Dec 12, 2018

पत्रोत्तर


मित्रा,
तुझे पत्र मिळाले
तू मजेत आहेस हे समजले.
आम्ही ही इकडे मजेत आहोत ....
फरक फक्त हाच की मागच्यापेक्षा ....
यावेळीचा उन्हाळा जरा जास्तच कोरडा आहे.
तु म्हणतोस, ‘गावाकडं यायचंय ...’
‘‘कशाला येतोस ?
फार उशीर झाला आहे रे आता ..
आपण दिवसभर डुंबायचो ती विहीर
कधीच आटली आहे.
पुर्वी नवविवाहीता मोठ्या विश्वासाने
पाणी भरायच्या त्या विहीरीवर...
दरम्यानच्या काळात त्यातील कित्येकजणींनी
आत्महत्या केलीय .. त्याच विहीरीत उडी घेऊन.
तू म्हणतोस ...
ती विहिरीवरची ‘मोट’ही कधीच लुप्त झालीय,
अन् त्यासोबत पाटाच्या पाण्याचा झुळझुळ आवाजही.
झाडाखालची आपली शाळा, आता पार बदलून गेलीय.
आख्खं आयुष्य शाळेसाठी देणारे देशपांडे मास्तर गेले,
तेव्हा आठवणं आली होती तुझी ...
कारण तू म्हणायचासं ‘मास्तर, मी पण मास्तर होणार,
आपल्या शाळेत शिकवणार’
आता शाळेत कित्येक सर आहेत...
पण एक मास्तर भेटत नाहीत !
आपण दिवसभर ज्याच्याभोवती हुंदडायचो
तो पिंपळपाराचा कट्टा नावापुरताच उरलाय
अन् कट्टयावचा पिंपळही कधीच इतिहासजमा ठरलाय.
म्हातारी खोडं आता कट्ट्यावती बसत नाहीत...,
खोडं एकटीं कारण नातवंही सोबत दिसत नाहीत.
कधीकाळी भल्या पहाटं खांद्यावर फावडं टावूâन
निघणाऱ्या शेतकऱ्याची तरुण पोरं ...
आता दिवसभर गावातच फिरत असतात ...
कधी या झेंड्याखाली तर कधी त्या झेंड्याखाली.
भविष्य हरवलेल्या खेड्यागत.
मित्रा,
तू मागे सोडून गेलास ते तुझं गाव...
आज तुला सापडेलच असं नाही.
अन् माझं म्हणशील तर...
मीही आज कुणाला माझ्या गावाची ओळख देत नाही.
तू गाव सोडलंस तेव्हा अडवलं होतं मी तुला...
मोठ-मोठ्या आदर्शाच्या गोष्टी सांगून.
तू ऐकल नाहीस ... निघून गेलास ...
गावं मागं सोडून ... तुझ्यासोबत कित्येकजणांना घेऊन ...
मी राहिलो इथेच ... प्रत्येकाला विरोध करतं,
आदर्शाच्या गोष्टी पेरत.
मित्रा,
तू जिंकलास
मी हरलोय !
वाईट फक्त एकच वाटतय की,
तू सोडून गेलास ते तुझं गाव...
मी तुला परत देऊ शकत नाही.’’
- रमेश ठोंबरे

Dec 2, 2018

आरक्षण हवंय !


काही काळासाठी दिलेलं आरक्षण
या देश्याच्या भाळावरची अमीट खूण होऊन बसलंय

बाबासाहेब,
या देशात लोकशाही असली तरी
हा देश राजकारण्यांच्याच तालावर नाचणार
हे माहीत नव्हतं का तुम्हाला ?

बाबासाहेब,
आज सगळे प्रश्न मागं पडलेत
अन मागासलेपण दाखवण्याची शर्यत सुरू झालीय.

निवडणूका जवळ आल्या की
जात धर्माच्या अस्मिता टोकदार होतात ...
मंदिर मस्जिदी आठवतात ...
अश्याच कुठल्यातरी गोंधळात
शिक्षणाचं बाजारीकरण करणार विधेयक
एकमतानं पास होत,
आणि साक्षर म्हणवणारा देश
दिवसेंदिवस निरक्षर होत जातो ...

बाबासाहेब,
देशाला अनुदान हवंय
बाबासाहेब,
काहीही न करता झालेल्या नुकसानीची
नुकसान भरपाई हवीय
बाबासाहेब,
देश निरक्षर झालाय
देश दरिद्री झालाय
देश मागास आलाय !

बाबासाहेब,
आता देशाला संविधान नकोय
आरक्षण हवंय !

- रमेश ठोंबरे

Sep 27, 2018

चांदणे चांदणे चांदणे व्हायचे

चांदणे चांदणे चांदणे व्हायचे
भेटल्यावर तिचे बोलणे व्हायचे

पोचण्याला कुठे ध्येय होते मला
सोबतीने तिच्या चालणे व्हायचे

चालताना जरा मीच थांबायचो
पाठमोरे तिला पाहणे व्हायचे

हात हातामध्ये घेतल्यावर तिचा
जीवघेणे तिचे लाजणे व्हायचे

ठेवले मी तिला पापणी आड पण 
काळजावर छबी गोंदणे व्हायचे

पत्र होते तिचे एक गंधाळले
रातभर वाचणे जागणे व्हायचे

शब्द देऊनही 'तेच' टाळायची
शेवटी 'जे' तिला मागणे व्हायचे

- रमेश ठोंबरे

Aug 15, 2018

ओल

सगळं उन्हाळी काम यंदा ट्रॅक्टर वर उरकलं होतं. मागच्या सहा महिन्यात दशरथ नानानं जवळपासचे सगळे जनावराचे बाजार पालथे घातले पण, मानाजोगी बैलजोडी मिळाली नाही म्हणून सगळीकडून परत आला.  बैलजोडी तरी कशी पसंत पडणार, ज्या त्या बाजारात तो गुण्या-सोन्यालाच बघायचा. गुण्या-सोन्या त्याच्या नजरं आड होत नव्हते.  बाजारात नवीन जोडी बघीतली की नाना तिची गुण्या-सोन्या सोबत तुलना करायचा. शेवटी निराश होऊन रिकाम्या हातानी आन भरल्या डोळ्यांनी घरला परतायचा. मागच्या सहा महिन्यांपासून हे आसच चाललं होतं. कुणीतरी कुठल्यातरी बाजाराचा ठेपा आणायचा. नाना पैश्याची थैली उचलायचा. बाजाराला जायचा अन पुन्हा संध्याकाळी रिकाम्या हातानं घरी परत यायचा. बैलजोडी तरी कशी पसंत येणार ! सोन्या-गुण्याच्या आठवणी अजून नानाच्या काळजात ओल्या होत्या. नानाला त्या विसरणं शक्य नव्हतं. बैलजोडी जराशी पसंत पडली की, मनात तुलना व्ह्यायची ...अन काहीतरी कारण सांगून नाना सौदा सोडून द्यायचा.

