May 30, 2011

रे सख्या, मी चिंब भिजले रे ....


रे सख्या, मी चिंब भिजले रे ....
तू बोललास काही अन ... जीवन सजले रे.

हि धुंद झाली हवा ....
हा पाऊस वाटे नवा,
ओले हे अंग असे
अन नजरेचा गोडवा.
रे सख्या, मी चिंब भिजले रे .....

मन माझे अधीर होते,
हि आसुसलेली काया ...
तू आलास घेऊन धुंदी
अन ओली-ओली माया.
रे सख्या, मी चिंब भिजले रे .....

घे समजून घे सख्या,
या धरतीची याचना ....
कर शिडकाव सरींचा
बघ दाटल्या भावना !
रे सख्या, मी चिंब भिजले रे .....

व्यापून आयुष्य माझे
तू बोलतोस काही ...
तू प्रश्न टाकला ऐसा
कि उत्तर ...गंध होई..
रे सख्या, मी चिंब भिजले रे .....

- रमेश ठोंबरे
३० मे २०११

May 28, 2011

~ अजून बाकी ~


धुंद जाहली, कुंद जाहली, परी भाळणे अजून बाकी
चिंब जाहलो आठवणींनी, पाउस भिजणे अजून बाकी.


रक्त सांडले दुबळ्यांचे अन, जीवे मारले रक्षणकर्त्या
देश आमुचा पोसत बसतो, फास अवळणे अजून बाकी.


उंच उंच इमले, आदर्शाचे, पचउन कुठला ढेकर येतो
आगडोंब ज्या उदरी वसतो, घास भरवणे अजून बाकी.


तुझे दिलासे, तुझे उसासे, तुझे खुलासे मोजत बसतो
पहिल्या वहिल्या पत्राचे पण, उत्तर मिळणे अजून बाकी.


भाव भुकेला विठू एकटा, वाट पाहतो भक्तगणांची
दलाल दिसले, बडवे दिसले, विठ्ठल दिसणे अजून बाकी.


रदीफ सारे जुळून येता, किती रमेशा गजला लिहिल्या
काळीज पार करणारा एक, शेर गिरवणे अजून बाकी.- रमेश ठोंबरे

May 27, 2011

१६. || प्रियेचा तो बाप ||


पाहिला मी आज
प्रियेचा तो बाप
सर्वांगाला काप
सुटला हो || १ ||

अंगी तो धिप्पाड
झोकात चालतो
नाकात बोलतो
काही बाही || २ ||

पिंजारून आल्या
ओठावरी मिशा
दिसतील कशा ?
साळसूद || ३ ||

दुसर्याच क्षणी
माझ्यापुढे उभा
केला मग तोबा
ऐश्या नरा || ४ ||

कुठे मम प्रिया
कुठे तिची नाळ
पाहील मी कुळ
मातेचेही || ५ ||

- रमेश ठोंबरे
दि २१ नोव्हे. २००९

१५ || नश्वर हा देह ||


नश्वर हा देह
नश्वर हि माया
शाश्वत हो प्रिया
मजसाठी || १ ||

नको मज पैसा
नको मज धन
संतुष्ट हे मन
भक्तीतच || २ ||

नको ती भूषणे
आणि आभूषणे
कशाला दुषणे ?
वैराग्याला || ३ ||

काय मज पाप
काय मज पुण्य
होयील मी धन्य
दर्शनाने || ४ ||

दु:खाचा आठव
विसरलो आता
मुखी नाम घेता
प्रिया प्रिया || ५ ||

- रमेश ठोंबरे

May 26, 2011

हा माझ्या बापुंचा देश नाही.


माझ्या देशान बलिदान केल होत स्वतेंत्र्यासाठी
माझ्या देशान बाँधल्या होत्या रुनानुबंदाच्या गाठी.
माझा देश होता तो गुलामगिरीत जगनारा,
आणि माझाच देश होता तो अन्यायाविरुद्ध पेट्नारा
माझ्या देशान शिकवला होता बंधुभाव,
आणि माझ्याच देशान सांगितल होत चलेजाव.
माझा देश होता जगाला प्रेम शिकवनारा,
माझा देश होता द्वेशाच पात मोडनारा.
माझ्या देशात होत नव्हती हिंसा,
माझा देश होता अहिन्सेशी नात सांगणारा.
...
काय म्हणतोस वेड्या,
सत्तेसाठी लड़तोय तो हा माझा देश आहे.
आणि काय रे न्याय मागना-यानवर जिथ..
लाठी हल्ला होतोय तो ही माझाच देश आहे ?
माझ्याच देशात का ते शहर पेटत आहे,
सांग माझ्याच देशात का त्या मातेच वस्त्र फ़िटत आहे ?
नाही वेड्या नाही हा देशच माझा नाही,
शेर्तेवर सांगतो हा माझ्या बापुंचा देश नाही.

