Oct 16, 2014

माझा एक कवी मित्र आहे ….

माझा एक कवी मित्र आहे …. त्याच्या अधून मधून भेटी होत असतात… एखाद्या छोटेखानी कार्यक्रमात कविता ऐकण्या ऐकवण्याचा प्रसंग बर्याचदा येतो, मित्राला कविता म्हण म्हटले कि मित्र थोडासा पुढं सरसावून, शून्यात नजर टाकून त्याची एक गेय कविता तर्रनुम मध्ये सदर करतो, गावाकडच चित्र उभं करणारी कविता असते, कधी दुष्काळ, कधी सुगीचे दिवस, कधी रुसलेले बैल, कधी शेतकर्याची आत्महत्या, असल्या साहित्यातील अतोनात सक्सेसफुल एवजाची तंतोतंत सरमिसळ असतानाही मित्राच्या चेहऱ्यावरचे निरागस भाव शेवटपर्यंत जरा सुद्धा बदलत नाहीत आणि याचं समेवर एकदाचं त्याचं काव्यगान संपतं ! मित्र सर्व श्रोत्यांवर एकवार आपली तीच निरागस नजर फिरवत, त्यांच्या उपस्थितीतीची दाखल घेतो आणि, बसल्या जागेवर पुन्हा थोडं मागं सरकतो.    

पण सांगायचा आणि महत्वाचा विषय हा कि, मित्राची कविता संपल्यावर मला नेहमीच एक प्रश्न पडतो कि "हा प्रत्येक वेळेस जी कविता ऐकवतो ती तीच-ती  कविता असते कि वेगळी कविता असते ? 

Oct 11, 2014

ट्यागीरामांसाठी एक दु:खद बातमी
मित्रानो ट्यागीरामांकडून होणारी छळवणूक हि आता नेहमीचीच आणि तितकीच त्रासदायक गोष्ट झालेली आहे.  कुठली पोस्ट, कुणाला आणि किती वेळेस ट्याग करावी याचे काहीच धरबंद या लोकांना नसते, मुळात 'आपल्या हातात दिलेली हि 'सोय' आपण माकडाच्या हातात 'कोलीत' आल्या सारखी वापरतो आणि इतरांची गैरसोय करतोय' अशी पुसटसी शंका हि या लोकांच्या मनात डोकावते कि नाही याबद्दल माझ्या मनात उत्सुकता वजा शंका नेहमीच असते .

असो, तर या महाभागांच्या कुटील कारस्थानामुळे फेस्बुकावरील बरेच रहिवासी धास्तावलेले आहेत याची मला स्वानुभवातून खात्री झालेली होतीच, त्यामुळेच काही दिवसांपूर्वी एका मध्यरात्री असंच एक तात्कालिक कारण घडलं आणि इतक्या दिवस खदखदत असलेल्या वैचारिक उद्वेगाला मी मूर्त रूप दिलं. लगेच आतापर्यंत 'ट्याग' या सोयीचा 'सोयी' प्रमाणे गैरवापर करणाऱ्या सर्व ट्यागीरामांचा एक धावता आढावा मन:पट्टालावर घेतला, संगणकाचा कि-बोर्ड जवळ ओढला आणि उशीर झाला तर राग शांत होईल आणि पुन्हा हे काम मागे पडेल या भीतीपोटी जितक्या लवकर आणि जोरात बडवता येईल तितक्या लवकर बडवला आणि कार्य हातावेगळ केलं. हे शुभ कार्य होतं ट्यागीरामां कडून होणाऱ्या छळवणूकिची इत्यंभूत माहिती मार्क झुकरबाबाला जमेल तितकी जास्तीत जास्त पुराव्यानिशी सादर करण्याचं.