पेरणीचे दिवस जवळ आले होते. बैलजोडी वाचून सगळी मशागतीची कामं खोळंबली होती. शेत नीट करणं, नांगरट घालणं सगळं तसच होतं. नानाची मानसिकता रामाला कळत होती पण आजूबाजूला सगळ्या लोकांची मशागतीची कामं जोरात सुरू होती अन आपलं शेत मात्र अजून तसंच पडून होतं. आजवर नाना स्वतः पुढाकार घेऊन काम करून घ्यायचा, लहाना मुलगा रामा दिवसभर राबायचा. मोठा शिवा बीडच्या कॉलेजात वकिलीचं शिक्षण घेतो. महिन्या पंधरा दिवसाला गावाकडं आला की तो सुद्धा दिवसभर राबतो. सगळे मिळून काम करतात म्हणून शेत सोनं पिकवतं. नानाला दहाबारा एकर जमीन ! पण जमीन नंबर एकची, मेहनतीला फळ देणारी. उन्हाळ्याचे दोन तीन महिने सोडले तर पाण्याखाली असणारं शेत. उन्हाळ्यात तेवढ दोन तीन महिने हिर तळ गाठते. माणसांना आणि जनावरांना पिण्यापूरतच पाणी हिरीला रहायच. हाहा म्हणता उन्हाळा सरायचा. शेतीची मशागत संपायची आणि पावसाचं आगमन व्हायचं. सगळ्या शिवारात पेरण्यांची लगबग सुरू व्हायची अन आठवड्यात पेरण्या उरकून झाल्या की पुढच्या आठ दिवसात काळं रान नवं रूप घेवून हिरवं व्ह्यायचं.

औंदा सुद्धा सगळीकडं अशीच लगबग सुरू होती, पण मागच्या वर्षी गुण्या-सोन्याला गमावल्यापासून दशरथ नानानं हाय खाल्ली होती. गुण्यासोन्या बिगर शेतात त्याचं मनच लागत नव्हतं. रामान मागच्या महिन्यापर्यंत बापाच्या बैलजीडीची वाट बघीतली आणि नंतर बापाला काही न बोलताच सरळ जिल्हा बँकेतून कर्जाची जुळवाजुळव करून एक दिवस ट्रॅक्टरच दारात उभं केलं. नानींन ट्रॅक्टर ची पूजा केली. शिवानं नारळ फोडलं. सगळ्या भावकीत प्रसाद वाटला. दशरथ नानाच्या पोरानं गावात ट्रॅक्टर आणल्याची बातमी सगळ्या गावात पसरली ! नानाच्या अन पोरांच्या मेहनतीचं गावातल्या जुन्या खोडानी कौतुक केलं. दुसऱ्या दिवसापासून ट्रॅक्टरनं गुण्या-सोन्याची जागा घेतली. गुण्या सोन्याच्या दावणीच्या जागेत आता ट्रॅक्टर दिमाखात उभं राहू लागलं. आधुनिकतेनं परंपरेवर मात केली की परंपरा इतिहासजमा व्हायला लागतात. इथं तर परंपरेनच जागा मोकळी करून दिली होती मग आणखी काय वेगळं होणार होतं ?

आता ट्रॅक्टर आल्यावर पोरांना नव्यानं उत्साह आला होता. मोठा शिवा सुद्धा भावाला मशागतीसाठी अन पेरणीसाठी मदत म्हणून कॉलेजला दांडी मारून आला होता. दुसऱ्या दिवशी दोघं भाऊ ट्रॅक्टर घेऊन तालुक्याला गेले. ट्रॅक्टरसाठी लागणारं डिजल, आईल काय काय ते सारं महिनाभर पुरंल एवढं एकदाच घेवून आले. पुढं एकदा कामाला लागलं की पेरणी करूनच दम घ्यायचा असं ठरवलं होतं. मोठं टीपाड भरून डिजल आणलं, कॅन भरून आईल आणलं. सगळं गोठ्यात ठिवलं. शेणामातीच्या गोठ्याला आता डिजलचा वास येऊ लागला. परंपरेच्या खुणा अजूनच धूसर होवू लागल्या.

दुसऱ्या दिवशी सकाळीच नव्यानं डिजल पेलेलं ट्रॅक्टर  धड धड करीत शेतावर हजर झालं. आजूबाजूचे पोरं सोरं काम धंदे सोडून बैलाच्या जागेवर ट्रॅक्टर कसं काम करतंय ते बगायला आले. रामान पुन्हा एक नारळ फोडलं, आर्ध बंधावरच्या देवाला ठेवलं, एक तुकडा झाडाखाली बसलेल्या नानाला दिला, नानाच्या पाया पडला. बाकीचं नारळ जमलेल्या पोरांना दिलं. दोघा भावानं मिळून ट्रॅक्टरला नांगर जोडला. ट्रॅक्टर चालू झालं. एक एक तास घेत ट्रॅक्टर रान नांगरू लागलं. आतापर्यंत दिसलं नाही असं काळंखप्प रान दिसू लागलं. दशरथ नाना लांब सावलीला बसून सारं बघत होता. आता बैलांचा प्रश्न मिटला होता, काम सुरू झालं होतं. आता या शेतात कधीच गुण्या-सोन्या दिसणार नाहीत ह्या ईचारांनं नाना आतून गलबलून गेला होता. पोरांचा दोष नव्हता, पण हे सगळं इतक्या लवकर घडल अस नानाला वाटलं नव्हतं. काळाशी जुळवून घ्यायला नानाचं मन आजही तयार नव्हतं.

