Nov 28, 2012

पर्णकोवळी पहाट जेंव्हा ..

पर्णकोवळी पहाट जेंव्हा, दवभिजल्या अंगणी पसरते 
धुंद बोचरी, थंड हवेची, झुळुक अचानक तनात भरते 

दूर जागत्या क्षितिजावरुनी, रविकिरणांचा उत्सव होतो 
पहाटवेडा निसर्ग मग तो, चैतन्याला कवेत घेतो 

झुळझुळ वाहे नीर कुठेसे, नाद खळाळत कानी येतो
सवे सुगंधी, रान फुलांच्या, वारा मंगल गाणी गातो. 

धाव धावुनी थकले श्वापद, सरितेकाठी जरा विसावे
नेत्र मिटूनी, तोय प्राशिती, समीप मग ते कुणी नसावे 

रान मोकळ्या आभाळाशी, डोंगर करती गूज नवे
मोजत बसते पक्षी-पक्षी, अन पक्षांचे किती थवे ! 

मीच एकटी भटकत असते, माझ्या सोबत रानोमाळी 
मला शोधण्या, येशिल का रे, मंतरलेल्या एक सकाळी 

कधी अनामिक, कातरवेळी, आठवणींची होते गर्दी 
निसर्ग येतो गळा भेटण्या, तुला अचानक होते सर्दी !

- रमेश ठोंबरे

Nov 27, 2012

वेदना



तुला खरच काळजी असेल...
त्या निष्पर्ण, अभागी वृक्षाची
तर खरच त्याला पाणी घालत जा ...
तो बोलत नाही मनातलं ...
पण तू माझ्याबरोबर असलीस कि
नुसता सळसळत असतो !

मला अपराध्यासारख वाटतं ...

का दुर्लक्ष करतेस तू त्याच्याकडं ?
हिरवा गर्द ...,
डवरलेला असायचा म्हणे तो ...
आपली भेट होण्यापूर्वी.

दररोज पाणी घालायचीस

म्हणे तू त्याला ...
हितगुज करायचीस ...
तासनतास त्याच्याशी.
अशी अचानक कशी विसरलीस ?

तू अशी वागत जावू नकोस ....!

उन्मळून पडेल तो एकदिवस.
मला काळजी वाटते ग ...
त्याची आणि माझीही !

- रमेश ठोंबरे

Nov 24, 2012

अंधाराची साथ


अंधाराची साथ तिला, अंधाराचा ध्यास,
तिमिराचा भास झाला, काळोखाचा श्वास.

आवसेची वाट पाहे, पौर्णिमेची भीती
चढणीला रेंगाळली, अस्तापायी गती

अंधाराच नातं तिला, देवाजीनं दिलं,
दुनियेत आली अन, अंधारून आलं.

काजळल्या पापण्यांनी, डोळे केले बंद
काळ्याशार नयनांना, काजळाचा छंद.

खोल खोल विचारांची, मनामंदी दाटी
उजाडल्या अंतरात, काळजाची खोटी

अस काय उजेडाचं, अडलेलं माप ?
प्रकाशात केलं कोण्या, जनमाचं पाप !

- रमेश ठोंबरे
www.rameshthombre.com

‎'मराठी कविता समूहा'च्या 'कविता-विश्व दिवाळी विशेषांक २०१२' मध्य प्रकाशित कविता -

Oct 21, 2012

~ दिवाळी ~



येईल गार वारा, घेऊन ही दिवाळी
आनंद भार व्हावा, पाहून ही दिवाळी

संगीत मंद होता, भारावल्या मनाचे
जाईल सूर सारे, छेडून ही दिवाळी

आकाश पांघरुनी, मी झोपलो नव्याने
स्वप्नेच चार गेली, देऊन ही दिवाळी

अंधार फार दाटे, दारिद्र्य सोबतीला
जाईल ज्ञानज्योती, लाऊन ही दिवाळी

होतील तृप्त सारे, पाहील ती सुखाने
गाभाच संस्कृतीचा, सांगून ही दिवाळी

झालो उदास थोडा, पाहून वाट न्यारी
गेलीच आस थोडी, टांगून ही दिवाळी

- रमेश ठोंबरे

Oct 18, 2012

लोकशाही



लोकशाही ! हो तीच लोकशाही,
जी भारताच्या घटनेत आहे...
तीच लोकशाही !

काळ माझ्या स्वप्नात आली,
आणि सकाळी उठून लोकशाहीवर ..
विचार करावा असंच काहीतर सांगून गेली.

