनं घेत होता. ऊन डोक्यावर आलं होतं, दुपारच्या जेवणाची वेळ झाली होती, पेरणीचा शेवटचा फेरा बाकी होता म्हणून शिवा घागर घेऊन हिरीवर गेला होता. इकडं नानांन शेवटचं तास घेतलं, पेरणी संपली, अन गुण्यानं अंग टाकलं. नानाच्या पायाखालचं रान सरकलं. नाना रामा गुण्याजवळ आला, जू बाजूला केलं. गुण्याच्या तोंडातून फेस निघतं होता, पायांची हालचाल मंदावत चालली होती. 'गुण्या काय आलं रं, उठ की ! बघ संपली आपली पेरणी, बघ शेत कसं दिसतंय, उध्या धान उगवून येईल बघ ! बघणार नाही व्हय तू !' आस म्हणून नाना गुण्याच्या गळ्यात पडला. सोन्या सुद्धा सौरभर झाला होता. हिरीवर गेलेला शिवा सगळी गडबड बघून हातात भरलेली घागर घेऊन धावत पळत आला . 'पाणी पाजा रं माझ्या गुण्याच्या कुणी तरी पाणी पाजा ! लय काम घेतलं रं माझ्या लेकरा कडून म्या' असं म्हणून नाना राडू लागला. गुण्याची हालचाल बंद झाली, रडारड ऐकून बाजूचे लोक जमा झाले. त्यातल्याच जाणकारांन तपासून गुण्याची प्राणज्योत मदावल्याच सांगितलं, अन नानाच्या दुःखाला पारावर राहिला नाही. त्यादिवशी नाना खूप रडला, अख्या जिंदगीत कधी रडला नसलं एवढा !

गुण्या गेला, नानानं त्याचे सगळे विधी केले अगदी घरातल्या नात्याचं कुणी गेल्यागत, पण दुर्दैव इथंच थांबलं नाही, गुण्याच्या जाण्याचा धोसरा जसा नानान घेतला तसाच कदाचित त्याहून जास्त सोन्यान घेतला, त्यानं अन्न पाणी सोडलं ! नानांन त्याच्यासाठी लय प्रयत्न केले, तालुक्याहुन डॉक्टर आणला, इंजेक्शन, औषध नाही नाही ते केलं. जाणत्या जुंनत्याला दाखवलं पण काहीच फरक पडत नव्हता. हे अंगचं दुखणं नव्हतंच !

गुण्या सोन्या सख्ये भाऊ, एका गायीचे गोरे ! सोबत राहिलेले, सोबत वाढलेले ! कामाला वाघ होते, आख्या पंचक्रोशीत त्यांचा डंका होता. लहान असल्यापासून नानाच्या देखरेखीत त्यांचं सगळं व्हायच. वैरण पाण्यापासून कामापर्यंत नाना सगळं स्वतः करायचा. पोरं बैलाला मारतेत म्हणून स्वतः औत हकायचा, स्वतः शेत करायचा. रामा शिवा पेक्षा जास्त प्रेम होतं त्याचं गुण्या सोन्यावर !

नानानं सगळे प्रयत्न केले पण त्याच्या प्रयत्नांना यश आलं नाही, ते येणार सुद्धा नव्हतं करण नानाला सोन्याचं दुखणं माहीत होतं. माणसं आपलं दुःख बोलून हलकं करतात पण मुक्या प्राण्यांना ती ही सोय नसते, त्यांचं दुःखं फक्त डोळ्यातून झरत राहतं आणि ते देखील नाना सारख्या लाखातल्या एखाद्यालाच समजतं ! सोन्या सुध्दा गेला ! त्या दिवशी नाना दिवसभर त्याच्या सोबत बसून होता ! त्याच्या डोळ्यात  पाहून त्याच्याशी संवाद साधत होता. दिवसभर गोठ्यात झोपून असलेल्या सोन्यान नानाच्या मांडीवर तोंड ठेवून प्राण सोडले. नानांनं टाहो फोडला ! आसमंत गहिवरून गेला, पुन्हा गावकरी जमले, पुन्हा विधी झाले ! नानाचा गोठा रिकामा झाला ! तसा नाना सुद्धा रिकामा आला, त्याला दिवस खायला उठत होता ! दिवस दिवस नाना शेतात एकाच जाग्यावर बसून राहायचा. आभाळात डोळे लावून दूरवर एकटक पाहत राहायचा !

गुण्या सोन्याला जाऊन वर्ष होतं आलं होतं पण त्यांचं आठवणीनं नाना पार कोलमडून गेला होता, कुठलंच औषध काम करीत नव्हतं .... नाना कुणाशी बोलत नव्हता .... आपल्याच तंद्रीत तासंतास बसून राहायचा !

आज सुद्धा तेच चाललं होतं, शेतात ट्रॅक्टर सुरू होत अन नाना कोपऱ्यात लिंबाच्या मोठ्या झाडाखाली असलेल्या जुळ्या दगडी समाधीला पाठ देऊन
डोळे आभाळात लावून बसला होता. रामा ट्रॅक्टर चालवत होता, शिवा नांगरटीत ट्रॅक्टरच्या माग माग फिरत होता. दोघं भाऊ नव्या उत्साहानं कामाला लागले होते. समाधीच्या रानाची नांगरणी उरकली होती, इकडं ऊन डोक्यावर आलं होतं म्हणून दोघं ट्रॅक्टर बांधाच्या बाजूला सावलीत लावून नानां बसलेल्या लिंबाच्या झाडाजवळ आले. शिवानं झाडाच्या फांदीला बांधलेलं भाकरीचं धुटं सोडलं आन, 'चला नाना जेवून घ्या, नांगरट संपत आली बघा !' म्हणत नाना जवळ गेला. नानाचे डोळे अजून सुद्धा ढगातच होते. 'नाना आहो काय म्हणतोय मी, जेवायचं नाही व्हय !' शिवान पुन्हा विचारलं. नानाचा काहीच प्रतिसाद नव्हता. शिवान रामाकडं पाहिलं तसं रामा जवळ आला,'नाना काय झालं !' असं म्हणून त्यान नानाच्या खांद्याला हलवलं .... अन नाना त्याच्या अंगावर कोसळला ! दोघं भाऊ घाबरून गेले ... नाना नाना करून हलवू लागले ... पण नानाचा काहीच प्रतिसाद नव्हता ....तो शांत झाला होता ...! त्याच्या गुण्या - सोन्यासारखा त्यांच्याच समाधीजवळ त्यांच्यातच विलीन होऊन गेला होता.

गुण्या-सोन्या अन शेत म्हणजे नानाच विश्व होतं, जगणं होतं, गुण्या सोन्याच्या जाण्यानं त्याचा श्वास कोंडला होता तो मोकळा आला. समृद्धी वेगळी आणि समाधान वेगळं, गुण्या सोन्या सोबतचं जगणं अभावग्रस्त असलं तरी नानाला समाधान देणारं होतं, गोठ्याला येणाऱ्या शेणामातीच्या पारंपरिक सुगंधात त्याची ऊर्जा द्विगुणित व्हायची. शेत अन गुण्या सोन्याचं वैरणपाणी करतांना नानाचा दिवस भरगच्च असायचा, गुण्या सोन्याच्या जाण्यानं नानाचा दिवस मोठा झाला अन नानाला एक एक दवस ढकलन कठीण झालं होतं रिकाम्या गोठ्यात अधुनिकतेनं ठाण मांडलं होतं अन परंपरेची ओल सुकून गेली होती !

आज चार वर्षे झाली नानाच्या जाण्याला, पोरांनी बापाच्या आठवणीत नानाची समाधी सुद्धा त्याच कोपऱ्यात लिंबाच्या झाडाखाली गुण्या सोन्याच्या जुळ्या समाधी शेजारी बांधली आहे ! दुपारच्या वेळी रणरणत्या उन्हात जवळवून जाणाऱ्या अनोळखी वाटसरूला डेरेदार लिंब खाणावू लागतो अन वाटसरूचे पाय विनासंकोच विनासायास झाडाकडं वळतात, पाय विसावा घेतात, भाकरीचं धुटं सोडलं जातं, थंडगार पाण्यानं उन्हाचा आत्मा शांत होते रखरखत्या उन्हात चैतन्य सळसळायला लागतं. समाधीला पाठ लागली की अनोळखी रणरणत्या मनात परंपरेच्या आठवणींची ओल झिरपायला लागले !

- रमेश ठोंबरे

May 6, 2017

कीर्तन आणि कीर्तनातील दृष्टांत !