नारळाचा तुकडा तोंडात टाकून गुडघ्यावर हात देऊन नाना उठला बांधाबांधान शेताच्या दुसऱ्या बाजूला आला, अन जास्त चालवलं न गेल्यानं कोपऱ्यातल्या लिंबाच्या झाडाखालच्या बारक्या जुळ्या समाधीला पाठ लावून बसून राहिला. इकडं त्याच शेताच्या तुकड्यावर रामा शिवाच ट्रॅक्टर रान तय्यार करण्याच काम सुरू होतं, ते समोर पाहात असतांनाच नानाच मन भूतकाळात जातं.....

त्यादिवशी असच तय्यार झालेल्या रानात, मोठ्या उत्साहात पेरणी सुरू होती. आठ दिवसापूर्वी चांगला पाऊस झाला होता. सगळीकडं पेरणीची कामं सुरू होती. नानाची पेरणी सुद्धा आता उरकत आली होती. तो पेरणीचा शेवटचा दिवस होता. गुण्या सोन्या हिमतीनं तिफण ओढत होते, नाना चाड्यावर हात धरून चालत होता. रामा शिवा मदत करीत होते, मागच्या चार दिवसांपासून पेरणी सुरू होती, त्या आधी पंधरा वीस दिवस शेत तय्यार करण्यासाठी गुण्या सोन्या जुंपले गेले होते. आज सकाळपासून गुण्याचं अंग गरम लागतं होतं, त्याला नीट चालता येत नव्हतं. नानाच्या लक्षात आलं होतं पण शेवटचा दिवस होता पेरणीचा, म्हणून नाईलाज होता. एकदा पेरणी संपली की तालुक्याचा डॉक्टर आणून औषधपाणी करू असा विचार करून, गुण्या सोन्याच्या अंगानं काम सुरू होतं. सोन्यासुद्धा जमेल तेवढ गुण्याच्या बाजूनं घेत होता. ऊन डोक्यावर आलं होतं, दुपारच्या जेवणाची वेळ झाली होती, पेरणीचा शेवटचा फेरा बाकी होता म्हणून शिवा घागर घेऊन हिरीवर गेला होता. इकडं नानांन शेवटचं तास घेतलं, पेरणी संपली, अन गुण्यानं अंग टाकलं. नानाच्या पायाखालचं रान सरकलं. नाना रामा गुण्याजवळ आला, जू बाजूला केलं. गुण्याच्या तोंडातून फेस निघतं होता, पायांची हालचाल मंदावत चालली होती. 'गुण्या काय आलं रं, उठ की ! बघ संपली आपली पेरणी, बघ शेत कसं दिसतंय, उध्या धान उगवून येईल बघ ! बघणार नाही व्हय तू !' आस म्हणून नाना गुण्याच्या गळ्यात पडला. सोन्या सुद्धा सौरभर झाला होता. हिरीवर गेलेला शिवा सगळी गडबड बघून हातात भरलेली घागर घेऊन धावत पळत आला . 'पाणी पाजा रं माझ्या गुण्याच्या कुणी तरी पाणी पाजा ! लय काम घेतलं रं माझ्या लेकरा कडून म्या' असं म्हणून नाना राडू लागला. गुण्याची हालचाल बंद झाली, रडारड ऐकून बाजूचे लोक जमा झाले. त्यातल्याच जाणकारांन तपासून गुण्याची प्राणज्योत मदावल्याच सांगितलं, अन नानाच्या दुःखाला पारावर राहिला नाही. त्यादिवशी नाना खूप रडला, अख्या जिंदगीत कधी रडला नसलं एवढा !

गुण्या गेला, नानानं त्याचे सगळे विधी केले अगदी घरातल्या नात्याचं कुणी गेल्यागत, पण दुर्दैव इथंच थांबलं नाही, गुण्याच्या जाण्याचा धोसरा जसा नानान घेतला तसाच कदाचित त्याहून जास्त सोन्यान घेतला, त्यानं अन्न पाणी सोडलं ! नानांन त्याच्यासाठी लय प्रयत्न केले, तालुक्याहुन डॉक्टर आणला, इंजेक्शन, औषध नाही नाही ते केलं. जाणत्या जुंनत्याला दाखवलं पण काहीच फरक पडत नव्हता. हे अंगचं दुखणं नव्हतंच !

गुण्या सोन्या सख्ये भाऊ, एका गायीचे गोरे ! सोबत राहिलेले, सोबत वाढलेले ! कामाला वाघ होते, आख्या पंचक्रोशीत त्यांचा डंका होता. लहान असल्यापासून नानाच्या देखरेखीत त्यांचं सगळं व्हायच. वैरण पाण्यापासून कामापर्यंत नाना सगळं स्वतः करायचा. पोरं बैलाला मारतेत म्हणून स्वतः औत हकायचा, स्वतः शेत करायचा. रामा शिवा पेक्षा जास्त प्रेम होतं त्याचं गुण्या सोन्यावर !

नानानं सगळे प्रयत्न केले पण त्याच्या प्रयत्नांना यश आलं नाही, ते येणार सुद्धा नव्हतं करण नानाला सोन्याचं दुखणं माहीत होतं. माणसं आपलं दुःख बोलून हलकं करतात पण मुक्या प्राण्यांना ती ही सोय नसते, त्यांचं दुःखं फक्त डोळ्यातून झरत राहतं आणि ते देखील नाना सारख्या लाखातल्या एखाद्यालाच समजतं ! सोन्या सुध्दा गेला ! त्या दिवशी नाना दिवसभर त्याच्या सोबत बसून होता ! त्याच्या डोळ्यात  पाहून त्याच्याशी संवाद साधत होता. दिवसभर गोठ्यात झोपून असलेल्या सोन्यान नानाच्या मांडीवर तोंड ठेवून प्राण सोडले. नानांनं टाहो फोडला ! आसमंत गहिवरून गेला, पुन्हा गावकरी जमले, पुन्हा विधी झाले ! नानाचा गोठा रिकामा झाला ! तसा नाना सुद्धा रिकामा आला, त्याला दिवस खायला उठत होता ! दिवस दिवस नाना शेतात एकाच जाग्यावर बसून राहायचा. आभाळात डोळे लावून दूरवर एकटक पाहत राहायचा !

गुण्या सोन्याला जाऊन वर्ष होतं आलं होतं पण त्यांचं आठवणीनं नाना पार कोलमडून गेला होता, कुठलंच औषध काम करीत नव्हतं .... नाना कुणाशी बोलत नव्हता .... आपल्याच तंद्रीत तासंतास बसून राहायचा !

