Jun 15, 2014

फक्त एवढे कराल का ?असाल सेवक जनतेचे तर फक्त एवढे कराल का 
सत्तेसाठी सोडून थोडे सत्यासाठी लढाल का ?


बांधावरती भाव लावता शेतकऱ्याच्या कष्टाचा 
शेतामध्ये उतरून थोडा नांगर हाती धराल का ?


जुनेच खड्डे, जुनीच रोपे, वृक्षारोपण खेळ जुना 
या वर्षीचे वृक्ष लावण्या नवीन जागा पहाल का ?


साक्षर करण्या जनता, तुम्हा शिक्षण खाते दिलेच तर
इयत्ता चौथी पास कराया बाकावरती बसाल का ?


सत्ता पडता झोळीमध्ये विसरून जाता जनतेला
बाप कधी जर समोर आला ओळख देवून हसाल का ?


आवडतो जर फक्त तुम्हाला, फोटो, ब्यानर अन सत्कार !
हार घालतो हजार आम्ही, फोटो पुरते उराल का ?


- रमेश ठोंबरे 

Jun 11, 2014

….

….
मी बंधिस्त केलंय माझं मन
मी शिवून घेतलेत माझे ओठ
मी करकचून बांधलेत माझे हात पाय !
मी नष्ट केलीय माझ्या अभद्र लेखणीतील …
आग ओकणारी शाई
आणि मोडून टाकलीय तिची धारदार निब !
हे सगळं करणं खरच गरजेचं होतं
कारण … हे बंधमुक्त राहिले असते तर
माझ्या मनानं पुकारलं असतं बंड
माझ्या हातपायांनी उभारली असतील आंदोलनं
रक्ताळलेल्या ओठांनी ओलांडले असते
सभ्यतेचे तथाकथित निकष
आणि लेखणीने मोडले असते अभद्रतेचे विक्रम !
म्हणून मी आता व्यक्त होणंच टाळतोय
या सभ्यतेच्या जगात …
निदान आता तरी अबाधित राहील माझं अभिव्यक्ती स्वातंत्र्य !
- रमेश ठोंबरे
www.rameshthombre.com

Jun 5, 2014

आपण माणूसपण जपणारी माणसं आहोत

आपण 
सूर्याचे त्याच्या प्रत्येक किरणासाठी, 
मातीचे तिच्या प्रत्येक सृजनासाठी, 
आणि निसर्गाचे त्याच्या अमर्याद दर्यादिलीसाठी
आभार मानणारी माणसं आहोत.

आपण अंधपणे स्वीकारत नाही आपलं भविष्य,
आपण कधीच विसरत नाही आपला भूतकाळ
आपण जमिनीवर पाय रोवून वर्तमानात जगणारी माणसं आहोत !

सुखात हुरळून जात नसतो आपण
अन दु:खात खचून जाण हि माहित नसतं आपल्याला
आपण संकटाना छातीवर घेणारी माणसं आहोत !

आपण
जीवाला जीव देणारी
आपल्या सभोतालावर प्रेम करणारी,
घामाच्या प्रत्येक थेंबाच महत्व जाणणारी
अन हवेच्या झुळकेच ऋण सांगणारी माणसं आहोत !

आपण विसरून चालणार नाही त्याला दिलेला शब्द
कारण आपण शब्दाला जगणारी माणसं आहोत.
आपण विसरून चालणार नाही आपलं माणूसपण
कारण आपण माणूस म्हणून जन्माला आलेली माणसं आहोत.
आपण माणूसपण जपणारी माणसं आहोत

- रमेश ठोंबरे