कीर्तन आणि कीर्तनातील दृष्टांत !
वय कुठलंही असो, अगदी शाळकरी किंवा जक्ख म्हातारपण ....आणि शिकवण सुद्धा कुठलीही असो चांगली किंवा वाईट.... ती उदाहरणाशिवाय आपल्या पचनी पडत नाही हे अंतिम सत्य आहे, आपल्याला दृष्टांत लागतो तेंव्हाच समजत .... पण हि सुद्धा एक चांगली गोष्ट आहे, नाहीतर ... पुराण काळापासून काही गोष्टी काळाच्या कसोटीवर सिद्ध झालेल्या असताना त्याकड दुर्लक्ष करून .... सगळं काही होऊन गेल्यावर ... स्वतःच्याच उण्यापुऱ्या अनुभवातून चांगला वाईट दृष्टांत घेण्यात तरी काय अर्थ आहे !
कीर्तन, हि वारकरी सांप्रदायातुन आलेली आणि मोठा इतिहास असलेली महाराष्ट्रातील लोक प्रबोधनाची परंपरा आहे. 'समाज तमाशानं बिघडला नाही आणि कीर्तनानं सुधारला नाही' हे वरवर सत्य जरी वाटत असलं तरी काही मोजक्या समाजावर या गोष्टींचा नक्कीच परिणाम होत असतो, म्हणून स्वतःत बदल घडवून घेणाऱ्या आणि नीतिमत्ता जिवंत असणाऱ्या समाजावरच हे जग उभं आहे ! कीर्तन ऐकणे हा माझा आवडीचा छंद आहे, पूर्वी लहान असताना आजोबांच्या धाकाने आणि नंतर नंतर सवयीने मला कीर्तनाची गोडी लागली. कीर्तनातील नामस्मरण, कीर्तनातील वाद्यांचा नाद, कीर्तनातील अभंग, कीर्तनातील दृष्टान्त आणि विशीष्ट एका अभंगाभोवती उभे राहिलेले कीर्तन हा एक श्रवणीय सोहळा असतो. मी नववी दहावीला असेपर्यंत हा योग नियमित यायचा पुढे शिक्षणामुळे आणि अभ्यासामुळे गावाकडे जास्त राहता आले नाही. तरीही जमेल तेंव्हा त्याकाळी आकाशवाणीवरून प्रसारित होणारे कीर्तनाचे अनेक कार्यक्रम मी आवर्जून ऐकत असे, या नंतरच्या काळात मात्र, वर्ष-वर्ष असा योग्य जुळून येत नव्हता, आणि अलीकडच्या काळात तर योगा योगानेच हे शक्य व्हायचं ! असो
मी कीर्तनाकडं आकर्षित होण्याचे अनेक कारणं आहेत, किर्तनातलं कथाकथन, किर्तनातले उदाहरणं, कीर्तन सांगणाऱ्या महाराजांचा वाचिक आणि कायिक अभिनय, टाळ - मृदूंगाचा नाद आणि सहकाऱ्यांचा भक्तीमय जल्लोष. शाळेत असताना आमचे गुरुजी सांगायचे कीर्तनकाराला, गायन, नर्तन, अभिनय यासारख्या आणखी कितीतरी कला अवगत असाव्या लागतात. तो हजरजबाबी असावा लागतो, एकपाठी असावा लागतो, श्रोत्यांची नाडी ओळखून प्रभोधन करणारा अवलिया असावा लागतो एवढच नाही तर लेखक, कवी आणि कथाकार सुद्धा असावा लागतो, ! शाळेत शिक्षक जसे एखादं विधान समजून सांगण्यासाठी तितकंच चपखल उदाहरण द्यायचे तेच काम कीर्तनातील दृष्टांत करत असतात, मला आजही आठवतंय नागरिकशास्त्र विषय शिकवताना आमच्या शिक्षकांनी दिलेलं उदाहरणं. विधान होतं, 'एक वस्तू एखाद्यासाठी चैनीची वाटते पण तीच वस्तू दुसऱ्यासाठी गरजेची असते !' आता विधान उधारणाशिवाय सांगितलं तर त्या वयात तरी समजण्यासारखं नव्हतं, म्हणून गुरुजींनी शेतकऱ्याचं आणि डॉक्टरचं उदाहरण दिलं. कार ही शेतकऱयांसाठी चैनीची वस्तू आहे पण डॉक्टरसाठी तीच कार किती गरजेची असते हे वेगळं सांगायला नको. (पुढे विध्यार्थी बदलत गेले पण शिक्षकांचा दृष्टांत कित्तेक वर्ष तोच राहीला म्हणे !)
मागे एकदा, एका कीर्तनकारांनी असाच छान दृष्टांत दिला होता. महाराज म्हणाले, 'मी रस्त्याने चाललो होतो तेवढ्यात मला एक शाळकरी मुलगा भर उन्हात भलंमोठं दप्तर पाठीवर घेऊन सायकलला ढकलत जाताना दिसला. मी त्याला थांबवून विचारल, 'बाळा काय झालं, असं सायकल ढकलत का चाललास ?', मुलगा बोलका होता म्हणाला, 'आहो महाराज बघा कि सायकल पंचर झालीय !, आता पंचर काढावं लागल !' मी म्हणलं 'आर कशाला वेळ घालवतोस, हवा मार टायरात अन जा शाळेत'. पोरानं माझ्या धोतर पटक्याकडं पाह्यल अन म्हणलं , 'तसं नस्तय महाराज ते, पंचर काढलं नाय तर, भरलेली हवा थोड्या वेळात पुन्हा निघून जाईल. मग हवा भरून काय फायदा ? हवा भरलेली टिकायला पायजे असलं तर पंचर काढावं लागल !' एवढी गोष्ट सांगून महाराज मूळ मुद्द्या कड वळतात आणि श्रोत्यांना सांगतात, 'कीर्तन ऐकायला आलेल्या तुम्हा श्रोत्यांमध्ये ज्ञान, भक्ती आणि शक्तीची हवा भरणं हे कीर्तनकाराचं काम आहे पण मुळात श्रोता हा पंचर असता काम नाही !' ठ ल विठ्ठल विठ्ठल !
आणखी एक छान दृष्टांत आहे .... 'सत्याचरण' या विषयावर 'नुसतं चांगलं बोलून चालत नाही तर स्वतः सुद्धा चांगलं वागलं पाहिजे' हे सांगणारा. एक गोष्ट सांगितले जाते अध्यात्मात तुकारामाच्या जीवनातील म्हणून सांगितली जाते तर मोटिवेशनल प्रोग्राममध्ये गांधीजींच्या जीवनातली म्हणून सांगितले जाते. माझ्या माहिती नुसार गांधींच्या आत्मचरित्रातली असावी. (जाणकारांनी मार्गदर्शन करावे) एकदा एका मुलाची आई मुलाची तक्रार घेऊन गांधीजींकडे आली आणि म्हणाली, "बापू हा मुलगा खूप गुळ खातो ... आता याला तुम्हीच काहीतरी सांगा." गांधीजींनी तक्रार फक्त ऐकून घेतली आणि ... त्या दोघांना आठ दिवसांनी पुन्हा यायला सांगितले. आई आणि मुलगा तेंव्हा निघून गेले. आठ दिवसांनी परत आले. पुन्हा आई म्हणाली 'आता सांगा ऐकलं तो तुमचं तरी'. गांधीजी शांतपणे पाहत त्या मुलाला म्हणाले, "बाळा जास्त गुळ खाऊ नकोस, गुळ खाल्ल्याने पोटात जंत होतात" एवढं सांगून त्या मुलाला जायला सांगितलं. आता, त्या बाईला काही समजेना ती म्हणाली 'बापू, इतकंच सांगायचं होतं तर मग आठ दिवस कश्याला लावले, तेंव्हाच सांगायचे होते !" बापू म्हणाले, " आठ दिवसांपूर्वी मी सुद्धा गुळ खात होतो ! ..... म्हणुन तेंव्हा मला हे त्याला सांगण्याचा अधिकार नव्हता .... आता मागच्या आठ दिवसात मी गुळ खाणे सोडले आहे !" तर हे आहे सत्याचरन, त्यावरील हा उत्तम दृष्टांत !
तर असे हे कीर्तनातले दृष्टांत, आणि हे सगळं आता आठवायचं कारण म्हणजे काहीदिवसांपूर्वी, ११ वी - १२ वीला माझा वर्गमित्र असलेल्या आणि प्रबोधनाचं कीर्तन करत असलेल्या अशोक महाराज गेंदले यांचं कीर्तन इथे औरंगाबाद येथे असल्याचं समजलं, मित्राला कीर्तनातून ऐकण्याची पहिलीच संधी होती म्हणून मी हा कीर्तन सोहळा ऐकण्यासाठी गेलो होतो, छोटेखाने कार्यक्रम पण हळूहळू करत भरपूर श्रोते जमले होते आणि कीर्तनसुद्धा रंगात आलेलं होतं. या वेळी 'संत-संगतीचा महिमा, किंवा सद्गुणांच्या संगतीत आल्यानं काय होतं हे सांगताना महाराजांनी दोन दृष्टांत दिले ते अगदीच सडेतोड होते. एक दृष्टांत होता पुराणातला, जो कीर्तन ऐकायला बहुसंख्येने उपस्थित असलेल्या स्त्रियांना समोर ठेवून असावा ..... दृष्टांत रामायणातील .... रावण सीतेला पळवून आणतो ... अशोक वनात ठेवतो ... विचार असतो सीतेशी लग्न ...! पण रावण असला तरी, सीतेच्या संमत्तीशिवाय तिच्याशी लग्न त्याला मान्य नव्हतं, म्हणून तो रोज येऊन सीतेची नानाप्रकारे मनधरणी करायचा ... साम, दाम, दंड, भेद असे सगळे मार्ग अवलंबून झाल्यावर तो पत्नी मंडोदरी कडे गेला, या कामी पत्नीची काही मदत होते का हे पाहण्यासाठी त्यांन मंडोदरीला 'तुझा पत्नीधर्म म्हणून, मला सीतेला वश करण्यासाठी काही तरी उपाय सांग', असे सांगितले. तेंव्हा मंदोदरी म्हणते ! 'नाथ आपण सगळे उपाय करून थकला असाल तर आता एक करा, परकाया प्रवेश .... तुम्ही असेही सोंग घेण्यात माहीर आहात ... तर मग तुम्ही रामाचेच सोंग घेऊन तुमचं लक्ष का साध्य करत नाही ?' ... हे ऐकून रावण शांत आणि निराश झाला .... म्हणाला, 'मंदोदरी.... तुला असं का वाटतं कि मी हा उपाय केला नसेल म्हणून, मी ते हि करून बसलोय .... ! ..... पण ... हे काय होतंय समजत नाही .... मी रामाचं सोंग घेतलं कि माझ्यातली वासनाच नष्ट होते आणि जे मला करायचं ते मी करू शकत नाही !'' .... .... ... ... ... ... .... तर महाराज हे आहे सद्गुणांच्या सानिध्याची ताकद, नुस्त रामचं सोंग घेतलं तरी रावणाचा खरोखर राम होतो .... मग सद्गुणांचं आचरण केल्यास तुमच्यात बदल हा होणारच ! म्हणून संतसंगती महत्वाची !
महाराजांनी दिलेलं दुसर उदाहरण होतं जरा अलीकडच्या काळातलं, सिनेमा आणि अध्यात्मातलं, इ.स. १९३६ मध्ये 'संत तुकाराम' हा मराठी चित्रपट प्रदर्शित झाला, या चित्रपटाने त्यावेळी देश विदेशात अनेक विक्रम केले हा चित्रपट भारतात एका चित्रपटगृहात तर वर्षभर सुरू होता. हा त्या वेळचा एक उच्चांक होता. खरी गोष्ट तर पुढेच आहे या चित्रपटात तुकारामांची भूमिका केली होती विष्णुपंत पागनीस यांनी, ज्या भूमिकेने पुढे त्यांना अजरामर केलं. त्यावेळी चित्रपट प्रदर्शित झाला. चित्रपट अजरामर झाला. चित्रपटाने चांगला धंदा सुद्धा केला, आता वेळ होती कलाकारानचं मानधन द्यायची, त्याकाळी चित्रपट काढणंच खरं म्हणजे दिव्य असायचं त्यामुळे कलाकारांचं मानधन हे बहुतेक वेळी चित्रपट प्रदर्शित झाल्यावरच मिळायचं, इथेतर चित्रपट गाजला सुद्धा होता म्हणून निर्माते सुरवातीला विष्णुपंतांकडे आले, मानधनाचं पाकीट समोर ठेवलं म्हणाले, 'महाराज, हे आपलं मानधन !', चित्रपटातिल तुकारामाच्या भूमिकेनंतर निर्माते विष्णुपंतांना 'महाराज' म्हणत असत. पाकीट पाहून विष्णुपंत म्हणाले, 'मानधन.... ? मी घेणार नाही.' ...
निर्माते म्हणाले ... "महाराज, ठरल्या पेक्षा दुप्पट आहे !". विष्णुपंत म्हणाले "तरीही घेणार नाही !. आता निर्मात्यांना काही कळेना ... त्यांना वाटलं, चित्रपट इतका गाजला, चित्रपटाने जास्त धंदा केला म्हणून पंतांना जास्त मानधनाची अपेक्षा असणार ..., "म्हणाले चारपट देतो... आतातरी घ्या !'. या नंतर विष्णुपंत शांतपणे म्हणाले, "ज्या निर्मोही तुकारामाच्या भूमिकेनं मला अजरामर केलं, त्या भूमिकेसाठी मी मानधन घेवू ? मी मानधन घेणार नाही ! " निर्मात्यांनी हि त्यांनी घेतलेल्या भूमिकेला मान दिला. विष्णुपंतांनी भूमिकेसाठी तुकारामांचा वेष परिधान केला आणि त्या चित्रपटा दरम्यान ते तुकाराम जगले, नंतर ते खऱ्या अर्थानं विरक्त झाले ! आज खऱ्या तुकारामहाराजांचा फोटो देहुतही उपलब्ध नसताना आपण जे फोटो सर्वत्र पाहतो पुजतो ते फोटो सुद्धा विष्णुपंत पागनीसांचे आहेत, हि त्यांच्या अभिनयाची आणि संत संगतीची किमयाच नव्हे काय आणि याही पुढची गोष्ट म्हणजे ज्या भूमिकेवर रसिकांनी इतकं प्रेम केलं त्या तुकारामाचा वेष त्यांनी शेवटपर्यंत उतरवला नाही, ते शेवटपर्यंत तुकारामांच्याच वेषात वावरले !
म्हणून महाराज म्हणतात 'सद्गुणांच सोंग जरी घेतलं तरी ते त्या माणसात उतरतात, म्हणून भक्ती करा .... संत संगती करा, ठ ल विठ्ठल विठ्ठल !"