आज सुद्धा तेच चाललं होतं, शेतात ट्रॅक्टर सुरू होत अन नाना कोपऱ्यात लिंबाच्या मोठ्या झाडाखाली असलेल्या जुळ्या दगडी समाधीला पाठ देऊन
डोळे आभाळात लावून बसला होता. रामा ट्रॅक्टर चालवत होता, शिवा नांगरटीत ट्रॅक्टरच्या माग माग फिरत होता. दोघं भाऊ नव्या उत्साहानं कामाला लागले होते. समाधीच्या रानाची नांगरणी उरकली होती, इकडं ऊन डोक्यावर आलं होतं म्हणून दोघं ट्रॅक्टर बांधाच्या बाजूला सावलीत लावून नानां बसलेल्या लिंबाच्या झाडाजवळ आले. शिवानं झाडाच्या फांदीला बांधलेलं भाकरीचं धुटं सोडलं आन, 'चला नाना जेवून घ्या, नांगरट संपत आली बघा !' म्हणत नाना जवळ गेला. नानाचे डोळे अजून सुद्धा ढगातच होते. 'नाना आहो काय म्हणतोय मी, जेवायचं नाही व्हय !' शिवान पुन्हा विचारलं. नानाचा काहीच प्रतिसाद नव्हता. शिवान रामाकडं पाहिलं तसं रामा जवळ आला,'नाना काय झालं !' असं म्हणून त्यान नानाच्या खांद्याला हलवलं .... अन नाना त्याच्या अंगावर कोसळला ! दोघं भाऊ घाबरून गेले ... नाना नाना करून हलवू लागले ... पण नानाचा काहीच प्रतिसाद नव्हता ....तो शांत झाला होता ...! त्याच्या गुण्या - सोन्यासारखा त्यांच्याच समाधीजवळ त्यांच्यातच विलीन होऊन गेला होता.

गुण्या-सोन्या अन शेत म्हणजे नानाच विश्व होतं, जगणं होतं, गुण्या सोन्याच्या जाण्यानं त्याचा श्वास कोंडला होता तो मोकळा आला. समृद्धी वेगळी आणि समाधान वेगळं, गुण्या सोन्या सोबतचं जगणं अभावग्रस्त असलं तरी नानाला समाधान देणारं होतं, गोठ्याला येणाऱ्या शेणामातीच्या पारंपरिक सुगंधात त्याची ऊर्जा द्विगुणित व्हायची. शेत अन गुण्या सोन्याचं वैरणपाणी करतांना नानाचा दिवस भरगच्च असायचा, गुण्या सोन्याच्या जाण्यानं नानाचा दिवस मोठा झाला अन नानाला एक एक दवस ढकलन कठीण झालं होतं रिकाम्या गोठ्यात अधुनिकतेनं ठाण मांडलं होतं अन परंपरेची ओल सुकून गेली होती !

आज चार वर्षे झाली नानाच्या जाण्याला, पोरांनी बापाच्या आठवणीत नानाची समाधी सुद्धा त्याच कोपऱ्यात लिंबाच्या झाडाखाली गुण्या सोन्याच्या जुळ्या समाधी शेजारी बांधली आहे ! दुपारच्या वेळी रणरणत्या उन्हात जवळवून जाणाऱ्या अनोळखी वाटसरूला डेरेदार लिंब खाणावू लागतो अन वाटसरूचे पाय विनासंकोच विनासायास झाडाकडं वळतात, पाय विसावा घेतात, भाकरीचं धुटं सोडलं जातं, थंडगार पाण्यानं उन्हाचा आत्मा शांत होते रखरखत्या उन्हात चैतन्य सळसळायला लागतं. समाधीला पाठ लागली की अनोळखी रणरणत्या मनात परंपरेच्या आठवणींची ओल झिरपायला लागले !

- रमेश ठोंबरे

Aug 4, 2018

आरसा बदलून टाकू का !

आरसा बदलून टाकू का !
मी मला पाण्यात पाहू का ?

तू मला ओवाळण्याआधी
मी तुझ्या कळपात येऊ का ?

फार तू पडलास की मागे
मी तुला चर्चेत आणू का

मी तसा तर बोलका आहे
पण जरासे मौन पाळू का ?

साजरे नसतात का डोंगर
मी जरा जवळून पाहू का ?

फार झाले शील पांघरने
मी जरा अश्लील बोलू का ?

वेगळ्या जातीतला आहे
वेगळ्या ताटात जेवू का ?

मी तुला समजेल का नक्की !
मी तुला समजून घेऊ का ?

का तिने ऐकून टाळावे
मी तिला बोलून टाळू का ?

तू किती आहेस रे हलका !
मी तुला पाण्यात सोडू का ?

पावसाळा पाहिजे आहे
मी इथे पाऊस पेरू का ?

आपले आहेत ना सगळे !
आपले आभार मानू का ?

नाच ना शेतात तू माझ्या
सांग मी तालात वाजू का ?

- रमेश ठोंबरे

Jul 6, 2018

चेहऱ्याला कुठे पाहिले जायचे


चेहऱ्याला कुठे पाहिले जायचे
काळजाशी तिच्या बोलणे व्ह्यायचे
°
चांगल्यानेच हा घात केलाय ना !
चांगले मग कसे सांग वागायचे ?

°
लेखणी तर तुझी फार आहे कडू
बोलताना तरी गोड बोलायचे

°
हीच आहे म्हणे वागण्याची कला
मी तुला गायचे तू मला गायचे !

°
वेगळी तू जरी वेगळा म्हण मला
वाटले जर कधी वेगळे व्ह्यायचे

°
धुंद होण्यास दारुच का पाहिजे
मी तुला प्यायचे तू मला प्यायचे

°
शक्य आहे तुला शेत कसशील तू
पण विटेवर कसे मी उभे ऱ्हायचे ?

°
- रमेश ठोंबरे

May 31, 2018

नाव त्यांचे आजही चर्चेत नाही

द्यायची असते', म्हणूनी देत नाही
दादही मी द्यायचो लाचेत नाही !

सोबत्यांच्या आठवांनी धुंद होतो
मी कधीही एकट्याने घेत नाही !