तिनं घेतलेल्या परीक्षेत,
मी नापास झालो !
खरच नापास झालो.
कारण तिनं लोकशाहीची व्याख्या विचारली ...
अन मी निरुत्तर झालो.
भारतात लोकशाही आहे का ?
म्हणून विचारलं ...
अन मी घटनेतल्या ...
कलमांवरून बोट फिरऊ लागलो.

तेंव्हा लोकशाहीच डोळे गळत म्हणाली,
''खून झालाय माझा,
या तुझ्याच देशात..
.... हो अगदी इंदिरेसारख्या
गोळ्या झेलल्यात मी या छ्यातीवर.
.....हो माझ्याच रक्षणकर्त्यानी,
भरदिवसा रस्त्यावर खून केलाय माझा."

लोकशाहीचा कंठ दाटून आला...
तसं मीच विचारलं -
''तू आता कुठ असतेस ?
काय - काय करतेस ?"

पुढ डोळे पुसत ती म्हणाली -
"मी कुठे जाणार ?,
इथच घुटमळतोय माझा आत्त्मा
त्या नराधमांना शोधण्यासाठी....
अन माझं स्वप्नं बघना-यां
लोकांना भेटण्यासाठी ..
पण पुन्हा पुन्हा होणारा रक्तपात
आता सहन होत नाही,
आणि दारुगोळ्याचा तो राक्षसी आवाजही."

लोकशाही घाबऱ्या आवाजात,
आपुलकीनं सांगत होती,
अन मीही कान देऊन ...
भयभीत होऊन ऐकत होतो.

तेवढ्यात लोलकाच्या घड्याळान
कानठळ्या बसवणारा आवाज केला,
अन त्या आवाजानं घाबरून ...
बिचारी लोकशाही आल्या पाऊली परत गेली.

- रमेश ठोंबरे

Oct 17, 2012

~ तुझे भास होते ~



खरे खास होते
तुझे भास होते

जरी गोड भासे,
उरी त्रास होते.

उसासे जरासे,
जरा श्वास होते

तुला टाळणेही
कुठे रास होते ?

मरावे म्हणालो,
तुझे ध्यास होते.

जगावे रमेशा,
असे फास होते.

- रमेश ठोंबरे

Oct 16, 2012

‎~ प्रेम गाणे गात आहे ~


ती म्हणाली काल जेंव्हा, चांदण्याची रात आहे
मी म्हणालो सोड सारे, पाहिजे ती साथ आहे.

काय होते लाजणे अन, काय होता तो बहाणा
काय झाले काल राती, हीच मोठी बात आहे.

चांदव्याने पाहिले ते, चांदणीचे रूप भोळे
चांदणीच्या जाळण्याला, रेशमाची वात आहे

आड आले धोंड सारे, प्रेम मार्गी चालताना
आज माझ्या चालण्याला, भाळलेली वाट आहे

ती म्हणाली काल जेंव्हा, वेदनेला सूर आहे
मी अताशा भोगल्याचे, प्रेम गाणे गात आहे.

- रमेश ठोंबरे

Oct 13, 2012

तुला पाहता हलले काही



तुला पाहता हलले काही, कसे ? कुठे ? समजेना

पाहून घेतो पुन्हा एकदा, एक वेदना दे ना !

वळणावरुनी असा घसरलो, आणिक सुटले भान

सगळे सगळे दिधले तुजला, फक्त राहिले प्राण !

मला न कळले काळजात या, कशी वेदना आली

ओठांवरती माझ्या विरली, तव ओठांची लाली !

बाहुपाशी कैद करून, मोहर उठवली जेंव्हा,

बंधनात हि जादू असते, म्हणालीस तू तेंव्हा !

रात नशीली उधळून गेली, तुझ्या तनुचा गंध

आणि अचानक पहाट झाली, तरी सुटेना छंद !

- रमेश ठोंबरे


Oct 6, 2012

तुमच्या-माझ्या मनात

तुमच्या-माझ्या मनात
एक तान्हं मुल रांगत असतं
मी अजून लहान आहे
हेच नव्यानं सांगत असतं.

थोडं कुठं दुखलं कि
आई आई म्हणत असतं
दु:ख तर असतच
पण दाखवण्यासाठी कण्हत असतं.

तुमच्या-माझ्या मनात एक
तान्हं मुल रांगत असतं

झोपाळ्यात बसलं कि
उगाच पोटात गोळा येतो
भीती लपवून चेहरा
खरच किती भोळा होतो ?

