Showing posts with label ओवी. Show all posts
Showing posts with label ओवी. Show all posts

Apr 2, 2014

>>>

>>>

गाठण्यास लक्ष 
उभारली गुढी 
हातामध्ये घडी
बांधलेली ।।१।। 

जपतात सारे 
नमो नमो मंत्र 
धनुष्याचे तंत्र 
विसरले ।।२।।

महायुती साठी
समतेचा पूर
इंजिनाचा धूर
दूर दूर ।।३।।

शब्द बाण ओठी
घेवूनी चौकात
काढिती औकात
स्वकीयांची ।।४।।

'आप'ल्या हातात
घेवूनीया झाडू
कॉर्पोरेट लाडू
बोलू लागे ।।५।।

टाकतात धाडी
खादितले टोळ
बोलेरोची धूळ
खेडो पाडी ।।६।।

उघडूच नये
अपेक्षांची मुठ
धोंड्या परी विठ
मऊ म्हणा ।।७।।

परिवर्तन हे
घडायास हवे
पक्षी यावे नवे
घरट्यात ।।८।।

- रमेश ठोंबरे 

Mar 23, 2012

कोणी म्हणे ...... ३ ..................६)



कोणी म्हणे येथं
काव्य फार झाले
त्याला मी दावले
अभिप्राय ||

कोणी म्हणे येथं
चौर्य हि उदंड
दावला मी दंड
डिलीटाचा ||

कोणी खोट काढी
शील अश्लीलाची
त्याला दिल्या शाली
जोड्यां सवे ||

कोणी म्हणे 'फेक*'
आहे येथं फार
'ई-बुक' 'त्यांचेची*'
गाजविले ||

कोणी म्हणे आहे
पसाराच फार
त्याला वर्तमान
दाखविले ||

- म.क.
(रमेश ठोंबरे)

Mar 21, 2012

कोणी म्हणे ...... २ ..................५)



कोणी म्हणे मी रे
सहजची आलो |
येथलाची झालो
खर्या अर्थी ||

कोणी म्हणे माझी
भूक फार आहे
पूर रोज पाहे
कवितांचा ||

कोणी म्हणे गड्या
सापडला मार्ग
दूर आता स्वर्ग
दोन बोटे ||

कोणी म्हणे मज
आवडे हा मेळा
होती सर्व गोळा
एक धागी ||

कोणी म्हणे काय
आहे येथं खास
सोडवेना कास
माझे माय ||

- म.क.
(रमेश ठोंबरे)

Mar 5, 2012

मराठी


माझ्या मराठीला नका दावणीला बांधू
जग भ्रमंतीचा तिला घेउद्या आनंदू.

माझ्या मराठीचं नका दु:ख आता सांगू
फुकाचेच लख्तरे नका वेशीला ते टांगू.

ज्ञानियाची भाषा आणि रसाळ हि बोली,
हिच्या अस्तित्वाची उगा मोजतात खोली.

राकट, काटक अन लावण्याची भाषा,
मराठीच आहे माझ्या जगण्याची आशा.

मराठी मराठी भाषा मराठी बोलेन,
भविष्याच्या मुखी शब्द मराठी घालेन.

माझ्या मराठीचा रस चाखतात लोक,
भाषे मंदी भाषा गोड मराठीच एक !

माझ्या मराठीला नाही शब्दाचं बंधन
अलंकार अन वर वृतांच गोंदण !

तरेल मराठी पुन्हा उरेल मराठी,
जगामंदी श्रेष्ठ अशी ठरेल मराठी !


- रमेश ठोंबरे

Nov 10, 2011

५) प्रियेचे श्लोक

 

तिला पाहिले रे सकाळी सकाळी,
'दिला' जाळले रे सकाळी सकाळी |
तिच्या लोचनांनी मला भाळले रे
तिने टाळले रे सकाळी सकाळी || २५ ||


तिच्या दर्शनाने असा धन्य झालो,
तिचा भक्त झालो सकाळी सकाळी |
असा गुंतताना तिच्या भावरंगी,
जगी मुक्त झालो सकाळी सकाळी || २६ ||
 

तिचे केस ओले असा फास झाले,
अदांनीच मेलो सकाळी सकाळी |
तिला पाहताना, तिने पाहिले अन,
उगा चोर झालो सकाळी सकाळी || २७ ||


- रमेश ठोंबरे 
(Ramesh Thombre)