- रमेश ठोंबरे

Jul 29, 2016

देव देव म्हणत्यात, दिसत कसा नाही ?

देव देव म्हणत्यात, दिसत कसा नाही ?
अश्या कश्या देवापुढं झुलत्यात गायी ।। धृ ।।

पावसाचा थेंब न्हाई पोळलेलं जिन्ह
घोटभर दुधाविना रडतया तान्हं
घासभर खाण्यासाठी चाले वणवण
ज्याला त्याला पोटावर बांधण्याची घाई ।। १ ।।

आया बाया भेदरल्या साव झाले गुंड
डोळे गेले गरदीचे गाव झालं षंढ
सावित्रीच्या लेकी पुन्हा विसरल्या बंड
न्हाण आल्या घरामंदी कोमेजली जाई ।। २ ।।

छान छौक वाढली अन सोकावली पोरं
खाटकाच्या दाराम्होर बांधलेली ढोरं
काम नको घाम नको नादावली चोरं
गाव पडलं ओस इथं शहराच्या पायी  ।। ३ ।।

नदी नाल आटून गेली, आटली र ओलं
गावाची या बदलली रंग ढंग चाल
नाती-गोती इसरली, तुटली र नाळ
तुझ्या माझ्या जगण्याची झाली म्हसनखाई ।। ४ ।।

देव देव म्हणत्यात दिसत कसा न्हाई ?

Mar 30, 2016

माती


वर्षभरानं कधीकाळी
मी शहरातून माझ्या गावात येतो तेंव्हा,
भिरकावून देतो पायांना बंदीस्त करणारे शूज,
श्वास दडपून टाकणार्या स्वाक्ससह
अन सताड उघड्या पायांनी....
फिरून घेतो अक्खा माळरान.
इथल्या मातीच्या ढेकळांनी
सोलवटून घेतो माझे पाय.
.....
.....
कधीकाळी मातीतून जन्मलेला हा देह
पुढं कधीतरी मातीत मिसळताना...
या मातीलाच परका वाटू नये म्हणून !
- रमेश ठोंबरे

Oct 24, 2015

इन्स्पेक्शन


गावात डांबरी सडक झाली तरी आज सुध्दा धुरळा उडवितच एस.टी.गावात येते. नदीच्या पलीकडची एस.टी. कोरड्या नदीवरचा पुल ओलांडून आलीकडं पुढं आली की गाव लागतं. आज कित्येक वर्षांपासून कोरडीठाक पडलेली नदी कधीकाळी पुराच्या पाण्यानं ओसंडून वाहायची, पावसाळ्याच्या दिवसात तर पुलावरुन पाणी वाहायचं. रात्रभर पाऊस पडला की दुसऱ्या दिवशी शाळेला सुट्टी मिळायची एक-दोन  दिवसांसाठी गावचा संपर्क तुटायचा. गावची सगळी पोरं किमान अर्धा दिवस तरी नदीवर हुंदडत रहायची, म्हशी पाण्यात बसाव्यात तशी दिवस-दिवस पाण्यात डुंबायची.... पण आज तीच नदी कित्तेक वर्षांची तहानलेली आहे. ‘हा पुल नेमका कशासाठी ?’ असा प्रश्न कोण्या नवख्या माणसाला पडावा इतकं नदीच पात्र अरुंद झालयं, नदी तिचं अस्तित्वच हरवुन बसलीय. अशा या कोरड्याठाक नदीच्या दगडी पुलावरुन एस.टी. धडधड करत आली की, वीस पंचेवीस मीटरवर थांबते ते गावचं एस.टी.स्टँड. स्टँडच्या आजुबाजुला बारीक बारीक टपऱ्या, पंक्चरचं दुकान, वारकाचं दुकान, एकाद दुसरं किराणा मालाचं दुकान एवढंच काय ते गावचं आधुनिकीकरण. बाजुलाच प्राथमिक शाळेच्या चार दोन खोल्या, दोन मास्तरांनी आन् साठ-सत्तर पोरांनी भरलेली शाळा. शाळेच्या पटांगणातच एका कोपऱ्याला सरकारी हापसा. अर्ध्या  गावाची भिस्त याच हापस्याच्या पाण्यावर असल्याने या हापस्याला कधीच उसंत नसते मध्यरात्रीचे कधीचे तरी चार-पाच घंटे आणि राष्टगीताचे बावन्न सेंकद ऐवढाच काय तो त्याचा विसावा, नाहीतर दिवस-रात्र धाड-धाड आवाज करत हा संथ गतीनं जमेल तसं आणि जमेल तितकं पाणी ओकत असतो. शाळेची प्रार्थना सुरु असली की अर्ध्या पोरांच लक्ष हापस्यावरच्या माणसांकड, कुणाची आई, कुणाची बहीण, कुणाचा भाऊ नित्यानं हापस्यावर हजर असायचे आन् आपलं कुणी दिसलं की लक्ष वेधुन घेण्यासाठी पोरांचे चाळे सुरु व्हायचे. राष्ट्रगीत सुरु झालं की हापस्याचा आवाज बंद व्हायचा अन् हापस्यावरची माणसं शांत उभी रहायची, पण दांड्यावरचा गडी इतकी अधीर असायचा की इकडं ‘भारत माता की…. ’ म्हणलं की तिकडं हापसा ‘जय!’ म्हणायचा.