मला सांगा
मोठं झालं म्हणून काही
भ्यायचच नाही ?
डोळे मिटून दुध
आम्ही प्यायचच नाही ?     

चटक मटक दिसलं ... कि,
तुमच्या तोंडी पाणी सुटतं
'डॉक्टर गेला खड्ड्यात'
...मन बंड करून उठतं.

त्याला खाली बसवून
त्याची समजूत घालता
गरीब बिचारं मन...
खट्टू होवून बसतं
तुमचा चेहरा पाहून
तुमच्यावरती हसतं  
  
तुम्ही म्हणाल ..
मनात आलं म्हणून
सांगा कधी रांगता येत ?
मी म्हणेल ...
बालपण का सांगा 
खुंटीवरती टांगता येत ?

पण जावू द्या ना आता ..
लगेच कुठे रांगत आहात ?
तुम्ही अजून लहान आहात ..
हेच कशाला सांगत आहात ?     

कारण मला माहित आहे

तुमच्या-माझ्या मनात
एक तान्हं मुल रांगत आहे
मी अजून लहान आहे
हेच नव्यानं सांगत आहे !

- रमेश ठोंबरे
(ढापलेली गाणी) 

Oct 3, 2012

अभिप्राय

तिने लेखन क्रिया केली
आणि त्याने,
लगेच प्रतिक्रिया दिली.

म्हणाला,
"वरून दुसरी ओळ ...
जराशी विसंगत झाली आहे.
आणि याच कारणाने हि द्विपदी
पार रसातळाला गेली आहे.

दुसऱ्या कडव्यातल्या तिसर्या ओळीत
एक शब्द जास्त आहे.
तू हवं तर मोजून पहा ..
माझं(च) म्हणन रास्त आहे.

तिसऱ्या चरणाच्या 'लगावली'त
थोडीशी गडबड आहे.
भाव-भावना ठीक ठाक
पण मात्रांची पडझड आहे.

चौथ्या कडव्यातील दुसरी ओळ
'अशी' लिहिलीस तर बरं वाटेल.
अर्थ थोडा बदलतोय
पण गाताना खरं वाटेल !

पाचव्या कडव्यामध्ये
काव्य कुठं दिसलं नाही,
आणि त्याच तिथे नेमकं
यमक सुद्धा बसलं नाही.

बाकी कविता चांगली आहे,
पण अजून छान होवू शकते.
थोडी उडी घेतलीस तर
आणखी उंच जावू शकते.  

आणि हो, एक राहिलं
सुरवातीला 'प्रिय' आणि शेवटी 'तुझीच'
असे शब्द कवितेत नसतात.
मी खात्रीनं सांगतो ...
हे फक्त प्रेमपत्रात लिहित असतात.


ता.क. : भावना ओतण्याच्या नादात लय सोडू नकोस !

- रमेश ठोंबरे
  http://rameshthombre.blogspot.com/

Oct 2, 2012

पातक

डोई टेकलं आभाळ
टेकू लावणार काय ?
अशी फाटली धरणी
धागा धरणार नाय !

भूक वाढल्या कान्हाचा
टाहो आसमंती गेला.
दुध सुकल्या स्तनाचा
पीळ काळजाला आला.

पीठ घातल्या पाण्याचा
घोट ओठामंदी दिला.
चुली म्होरल्या पिठाचा
घास भूकेल्यान नेला.

गुंडा पुरुष आधार
झाला चालण्याचा भार.
इथं पोटात काहूर
त्याले वासनेचा ज्वर.

असं भयाण जगणं
कसं देवाजीनं केलं.
कुण्या जन्माचं पातक
मह्या माउलीला दिलं ?    
  

- रमेश ठोंबरे
(जिथं फाटलं आभाळ)

Oct 1, 2012

गांधी(वादी) झाल्याचं फिलिंग



१ अक्टोबर ची प्रत्येक रात्र ...
मला शांत झोपू देत नाही ...!
कितीही डोळेझाक केली तरी
वर्षभराचा लेखाजोखा डोळ्यासमोरून जात नाही.
मला आठवतात ...,
माझ्याच दैनंदिनीतील कितीतरी संदिग्ध नोंदी.
माझ्याच दैनंदिनीत झालेली सत्याची घुसमट !
असत्यावर डकवलेले ...सत्याचं पारदर्शक लेबल.

थोडस पुढं गेलं कि जाणवतो ....
वैचारिक आक्रस्ताळेपणा,
डोळ्यातून आग ओकणारी हिंसा...
आणि अवस्तावाचा ध्यास !
मला जाणवते...
मनातील अशांती, असंतोष.
आणि विचारांचा गोंधळ.