Nov 5, 2011

१) || ससा आणि कासव ||




एक शुभ्र ससा छान | उंचाउनी दोन्ही कान |
गर्वे करी गुणगान | चपळतेचे || १ ||

म्हणे वेग माझा फार | वात होई चूर-चूर |
असता मी भले दूर | पुन्हा इथे || २ ||

कासवाचे करी हसे | म्हणे चाले बघा कसे |
याला ध्येय कसे दिसे | आळ्श्याला || ३ ||

जाया निघे बारश्याला | काळ उलटुनी गेला |
पोचे मग लगनाला | कसा तरी || ४ ||

करू म्हणे थोडी मौज | त्याने लावियली पैज
कासवास जिंकू आज | शर्यतीत || ५ ||

कोण जाई म्हणे वेगे | डोंगराच्या पाठी मागे
त्याचे मग नाव लागे | जिंकण्याला || ६ ||

कासवही धन्य धन्य | पैज त्याने केली मान्य |
करू म्हणे आज शून्य | गर्व याचा || ७ ||

रोज आहे उड्या घेत | वर तो वाकुल्या देत |
करू याचे नेत्र श्वेत | एकदाचे || ८ ||

पैज ठरे, दिस ठरे | संगतीला सखे खरे |
कोण जिंके कोण हारे | दिसे आता || ९ ||

पैज झाली आता सुरु | ससा लागे मार्ग धरू
कासव हि तुरु तुरु | चालू लागे || १० ||

दूर दूर गेला ससा | झाला आता दिसेनासा |
उमटेल कसा ठसा | कासवाचा ? || ११ ||

ससा गेला वेगे दूर | जसा भरला काहूर |
त्याला सापडला सूर | जिंकण्याचा. || १२ ||

ससा पाहे आता मागे | कुठे कासवाचे धागे |
त्याला वेळ किती लागे | गाठण्याला || १३ ||

कासव ते दूर म्हणे | कधी व्हावे इथे येणे |
तोवर ते शांत होणे | गैर नाही || १४ ||

ससा झाला कि निश्चिंत | त्याची मिटलीच भ्रांत
विसावला थोडा शांत | तरू तळी || १५ ||

वनी देखिले गाजर | क्षुधाग्णी तो पेटे फार |
कंद ते घेऊन चार | भक्षीतसे || १६ ||

कोवळे ते खाता कंद | हालचाल होई मंद |
नयनहि होती धुंद | व्याकुळले || १७ ||

प्राशी नीर ते शीतल | मग डळमळे चाल |
नयनी निद्रेचा ताल | घुमू लागे || १८ || 
 
निद्रे झाला अर्धमेला | सुख स्वप्नी तो रंगला |
वाटे जसा स्वर्गी गेला | आपसूक || १९ ||

पुढे कासव ते चाले | त्याची एकलीच चाल |
त्याचा एकलाच ताल | योजिलेला || २० ||

नाही थांबले ते कुठे | जरी कोणी मित्र भेटे |
न ही जिद्द त्याची सुटे | चालण्याची || २१ ||

चाले संथ गती तरी | त्याची साधना ती खरी
आणि खात्री मनी धरी | जिंकण्याची || २२ ||

चाले असे लगबगे | पाठी घेउनिया ओझे |
ध्येय गाठण्यास चोजे | शर्यतीचे || २३ ||

त्याने सोडीयेले मागे | बघा आळसाचे धागे |
पुन्हा पुढे चालू लागे | लक्ष्याकडे || २४ ||

पहिला तो ससा त्याने | झोपलेला तरू तळी |
झोप उतरली गळी | सारी सारी || २५ ||

कासवाने केली शर्त | म्हणे नडलाची धूर्त |
श्रम नाही गेले व्यर्थ | धावण्याचे || २६ ||

मग पुन्हा घेई वेग | मागे मागे धावे मेघ |
नाही आली प्राण्या जाग | झोपलेला || २७ ||

लक्षभेद कासवाचा | पोहचला शेवटला
तेंव्हा वेग मंदावला | विसाव्याला || २८ ||

दिस ढळे जाग येई | आता काही खैर नाही |
ससा मागे पुढे पाही | कासवाला || २९ ||

शोधीयेले काटे कुटे | कासव न दिसे कुठे |
आता मनी भीती वाटे | हरण्याची || ३० ||

लागे मग पुन्हा पळू | आणि पुन्हा मागे वळू
आता कशी हर टाळू | दिसणारी || ३१ ||

एक तो प्रहर झाला | डोंगराच्या मागे आला |
पाहून तो घाबरला | कासवाला || ३२ ||

कासव ते हसे गाली | कशी तुझी गती गेली
म्हणे फजितीच झाली | वेगा ची हो || ३३ ||

करू नको गर्व म्हणे | कष्टा विन सर्व सुने |
आळसाचे तुझे जिने | नडले रे || ३४ ||

ससा म्हणे चूक झाली | उगी तुझी थट्टा केली
जागा मला दाखविली | तूच लेका || ३५ ||

रमा म्हणे गर्व नको | करता हे काम मोठे
भोगीयले त्याचे तोटे | ससोबाने || ३६ ||

- रमेश ठोंबरे
अभंग गोष्टी (अधारित) 