कुठल्याश्या अतिशय उत्स्फूर्त आणि झपाटलेल्या शक्तीनिशी मी सगळी माहित, पुरावे, ट्यागीरामांचे प्रोफाइल्स, त्यांनी ट्यागलेल्या नावांच्या याद्या, आपल्याला जबरदस्तीने वाचायला भाग पाडलेल्या आणि त्यांनी स्वतःहि एकदातरी वाचल्या असतील कि नसतील इतपत शंका येण्याइतक्या आणि काव्याच्या आसपास हि नजाणार्या कविता. सोबत जड बोजड 'मोबाइल धारक फेसबुककराच्या ब्याटरीचा आणि नेट प्याकचा जीव घेणारे, चित्र विचित्र फोटो' असला काय काय डाटा जोडून त्या सोबत एक निषेध वजा निवेदन तय्यार केले.  त्यात आपण दिलेली हि 'ट्याग'ची सोय म्हणजे आमच्या साठी 'माकडाच्या हातातले कोलीत' ठरली आहे आणि याची धास्ती माझ्यासारख्या कितीतरी सभ्य आणि निरुपद्रवी लोकांनी घेतली आहे, तेंव्हा आपण हे कोलीत वेळीच काढून घ्यावे आणि आमची गैरसोय टाळावी' अश्या आशयाची एक पोस्ट मी फेसबुक ला टाकली, त्यात 'मार्क झुकरबर्ग'  आणि त्यांच्या सोबत, माझ्या आणि त्यांच्या मित्र यादीतील 'कॉमन फ्रेंडस'ना पहिले आणि शेवटचे ट्याग करून टाकले !

हा हा म्हणता या पोस्ट ने 'मार्क'च्या भिंतीवर धुमाकूळ घातला आणि भरीत भर म्हणून आधीच ट्यागीरामांच्या उपद्व्यापामुळे त्रासलेल्या कित्त्येक समदु:खी  लोकांनी त्या पोस्टवर 'ट्याग-सुख' घेतलं. या सगळ्या उठठेवीचा परिणाम असा झाला कि, झुकर बर्ग बाबाला या निवेदनाची दाखल घ्यावी लागली. आतल्या गोटातील खात्रीलायक बातमी अशी कि, माझ्या या निवेदनावर त्यांनी तातडीचा आणि सकारात्मक घेतला आहे.

तर माझ्या मित्रानो, आता निर्धास्त जगा, ट्यागीरामांच्या जाचातून लवकरात लवकर कोणत्याही क्षणी आपली सुटका होणार आहे, ट्याग ची सुविधा बंद करण्यात आल्याची घोषणा झुकरबर्ग बाबा कडून कुठल्याही क्षणी होवू शकते !

ट्यागीरामांनाही या गोष्टीची कुणकुण लागली आहे त्यांनी या निर्णयाच्या विरोधात पुन्हा  झुकरबर्गला निषेधाच्या पोस्टा 'ट्याग' करून आपला निषेध नोंदवण्यास सुरवात केली आहे ……. त्यामुळे तर आपला विजय निच्चीत आहे !  

Oct 5, 2014

सूडडोईवर भाकरीचं गाठोडं,
अन पोटात भुकेचा जाळ घेवून
ती तुडवत राहिली नशिबाची वाट आयुष्यभर !

तिला दिसल्या नाहीत कधीच तिच्या
रखरखत्या हातावरच्या भविष्य रेषा,
तिनं पहिल्या नाहीत कधीच
कुंकवाखालच्या ललाट रेषा !
तिनं कधीच दोष दिला नाही तिच्या नशिबाला,
अन तिचं नशीब लिहिणाऱ्यालाही

ती विसरत गेली तिचा भूतकाळ
ती ढकलत राहिली तिचं वर्तमान,
तिनं कधीच चिंता केली नाही भविष्याची

ती विसरून गेली … स्वतःच जगणं ….
ती विसरून गेली … विरोध
ती विसरून गेली … विद्रोह

ती फक्त ….
तुडवत राहिली नशिबाची वाट आयुष्यभर
अन उगवत राहिली सूड,
निर्ढावलेल्या समाजावर, विनातक्रार !

- रमेश ठोंबरे