गावची ही अशी बारक्या पोरांची बारकी शाळा अन् अर्ध्या गावाची तहान भागवणारा हा हापसा यांच एक अतुट नातं होतं, कुण्याच पोरांचा आई-बा स्पेशल वेळ काढून शाळेत यायचा नाही, हापस्यावर आला की मास्तर बोलवून घ्यायचे अन् हालहवाल पुसायचे. मास्तर वर्गात शिकवायचे तेंव्हा अर्धे पोरं हापस्याच्या आवाजाला कान लावून असायचे. हापस्याच्या लहान मोठ्या आवाजाच्या ठेक्यावर पोरं हापस्यावर कोण आलयं याचा आंदाज बांधायचे. कान बाहेर ठेवलेल्या पोराच्या डोक्याच्या दिशेन मास्तर खडूचा तुकडा फेकायचे आन् भानावर आलेले पोरगं कान अन् डोक्यासगट वर्गात हजर व्हायचं.

चार खोल्यांची, साठ-सत्तर पोरांची अन् दोन मास्तरांची ही शाळा म्हणजे गावकरी, मास्तर अन् शाळेतले पोरं सगळ्यांसाठी निव्वळ टाईमपास होती. वर्ग सुरु असतानांच गावकरी, सरपंच, पोलिस पाटील कोणीतरी थेट बाहेरुनच मास्तरांना हाक द्यायचे. त्यातल्या त्यात हुशार पोराच्या हातात वर्ग देऊन मास्तर बाहेर जायचे ते थेट शाळा सोडायलाच यायचे, तोवर शाळेतले पोरं-पोरी वर्ग डोक्यावर घ्यायचे अन् दुसरे सहशिक्षक डोक्याला हात अन् फुटक्या घडाळाकडं डोळं लावून हेडमास्तरांची वाट पाहत बसायचे.

अशा प्रकारे आला दिवस ढकलत शाळा सुरु असायची... प्रगतीच्या नावाने बोंबाबोंब ... तरीसुध्दा वर्षातुन एकदा शाळेची प्रगती तपासण्यासाठी जिल्ह्याहुन नादर सायब यायचे. तेवढ्या वेळात मास्तर-मास्तर मिळून काहीतरी जुगाड जमवायचे त्यातल्या-त्यात हुशार पोरांना प्रश्न विचारुन शाळेच्या प्रगतीचा प्रश्न तितक्या पुरता सोडवायचे. असेच त्या दिवशी अचानक धावती भेट म्हणुन नादर साहेब शाळा तपासणीसाठी येत असल्याची खबर हेडमास्तरांना लागली. जमेल त्या पध्दतीने जमेल तितक्या कमी वेळात मास्तरांनी पोरांना ‘बाका प्रसंग गुदरल्याची’ जाणिव करुन दिली. नादर साहेब शाळा तपासणीसाठी येणार हे ऐकून पोरं भिजल्या सस्यासारखे पुस्तकात डोकं घालून बसले, समोरचे दोन चार उनाड पोरं ‘हजेरीच्या’ भिती पोटी मागच्या लायनीत जाऊन बसले, समोरची आख्खी लाईन रिकामी झाली अन् दुसऱ्या लायनितल्या पोरांची पाचावर धारण बसली. पोरींनीबी त्यांच्या लायनी जमेल तश्या आकडून घेतल्या. ‘कितीबी आभ्यास केला तरी, सायब नेमका प्रश्न विचारुन गोची करत्यात’,  असा दांडगा विश्वास  ‘अन् इतक्या सगळ्या हुश्यार पोरातनं  नेमकं 'ढ' पोरंगंच कसं शोधत्यात’ याचं आश्चर्य पोरांना असल्यामुळे ‘टेंशन घिवून कायबी होत नस्त’ असं म्हणंत एक एक पोरंग मागच्या लायनित सामिल होत होतं. पोरांची ही सिटींग आरेंजमेंट सुरु असतानाच पुन्हा हेडमास्तर वर्गात आले, अन् अर्धवट उटलेले पोरंगं नेमकं काय करावं हे न समजल्यामुळं त्याच अवस्थेत हेडमास्तरांकडं पाहू लागलं. ‘जा पायजे तिथं जाऊन बस, खिडकीतुन बाहीर गेलास तरी हरकत नाही, पुढं बसुन आकलेचे दिवाळे निघण्यापेक्षा बरचं है ते !’ मास्तर वैतागुन बोलले पण पोराला निर्णय घेता येईना, ते तसच अवघडल्या अवस्थेत हातात दप्तर घेवून मास्तराच तोंड बघू लागलं, बाकी पोरं हातानं तोंड दाबून आवाज आलाच तर तो तोंडातूनच येईल ह्याची दक्षता घेत घेत दात काढू लागले. पुन्हा मास्तरांनी उठलेल्या पोराला तोंडानं ‘हं!’ करुन बोटानं कोपरा दाखवला तसं एका पायावर उभं असलेलं अन् विलक्षण गोंधळात पडलेलं पोरगं दुसऱ्याच क्षणाला भलंतचं डिमांड आलेल्या कोपऱ्यात मोठ्या शिताफीनं स्थानापन्न झालं.

‘तु गण्या, तु चांबाराच्या ... तुक्या,  तु टोणग्या, अन् तु ये.. झिपरे... राधे... चला पुढच्या लायनित या...’ - मास्तरांनी त्यातल्या-त्यात आवडत्या आणि हुशार विद्यार्ध्याना खास शैलित फर्मान सोडलं अन् विद्यार्थीही तोंडात धरलेली कॉलर वर करतं शेजार-पाजारच्या पोरांवर अत्यंत तुच्छतेतेची नजर टाकत  ऐटीत समोरच्या लायनीत येऊन बसले.

‘हे बघा, नादर सायबांनी प्रश्न विचारला तर, उत्तर येणाऱ्यानीच हात वर करायचे, अन् बरोबर उत्तरं द्यायची, उत्तर येत नसलं तर माझ्या हाताकडं नजर ठेवायची !’ मास्तर सुचना देत होते बऱ्याच पोरांना मागच्या वर्षीच्या अनुभवावरुन हे सगळं अंगवळणी पडलेलं होतं. ‘नादर सायेब आल्यावर आपण फक्त पटसंख्या दाखवण्याच्याच कामाचे आहोत’ हे बहुतेक विद्यार्ध्याना माहित असल्यामुळे ते नादर सायबाच्या डोळ्याला डोळा देण्याचं टाळंत असतं, अन् आल्या प्रसंगाला कसं धीरानं सामोर जाता येईल यासाठी मास्तरवर नजर ठेवून असतं. इकडं मास्तरांची अवस्था ही काही वेगळी नसे, पोरांना विचारलेल्या एखाद्या प्रश्नाचं उत्तर कधी कधी मास्तरांकडं ही नसे तेंव्हा मास्तर उगच ‘आलो ऽऽ आलो ऽऽ !’ म्हणत दोन मिनीटांसाठी वर्गाबाहेर जावून वेळ मारुन नेत.

असा हा शाळेच्या प्रगतीचा फार्स वर्षातुन एक वेळेस शाळेत व्हायचा... शाळेची आणि विद्यार्थ्यांची ‘प्रगती’ पाहुन नादर साहेबांना भोवळ यायची, ते हेडमास्तरांच्या खुर्चीत बसुन तासभर मास्तरांना झापायचे, थोड्यावेळानं बाजुच्या टपरीवरचा काळा पोरगा तिन स्पेशल चहा घेऊन यायचा. गरम चहा पिऊन नादर साहेब थोडे थंड व्हायचे, दोन चार समजुतीच्या गोष्टी सांगत ‘अहवालात लिहू का हे आसं.... ?’ म्हणून मधुन मधुन धमक्या द्यायचे ! इकडे सहशिक्षक ठरल्याप्रमाणं नादर साहेब आल्याची बातमी सरपंच आणि पोलीस पाटलांपर्यंत पोहोचवायचे. गावचे सरपंच म्हजें लय भारी माणुस कोणी सरकारी माणुस आपल्या घरी येणार म्हटल्यावर त्यांची छाती टम्म फुगायची .... त्यांना ही बातमी समजली की, लगेच त्यांनी साहेबांच्या, मास्तरांच्या अन् दोन चार त्यातल्या-त्यात प्रतिष्ठीत गावकर्यांसह फक्कट मटनाच्या जेवनाचा बेत तयार करायचा. थोड्याच वेळातं एका पोरानं येऊन जेवन तयार असल्याची वर्दी शाळेत द्यायची ….  हे सगळं अगदी दरवर्षी असचं ठरलेले....