Nov 3, 2011

|| आळस महात्म्य ||


आळस महात्म्य, सांगतो तुम्हासी |
जवळीक खासी, वाढवावी || १ ||

आळस आळस, वाढवावा नित्य |
हेच एक कृत्य, आवडसी || २ ||

आळसाने केले, जगणे काबीज |
गळ्यात ताबीज, मिरवतो || ३ ||

आळस मला रे, प्राणाहून प्रिय |
मिळविण ध्येय, योजिलेले || ४ ||

उठतो मी रोज, दुपार प्रहरी |
दिसे मग हरी, पेंगलेला || ५ ||

आळसासाठी मी, राबतोय रोज |
आळसाचे व्याज, मिळवीन्या || ६ ||

वाढवा जीवन, वाढवा आळस |
वाढवा कळस, आळसाचा || ७ ||

द्यावी रे ताणून, सकाळी दुपारी |
संधी पुन्हा भारी, रात्री आहे || ८ ||

आळसासाठी हो, करू नका काही
प्रसन्न तो होई, आपसूक || ९ ||

सांगतो रमेश, नको रे आळस,
लावण्या तुळस, आळसाची || १० ||

- रमेश ठोंबरे 
Ramesh Thombre 

Sep 30, 2011

|| लेकीच्या ओव्या ||


काय सांगू शेजीबाई, माझ्या लेकीचं कवतिक
घरासाठी तिनं बाई, खस्ता काढल्या कितीक

होती लहान ती जवा, सांभाळले भाऊराया,
झाली लेकराची माय, घास त्याला भरवाया.

भाऊ शाळेमंदी जातो, गिरवतो यक दोन,
त्याले शिकवते तीन, त्याची आडाणी बहीन.

आली वयामंदी जवा, लाज अंगात मायीना,
चाले नाकाम्होरं पोर, वर करून पाहीना.

हात पिवळे करण्या, बाप बोलला झोकात,
देण्या-घेण्याच्या रीवाजी, त्याचं मोडलं पेकाट.

चाले लगनाची घाई, गेली मोहरून पोर,
लळा मायीचा सुटेना, तिला आईचाच घोर !

जाता सासराला लेक, झाली दादल्याची राणी,
तिच्या पावलांनी तिथं, लक्ष्मी भरतेया पाणी.

लेक माझी ग गुणाची, नाही नाही ग कुणाची,
तिचा जीव माह्यापाशी, लेक मायीच्या मनाची.

लेक व्हाढतो ग ताट, लेक भरवते घास,
लेक कोरडा कोरडा, लेक पान्हाळली कास

- रमेश ठोंबरे
(Ramesh Thombre)
(अक्षरछंद)

Aug 15, 2011

|| पाडव्याच्या ओव्या ||


आज पाडवा पाडवा,
नीट बोल रे गाढवा,
अशी गोडी या सणाची,
दोड बोलून वाढवा.


सन पाडव्याचा खास,
नव संकल्पाचा ध्यास,
सन पहिला पहिला,
नव नव्याचा सुवास.


गुढी दारावरी मोठी,
बघा सजलेली काठी,
कडू लिंबाचे तोरण,
तिला साखरेची गाठी.


साज गुढीचा उभारा,
मनी गजानना स्मरा,
माता पित्याचे चरण,
आज मनोभावे धरा.


आला पाडवा पाडवा,
नवी आशा हि नव्याची,
आज पाडव्याच्या दिनी,
गुढी उभारा नव्याची.


- रमेश ठोंबरे (Ramesh Thombre)
अष्टाक्षरी - अक्षरछंद

Jul 30, 2011

|| होळीच्या ओव्या ||

आला फागुन महिना, आला होळीचा ग सन
झाला रंगाचा आठव, गेलं आनंदून मन

होळी सजवा सजवा, सडा सारवण दारी
फांदी चिरगुट बांधा, काढा रांगोळी साजरी

होळी पेटली पेटली, तिला दाखवा निवध,
घडा वाईटाचा भरे, झाला 'होलिके'चा वध.

तिला निवध तो काय, गोड पुरणाचीपोळी,
एक भाजला नारळ, ओंबी गव्हाळी गव्हाळी.

आता जळेल गारवा, उन डोक्यावर येई,
आणा शिव्या-शाप ओठी, पोट मोकळे ते होई

होळी पेटली पेटली, आला भैरवांचा टोळ
तमो गुण सारे जाळा, होळी दुर्गुणांचा काळ


- रमेश ठोंबरे
(अक्षरछंद)