- रमेश ठोम्बरे
दी. ५ / २ / १९९५

तुला परत यायचं असेल तर


महात्म्या, तुला परत यायचं असेल तर,
तुझी ती अहिंसा तेथेच ठेवुन ये.
कारण आज तिला आमच्याकडे काहीच किंमत नाही
आज अहिंसेला आम्ही अडगळी शेजारी जागा दिलीय,
कारण अहिंसा म्हणजे आज फक्त गांधीवाद्यांची झालीय...

अहो गांधीवादी तरी कसले ते...?
नुसते गांधीवादी म्हणवुन घेणारे,
आणि अंधारात सत्तेसाठी...
सत्त्यासाठी नव्हे महात्म्या, सत्येसाठी!
अंधारात सत्तेसाठी पाठीत खंजर मारणारे,
आणि डळमळत्या खुर्चीला...
पडण्याआधी तारणारे.
हे आजचे अहिंसावादी...
हे आजचे गांधीवादी.
म्हणुन अहिंसा नको.

आणि हो, तो सत्याग्रह तरी कशाला आणतोस?
कुणाचे ग्रह हलणार आहेत त्यानं?
कुणाचे विचार बदलणार आहेत त्याने?
महात्म्या, ते प्रेम ही नकोस आनू
दोन दिवसात पार बो-या वाजेल त्याचा,
आजच्या स्पर्धेच्या युगात.
कारण, आज आम्ही धावण्याची शर्यत...
प्रेमाने नाही तर पायात पाय घालुनच जिंकतो...
आणि हो, आम्ही कुणाचं भलं करु...
अशी आशाही आमच्याकडुन करु नकोस,
कारण तिथच तर आम्ही शिंकतो
म्हणुन प्रेम ही नको.

आणि महात्म्या ती, करुणा आणि शांती,
ती तर नकोच नको.
गांधीवादाचे पुरस्कर्ते म्हणुन ठेवली होती...
हीच नावे आम्ही आमच्या मुलींची
पण तीही त्यांनी कधीच बदललीत,
आजच्या आधुनीक युगात 'सुटेबल'
होत नाहीत म्हणुन

तेंव्हा आता यायचं असेल तर,
सत्त्यासोबत असत्त्यालाही घेऊन ये.
आता चरखा नकोय ...एखादी गन घेऊन ये,
महात्म्या तु जरुर ये.... पण येताना,
आमच्या सारखंच पांढरपेशी मनही घेवुन ये!


रमेश ठोंबरे

आधारस्तंभाला आधार द्यायचा कसा ?


एकदा बापू माझ्या स्वप्नात आले
थोड्स मला हालउन म्हणाले,
" आस् कोणत पाप माझ्या हातून झालय,
म्हणून तुम्ही लोकानी मला ट्राफिक हवालदार केलय ?
दिवस - रात्र या चौकात उभा कसा राहू,
सांग उघड्या डोळ्ळयानि हे पाप कसा पाहू ?"
एवढ बोलून बापू गप्प झाले
चेहेरा माझा पाहून पुन्हा ठप्प झाले.
मी मन्हालो, "बापू, उपोषण करा,
नाहीतर खाली उतरून सरळ भाषण करा."
एकून बापू पुढ बोलले, मन्हाले,
"विचार तोही करून बसलोय,
उपोषण करून ही कित्येकदा फसलोय.
आज उपोषनाचा माझ्या फायदा होणार नाही,
मी मेलो तरी कोणीही पहायला यणार नाही.
आजवर फार सहन केलय,
पण काल जे झालय ते चांगलच झालय"
बापू स्वास सोडून मन्हाले,
"हो कालच माझ्या चिंतेचा विचार कोणीतरी केलाय,
वरचे वर माझा चष्माच नेलाय.

.... आता मात्र मी सर्व विसरून गेलोय
डोळे आसून ही अंधला झालोय".
बापुन्कडे पाहून मी विचार करू लागलो
त्यांच्या बोल्न्याचा अर्थ त्यांच्या डोळ्यात पाहू लागलो.
मी मन्हालो, " चष्मा पळउन तुमची चिंता आम्ही खोडली,
मग आता तुम्ही कश्यासाठी झोप माझी मोडली ?"
बापू पुन्हा कळवळुन मन्हाले,
" अरे काल चष्माम्या बरोबर कठिही नेलीय,
म्हणूनच माझी ही दैय्ना झालीय,
अरे कठिवाचुंन मी लूळा झालोय
म्हणूनच आधारासाठी तुज्यकड़ आलोय"

.... बापुंच बोलन एकून मी पुन्हा विचारात पडलो,
झोप मोडताच बापू निघून गेलेत.
पण मी मात्र अनखिही विचारच करतोय.
काठीचा प्रश्न सोडवायचा कसा ?
आधारस्तंभाला आधार द्यायचा कसा ?

