Mar 7, 2017

तू पाणी घालतेस तो वृक्ष

तू पाणी घालतेस तो वृक्ष आता
चांगलाच फोफावलाय
अन कुठल्यातरी ओढीनं
पार गॅलरीपर्यंत झेपावलाय
तू चिमण्यांना दानापाणी कारायचीस 
म्हणून त्या येऊन बसायच्या वृक्षावर
आणि शीटत राहायच्या
त्याच्या अंगाखांद्यावर दिवसभर
तू दिवसभर काळजी घ्यायचीस चिमण्यांची,
तुझी चाहूल लागली कि
नुस्ता चिवचिवाट करायच्या चिमण्या,
तेंव्हा शहारून यायचा तोही !
तुला केवढं कौतुक चिमण्यांच्या धिटाईचं
अन केवढा तिटकारा
वृक्षाच्या चोरट्या स्पर्शाचा !
तो कधीचा झुरतोय एकटाच,
कधीतरी हात फिरवत जा त्याच्या
अंगाखांद्यावरून .....
बघ कसा बहरून येईल तो....
तुझ्यासाठी आणि
तुझ्या चिमण्यांसाठी ही !
- रमेश ठोंबरे