यंदाबी... सगळं इन्स्पेक्शन आटोपून, समजुती, धमक्या, सुनावन्या सगळं पार पडल्यावर  ‘सायेब आता उशीर झालाचय तवा जेवूनच जा ... !’ अशी गुळणी हेडमास्तरांनी नादर साहेबांवर टाकली. नादर सायब तसे पटकन खुर्चीवर उठले आणि ‘नाही नाही जेवण वगेरे काही नको ... आता निघायला पाहिजे... मला उशीर होतोय, मी एकटाच आहे शिवाय आज जीप पण आणलेली नाही ... मोटार सायकलवर जायचयं ....’ आसं म्हणून टाळू लागले पण ‘‘नाय नाय ... समद तयार आहे ... जेवायला लागलं तेवढाच काय तो येळ ... सरपंचांचा खास आग्रह आहे...’ आसं म्हणून विणवण्या करुन ... शाळेची घंटी वाजवायला सांगुन, नादर सायबांना पुढं घालुन हेडमास्तर, सहशिक्षकांसह सरपंचाच्या वाड्यावर निघतात.

जेवणाचा बेत फक्कड होतो..., गप्पा गोष्टी होतात ... नादर साहेब सरपंचाना शाळेच्या ‘प्रगती’ विषयी बोलतात, अन् सरपंच ’प्रगतीच्या’ शाळेविषयी सांगतात, ‘‘प्रगती’ बिमार होती, उद्या पास्नं पाठवतो शाळेत, पुढच्या येळेस येताल तवा नक्की ‘प्रगती’ दिसंल’’ सरपंचांच्या ह्या उत्तरावर सगळेच हासायला लागतात. नंतर जोक झाल्याचं कळाल्यावर सरपंचबी हसायला लागतात. अशा प्रकारे शाळा तपासणीवर आलेले नादर साहेब विद्यार्थ्यांच्या प्रगतीवर नाखुश झालेले असतात पण पाहुणचाराने खुश होऊन गावकर्यांचा निरोप घेतात अन् मोटार सायकलवर टांग मारतात. दणाण फट फट करत मोटार सायकल .... नदीच्या काळोखातुन वर निघून खड्डे चुकवत डांबरी रोडनं सुसाट निघते. जेवनाच्या आन् गप्पांच्या नादात निघायला बराच वेळ झालेला असतो, गावकुसातुन बाहेर पडल्यावर लक्षात येतं की खरचं बराच उशीर झालेला असतो. रात्रीचा अंधार हळू हळू गडद होत चाललेला असतो. नादर साहेबांना आता लवकरात लवकर हा छोटा आडमार्गी रस्ता पार करुन मुख्य रस्त्याला लागायचं असतं म्हणून ते रस्त्यावर नजर ठेवून मोटर सायकलचा कान पिळू लागतात. थंडीचे दिवस असल्यामुळे गार वारा त्यांच्या स्वत:च्या कानावर आदळत असतो, अंगात सुध्दा हुडहुडी भरलेली असते... अशातच गडबडीच्या नादात नादर साहेबांना रस्ता चुकल्याची जाणीव होते... अन् तेंव्हाच मोटार सायकल सुध्दा बंद पडते.... मोटार बाजूला घेऊन नादर साहेब ... पुन्हा पुन्हा किक मारुन पाहतात पण उपयोग होत नाही....मोटार सायकल हु की चुं करत नाही. आजु बाजुचा अंधार आनखीच दाट होऊ लागतो.

किक मारुन नादर साहेबांना घाम फुटतो .... त्यात आता मोटार सायकल ढकलायची पाळी येते, काही आंतर मोटार सायकल ढकलल्यावर साहेब दमुन जातात अन् गाडी बाजुला लावून खाली बसतात. आजु-बाजुला नजर टाकतात अंधारात काहीच दिसत नाही.... डोंगर उतरणीवरून पाच-सहा डोकी हळु हळु दुर जाताना दिसतात ... अन् थोड्यावेळानं उतरणीच्या अंधारात दिसेनासे होतात ... थोड्या अंतरावर एक मोठी शेकोटी धगधगत असते ... तिच्यातुन राखाडी धुर काळोखाच्या काळ्या पडद्यावर उर्ध्वगामी रेषा ओढत आसमंतात विलीत होत असतो. कडक हिवाळ्याचे दिवस असल्यानं आजुबाजुच्या शेतकर्यांनी  थंडीपासून रक्षण करण्यासाठी शेकोटी पेटवली असावी आणि आता रात्र झाल्यावर आपआपल्या शेतावर निघून गेले असावेत असा अंदाज बांधत पुन्हा हळु हळु मोटार सायकल ढकलत नादर साहेबांनी शेकोटी जवळ केली. पुन्हा एकदा मोटार सायकल सुरु करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला आन् मग हार पत्करुन शेकोटी शेजारी बसुन राहिले. दाट काळोखात सोबत कुणीच नसताना आता त्यांना शेकोटीचीच तेवढी सोबत वाटली, म्हणून ते जवळच्याच एका दगडाला पाठ लावून खाली बसले शेकोटीचा शेक दूरपर्यंत अंगावर येत होता. हळू हळू काळोख आणखीनच दाट होत चालला होता, रात्र इथेच अशी आणि कुणाच्या सोबतीशिवाय एकट्यानेच काढावी लागणार या कल्पनेने त्यांना कापरं भरलं होतं. आता अंधार इतका गडद झाला होता की, शेकोटीच्या उजेडानं विस-पंचेवीस फुटाचा एक परिघ आखुन घेतला होतो त्या परिघाबाहेरच काहीच दिसेनासं झालं होतं. आज अचानक धडक मारुन आपण कोवळया जिवांना अन् गाफील असलेल्या निष्पाप मास्तरांना उगाच त्रास दिला, म्हणुन शिक्षणमंत्र्यांनी आपल्यालाच अधार कोठडीत डांबून ठेवलय की काय असले चित्रविचीत्र विचार नादर साहेबांच्या मनात येऊ लागले. तेवढ्यात अंधारातुन शेकोटीच्या परिघात काहीतरी हालचाल झाली अन् कुठूनतरी एक कुत्र आत डोकावलं. नादर साहेब आधी घाबरले व नंतर सावरुन बसले, जिभल्या चाटतं कुत्रं शेकोटीच्या अन् नादर साहेबाच्या आधारावर येऊन बसलं, खरं म्हणजे आता नादर साहेबांना त्याचाच जास्त आधार वाटला. दोघंही एकमेकांना अनोळखी असले तरी एकमेकांच्या आधारावर आता ही रात्र नक्कीच थोडी सुसह्य होईल या कल्पनेने नादर साहेबांची भिती थोडी कमी झाली, थोडं एैसपैस बसुन त्यांनी आता कडाक्याच्या थंडीत शेकोटीचा आनंद घेतला. कुत्रं सुध्दा थोडं खुरडत खुरडत आनखी जवळ येऊन डोळे मिटून बसुन राह्यलं.

शेकोटीच्या धगीनं आता हात पाय गरम झाले होते, थंडी पळून गेली होती. आजुबाजुचं काहीच दिसत नव्हतं इतका गडद अंधार चारी बाजुंनी पसरलेला होता. ‘कदाचीत अमावस्येच्या आजुबाजुची विंâवा अमावस्येचीच रात्र असावी‘ असा विचार मनात येताचे नादरसाहेब पुन्हा अस्वस्थ झाले अन् हाताच्या बोटावर काहीतरी हिशोब मांडू लागले. कुत्र्याचा डोळा चुकवून उगाच माग पाहून अंधाराचा अंदाज घेवून सावध झाले. शाळेतल्या भेदरलेल्या चिमुरड्या, निष्पाप पोरांचे ते चेहरे आता आपल्याकडं पाहून हासतं आहेत, हेडमास्तर छडी घेऊन आपल्या दिशेनं चाल करुन येत आहेत, सरपंचाची ‘प्रगती’ बे-एक-बे म्हणत आपल्याच डोक्यावर नाचत आहे, अन् ‘साहेब उद्या पाठवतो बगा प्रगतीला साळंत‘ असं म्हणतं सरपंच गदागदा हासत आहेत....‘ असले काहीतरी स्वप्नं नादर साहेबांना अर्धवट झोपेत पडत, अन् साहेब बसल्या जागी खडबडून जागं होत, बाजुबाजुला पाहत...., साहेबाची हालचाल जाणवली की, कुत्रं रात्रीचा भेसुर सुर लावी अन् साहेब तोंडातून आवाज न काढता कुत्र्याला गप्प बसायला सांगत. थोडा डोळ्याला डोळा लागला की, कधी गृहमंत्री (साहेबांची बायको) ‘रात्रभर तुम्ही होता कुठे ?’ म्हणुन फैलावर घेत तर कधी, शिक्षणमंत्री, ‘चला कानं पकडून कोंबड व्हा तासभर, कोंबडी खायला पायजे काय ?‘ असं म्हणून अवघड जागेवर छडीचे फटके देत असल्याची स्वप्नं पडत, रात्रभर स्वप्नांनी साहेबांना झोप नाही अन् साहेबांच्या खडबडून जागं होण्यानं कुत्र्याच्या डोळ्याला डोळा नाही. जाग आली की साहेब कमालीचा पश्चाताप करायचे, पुन्हा पुन्हा शेकोटीच्या उजेडाला हात करुन घड्याळ पहायचे. हे घड्याळाचे काटे सुध्दा आपल्यावर सुड उगवत आहेत की काय असा विचार सुध्दा त्यांच्या मनात येऊन जातो, पण काहीच विलाज चालत नाही. कधी या काळोखातुन एखादा आशेचा किरण दिसतो आणि कधी आपली सुटका होते असा विचार करत झुंजुमुंजु होण्याची वाट पाहत नादर साहेब दगडाला टेकून बसुन राहतात. रात्र जसजशी पहाटेकडं सरकु लागते तसतशी शेकोटीची धग ओसरु लागते गार हवेची झुळूक उजेडाचा परिघ भेदुन अंगा खांद्यावर खेळु लागते. खर म्हणजे सुस्ती येऊन गाढ झोप लागण्याची वेळ पण अशा निर्जनस्थळी, कुठलाच सहरा नसतांना, स्वप्नांच्या सावटाखाली झोप लागणं खरं तर अशक्य, त्यातच कधी अर्धवट झोप लागली की नादर साहेबांना आपण कायम आरोपीच्या पिंजऱ्यात असल्याचे भास होत आणि खाडकन डोळे उघडत, पुन्हा अंगात कापरं, दरदरुन घाम, अशी गर्भगळीत अवस्था.

