May 31, 2018

नाव त्यांचे आजही चर्चेत नाही

द्यायची असते', म्हणूनी देत नाही
दादही मी द्यायचो लाचेत नाही !

सोबत्यांच्या आठवांनी धुंद होतो
मी कधीही एकट्याने घेत नाही !

मी मनाचे ऐकले नसते कधी, पण
जायचे असते तिथे तन नेत नाही

चांगले नसते कधीही राजकारण
पण तरीही सोडण्याचा बेत नाही

गाळला मातीत आहे घाम आम्ही
फक्त पाण्यावर पिकवले शेत नाही

सोसतो आहे उन्हाळा मीच माझा
मी कुणाच्या सावलीला येत नाही

जायचे तर जा पुढे तू एकट्याने
मी तसाही कोणत्या स्पर्धेत नाही

जाळले आहे शहर हे काल ज्यांनी
नाव त्यांचे आजही चर्चेत नाही

- रमेश ठोंबरे

May 22, 2018

कोषांतर : एका हिरकणीचा गझल प्रवास


"हिरकणी इतकीच फरफट रोज होते
फक्त अमुचा पाठ अभ्यासात नाही"

सुप्रिया जाधव यांचा हा शेर काही वर्षांपूर्वी मी वाचला  आणि त्याच क्षणी तो विलक्षण आवडला, बालभारतीच्या पुस्तकातील 'कोणासाठी .... बाळासाठी' अश्या काहीतरी नावाचा पाठ क्षणात आठवला, क्षणात आठवली अभेद्य कडा उतरून बाळापर्यंत पोहचणारी हिरकणी... आणि दुसरीकडे पुन्हा डोळ्यासमोर आली आजची स्त्री, तिची होणारी फरफट... आणि या वेळी ग्रामीण आणि नागरी स्त्री हा भेद सुद्धा शिल्लक न राहता तो एक अखिल स्त्री वर्गाची फरफट मांडणारा शेर ठरतो. हे सगळं या शेरात फार प्रभावीपणे आलं आहे.

सुप्रिया जाधव यांच्या गझला या पूर्वीही मी वाचल्या होत्या, त्यांच्या कविता तर मी ओर्कुटच्या जमान्यापासून वाचत आहे. त्या कवितेकडून गझलेकडे वळल्या.... सुरुवातीच्या गझलतंत्र शिक्षणापासून ... सुरुवातीच्या साधारण गझलपासून त्यांच्या आजच्या तरल आणि उत्कृष्ट गझल लिखाणाचा मी मूक साक्षीदार आहे.
*
पाच शेरांची गझल मागू नको तू
लाख दुःखे सोसल्यावर शेर होतो
*
हा शेर वाचला आणि मी एकदम भूतकाळात गेलो .... सुप्रिया जाधव यांच्या आयुष्यात आलेलं दुर्दैवी वादळ आणि त्या वादळांन मुळापासून हदरवलेलं त्यांचं भावविश्व ...डोळ्यासमोरून सरकत गेलं... या वादळात एक दुःख, एक सल कायमची त्यांच्याकडं आली आणि यातून काही अंशी त्यांना बाहेर काढण्याच काम गझलेनं केलं. त्यांच्या संवेदना या दरम्यान आणखी प्रगल्भ झाल्या, जबाबदाऱ्या वाढल्या, आणि एक सल कायम बोचत राहिली. जो अर्ध्यावर सोडून गेला तोच आता मनात रुंजी घालू लागतो, त्याच्या आठवाणीत कधी जगणं असह्य तर कधी सुसह्य होत जातं....

हा शेर पहा

सुमार आहे दिसायला मी कबूल करते
विचार त्याचा मनात येतो सुरेख दिसते !

खूप सुंदर आहे .... अजून काही सांगायलाच नको !
या संग्रहात तो / त्याचा विचार मधून मधून भेटत राहतो ....या संग्रहाला सुंदर बनवत जातो ...

आणखी काही शेर
*
जेंव्हा त्याच्या अस्तित्वावर घेते संशय
तेंव्हा तेंव्हा तो असल्याचा येतो प्रत्यय
*
माझ्या तुझ्या नात्यातले पावित्र्य सांभाळू असे
तू देव गाभाऱ्यातला मी देवळाची पायरी
*
रोज पहाटे स्वप्नामध्ये
तो साराच्या सारा येतो
*
त्याच्यावर मिसरा सुचताना
मोरपीशी शहारा येतो
*
तू असल्याच्या आभासांवर तगले आहे
तुझ्याविना मन रमवायाला शिकले आहे

जाणून आहे कुणी कुणाचे नसते येथे
येउन बघ ना कुठे कशी भरकटले आहे
*
कुठुनही पोचते त्याच्याचपाशी
कधी संपायच्या ह्या येरझारा ?