मी मनाचे ऐकले नसते कधी, पण
जायचे असते तिथे तन नेत नाही

चांगले नसते कधीही राजकारण
पण तरीही सोडण्याचा बेत नाही

गाळला मातीत आहे घाम आम्ही
फक्त पाण्यावर पिकवले शेत नाही

सोसतो आहे उन्हाळा मीच माझा
मी कुणाच्या सावलीला येत नाही

जायचे तर जा पुढे तू एकट्याने
मी तसाही कोणत्या स्पर्धेत नाही

जाळले आहे शहर हे काल ज्यांनी
नाव त्यांचे आजही चर्चेत नाही

- रमेश ठोंबरे

May 22, 2018

कोषांतर : एका हिरकणीचा गझल प्रवास


"हिरकणी इतकीच फरफट रोज होते
फक्त अमुचा पाठ अभ्यासात नाही"

सुप्रिया जाधव यांचा हा शेर काही वर्षांपूर्वी मी वाचला  आणि त्याच क्षणी तो विलक्षण आवडला, बालभारतीच्या पुस्तकातील 'कोणासाठी .... बाळासाठी' अश्या काहीतरी नावाचा पाठ क्षणात आठवला, क्षणात आठवली अभेद्य कडा उतरून बाळापर्यंत पोहचणारी हिरकणी... आणि दुसरीकडे पुन्हा डोळ्यासमोर आली आजची स्त्री, तिची होणारी फरफट... आणि या वेळी ग्रामीण आणि नागरी स्त्री हा भेद सुद्धा शिल्लक न राहता तो एक अखिल स्त्री वर्गाची फरफट मांडणारा शेर ठरतो. हे सगळं या शेरात फार प्रभावीपणे आलं आहे.

सुप्रिया जाधव यांच्या गझला या पूर्वीही मी वाचल्या होत्या, त्यांच्या कविता तर मी ओर्कुटच्या जमान्यापासून वाचत आहे. त्या कवितेकडून गझलेकडे वळल्या.... सुरुवातीच्या गझलतंत्र शिक्षणापासून ... सुरुवातीच्या साधारण गझलपासून त्यांच्या आजच्या तरल आणि उत्कृष्ट गझल लिखाणाचा मी मूक साक्षीदार आहे.
*
पाच शेरांची गझल मागू नको तू
लाख दुःखे सोसल्यावर शेर होतो
*
हा शेर वाचला आणि मी एकदम भूतकाळात गेलो .... सुप्रिया जाधव यांच्या आयुष्यात आलेलं दुर्दैवी वादळ आणि त्या वादळांन मुळापासून हदरवलेलं त्यांचं भावविश्व ...डोळ्यासमोरून सरकत गेलं... या वादळात एक दुःख, एक सल कायमची त्यांच्याकडं आली आणि यातून काही अंशी त्यांना बाहेर काढण्याच काम गझलेनं केलं. त्यांच्या संवेदना या दरम्यान आणखी प्रगल्भ झाल्या, जबाबदाऱ्या वाढल्या, आणि एक सल कायम बोचत राहिली. जो अर्ध्यावर सोडून गेला तोच आता मनात रुंजी घालू लागतो, त्याच्या आठवाणीत कधी जगणं असह्य तर कधी सुसह्य होत जातं....

हा शेर पहा

सुमार आहे दिसायला मी कबूल करते
विचार त्याचा मनात येतो सुरेख दिसते !

खूप सुंदर आहे .... अजून काही सांगायलाच नको !
या संग्रहात तो / त्याचा विचार मधून मधून भेटत राहतो ....या संग्रहाला सुंदर बनवत जातो ...

आणखी काही शेर
*
जेंव्हा त्याच्या अस्तित्वावर घेते संशय
तेंव्हा तेंव्हा तो असल्याचा येतो प्रत्यय
*
माझ्या तुझ्या नात्यातले पावित्र्य सांभाळू असे
तू देव गाभाऱ्यातला मी देवळाची पायरी
*
रोज पहाटे स्वप्नामध्ये
तो साराच्या सारा येतो
*
त्याच्यावर मिसरा सुचताना
मोरपीशी शहारा येतो
*
तू असल्याच्या आभासांवर तगले आहे
तुझ्याविना मन रमवायाला शिकले आहे

जाणून आहे कुणी कुणाचे नसते येथे
येउन बघ ना कुठे कशी भरकटले आहे
*
कुठुनही पोचते त्याच्याचपाशी
कधी संपायच्या ह्या येरझारा ?

दिसत नसला तरी आहेच आहे
तुझ्या श्वासांवरी त्याचा पहारा
*
डोळ्यात फार माझ्या शोधू नका स्वतःला
वसते अजून तेथे त्याची छबी गव्हाळी
*

या सगळ्या शेरांमधून तो कायम डोकावत राहतो.... त्याचं ते गझलेत येत राहणं अपरिहार्य आहे .. ही गझल त्याच्यामुळेच इतकी सुंदर आणि तरल आहे.
पण बऱ्याचदा त्याचं पुन्हा पुन्हा हे डोकावत राहणं, दु:खावरची खपली काढत राहणं, हे त्याच डोकावणं तिचं आयुष्य असह्य आणि एकसुरी बनवतय का ? याचं उत्तर सुद्धा ती शोधण्याचा प्रयत्न करते .... तेंव्हा लोकांचे डोळे बोलत राहतात ....

*
म्हणाले लोक,त्याच्यावर पुरे झाले सतत लिहिणे
म्हणाले दुःख , येऊ देत जे भंडावते आहे
*

पण त्याच्यावर लिहिणं बंद केलं, त्याचं हे डोकावणं बंद झालं तर काय होईल आणि मुळात हे शक्य आहे का ?

त्याचं उत्तर तिला माहीत आहे .... पण लोकांसाठी ते देणं गरजेचं आहे ...
*
गझल होते पोरकी माझी स्वतःला
नेमका उल्लेख त्याचा टाळल्यावर
*
त्याच्या उल्लेखाशिवाय ही गझल पोरकी आहे आणि हे पुन्हा पुन्हा हा संग्रह वाचताना जाणवतं.

पण हे सगळं स्वतःच दुःख, जगणं मांडताना गझलकारा बऱ्याच ठिकाणी ते इतक्या त्रयस्थपणे मांडते की ते तिचं वयक्तिक न राहता समस्त स्त्री वर्गाचं जगणं आणि भोगण होतं ! इंग्लिश मध्ये सांगायचं तर 'most personal is most universal' असं काहीतरी होत जातं

खाली दिलेले काही शेर याची उत्तम उदाहरणं आहेत

*
शेजेवर ती जिवंत जळते
घरात जेंव्हा सरपण नसते
*
उर्मिला विरहात जळते एकटीने
जानकीचा गाजतो वनवास नुसता

उर्मिलेच्या दुःखाच, उर्मिलेच्या विरहाच हे अस उदाहरण अभावानेच वाचायला मिळू शकतं, या शेराला अनेक कंगोरे आहेत, दुःख, विरह, विद्रोह, घुसमट .... आणि अश्या कितीतरी पीडित स्त्रियांचं मूक रुदन या शेरात अत्यंत समर्थपणे मांडलं आहे.