अशाही अवस्थेत कधीतरी उशीरा झोप लागते अन् पुन्हा पहाटे पहाटे जाग येते ....., सभोवतालच अस्तित्व आता बNयापैकी जाणवू लागतं, डोंगरांची डोकी, झाडांच्या रेषा, पिकांची सळसळ...पक्षांची कुजबुज... अशी पुसटसी कल्पना येऊ लागते..... नादर साहेब डोळे चोळत उटतात ... बाजूला झोपलेलं श्वान काही अंतरावर जाऊन काही तरी खात असतं .... कसलं तरी वाढलेले पान .... त्यावरच्या भातावर ते तुटून पडलेले असतं..., उजेडात दिसलेल्या अन्नावर ते ताव मारंत असतं. ‘इतक्या सकाळी काय मिळालं याला ?‘ असा विचार करत नादर साहेब थोडं रोखुन पाहतात ...तर कसली तरी पुजा असते ... हळदी कुंकू  ..नैवद्य .....फुटलेले मडकं .... धगधगुन शांत झालेली शेकोटी ..... शेकोटी ? शेकोटी कसली ... भलीमोठी चिताच !..... नादर साहेब सगळं त्राण एकवटून उभे राहतात... मागे पुढे पाहतात ... जाग-जागी रोवलेली खुनेची दगडं .... ज्याला पाठ टेकवून बसले तो दगड सुध्दा ... असाच.... ‘मी रात्रभर चितेचा शेक घेत होतो ? मी रात्र स्मशानात काढली ?’ अंधाराचं मळभ दुर होऊन डोळ्यावरची झापडं दुर होतात. आता मात्र साहेबांचे पाय लटपटायला लागतात.... अंगातलं त्राण नाहीस होतं ... पहाटेच्या कडाक्याच्या थंडीतही साहेबांना दरदरुन घाम फुटतो. होत नव्हतं तेवढ आवसान आणून साहेब ... चालु लागतात... मोटार सायकलजवळ येतात, मोटार सायकल बंद पडली आहे हे विसरुन मोटार सायकलवर बसतात, सवयीप्रमाणं हाफकीक मारतात ... मोटार सुध्दा सवयीप्रमाणं काहीही तक्रार न करता दणाण फट फट आवाज करते .... साहेब उरलेली सगळी शक्ती लावून एक्सलेटर पीळतात अन् मोटार सायकल मिळेल त्या रस्त्यानं स्मशानाच्या परिघाबाहेर सुसाट वेगात धावत सुटते.  इकडं भुकेल्यापोटी रात्रभर अन्न शोधंत फिरणारं श्वान सरते शेवटी तृप्त होऊन इच्छित स्थळी निघुन जातं.


त्याच दिवशीची सकाळ ....
नादर साहेब उशीरा उठतात, डोकं जड झालेलं आहे ... आजुबाजुला पाहतात, खोलीचे पडदे उघडतात ... पुर्वेकडून उन्हाची सोनेरी तिरीप बिछान्यावर पडते. दाराजवळ त्यांचा लाडका टॉमी ... बीस्कीटं खात असतो, त्यांची नजरानगर होताच साहेब ओशाळतात, उठतात ....फोनजवळ जातात ... नंबर फिरवतात ...‘माने मास्तर ... नमस्कार ! मी काही यावेळी तुमच्या शाळेवर इन्स्पेक्शनला येत नाही, माझी तब्यत खराब आहे.... तुम्हीच जिल्ह्याला आले की भेटून जा ! इथेच काय तो अहवाल लिहून घेऊ !’

इकडे शाळेत पुन्हा चैतन्य संचारतं ... हापसा नियमितपणे पाणी ओकू आगतो ... सरपंचांच्या प्रगतीची तब्यत सुधारते ... आता नादर साहेबाशिवाय .... त्यातल्या त्यात जमेल तेवढया प्रतिष्ठित गावकर्यांसह अन् शाळा मास्तरांसह कोंबडीच्या जेवनाचा बेत शिजु लागतो.

- रमेश ठोंबरे 

Jun 13, 2015

चैतन्य


रस्त्याच्या दुतर्फा ……
काळ्या ढेकळांनी व्यापलेली रानं ,
नजरेच्या सरळ रेषेत नागीनिसारख्या फुत्कारत
सळसळणाऱ्या उन्हाच्या झळा ….
थेट कानात घुसून मस्तकापर्यंत डंख मारत असताना ….
वाऱ्यानं उडणाऱ्या डोक्यावरचा पदर सावरत
त्याच रणरणत्या उन्हात
ती काड्या-कुड्या वेचून रान स्वच्छ करते आहे.
काही अंतरावर त्याच लिंबाच्या
झाडाच्या खालच्या फांदीला बांधलेल्या …
झोळीत शेतकऱ्याचा वारसदार निवांत झोपला आहे.
बुंध्याला बसलेलं कुत्रं जिभ बाहेर काढून
ल्ह्या ल्ह्या करत झोळीवर नजर ठेवून आहे.
तिचं मन भूतकाळात
पण नजर मात्र …
पुन्हा पुन्हा त्याच झाडाच्या वरच्या फांदीवर जाते
अन नेमका तेंव्हाच तिच्या माथ्यावरचा पदर
तिचं उजाड कपाळ पुन्हा पुन्हा उजाड करत जातो.
काही अंतरावर
नुक्तच मिसरूड फुटलेला तिचा धाकटा दीर ….
उद्याच्या आशेवर नव्या जोमानं ….
उद्या पाऊस येणारच या विश्वासान ….
उजाड शेताची मशागत करतो आहे.
किती चैतन्य विखुरलय पुन्हा एकदा
या उन्हात, काळ्या रानात …
अन त्याच्या मनात !
एवढंच !
- रमेश ठोंबरे

Sep 17, 2014

* भूतकाळी राजकारणातून ….

लहानपणी शाळेत जावून पाटीवर 'अ' गिरवायच्या दिवसांत, त्यानं म्हशीच्या पाटीशी सलगी केली, तरुणपणात आडल्या नडलेल्यासाठी अंगमेहनत करून  'नारायणाची' भूमिका वठवली … पुढं पक्ष कार्यकर्त्याच्या माध्यमातून नारायणाचा  'नारायणराव' झाला,  सहकाराला हाताशी धरून अक्खा जिल्ला पिंजून काढला, जनसंपर्क आणि ओठावरच्या साखरेनं त्याला एकदिवस 'साखर सम्राट केलं'. पुढं याच आडणी डोक्यानं समाजकारण आणि राजकारणाच समीकरण असं फिट्ट केलं कि, 'काला अक्षर भैस बराबर' वाला हा नेता शिक्षण सम्राट झाला. आई बापाच्या नावानं शिक्षण संस्था काढल्या, जील्यातले शिकले सवरलेले पोरं मास्तर म्हणून चिकटवले. म्हशी मागचे पोरं फावल्या वेळत साळत जावू लागले. या समाजकारणा सोबत कारखान्दारीच राजकारण होतच, गडी आता 'अवजड' नेता झाला.  कधी काळी 'पोरवयात हे धूड म्हशीवर बसून गावभर फिरायचं' असं कुणी जुन्या खोडांन सांगितलं तर आजचे तरणे पोरं 'खोडाकड' सौन्श्यान बघायचे अन निघून जायचे.

तर सांगायचा मुद्दा हा कि, या नेत्याचं जील्याच्या राजकारणात 'दोन्ही अंगानं वजन व्हतं', निवडणुकांच्या काळात यांच्या सभांनी आणि भाषणांनी जिल्ला ढवळून निघायचा, लोकं सभेला गर्दी करायचे, भाषण ऐकण्यासाठी लोकं अर्धा-अर्धा तास आधीच हजर असायचे, 'पिंजारलेल्या झुबकेदार मिशांमधून वळण घेत, वाट काढत, शब्द लोकांच्या कानावर आदळत, तेंव्हा पहिले पंधरा मिनिट तर त्या उच्चारांच्या वेगाशी आणि शब्दफेकिशी जुळवून घेण्यातच कानाची वाट लागायची. पुढं केंव्हातरी शब्दांची आणि कानाची वेवलेन्थ जुळायची म्हणे. (भरगच्च थेटरात दादा कोंडकेंचा पिच्चर पहिल्यांदाच पाहताना म्हणजे ऐकताना मला असा अनुभव आला होता)  निवडणुकांच्या दिवसांत रात्रीतून बाजी पटतवून टाकण्याच्या यांच्या खेळाला पुढं लोक 'हाबडा' म्हणून ओळखू लागले. बरीचं वर्षं अश्या 'हाबाड्याचा' धास्तीवजा अनुभव जिल्यातील भल्या भल्या स्त्री-पुरुष नेते मंडळीन घेतला.          