दिसत नसला तरी आहेच आहे
तुझ्या श्वासांवरी त्याचा पहारा
*
डोळ्यात फार माझ्या शोधू नका स्वतःला
वसते अजून तेथे त्याची छबी गव्हाळी
*

या सगळ्या शेरांमधून तो कायम डोकावत राहतो.... त्याचं ते गझलेत येत राहणं अपरिहार्य आहे .. ही गझल त्याच्यामुळेच इतकी सुंदर आणि तरल आहे.
पण बऱ्याचदा त्याचं पुन्हा पुन्हा हे डोकावत राहणं, दु:खावरची खपली काढत राहणं, हे त्याच डोकावणं तिचं आयुष्य असह्य आणि एकसुरी बनवतय का ? याचं उत्तर सुद्धा ती शोधण्याचा प्रयत्न करते .... तेंव्हा लोकांचे डोळे बोलत राहतात ....

*
म्हणाले लोक,त्याच्यावर पुरे झाले सतत लिहिणे
म्हणाले दुःख , येऊ देत जे भंडावते आहे
*

पण त्याच्यावर लिहिणं बंद केलं, त्याचं हे डोकावणं बंद झालं तर काय होईल आणि मुळात हे शक्य आहे का ?

त्याचं उत्तर तिला माहीत आहे .... पण लोकांसाठी ते देणं गरजेचं आहे ...
*
गझल होते पोरकी माझी स्वतःला
नेमका उल्लेख त्याचा टाळल्यावर
*
त्याच्या उल्लेखाशिवाय ही गझल पोरकी आहे आणि हे पुन्हा पुन्हा हा संग्रह वाचताना जाणवतं.

पण हे सगळं स्वतःच दुःख, जगणं मांडताना गझलकारा बऱ्याच ठिकाणी ते इतक्या त्रयस्थपणे मांडते की ते तिचं वयक्तिक न राहता समस्त स्त्री वर्गाचं जगणं आणि भोगण होतं ! इंग्लिश मध्ये सांगायचं तर 'most personal is most universal' असं काहीतरी होत जातं

खाली दिलेले काही शेर याची उत्तम उदाहरणं आहेत

*
शेजेवर ती जिवंत जळते
घरात जेंव्हा सरपण नसते
*
उर्मिला विरहात जळते एकटीने
जानकीचा गाजतो वनवास नुसता

उर्मिलेच्या दुःखाच, उर्मिलेच्या विरहाच हे अस उदाहरण अभावानेच वाचायला मिळू शकतं, या शेराला अनेक कंगोरे आहेत, दुःख, विरह, विद्रोह, घुसमट .... आणि अश्या कितीतरी पीडित स्त्रियांचं मूक रुदन या शेरात अत्यंत समर्थपणे मांडलं आहे.

अशी अनेक उदाहरण या संग्रहात आहेत ... ज्यात स्त्रीचं जगणं अतिशय समर्थपणे मांडलं गेलं आहे. खाली आणखी काही उदाहरणं दिली आहेत

*
तिसरीच कोणी जन्मले मी ही
त्याच्या चितेवर वेगळी गेली
*
युगांची सोसली असणार घुसमट
टिपेला पोचला होता तिचा स्वर
*
असावा दोष अपुल्या कुंडलीचा
मिळाला जन्म हा ताटातुटीचा
*
विझू घातला सवतीमत्सरही शिलगवते
सिगारेटचे थोटुक त्याच्या ओठांमधले
*

स्त्री जीवन मांडताना ते किती वेगळ्या पद्धतीनं मांडलंय हे खूप महत्वाच आहे, ते कुठं ही अंगावर येत नाही, विद्रोह असला तरी त्यात आक्रस्ताळेपणा जाणवत नाही. बऱ्याच ठिकाणी प्रतिकांचा आणि प्रतिमांचा खूप चपखल पद्धतीने वापर केला आहे त्यामुळं हे शेर मनाच्या कोपऱ्यात घर करून राहतात, विचार करायला भाग पडतात.
*
उजवीकडे, डावीकडे ताटात नक्की मी कुठे ?
पक्वान्न आवडते तुझे की फक्त तोंडीलावणे ?
*
पाहिले आहे तिचा मी धूर होताना
आगपेटीतील काडी पेट घेताना
*
एका शुल्लक पण पेट घेतल्यावर तितक्याच प्रखर वाटणाऱ्या कडीपेटीच्या काडीचं दुःख जास्त वेदनादायी असेल की एका पीडित स्त्रीचं ! होवू शकते का तुलना ? नाही !

'त्याच्या' शिवाय 'तीच' जगणं, काय आणि कसं असू शकतं हे एका स्त्री शिवाय कोण मांडू शकतं ?  दुर्दैवानं सुप्रिया जाधव यांच्या वाटेला आलेल्या अनुभवानं हे या संग्रहातून अतिशय समर्थपणे मांडल्या गेलं आहे आणि मराठी गझलेला समृद्ध करणार आहे. तो सोबत नसताना या समाजात स्त्रीचं एकटीच जगणं म्हणजे अतिशय खडतर परीक्षा आणि रोजचा संघर्ष आहे.