अशी अनेक उदाहरण या संग्रहात आहेत ... ज्यात स्त्रीचं जगणं अतिशय समर्थपणे मांडलं गेलं आहे. खाली आणखी काही उदाहरणं दिली आहेत

*
तिसरीच कोणी जन्मले मी ही
त्याच्या चितेवर वेगळी गेली
*
युगांची सोसली असणार घुसमट
टिपेला पोचला होता तिचा स्वर
*
असावा दोष अपुल्या कुंडलीचा
मिळाला जन्म हा ताटातुटीचा
*
विझू घातला सवतीमत्सरही शिलगवते
सिगारेटचे थोटुक त्याच्या ओठांमधले
*

स्त्री जीवन मांडताना ते किती वेगळ्या पद्धतीनं मांडलंय हे खूप महत्वाच आहे, ते कुठं ही अंगावर येत नाही, विद्रोह असला तरी त्यात आक्रस्ताळेपणा जाणवत नाही. बऱ्याच ठिकाणी प्रतिकांचा आणि प्रतिमांचा खूप चपखल पद्धतीने वापर केला आहे त्यामुळं हे शेर मनाच्या कोपऱ्यात घर करून राहतात, विचार करायला भाग पडतात.
*
उजवीकडे, डावीकडे ताटात नक्की मी कुठे ?
पक्वान्न आवडते तुझे की फक्त तोंडीलावणे ?
*
पाहिले आहे तिचा मी धूर होताना
आगपेटीतील काडी पेट घेताना
*
एका शुल्लक पण पेट घेतल्यावर तितक्याच प्रखर वाटणाऱ्या कडीपेटीच्या काडीचं दुःख जास्त वेदनादायी असेल की एका पीडित स्त्रीचं ! होवू शकते का तुलना ? नाही !

'त्याच्या' शिवाय 'तीच' जगणं, काय आणि कसं असू शकतं हे एका स्त्री शिवाय कोण मांडू शकतं ?  दुर्दैवानं सुप्रिया जाधव यांच्या वाटेला आलेल्या अनुभवानं हे या संग्रहातून अतिशय समर्थपणे मांडल्या गेलं आहे आणि मराठी गझलेला समृद्ध करणार आहे. तो सोबत नसताना या समाजात स्त्रीचं एकटीच जगणं म्हणजे अतिशय खडतर परीक्षा आणि रोजचा संघर्ष आहे.

हे एकाकीपण आणि इथल्या नजरा साहताना गझलकारा खूप आतलं आणि बोचरं सत्य मांडते

*
शाकारल्या मनाचे छप्पर उडून जाते
दररोज एक वादळ दारावरून जाते
*
वेल ही वृक्षाविना दिसल्याबरोबर
ओंडका अन ओंडका बहरून आला

पांढरे होताक्षणी हे भाळ माझे
रंग दुनियेचा खरा समजून आला
*
ही फार बिकट परिस्थिती आहे, एकट्या बाईकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन बऱ्याचदा वाईटच असतो, ही बाब गझलकारा अतिशय ताकदीने मांडते आहे. हे मांडत असताना योजलेल्या प्रतिमा अतिशय चपखल आहेत.
*
तो गेल्यावर गाडी अडली
जात दाखल्यावरची नडली

स्थान दिले मी मनात त्याला
मग नेमाने वारी घडली
*
ताकदीने घेतला मी उंच झोका
चांदवा हातात आपणहून आला

खूप सुंदर शेर आहे हा, अगदी मिसर्यातल्या 'आपणहून' आलेल्या शब्दसारखा हा संपूर्ण शेर आला असावा असं वाटून जातं.
*
वाट एकाकी निघाली निग्रहाने
सोबतीची खुमखुमी जिरली असावी
*
गती संपली संपला गोडवाही
कशास्तव नदी सागराला मिळाली ?

असे शेर हाच या गझल संग्रहाचा खरा गोडवा आहे, जे काही मांडायचं ते अतिशय समर्थपणे मांडले आहे, हे मांडताना कुठे ही पसरटपणा किंवा शब्दबंबाळपणा जाणवत नाही.

*
पुस्तकांची जाहली पारायणे
माणसांचे राहिले वाचन तुझे

चाल माझी वाटते उलटी तुला ?
सोड बाबा सोड शीर्षासन तुझे
*
वेदना रक्तात थोड्या ओत माझ्या
जीर्ण झाला जाणिवांचा पोत माझ्या
*

गळतानाही गिरकी घेते
लोभसवाणी दिसे पानगळ

अतिशय लोभस शेर आहे, वाचताच क्षणी प्रेमात पाडणारा, सृष्टीच्या सूक्ष्म निरीक्षणाला जीवन मूल्यांची जोड देवून मांडलेला, जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याची शिकवण देणारा.

तसं पाहिलं तर कवयित्रीला अतिशय नाजूक परिस्थितीतून जावे लागूनही या संपूर्ण गझल संग्रहाचा मूड सकारात्मक आहे. स्त्री मनाला बोचणाऱ्या बऱ्याच गोष्टी अत्यंत संयत शब्दात मांडल्या आहेत, जे वाचता क्षणी वाचकाच्या संवेदनांना विना ओरखडा स्पर्शून जातं आणि विचार करायला भाग पाडतं.

संग्रहातील ओळ न ओळ (मिसरा) वाचनीय आहे, नेटकं मनोगत, अभ्यासपूर्ण आणि अनौपचारिक प्रस्तावना (भूषण कटककर), मार्गदर्शक पाठराखण (म.भा. चव्हाण) इत्यादी. संपूर्ण गझल संग्रहाच्या निर्मितीवर अतिशय मेहनत घेतलेली पानोपानी दिसून येते, संग्रहात कुठे ही टायपो अर्थात छपाई किंवा व्याकरणातील दोष दिसून आले नाहीत. या संग्रहाशी जोडल्या गेलेली नावं ही या क्षेत्रातील अतिशय प्रथितयश आणि अभ्यासू मंडळी आहेत त्यामुळे हा गझल संग्रह सगळयाच दृष्टीने संग्राह्य आणि नवीन गझल लिहिणाऱ्यांसाठी तसेच सभ्यासकांसाठी मार्गदर्शक आहे.