- - रमेश ठोंबरे

सत्य, अहिंसा आणि प्रेम


बापू तुमचे सत्य आज
माला कुटेच सापडत नाही.
जो-तो म्हणत असतो,
सत्याशिवाय काही अडत नाही.

बापू तुमची अहिंसा,
आज पोरकी होउन गेली.
हिन्सेच्या पुढे बिचारी
लालभडक रंगात नाहून गेली.

बापू तुमच्या प्रेमाची
आज आम्ही होळी केली,
रखरखत्या निखा-यावर द्वेश्याच्या
आम्ही राजकारणी पोळी केली.

सत्य, अहिंसा आणि प्रेमाची
बापू तुमची शिकवण मोठी,
असत्य, हिंसा आणि द्वेश्याने
ज्याने-त्याने केली खोटी.

बापू तुमची गाँधी टोपी,
आज पुरती बदलून गेली.
बघता-बघता टोपीची त्या,
मोठी उंची हट (hat) जाली.

बापू तुमचा सत्याग्रह,
आज फैशन बनवण्यासाठी.
वेळो-वेळो सत्याग्रह केला ,
फ़क्त गांधीवादी म्हनवण्यासाठी.

बापू शिकवण तुमची,
सत्य, सहिंसा आणि प्रेम
फ़क्त यवढच सोडलत तर,
तुमच आमच अगदी सेम.

- - रमेश ठोंबरे

14. || अवकाळीच तो ||


अवकाळीच तो
प्रियेसाठी आला
छेडूनिया गेला
चिंब चिंब || १ ||

प्रियेच्या तनुचा
दिवाना दिवाना
घातला धिंगाणा
पुन्हा पुन्हा ||२||

झाला तो अधीर
मुक्त बरसला
ऋतु विसरला
ओला ओला ||३||

रस्त्यात प्रियेला
एकटी गाठतो
येउनी भेटतो
सवे सवे ||४||

मला टाळण्याचा
शोधतो बहाणा
अवकाळी राणा
दूर दूर ||५||


- रमेश ठोंबरे

May 6, 2011

१३. || देवा तुझ्या साठी ||


देवा तुझ्या साठी
नाही मज वेळ
घालू कसा मेळ
भक्तीचा रे || १ ||

विसरलो मला
विसरलो तुला
प्राण एक झाला
तीयेठाई || २ ||

नको तो आठव
तव प्रतापाचा
झालो मी प्रियेचा
दास आता || ३ ||

नको मागे लागू
दर्शन हि देऊ
उगा 'वाट' लाऊ
साधनेची || ४ ||

होयील कि भंग
प्रियेच्या संगाचा
आणि अभंगाचा
पेरलेल्या || ५ ||

- रमेश ठोंबरे

May 3, 2011

रमेश ठोंबरे: १२. || अभंगात माझ्या ||

रमेश ठोंबरे: १२. || अभंगात माझ्या ||: "अभंगात माझ्या प्रियेचीच भक्ती प्रिया हीच शक्ती मज साठी || १ || प्रियेसाठी आता सोडीला प्रपंच नाडीयले पंच महा ज्ञानी || २ || प्रीयेविना म..."

१२. || अभंगात माझ्या ||


अभंगात माझ्या
प्रियेचीच भक्ती
प्रिया हीच शक्ती
मज साठी || १ ||

प्रियेसाठी आता
सोडीला प्रपंच
नाडीयले पंच
महा ज्ञानी || २ ||

प्रीयेविना मज
नाही आता कोणी
प्रियेसाठी वाणी
झिजविन || ३ ||

प्रिया प्रिया नाम
घेयीन सर्वदा
माघार ती कदा
नाही नाही || ४ ||

सुटो आता जग
जावो आता प्राण
शोधील तो बाण
लोचनाचा || ५ ||

- रमेश ठोंबरे

११. || प्रिया प्राप्तीसाठी .... ||


प्रिया प्राप्तीसाठी
सोडीयले घर
मारियला ठार
'मी' च माझा || १ ||

पाहुनिया वाट
शिणले हे डोळे
काळीजही जाळे
प्रियतमा || २ ||

लागताही आस
प्रिया दर्शनाची
भेट त्या क्षणाची
व्हावी आता ||३ ||

प्राण हा व्याकूळ
मन हे अधीर
धरवेना धीर
भेटीलागी || ४ ||

'युगे अठ्ठावीस'
तेही लक्ष माझे
दर्शन ते चोजे
घ्यावयाला || ५ ||

- रमेश ठोंबरे