हे एकाकीपण आणि इथल्या नजरा साहताना गझलकारा खूप आतलं आणि बोचरं सत्य मांडते

*
शाकारल्या मनाचे छप्पर उडून जाते
दररोज एक वादळ दारावरून जाते
*
वेल ही वृक्षाविना दिसल्याबरोबर
ओंडका अन ओंडका बहरून आला

पांढरे होताक्षणी हे भाळ माझे
रंग दुनियेचा खरा समजून आला
*
ही फार बिकट परिस्थिती आहे, एकट्या बाईकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन बऱ्याचदा वाईटच असतो, ही बाब गझलकारा अतिशय ताकदीने मांडते आहे. हे मांडत असताना योजलेल्या प्रतिमा अतिशय चपखल आहेत.
*
तो गेल्यावर गाडी अडली
जात दाखल्यावरची नडली

स्थान दिले मी मनात त्याला
मग नेमाने वारी घडली
*
ताकदीने घेतला मी उंच झोका
चांदवा हातात आपणहून आला

खूप सुंदर शेर आहे हा, अगदी मिसर्यातल्या 'आपणहून' आलेल्या शब्दसारखा हा संपूर्ण शेर आला असावा असं वाटून जातं.
*
वाट एकाकी निघाली निग्रहाने
सोबतीची खुमखुमी जिरली असावी
*
गती संपली संपला गोडवाही
कशास्तव नदी सागराला मिळाली ?

असे शेर हाच या गझल संग्रहाचा खरा गोडवा आहे, जे काही मांडायचं ते अतिशय समर्थपणे मांडले आहे, हे मांडताना कुठे ही पसरटपणा किंवा शब्दबंबाळपणा जाणवत नाही.

*
पुस्तकांची जाहली पारायणे
माणसांचे राहिले वाचन तुझे

चाल माझी वाटते उलटी तुला ?
सोड बाबा सोड शीर्षासन तुझे
*
वेदना रक्तात थोड्या ओत माझ्या
जीर्ण झाला जाणिवांचा पोत माझ्या
*

गळतानाही गिरकी घेते
लोभसवाणी दिसे पानगळ

अतिशय लोभस शेर आहे, वाचताच क्षणी प्रेमात पाडणारा, सृष्टीच्या सूक्ष्म निरीक्षणाला जीवन मूल्यांची जोड देवून मांडलेला, जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याची शिकवण देणारा.

तसं पाहिलं तर कवयित्रीला अतिशय नाजूक परिस्थितीतून जावे लागूनही या संपूर्ण गझल संग्रहाचा मूड सकारात्मक आहे. स्त्री मनाला बोचणाऱ्या बऱ्याच गोष्टी अत्यंत संयत शब्दात मांडल्या आहेत, जे वाचता क्षणी वाचकाच्या संवेदनांना विना ओरखडा स्पर्शून जातं आणि विचार करायला भाग पाडतं.

संग्रहातील ओळ न ओळ (मिसरा) वाचनीय आहे, नेटकं मनोगत, अभ्यासपूर्ण आणि अनौपचारिक प्रस्तावना (भूषण कटककर), मार्गदर्शक पाठराखण (म.भा. चव्हाण) इत्यादी. संपूर्ण गझल संग्रहाच्या निर्मितीवर अतिशय मेहनत घेतलेली पानोपानी दिसून येते, संग्रहात कुठे ही टायपो अर्थात छपाई किंवा व्याकरणातील दोष दिसून आले नाहीत. या संग्रहाशी जोडल्या गेलेली नावं ही या क्षेत्रातील अतिशय प्रथितयश आणि अभ्यासू मंडळी आहेत त्यामुळे हा गझल संग्रह सगळयाच दृष्टीने संग्राह्य आणि नवीन गझल लिहिणाऱ्यांसाठी तसेच सभ्यासकांसाठी मार्गदर्शक आहे.

लिहिण्याच्या ओघात बरेच शेर इथे दिले गेले आहेत, आणखी किती तरी (एकूण 100 गझला आणि 60 सुटे शेर) अप्रतिम शेर आणि गझला या संग्रहात पानोपानी वाचकांच्या मनाचा ठाव घेण्यास सज्ज आहेत, त्या सर्वच बाबींवर इथे लिहिणे शक्य आणि योग्यही नाही म्हणून शेवटी आणखी काही सुटे शेर देऊन थांबतो !