लिहिण्याच्या ओघात बरेच शेर इथे दिले गेले आहेत, आणखी किती तरी (एकूण 100 गझला आणि 60 सुटे शेर) अप्रतिम शेर आणि गझला या संग्रहात पानोपानी वाचकांच्या मनाचा ठाव घेण्यास सज्ज आहेत, त्या सर्वच बाबींवर इथे लिहिणे शक्य आणि योग्यही नाही म्हणून शेवटी आणखी काही सुटे शेर देऊन थांबतो !

" पाच शेरांची गझल मागू नको तू
लाख दुःखे सोसल्यावर शेर होतो"

-  हे जरी खरं असलं तरी संग्रहात शेवटी दिलेल्या सर्वच सुट्या शेरांना त्यांची हक्काची गझल सुद्धा मिळो अशी इच्छा व्यक्त करून सुप्रिया (ताई) जाधव यांच्या पुढील लेखनास शुभेच्छा देतो !
*
एक तर दुष्काळ दे किंवा मला वाहून ने
पावसा तू सोसवत नाहीस रे मध्यम मला
*
लागला नाही सुगावा वादळाचा
मी किनारे गाठले असते कदाचित
*
आता नवी जागा बघा माझ्याकडे राहू नका
देताय दुःखानो तुम्ही भाडे तसेही वाजवी
*
राहू दे कोळ्याचे जाळे
घर त्याचेही बनते आहे
*
पिशवीमध्ये एकच पालेभाजी आहे
निघून गेल्या दिवसांची सय ताजी आहे
*
दोन सरींच्या मधे चालते
ठक्क कोरडी उरण्यासाठी
*
मलाही नाव दे तू घेतलेल्या औषधाचे
मला विसरायचे आहे तुला मी भेटल्याचे
*
भासलेलेे चिवट पण तुटलेच नाते
तन्यता सरतेच ... इतके ताणल्यावर

---------------------------------------------
गझल संग्रह : कोषांतर
सुप्रिया मिलिंद जाधव
पृथ्वीराज प्रकाशन, पुणे
पृष्ठे : 128
किंमत: 150/-
- रमेश ठोंबरे




May 18, 2018

रिकामं घर


उपाशीपोटी घरी आल्यावर
घरात खायला काही तरी शोधताना
रिकामं घर मलाच खायला उठतं

तेंव्हा
आम्ही दोघंही एकमेकांच्या
डोळ्यात पाहतो

मग
नेमकं कोणी कोणाला खायचं
हा विचार करत 
दोघंही उपाशी पोटीच
झोपी जातो,
पोट भारल्याचा आव आणून !

- रमेश ठोंबरे

May 16, 2018

माणसे वेल्हाळ होता तो

वाचकांची नाळ होता तो
पुस्तकांची चाळ होता तो

ऐकण्याचा कान ही झाला
बोलणारा टाळ होता तो

दोष कोणा द्यायचा नाही
पांढरे आभाळ होता तो

कोपराने खोदला आम्ही
अन म्हणे, खडकाळ होता तो !

आठवांणी कंठ भरल्यावर
रम्य सायंकाळ होता तो

माणसांनी टाकले त्याला
माणसे वेल्हाळ होता तो

थांबला पण काळ आल्याने
कर्दनांचा काळ होता तो

शेवटाला बाळ ही झाला
माउलीचे भाळ होता तो

- रमेश ठोंबरे
----------------------------------------------------------
आम्हा सर्व कविमित्रांचे मित्र आणि मार्गदर्शक,
गोष्टीवेल्हाळ स्व. सुधाकर कुलकर्णी अर्थात
सु.ल. यांना विनम्र आदरांजली !
----------------------------------------------------------

May 11, 2018

राखुया ना शुद्ध आपण येथले पर्यावरण !


जाणले नाहीच आम्ही माणसाचे आचरण
पाहतो आहोत केवळ बोलण्यातिल व्याकरण

आत्महत्येला मनाई, श्वास केला बेदखल
मी गुन्हा करणार नाही, द्या मला इच्छामरण

ट्विट केले, पोक केले, पोस्ट ही झाली करुन
चांगल्या कामात गेले, आजचे मग जागरण

राम-राजा श्रेष्ठतेस्तव पाहिजे होते समर
रावणाहातून ठरले शेवटी सीताहरण

दोष शहरालाच आम्ही द्यायचो अष्टोप्रहर
राहिले गावातही ना चांगले वातावरण

रम्य होण्या सांज अपुली अन पिढ्यांचे बालपण
राखुया ना शुद्ध आपण येथले पर्यावरण !

- रमेश ठोंबरे

May 9, 2018

काय जायचे रोजच वेळेवर ?


खूप चांगले दिसले असते घर
समोर थोडे अंगण असते तर

पीक उन्हाने मरून गेले अन
सरणावरती आली अखेर सर

दुःख असो वा आनंदाचा क्षण
जे जे मिळते खिशात सारे भर

मला कधीही जमले नाही पण
तुला पाहिजे ते तू खुशाल कर

प्रश्न तसा तर मनात ही नाही
त्या प्रश्नाचे व्ह्यावे तू उत्तर !

कसा ओळखू तिच्या चेहऱ्याला
मीच मला जर विसरून गेलो तर

लिहितो आहे सुमार हे नक्की
किती चांगले आहे पण अक्षर !

रोज वाजतो कर्कश हा भोंगा
काय जायचे रोजच वेळेवर ?

- रमेश ठोंबरे

Apr 25, 2018

मना आलास भानावर

मना आलास भानावर

मना आलास भानावर
तुझ्यासारखे झाल्यावर

खरे ट्यालेंट असते बघ
मागल्या दोन बाकावर

लागला चटका उन्हाला
सावली जवळ आल्यावर

पाहिले दोन डोळ्यांनी
ठेवले बोट तोंडावर

लागले पीक डोलाया
टाकला दोर माळ्यावर

गुन्हा केलाय हाताने
आळ आलाय जात्यावर

मनाचा बंद दरवाजा
किती अन्याय देहावर !

