Dec 15, 2023

असामान्य बुद्धिमत्तेचा असामान्य संघर्ष

एखादा माणूस सज्जन असेल, कृतत्ववान असेल तर त्याचं भविष्य उज्वलच असेल यात शंका नाही त्याहीपुढे जाऊन तो निस्वार्थी, देशाभिमानी, देशभक्त आणि देशासाठी झुंजणारा असेल तर, देश त्याला डोक्यावर घेऊन नाचेल, देशाला त्याचा अभिमान असेल... असच ना ! मलाही असंच वाटतं, असंच असायला हवं आणि बहुतांशवेळी असंच असतं ही... पण एखाद्या अश्याच असामान्य कृतत्ववान आणि देशभक्ताच्या बाबतीत मात्र नेमकं उलटं होत असतं... जनू देशच त्याच्या देशभक्तीवर सूड उगवत असतो, आणि माझ्यासारख्या अतिसामान्य माणसाला मात्र याचा थांगपत्ताही नसतो त्याला दिसतो फक्त चंद्रावर पोचलेला देश... आणि पुन्हा एक चुनावी जुमला ! रॉकेट्री - दी नम्बी इफेक्ट, इसरोचे वैज्ञानिक नम्बी नारायणन यांच्या असाधारण जीवन संघर्षावर आधारित एक सर्वांग सुंदर सिनेमा. काल हा सिनेमा पाहण्यात आला आणि एका अतिशय बुद्धिमान चलाख शास्त्रज्ञान्याच्या खडतर संघर्षाची जीवनकथा, आर. माधवन यांचा सर्वांगसुंदर अभिनय, संघर्ष आणि हतबलता क्षणोक्षणी आपले डोळे ओले करतात. फ्रान्स, अमेरिका आणि रशिया या रॉकेट सायन्स मध्ये अव्वल असणाऱ्या देशांची मुजोरी आणि अडवणूक यांना तोंड देत देत त्यांच्याच मदतीने त्यांना धूळ चारत त्याच्या पेक्षा कितीतरी कमी किमतीत आणि त्यांच्यापेक्षा दुप्पट कार्यक्षमता असलेले क्रॉनिक इंजिन आणि टेक्नॉलॉगी आपल्या भारतीय सहकार्यांच्या सोबत बनवणाऱ्या या शास्त्रज्ञाचा हा प्रवास थक्क करणारा आणि तितकाच धक्कादायक आहे. जेंव्हा देशासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या या शस्त्रज्ञावर देशद्रोहाचा आरोप करून त्याच्या कबुली जवाबासाठी त्याचा अमानवी छळ केला जातो. दुसरीकडे वर्तमाणपत्रे आणि टीव्ही वरील सवंग पत्रकारितेवर विश्वास ठेऊन समाज त्याच्या कुटुंबालाही अतोनात छळतो. तपासादरम्यान एक सीबीआय अधि
कारी विचारतो की,' तुमच्यावर एवढे गंभीर आरोप लावले असताना आणि तुम्ही देशासाठी पोलीस कस्टडीत असताना तुमचा एकही सहकारी शास्त्रज्ञ तुम्हाला भेटायला का आला नाही?' यावर नम्बी नारायणन यांनी दिलेलं उत्तर फार सुंदर आहे, 'जब कोई रॉकेट तुटता है तो हमारे सायंटिस्ट अपसेट होते है लेकिन कोई आदमी तुटता है तो उन्हे कुछ नही लगता!' शाहरुख खान यांनी शाहरुख खान म्हणून ऐका टी.व्ही. चॅनेल साठी घेतलेल्या मुलाखतीतून फ्लॅशबॅक च्या माध्यमातून हा सिनेमा उलगडत जातो आणि या असामान्य बुद्धिमत्ता असलेल्या शास्त्रज्ञावर देशद्रोहाचे आरोप ठेऊन आपण त्याच्या उम्मेदीचे 20 वर्ष फक्त आपण निर्दोष आहोत हे सिद्ध करण्यासाठी वाया घालवायला लावतो आणि सरतेशेवटी त्याला पद्मभूषण देऊन गौरवतो....! देशात कधी काळी हे सगळं घडून गेलेलं असतं आणि आपल्याला मात्र काल परवा पर्यंत ही माहीतही नसतं ही केवढी मोठी शोकांतिका आहे ! देशद्रोहाचे हे आरोप लावण्यामागे काय कारस्थान होतं हे आरोप कोणी आणि का लावले या सर्व प्रश्नांची उत्तरं सिनेमा देत नाही, कारण वास्तवातही या प्रश्नांची उत्तर मिळालेली नसावी असं वाटतं. चित्रपटात विकास इंजिन बनवण्यासाठीचा शास्त्रज्ञानचा प्रवास, इतर देशांनी केलेली अडवणूक आणि भारतीय टीमची बुद्धिमत्ता याचा रंजक प्रवास या चित्रपट मांडलेला आहे तो प्रत्येक्ष पाहणं रोमांचक आहे. चित्रपट 2022 ला प्रदर्शित झालेला आहे, जिओ सिनेमावर उपलब्ध आहे नक्की पहा ! - रमेश ठोंबरे #rocketry