पण आता दिवस बदलले, वयोमान आणि आकारमानाचा विचार करता एक एक इंच भूमी लढवण्यासाठी स्वतः यांनाच हाबाड्याची गरज पडते, साखर सम्राटाला 'साखर्या रोग' झाला, या शिक्षण सम्राटाला पूर्वी अक्षर वाचता तर येत नव्हतं पण ते निदान दिसायचं, आता अक्षर दिसत हि नाही, 'गडी'वर विसावलेलं हे धूड आज कित्तेक वर्षांपासून टाकल्या जाग्यावर पडून आहे, कूस बदलायची तर दोन आडदांडांची मदत घ्यावी लागते. सर्वांगाला खाज सुटलेली आहे, दिवसभर जमंल तसं आणि जमंल तिथं खाजवणं हा राष्ट्रीय कार्यक्रम (त्यांच्याच भाषेत सांगायचं तर, सहकारी कार्यक्रम) चाललेला असतो.  त्यासाठी दोन स्पेशल माणसं  २४ x ७  या हिशोबान ठेवलेली आहेत. पूर्वीच्या शस्त्रधार्यासारखे ते  हातात तुराट्याचा झाडू घेवून हजरच असत्यात, हिकडं खाजव, तिकडं खाजव, चालुंदे तेच्या मारी ! 

May 7, 2014

- आभाळ फाटल्याची गोष्ट -


मी माझ्या आज्या पंज्याकडून 
अन त्यांनी त्यांच्या सात पिढ्यानकडून ऐकलीय
आभाळ फाटल्याची गोष्ट 
दावणीला बांधलेलं माणसाचं जगणं …. 
खुंटीला अडकवून ठेवलेलं भविष्य, 
अन रांगेत उभे असलेले अगणित, अनपेक्षित भोग.

हे सगळं सोबत घेवून जगत राहिलेत माझे पूर्वज 
संकल्प पूर्तीच्या स्वप्नाच्या बळावर
त्यांनी वेळोवेळी केलेले कितीतरी संकल्प
अधुरेच आहेत वर्षानुवर्षापासून ….

मी कधी भूतकाळात शिरलो कि,
तपासून पाहतो माझ्या पूर्वजांच जगणं
अधुऱ्या संकल्पांच्या डायरीची फडफडणारी असंख्य पानं
मी जवळ गेलो कि जखडून टाकतात मला त्यांच्या भूतकाळात,
मला जाणवू लागतं त्याचं उपेक्षित जग
त्यांच्या मनातली तगमग.

अन ते पुन्हा सांगू लागतात,
कधी ओलावा आटल्याची गोष्ट
तर कधी 'आभाळ फाटल्याची गोष्ट'

- रमेश ठोंबरे 

9823195889

Apr 21, 2014

जगण्याची तगमग


दिस उदास उदास, उभा पेटलेला माळ
भुई वाटते उजाड, जसं रांडवेच भाळ
उन तापून तापून, झालं शिवार भकास 
दूर डोंगराच्या आड, कोणी पेटविला जाळ ?

अनवाणी पावलाची, कोण चढते डोंगर
पोर चाले झपाझप, डोई फुटकी घागर
उन तापल्या देहाला, थेंब पाण्याचा पाझर
धापापल्या काळजाची, लाज राखतो पदर

कोण्या गावचं पाखरू, कोण्या झाडावर आलं
थेंबभर पाण्यासाठी, असं परदेशी झालं
चिमण्यांची चिव-चिव, कावळ्याची काव-काव
चोच कोरडी उपाशी, गाणं विसरून गेलं

पोट खपाटीला गेलं, एक हपापल श्वान
चतकोर भुकेसाठी, त्यान 'एक केलं रान'
धाव धावून थकलं, माणसांच्या जागलीत
जीभ बाहेर तोंडाच्या, देहा लटकली मान

झळा उन्हाच्या पेटल्या, जशी पेटलेली आग
दिस कलत चालला, तरी ओसरेना धग
धनी वावराचा राबे, उन्हा तान्हात, रानात
दिसागानिक वाढते, जगण्याची तगमग !

- रमेश ठोंबरे
9823195889

Mar 14, 2014

असं दु:ख अवकाळी



असं दु:ख अवकाळी
त्याले वखुत कळना
भर उनाळ्यात देवा
त्याले सुटलाय पान्हा

आस पावसाची होती
तवां उडाला फुफाटा 
झाले अनवाणी पाय 
साऱ्या भेगाळल्या वाटा

बीज रुजायाचे तवा
नाही थेंब ओला दिला
हाता तोंडाशी आलेला
घास पावसानं नेला

असं फाटलं आभाळ
जसं फाटलेलं ऊर 
कसं कोणत्या दु:खाच 
सांग मातलं काहूर ?

अरे आभाळाच्या देवा
कसा झालास दगड
जिनं वावहून गेलं
आता आवर पाझर

माझ्या आभाळाच्या देवा
आता थांबव आबाळ
पुन्हा रुजाया राहू दे .
माझ्या पायामध्ये बळ

- रमेश ठोंबरे 

Nov 6, 2013

अभिव्यक्ती


एक कवी,
त्याच्याच ए. सी. केबिन मध्ये बसून 
लिहितो त्याच्या गावाच्या 'दुष्काळाची एक कविता'
इतकी खोल, इतकी विदारक कि,
वाचताना वाचकाच्या मनात शिरते आर पार … 
आणि पिळवटून टाकते त्याचं काळीज. 
त्याला आठवतो त्याने मागे सोडलेला त्याचा गाव. 

तो उभा राहतो …. 
कवितेतील त्या नायकाच्या जागी … 
आणि आठवू पाहतो त्याचा भूतकाळ …
त्याला दिसू लागते चुलीसमोर फुकणी फुकत 
बसलेली त्याची माय…
तिच्या डोईवर नावापुरताच उरलेला 
जीर्ण साडीचा फाटका पदर …
सभोवताली काळवंडलेल्या घराच्या भिंती… 
घामानं मळकटलेली बापाची 
कधी काळी पांढरी असलेली टोपी. 

टोपीवरून आठवतो … त्याला त्याचा बाप … 
दिवस उगवायच्या आत, 
खायला एक तोंड कमी म्हणून फोडलेल्या बैलजोडीतील 
एक बैलासह निघायचा शेतावर. 
दुसऱ्या बैलाच्या जागी स्वतःलाच जुंपायचा …
अन कधी त्याच्या मायलाबी. 
तेंव्हा मायला म्हणायचा, 

"औंदा पिक चांगलं आलं की 
माह्या सोन्याला जोडी बी आणील आन तुला नवी साडी बी"
मायला धीर यायचा, अन 
माय बैलाच्या बरोबरीन ओत्त ओढायची !
आणखी पुढ वाचल्यावर त्याला आठवतो … 
याही वर्षी कोरडाच गेलेला पावसाळा,
दावण रिकामी करून डोक्याला हात लावून बसलेला बाप.
पुन्हा आठवायची फुकणी फुकणारी माय,
आणि किती तरी वेळ नुस्तच उकळणार चुलीवरच पाणी. 

आता तो कविता वाचतच नाही …
कारण त्याच्या डोळ्यासमोर येत परसातलं भलं थोरलं झाड … 
जिथं बापानं माहेरपणाला आलेल्या लेकीच्या पहिल्या पंचमीला 
बांधला होता हौसेन तिच्यासाठी झोका …. 
आज आठवतोय त्याला, त्याच झाडावर …. 
कदाचित त्याचं फांदीला
आणि कदाचित त्याचं दोरीवर 
लटकणारा बाप !

कविता पुढं न वाचताच तो पुस्तक खाली ठेवतो 
आणि सलाम करतो, त्या कवीला आणि 
कवीच्या त्या अभिव्यक्तीला !
आणि लिहितो एक अभिप्राय, 
कविता काळजापर्यंत पोचल्याचा !

तेंव्हा खुश होतो कवी …
स्वतःच्या कलाकृतीवर, 
आणि वाचकाच्या अभिव्यक्तीवर !

रमेश ठोंबरे
............................................................................................................................................................
मराठी कविता समूहाच्या 'कविता विश्व' दिवाळी अंकातील माझी कविता …. 
'मराठी कविता समूहा'च्या दिवाळी अंकाचे चे ३ रे वर्ष …. आजही आठवतंय …. दोन वर्षांपूर्वी, पहिल्या दिवाळी अंकाचे प्रकाशन अ.भा.मराठी साहित्य संमेलनाचे (जानेवारीत सासवड येथे होणाऱ्या) नियोजित अध्यक्ष कविवर्य फ़. मुं. शिंदे यांच्या हस्ते औरंगाबादेत करण्यात आले होते. 

Oct 17, 2013

दुष्काळ


दुष्काळ दाटलेला
डोळ्यात साठलेला
आधीच बाप माझा
काळीज फाटलेला.