- रमेश ठोंबरे

Apr 11, 2018

एक प्रश्न (1)

कापूस पिकवणाऱ्या
शेतकऱ्याच्या बायकोच्या
अंगावर नवं कापड दिसल्याशिवाय,

ऊस पिकवणाऱ्या
शेतकऱ्याला सकाळच्या चहात
समाधानाची गोडी जाणवल्याशिवाय,

गहू ज्वारी पिकवणाऱ्या
शेतकऱ्याच्या चुलीवरची भाकरी
अभिमानानं टम्म फुगून आल्याशिवाय,

अन
वर्षानु वर्ष काळ्या आईची
ओटी भरणाऱ्या
शेतकऱ्याची पोर
कोऱ्या सातबाऱ्यात सह
आत्मिक समृद्धीत
उजवून निघाल्याशिवाय,

हा कृषिप्रधान देश
सुजलाम सुफलाम झालाय
असं कसं म्हणताय येईल ?

- रमेश ठोंबरे
#प्रश्न_पहिला

Apr 10, 2018

कितने सिकुडकर बैठे है लोग



इतने खचाखच भरे सभा मंडप मे
कितने सिकुडकर बैठे है लोग,
के जैसे लगता है
हर एक के बाजू की
एक कुर्सी खाली है ।

गर्म जेबों से हाथ भी निकालना नहीं चाहते,
इस ठंड की मौसम के लिए ख़रीदे
नये दस्ताने दिखाना भी नहीं चाहते  !

और ओ है की सबकुछ
खुलकर बोलना चाहता है,
जो ले आया है भरभरके,
नौछावर करना चाहता है

नज्म पे नज्म सुनाना चाहता है,
लेकिन कितने सिकुड़कर बैठे है लोग,
इक नज्म इनको छुये भी तो कैसे !

- कवी सर्वश्रेष्ठ

Apr 6, 2018

आभाळाला टेकण लावू चल

आभाळाला टेकण लावू चल
समिंदराला टोपण लावू चल

सत्ता येता उधळत आहे हा
या बैलाला वेसण लावू चल

विणतो आहे विश्वासाने मी
या नात्याला तोरण लावू चल

असे कसे रे गोड बोलले हे
या दोघांचे भांडण लावू चल

रुतले आहे अर्ध्यावरती हे
या जगण्याला टोचण लावू चल

राशन सारे संपत आले तर
छप्पन इंची भाषण लावू चल

- रमेश ठोंबरे

Apr 3, 2018

पाहताना ती मला टाळायची

पाहताना ती मला टाळायची
टाळताना पण किती लाजायची

बोलताना मी पुढे बोलायचो
चालताना ती पुढे चालायची

बोललो जर मी नवेल्या पाखरा
काळजाला ती किती जाळायची

मी मला तिज भोवती शोधायचो
ती मला माझ्यातली वाटायची

मी खरे तर चेहरा वाचायचो
ती तवा पण पुस्तके वाचायची !

मी तिच्यावर जीव ओवाळायचो
ती तसा मग जीव माझा घ्यायची !

- रमेश ठोंबरे

Mar 12, 2018

रंग भिंतीचे उडाया लागले


रंग भिंतीचे उडाया लागले
स्वप्न नवतीचे पडाया लागले

एक पिल्लू पाहुनी नभचांदवा
पंख नसताना उडाया लागले

सोडला मग हातही जेंव्हा तिने
स्वप्न सत्यावर रडाया लागले

पाहुनी अवयव प्रत्यारोपणे
प्रेम हृदयावर जडाया लागले

संपल्यावर दिवस प्रेमाचे अता ...
मन तिचे अन उलगडाया लागले

बैसल्यावर भूक पंगत पाहुनी
श्लोक कोणी बड्बडाया लागले

राग, मत्सर, द्वेष, कोत्या भावना
जे नको ते सापडाया लागले

- रमेश ठोंबरे

Feb 5, 2018

~ वाटले मिसळून जावे शेवटी ~


°
सोडलेली ती कधी ना भेटली
मी पुन्हा वहिवाट आहे सोडली
°
जीवना मी काय मागू सांग ना
लिस्ट आहे फार माझी लांबली
°
गाव माझे गाव नाही राहिले
लांब पडते आज त्याची सावली
°
वाटले टाळून गेल्यासारखी
पण पुढे खिडकीत होती थांबली
°
मी प्रियेला पाठमोरी पाहिले
अन पुन्हा मग पाठ नाही सोडली
°
सोबतीच्या फार झाल्या वल्गना
सापडेना एक आठवण चांगली
°
वाटले मिसळून जावे शेवटी
पण बघा गर्दीच इथली पांगली
°
- रमेश ठोंबरे

Jan 22, 2018

मी रात्रीला सजवत नाही

…………

मी रात्रीला सजवत नाही
स्वप्न मला जर बघवत नाही

पाऊस 'रडतो' असे म्हणू का ?
पाऊस 'पडतो' म्हणवत नाही

दिवसाला जर छळले मी तर
रात्र मला मग 'निजवत' नाही

मी चंद्राची होळी करतो ....
चंद्र मला जर विझवत नाही

सावलीतल्या मातीमध्ये
स्वप्न उन्हाचे उगवत नाही

माझ्यासाठी अगम्य सारे,
जे जे मजला समजत नाही

जुनेर झाले आयुष्याचे
दु:ख तरी का उसवत नाही ?

- रमेश ठोंबरे

Jan 2, 2018

बापासाठी

लिहिली नाही कधी ओळ मी बापासाठी
कुठून आणू इतकी हिम्मत त्याच्यासाठी

डोळ्यामध्ये आणून पाणी आई रडते
बाप शोधतो फक्त कोपरा लपण्यासाठी

झोप मोडते तेंव्हा कळते तगमग त्याची
बाप जागतो डोळ्यामधल्या स्वप्नासाठी

कष्ट उपसतो, खस्ता खातो, गातो गाणी
सुख दुःखाची गाथा त्याच्या जगण्यासाठी

काळीज कुण्या बापाचे जर असते फत्तर
जन्म घातला नसता त्याने लेकासाठी

सांग म्हणालो काय करू मी तुमच्यासाठी
रडणे सोडून हास म्हणाला लढण्यासाठी

पाहिला न मी बापाइतका महान कोणी
बाप तवा मग झुकला त्याच्या बापासाठी

- रमेश ठोंबरे