Nov 21, 2010

~ आभाळ सारे फाटले ~


आभाळ सारे फाटले, सांगेन मी केंव्हातरी
ओठात आहे दाटले, सांगेन मी केंव्हातरी.

अंधारल्या रातीत मी, शोधीत आहे काजवे
सूर्यास कैसे वाटले ? सांगेन मी केंव्हातरी.

खाऊन ते शेफारले, लोणीच त्या प्रेतातले,
नरकात का ते बाटले ? सांगेन मी केंव्हातरी.

डोळ्यात आहे पाहिले, ते प्रेम मी सांभाळले,
काळीज केंव्हा फाटले, सांगेन मी केंव्हातरी.

नाराज झाल्या भावना, नाराज झाल्या वासना
नाराज विश्वा थाटले, सांगेन मी केंव्हातरी.

वाटा पुन्हा अंधारल्या, आधार सारे संपले,
आयुष्य कोठे काटले, सांगेन मी केंव्हातरी.

- रमेश ठोंबरे
Ramesh Thombre

Nov 14, 2010

एक उनाड दिवस जगून पहा !


रोजच तुम्ही काम करता
घड्याळाच्या आकड्यांना हरता
आज ऑफिस दुरून पहा,
एकदा दांडी मारून पहा.

रोज जाता लोकलने
तेच स्टेशन ....
तीच लोकल
त्याच रुळावर तोच वेग
चिमणीवरचा तोच मेघ.
एकदा स्टेशन चुकउन पहा
एकदा लोकल हुकउन पहा.
एक उनाड दिवस जगून पहा !

रोजच चालतो वरण भात
रोजच असतात हातात हात
आज जोडी बदलून पहा
आज 'गोडी' बदलून पहा !

मग Picture वेगळा दिसेल
तुमचाच सिनेमा सगळा असेल !
.... तेव्हा Entry मारून पहा
थोडी Country मारून पहा !
एक उनाड दिवस जगून पहा !

रोज असते तेच गाव
रोज सांगता तेच नाव
एकदा भलत्याच गावी जाउन पहा
अन भलत्याच सारखं वागून पहा !
एक उनाड दिवस जगून पहा !

रोज तुमची तीच ओळख
रोज तुमचा तोच कट्टा
रोज तुमचे तेच मित्र
रोज तुमच्या जुन्याच थट्टा
तुमचा चेहरा बाजूला ठेऊन
एकदा ओळख विसरून पहा !
रोज असता साळसूद तुम्ही
आज थोडे घसरून पहा .
एक उनाड दिवस जगून पहा !

हा भेटो किंवा तो भेटो
रोज तुमचा तोच फोटो !
रोज तुमची तीच style
रोज तुमच तेच Profile.
एकदा Moto बदलून पहा.
एकदा फोटो बदलून पहा.
एक उनाड दिवस जगून पहा !

- रमेश ठोंबरे

दु:खाचं गाणं

तुम्ही म्हणता जगामध्ये
दु:ख आहे भरलेलं
आणि कुणी - कुणीतर
स्वप्नात सुद्धा हरलेलं.

हरलं तर हरू द्या,
भरलं तर भरू द्या !
दु:खा साठी झुरू नका
हरण्यावरती मरू नका.

तुम्ही तुमचे चालत रहा,
ओठातलं गाणं बोलत रहा.

एक दिवस असा येईल,
दु:ख सुद्धा गाणं होईल.
तेव्हा त्याला गात जा,
हळूच कवेत घेत जा.

मग त्याला सांगून टाका
मी तुला भीत नाही.
फक्त-फक्त सुख म्हणजेच
माझ्या साठी गीत नाही.

मी आनंदात गाणं गातो
दु:खात सुद्धा तसाच न्हातो.

..... पुन्हा म्हणाल ?
जगामध्ये दु:ख आहे भरलेलं
आणि कुणी - कुणीतर
स्वप्नात सुद्धा हरलेलं.

मी म्हणेल .... !

हरलं तर हरू द्या,
भरलं तर भरू द्या !

तुम्ही तुमचे चालत रहा,
ओठातलं गाणं बोलत रहा.

- रमेश ठोंबरे