मातीत राबताना
घमास सांडताना
व्याकूळ रोज होतो
देवास भांडताना

स्वप्नात रोज त्याच्या
येतात टोळ धाडी
पाण्याविनाच डुबते
आकंठ रोज होडी

पाऊस आज यावा
करतोय रोज धावा
वर्षे अनेक सरली
कोणास दोष द्यावा

आभाळ रंग दावी
अध्यात्म आस लावी
अभंग भंगलेला
अन कोरडीच ओवी

मातीत राबताना
डोळ्यास भावलेला,  
दिसतोय बाप माझा
गळफास लावलेला !

- रमेश ठोंबरे



Oct 6, 2013

..जीव हारून निजला ... |

..............जीव हारून निजला ... |
असा दमला भागला
...............जीव हारून निजला ... ||

डोळा सले भूतकाळ ...
आत वेदना ती खोल.
मानव्याचा जनम र
आज असा वाया गेला ...... १
...............जीव हारून निजला

झोप लागणार कशी ?
उगा बदलतो कुशी.
चिता मिटवील चिंता
असा इचार र झाला ....२
...............जीव हारून निजला

त्याची गाय तूटलेली ...
याची माय विटलेली.
तिळ तिळ तुटे जीव
घर घर काळजाला .... ३
...............जीव हारून निजला

डोंगरात मरीआई ...,
कधी दिसलीच नाई
शेरडाच्या जीवा वरी
इथ लांडगा मातला ....४
...............जीव हारून निजला

फाटलेल्या आसऱ्याला
तुटलेल्या वासराला
घेर कुशीमंदी देवा ...
लई येळ आता झाला ... ५
...............जीव हारून निजला
असा दमला भागला
...............जीव हारून निजला ... ||


- रमेश ठोंबरे

Sep 18, 2013

भेगाळली जमीन

भेगाळली जमीन 

भेगाळली जमीन 
तिला पावसाची आस 
त्याचं नशीब फाटक 
त्याचं आभाळ भकास. 

तिचं तापलेल अंग
तिला सोसवेना दाह
त्याचा वळीव कोरडा
मन आटलेला डोह

तिची नवथर काया
जसा शेलाटीचा ढंग
इथं पेटता पेटना
त्याचं रापलेलं अंग

उर आगीत पेटता
नको चंदनाची चोळी
बाग बहरून आली
शेत विसरला माळी

आला सोसाट्याचा वारा
बारा शिव ओलांडून
गेला अधाशी मनानं
उभ्या पिकाला सांडून

- रमेश ठोंबरे 

Nov 24, 2012

अंधाराची साथ


अंधाराची साथ तिला, अंधाराचा ध्यास,
तिमिराचा भास झाला, काळोखाचा श्वास.

आवसेची वाट पाहे, पौर्णिमेची भीती
चढणीला रेंगाळली, अस्तापायी गती

अंधाराच नातं तिला, देवाजीनं दिलं,
दुनियेत आली अन, अंधारून आलं.

काजळल्या पापण्यांनी, डोळे केले बंद
काळ्याशार नयनांना, काजळाचा छंद.

खोल खोल विचारांची, मनामंदी दाटी
उजाडल्या अंतरात, काळजाची खोटी

अस काय उजेडाचं, अडलेलं माप ?
प्रकाशात केलं कोण्या, जनमाचं पाप !

- रमेश ठोंबरे
www.rameshthombre.com

‎'मराठी कविता समूहा'च्या 'कविता-विश्व दिवाळी विशेषांक २०१२' मध्य प्रकाशित कविता -

Oct 2, 2012

पातक

डोई टेकलं आभाळ
टेकू लावणार काय ?
अशी फाटली धरणी
धागा धरणार नाय !

भूक वाढल्या कान्हाचा
टाहो आसमंती गेला.
दुध सुकल्या स्तनाचा
पीळ काळजाला आला.

पीठ घातल्या पाण्याचा
घोट ओठामंदी दिला.
चुली म्होरल्या पिठाचा
घास भूकेल्यान नेला.

गुंडा पुरुष आधार
झाला चालण्याचा भार.
इथं पोटात काहूर
त्याले वासनेचा ज्वर.

असं भयाण जगणं
कसं देवाजीनं केलं.
कुण्या जन्माचं पातक
मह्या माउलीला दिलं ?    
  

- रमेश ठोंबरे
(जिथं फाटलं आभाळ)

Mar 21, 2012

कुणब्याच्या पोरा तुला ह्याचीच का लाज ? (दीर्घ कविता)


.. १ ..
रांगड्या या शेतामंधी रांगडा हा बाप
चालताना त्याच्यासंग माय खाई धाप

शिकशील चार बुक होशील तू मोठा,
तेंव्हा साऱ्या कष्टाला मग देशील तू फाटा.

आस गोड भविष्याची धरुनी ती मनी,
राबतोय उन्हामंदी कष्टाचा हा धनी.

उनाळ्याच्या दिसामंदी पळस फुलला,
तुझ्या सुखापायी त्यानं अंगार झेलला.

दमलेल्या अंगाला या कष्टाचाचं साज
कुणब्याच्या पोरा तुला ह्याचीच का लाज ?

..२..
माय तुझी बापासंग ओढतीय गाडा
वाचणार कशी तिच्या दु:खाचा र पाडा ?

गायीला त्या वासराचा येतोया आठवं
दाटतात तिच्या मग डोळ्यात आसवं

फाटलेली चोळी सांगे दारिद्र्याचं जीण,
अन काळ्याभोर धरतीचं हिरवं ते लेणं.

अनवाणी पायी माय चाले बिगी बिगी
सोडला दुष्काळ आहे डोळ्यामोर्ह सुगी

दिस येता डोईवर पदरी हि भिजं
कुणब्याच्या पोरा तुला ह्याचीच का लाज ?

..३..
शिकण्यास पोराची केली बोळवण,
शहरात आलं एक उंडारलेलं बेन.

शेत नको माती नको हवं याला काय ?
शिकणार नाय माती मसणात जाय !

बाप राबे शेतामंदी याला नाही तमा,
शहरात वागण्याची गाठणार सीमा.

शहरामंदी पोराचा हा पाहुनिया थाट,
वाकलेला बाप मग चाले बघा ताट.

पोऱ्या बोले इंग्लिश चाले बापा मोर्ह 
बापा वाटे शहरात शिकतंय पोरं

बापाच्या र बोलण्याचा नाकातून बाज
कुणब्याच्या पोरा तुला ह्याचीच का लाज ?

..४..
शहराची शानशोक विसरला गाव,
बापाचं हि येत नाही तोंडामध्ये नावं,

कॉलेजात जातो मग सजून धजून,
फाटलेल्या चड्डी मध्ये थोडासा बुजून.

कॉलेजात पाही अश्या पोरी गो-या गो-या,
एका वर्गामंदी चाले दोन दोन वा-या.

बुकामध्ये याचं मन रमणार कसं...?
याला आता लागलेला वेगळाच ध्यास.

दाणा नाही पोटामध्ये, शहराचा माज
कुणब्याच्या पोरा तुला ह्याचीच का लाज ?

..५..
बाप म्हणे शिकणार होणार हा मोठा,
कुणब्याच्या घरी नाही आनंदाला तोठा.

मायेन बी आस आहे जीवाला टांगली,
पाहतेया रातीला ती सपान चांगली.

मायेच्या या सपनाची काय तुला जाण,
बापाच्या हि कष्टाचे आहे कुठे ध्यान ?

दिसभर झोप घेइ, करी रातीचा दिवस
कोण्या मोसोबाला याचा घालावा नवस ?

मिळणार कसा तुला ज्ञानाचा र साज ....
कुणब्याच्या पोरा तुला ह्याचीच का लाज ?

..६..
सोडीला तू गाव झाला शहराचा बाबू,
गावामंदी येता नको नाक तोंड दाबू.

याच शाळेमंधी होता गिरवला 'एक'
आज हि न कळे तुला जगण्याची मेख.

हाच तुझा गाव आहे, हेचं ते राउळ.
नवस फेड्या मारुतीचं हेचं ते देऊळ.

बसायला दिला तुला पटक्याचा सोंगा,
तुझ्या डोक्या मंदी असे वेगळाच भुंगा.

गोठ्या मंधी शिरताच झाली तुला खाज
कुणब्याच्या पोरा तुला ह्याचीच का लाज ?

..७..
शिकला हा चार बुक विसरला गाव.
गोठ्यातल्या गायीचं हि विसरला नाव,

बहिण हि झाली आहे आता बघ मोठी
लाज तिची झाकातेय फाटकी चीरोटी

मन तिचं तुला कधी उमजलं नाही
डोळ्यातलं सपान बी समजलं नाही

बापाची हि चिंता आता वाढलीय फार
वयातली लेक त्याला वाटतीय भार

अंगावरी शोभे तिच्या योवानाचा साज
कुणब्याच्या पोरा तुला ह्याचीच का लाज ?

..८..
लेकी साठी रान आता टाकलं गहाण
पायामंदी टोचतीया रोजचीच वहाण

पांढरया या सोन्यानं बी दिला औंदा दगा
आता तरी थेंब सोड वांजोट्या रे ढगा

जमीन कोरडी पिक गेलं र जळून
वाट तुझी पाहता दिस गेला र ढळून

तुझ्या पायी लेका दिस-रात एक केली.
शेवटला तुला त्याची सय नाही आली,

गळ्यामंदी फास डोई सावकारी व्याज
कुणब्याच्या पोरा ठेव याची आता लाज ?


- रमेश ठोंबरे