रोजचीच आहे
पायपीट सारी
पंढरीची वारी
आठवे गा ॥१॥
सुटता सुटेना
जगण्याची होड
अंतरात ओढ
भेटण्याची ॥२॥
खुणावतो देवा
चंद्रभागा तीर
आता मज धीर
धरवेना ॥३॥
भव चिंता सारी
तुजवरी देवा
म्हणोनि विसावा
चरणाशी ॥४॥
मागणे ते काय
नाही माझे फार
पडावा विसर
जगताचा ॥५॥
एक व्हावे मन
एक व्हावे तन
आणिक वर्णन
काय करू ? ॥६॥
शेवटचे देवा
मागतो मागणे
येणे आणि जाणे
घडू दे गा ! ॥७॥
- रमेश ठोंबरे
रूप तुझे देवा
साठवावे डोळा
तो नेत्र सोहळा
सर्वश्रेष्ठ
विठ्ठल विठ्ठल
देह सारा बोले
अनु रेणू झाले
विठूमय
विठ्ठलाचे सख्य
मागतो मी नित्य
जीवनाचे सत्य
हेची एक
तन हे विठ्ठल
मन हे विठ्ठल
कर्म हि विठ्ठल
व्हावे आता.
- रमेश ठोंबरे
हरी नाम घ्या रे
मनाने निर्मल
येईलकी बळ
साधनेला ||१ ||
हरी नाम शांत
हरी नाम गोड
हरी नाम जोड
अध्यात्माची || २||
हरी मुखे म्हणा,
पुण्या होई खास
मोजता का श्वास
घेतलेला ||३||
हरी हरी केले
लाऊन समाधी
उरली न व्याधी
आता काही ||४||
नामाचा महिमा,
सांगतो रमेश
नाम व्हावा श्वास
शेवटाचा ||५||
- रमेश ठोंबरे
सावळे हे रूप
वेड मज लावी
आता भेट व्हावी
सावळ्याची || १ ||
भेटीसाठी जीव
कासावीस झाला
करीतसे धावा
विठ्ठलाचा || २ ||
दर्शन ते व्हावे
ध्यास मनी आहे
नीज रूप पाहे
पांडुरंगे || ३ ||
प्रेम हे अमाप
भक्तावरी तुझे
हवे काय दुजे
माउलीगे || ४ ||
विठू विठू बोलू
आनंदाने डोलू
भेटेल कृपाळू
मायबाप || ५ ||
- रमेश ठोंबरे