" पाच शेरांची गझल मागू नको तू
लाख दुःखे सोसल्यावर शेर होतो"

-  हे जरी खरं असलं तरी संग्रहात शेवटी दिलेल्या सर्वच सुट्या शेरांना त्यांची हक्काची गझल सुद्धा मिळो अशी इच्छा व्यक्त करून सुप्रिया (ताई) जाधव यांच्या पुढील लेखनास शुभेच्छा देतो !
*
एक तर दुष्काळ दे किंवा मला वाहून ने
पावसा तू सोसवत नाहीस रे मध्यम मला
*
लागला नाही सुगावा वादळाचा
मी किनारे गाठले असते कदाचित
*
आता नवी जागा बघा माझ्याकडे राहू नका
देताय दुःखानो तुम्ही भाडे तसेही वाजवी
*
राहू दे कोळ्याचे जाळे
घर त्याचेही बनते आहे
*
पिशवीमध्ये एकच पालेभाजी आहे
निघून गेल्या दिवसांची सय ताजी आहे
*
दोन सरींच्या मधे चालते
ठक्क कोरडी उरण्यासाठी
*
मलाही नाव दे तू घेतलेल्या औषधाचे
मला विसरायचे आहे तुला मी भेटल्याचे
*
भासलेलेे चिवट पण तुटलेच नाते
तन्यता सरतेच ... इतके ताणल्यावर

---------------------------------------------
गझल संग्रह : कोषांतर
सुप्रिया मिलिंद जाधव
पृथ्वीराज प्रकाशन, पुणे
पृष्ठे : 128
किंमत: 150/-
- रमेश ठोंबरे




May 18, 2018

रिकामं घर


उपाशीपोटी घरी आल्यावर
घरात खायला काही तरी शोधताना
रिकामं घर मलाच खायला उठतं

तेंव्हा
आम्ही दोघंही एकमेकांच्या
डोळ्यात पाहतो

मग
नेमकं कोणी कोणाला खायचं
हा विचार करत 
दोघंही उपाशी पोटीच
झोपी जातो,
पोट भारल्याचा आव आणून !

- रमेश ठोंबरे

May 16, 2018

माणसे वेल्हाळ होता तो

वाचकांची नाळ होता तो
पुस्तकांची चाळ होता तो

ऐकण्याचा कान ही झाला
बोलणारा टाळ होता तो

दोष कोणा द्यायचा नाही
पांढरे आभाळ होता तो

कोपराने खोदला आम्ही
अन म्हणे, खडकाळ होता तो !

आठवांणी कंठ भरल्यावर
रम्य सायंकाळ होता तो

माणसांनी टाकले त्याला
माणसे वेल्हाळ होता तो

थांबला पण काळ आल्याने
कर्दनांचा काळ होता तो

शेवटाला बाळ ही झाला
माउलीचे भाळ होता तो

- रमेश ठोंबरे
----------------------------------------------------------
आम्हा सर्व कविमित्रांचे मित्र आणि मार्गदर्शक,
गोष्टीवेल्हाळ स्व. सुधाकर कुलकर्णी अर्थात
सु.ल. यांना विनम्र आदरांजली !
----------------------------------------------------------

May 11, 2018

राखुया ना शुद्ध आपण येथले पर्यावरण !


जाणले नाहीच आम्ही माणसाचे आचरण
पाहतो आहोत केवळ बोलण्यातिल व्याकरण

आत्महत्येला मनाई, श्वास केला बेदखल
मी गुन्हा करणार नाही, द्या मला इच्छामरण

ट्विट केले, पोक केले, पोस्ट ही झाली करुन
चांगल्या कामात गेले, आजचे मग जागरण

राम-राजा श्रेष्ठतेस्तव पाहिजे होते समर
रावणाहातून ठरले शेवटी सीताहरण

दोष शहरालाच आम्ही द्यायचो अष्टोप्रहर
राहिले गावातही ना चांगले वातावरण

रम्य होण्या सांज अपुली अन पिढ्यांचे बालपण
राखुया ना शुद्ध आपण येथले पर्यावरण !

- रमेश ठोंबरे

May 9, 2018

काय जायचे रोजच वेळेवर ?


खूप चांगले दिसले असते घर
समोर थोडे अंगण असते तर

पीक उन्हाने मरून गेले अन
सरणावरती आली अखेर सर

दुःख असो वा आनंदाचा क्षण
जे जे मिळते खिशात सारे भर

मला कधीही जमले नाही पण
तुला पाहिजे ते तू खुशाल कर

प्रश्न तसा तर मनात ही नाही
त्या प्रश्नाचे व्ह्यावे तू उत्तर !

कसा ओळखू तिच्या चेहऱ्याला
मीच मला जर विसरून गेलो तर

लिहितो आहे सुमार हे नक्की
किती चांगले आहे पण अक्षर !

रोज वाजतो कर्कश हा भोंगा
काय जायचे रोजच वेळेवर ?

- रमेश ठोंबरे