आणखी थोडं पुढं गेलं दिसतात ...
भुके-पोटी वणवण फिरणारे जीव
पाठीवरून तान्ह्याला घेवून कळवळणारी माय !
तिथेच कुठे तरी ... कधी नजर चुकवून ...
तर गर्दीचा फायदा घेवून ... माझे वळलेले पाय !

पुढे खूप काही ...
पण पुढच्या आठवणी दाबून ठेवतो ...
... कारण आता पहाट झालेली असते.
सूर्य किरणांची एक तिरीप
...हळूच खिडकीतून आलेली असते.

मी उठतो .....
सर्व विधी आवरून तय्यार होतो ...

खास आजच्या दिवसासाठी आणलेला
धोतर-पंचा महत्प्रयासाने अंगावर चढवतो.
बाहेर आलेल्या पोटाला थोडं आत ढकलतो.
... मध्ये मध्ये डोकावणाऱ्या पांढर्या केसांवर
गांधी टोपी ठेवतो.
शुभ्र पांढर्या फुलांचा एक हार हातात घेतो.
पुन्हा पोट सावरत ... कसरत करत
स्टुलावर चढतो आणि बापूंच्या फोटोला घालतो.
आता बापूंनाही कसं शांत वाटतं !
अन माझ्यातही गांधी(वादी) झाल्याचं फिलिंग दाटतं !

- रमेश ठोंबरे
(२ ऑक्टोबर २०१२)
(महात्म्याच्या कविता)

Sep 11, 2012

चांगभलं !

पिणाराचं चांगभलं
पाजणाराचं चांगभलं
एक घोट पोटामंदी
स्वस्ताईचं चांगभलं !

घेणाऱ्याचं चांगभलं
देणाऱ्याचं चांगभलं
दोन घोट पोटामंदी
महागाईचं चांगभलं !

चांगल्याचं चांगभलं
पांगल्याचं चांगभलं
तीन घोट पोटामंदी
वाटोळ्याचं चांगभलं !

करणाऱ्याचं चांगभलं
भरणाऱ्याचं चांगभलं
चार घोट पोटामंदी
घोटाळ्याचं चांगभलं !

भ्रष्टाचाराचं चांगभलं
शिष्टाचाराचं चांगभलं
पाच घोट पोटामंदी
या नेत्याचं चांगभलं !

लोकशाहीचं चांगभलं
ठोकशाहीचं चांगभलं
सहा घोट पोटामंदी
या देशाचं चांगभलं !

पिणाराचं चांगभलं
पाजणाराचं चांगभलं
घोटा मागून घोट गेले
या पोटाचं चांगभलं !

- रमेश ठोंबरे
www.rameshthombre.com

Jul 15, 2012

विठ्ठल विठ्ठल म्हणा ....


कर्मावरती भक्ती असू द्या, तयास विठ्ठल म्हणा
विठ्ठल विठ्ठल म्हणा चला रे विठ्ठल विठ्ठल म्हणा !

जगी रंजले, किती गांजले
अन्न, वस्त्र अन स्वप्न भंगले
दिन दुबळा दिसता कोणी, तयास विठ्ठल म्हणा ||१||
विठ्ठल विठ्ठल म्हणा ....

शब्दावाचून उणेच सारे
शब्द बोलता, हसती तारे
शब्दावरती प्रेम असू द्या, तयास विठ्ठल म्हणा  ||२||
विठ्ठल विठ्ठल म्हणा ....

निसर्ग आहे आपुला पिता
अन धरती हि अपुली माता
नतमस्तक व्हा नित्य तिथे, तयास विठ्ठल म्हणा  ||३||
विठ्ठल विठ्ठल म्हणा ....

जिथे तिथे रे विठ्ठल वसतो
दगडा मध्ये विठ्ठल दिसतो
चरा-चराला विठ्ठल जाणा, तयास विठ्ठल म्हणा  ||४||

- रमेश ठोंबरे
  

 

   






Jul 6, 2012

रूप तुझे देवा

रूप तुझे देवा 
साठवावे डोळा 
तो नेत्र सोहळा 
सर्वश्रेष्ठ 
विठ्ठल विठ्ठल 
देह सारा बोले 
अनु रेणू झाले 
विठूमय 

विठ्ठलाचे सख्य
मागतो मी नित्य 
जीवनाचे सत्य 
हेची एक

तन हे विठ्ठल
मन हे विठ्ठल 
कर्म हि विठ्ठल
व्हावे आता.

