Jul 29, 2016

देव देव म्हणत्यात, दिसत कसा नाही ?

देव देव म्हणत्यात, दिसत कसा नाही ?
अश्या कश्या देवापुढं झुलत्यात गायी ।। धृ ।।

पावसाचा थेंब न्हाई पोळलेलं जिन्ह
घोटभर दुधाविना रडतया तान्हं
घासभर खाण्यासाठी चाले वणवण
ज्याला त्याला पोटावर बांधण्याची घाई ।। १ ।।

आया बाया भेदरल्या साव झाले गुंड
डोळे गेले गरदीचे गाव झालं षंढ
सावित्रीच्या लेकी पुन्हा विसरल्या बंड
न्हाण आल्या घरामंदी कोमेजली जाई ।। २ ।।

छान छौक वाढली अन सोकावली पोरं
खाटकाच्या दाराम्होर बांधलेली ढोरं
काम नको घाम नको नादावली चोरं
गाव पडलं ओस इथं शहराच्या पायी  ।। ३ ।।

नदी नाल आटून गेली, आटली र ओलं
गावाची या बदलली रंग ढंग चाल
नाती-गोती इसरली, तुटली र नाळ
तुझ्या माझ्या जगण्याची झाली म्हसनखाई ।। ४ ।।

देव देव म्हणत्यात दिसत कसा न्हाई ?

Jun 22, 2016

कवितेविषयी बोलावं असे काय असतो आपण ?

कवितेविषयी बोलावं असे काय असतो आपण ?
खरं तर मीच बोलत असतो कवितेसोबत माझ्या विषयी ....
आणि तिचा मोठेपणा म्हणून ती ऐकत असते माझा शब्द न शब्द
मला बोलायचं असतं,
झाडांशी फुलांशी, इथल्या डोंगरदऱ्यांशी
मला बोलायचं असतं
उन्हाशी, सावलीशी, मावळत चाललेल्या दिवसाशी
रुसून गेलेल्या पावसाशी !
मला बोलायचं असतं
माझ्या गावासोबत, गावातल्या माणसांसोबत,
ह्यांच्यासोबत, त्यांच्यासोबत, तुमच्यासोबत.

पण बऱ्याचदा पोटातून आले तरी शब्द फुटत नाहीत ओठातून
ते सांडत राहतात लेखणीतून,
झरत राहतात ओळींमधून
कागदाच्या पानांवर एक कविता बनून !

कधी मी सांगत असतो इथल्या पावसाची गोष्ट
कधी मी सांगत असतो इथल्या उन्हाची गोष्ट
कधी इतिहासाची अन कधी मनाची गोष्ट !

कागद संपतात पण गोष्टी संपत नाहीत
तेंव्हा मी लिहितो,
झाडं लावायची अन झाडं जगवायची गोष्ट,
अशाच कितीतरी झाडांची कत्तल केलेल्या कागदांमधून.

वागण्यात अन लिहिण्यात किती वेगळे असतो आपण !

ओठातून न फुटणारे शब्द आता
लेखणीतूनही अबोल होतात !

काही गोष्टी मी सांगत नाही कुणालाच
आई-वडील, मित्र अन प्रेयसीलाही ... !
त्याही सांगतो फक्त कवितेला
मी सांगत असतो भान विसरून
अन ती ऐकत असते कान पसरून
ती आईच असते तेंव्हा
प्रेयसी सुद्धा होते !
तेंव्हा तरी काय असतो आपण !

मी कवितेसाठी श्वास होईल,
मी कवितेसाठी जीव देईल !
अरे कव्या,
तू फक्त एक झाड लावलंस तरी खूप होईल
साल, किती बोलतो आपण !
कवितेविषयी बोलावं असे काय असतो आपण ?

- रमेश ठोंबरे

Apr 5, 2016

ओढून सावल्या दाट

ओढून सावल्या दाट
ही शांत झोपली रात
पानांची सळसळ चाले
अंधार गर्द घनदाट

आवाज येतसे दूर
की रातकिड्यांचा सूर
मन आशेची हुरहूर
मन शंकांचे काहूर

घन काळ्या अंधारात
चांदणे पहुडले शांत
ही चंद्रकोर साक्षीला
मन भरल्या अंधारात

कल्लोळ मातला आत
हा 'हवा घालतो' वात
चुकलेला प्रवास आहे
थकलेला झंझावात !


- रमेश ठोंबरे 

Mar 30, 2016

माती


वर्षभरानं कधीकाळी
मी शहरातून माझ्या गावात येतो तेंव्हा,
भिरकावून देतो पायांना बंदीस्त करणारे शूज,
श्वास दडपून टाकणार्या स्वाक्ससह
अन सताड उघड्या पायांनी....
फिरून घेतो अक्खा माळरान.
इथल्या मातीच्या ढेकळांनी
सोलवटून घेतो माझे पाय.
.....
.....
कधीकाळी मातीतून जन्मलेला हा देह
पुढं कधीतरी मातीत मिसळताना...
या मातीलाच परका वाटू नये म्हणून !
- रमेश ठोंबरे