 - रमेश ठोंबरे

May 25, 2012

विवाहितेची आत्महत्या


काल एक बातमी कानावर आली ...
विवाहितेने आत्महत्या केली... !
मनात विचारचक्र सुरु झाले
का ? कसे ? असे का केले.

तर्क वितर्कांचे ... थैमान सुरु झाले

नवर्याचा जाच असावा,
सासर्याचा त्रास असावा.
सासू खूप बोलत असेल,
नणंद मनात सलत असेल.

जगण्याला कंटाळली ...
कि आणखी कुणाला भाळली असेल
कोणी तरी नडले असेल
म्हणून अघटीत घडले असेल.

जगणं सध्या महाग आहे,
महागाईन घेरलं असेल.
डोक्यावर मोठा डोंगर असेल,
म्हणून सावकारीन मारलं असेल.

दुनियेलाही तो भीत नसावा,
नवरा दारू पीत असावा.
हे हि दु:ख दाटलं असेल
म्हणून 'औषध' घेतलं असेल. 

शेवटी काय ... !
जगणं तिला झेपलं नसेल
काळीज तिचं इतकं छोटं
कि दु:ख त्यात लपलं नसेल.

तर्क वितर्क हजार झाले ..
मनालाही पटून गेले.
यात तिचं चुकल काय ?
कित्तेक जीव असेल गेले.

सगळीकडचा आक्रोश
तिची कहाणी सांगत होता
माझ्या मनातला हरेक तर्क
मनात पुन्हा रांगत होता.

तेवड्यात एक टाहो आला
भुकेल्या पोटाचा .....,
दुधाच्या ओठाचा ....!

आता सगळे तर्क मातीत गेले
रांगते विचार जागीच मेले,
ती विवाहिता,
विवाहीताच राहिली असेल...
तिला शेवटपर्यंत
आईपण कळलं नसेल ! 

- रमेश ठोंबरे    

May 18, 2012

~ गांधी नंतर ~



या देशाने काय पाळले गांधी नंतर  ?
फोटोला बस हार माळले गांधी नंतर.
 
विटंबनाही रोज चालते इकडे-तिकडे  
पुतळे कसले, तत्व जाळले गांधी नंतर

देश बदलला, देशाचा गणवेश बदलला
खादीलाही नित्य टाळले गांधी नंतर

शस्त्राहुनही खणखर असते निधडी छाती
हिंसेपुढती रक्त गाळले गांधी नंतर
गांधी 'हत्या' 'वध' ठरवण्या आमच्यासाठी ?  
इतिहासाचे पान चाळले गांधी नंतर
देश आमचा गांधीवादी सांगत सुटलो, 
नथुरामाला किती भाळले गांधी नंतर ?

नको 'रमेशा' निराश होऊ कातरवेळी
'राजघाट'ने नेत्र ढाळले गांधी नंतर.

- रमेश ठोंबरे
(महात्म्याच्या कविता)

Apr 15, 2012

~ तुझी आठवण येते ~

तू नसताना रांगत रांगत तुझी आठवण येते
चोर पाउली लाजत लाजत तुझी आठवण येते 

जिकडे तिकडे भयाण शांती गहिवरलेली गाणी
दंगा मस्ती वाजत गाजत तुझी आठवण येते 

बोट सुटावे हाता मधुनी अडखळती पाऊले
दुडक्या चाली चालत चालत तुझी आठवण येते 

अबोल झाली शब्द विखुरल्या पुस्तकातली पाने
बोल बोबडे बोलत बोलत तुझी आठवण येते

कधी बोचतो डोळ्यांमधला विखार जो सांडला
नेत्र बोलके गाळत गाळत तुझी आठवण येते

कधी आठवे फुगलेल्या त्या गालावरचा पापा
नाक नवेले मुरडत मुरडत तुझी आठवण येते

कुणास सांगू किती रमेशा आठवांत मी रमतो
आठवणींना टाळत टाळत तुझी आठवण येते

- रमेश ठोंबरे

~ फेसबुकावर ~



कितीक सारे मित्र 'च्याटले' फेसबुकावर 
तुझे नि माझे नित्य 'फाटले' फेसबुकावर.

गल्लीमधली पुसती सारी 'कोण पाहुणा ?'
'विश्वची माझे सगे' वाटले फेसबुकावर.

सोशल त्याचा श्वाश जाहला, जगणे झाले
झुकरबर्ग ने द्रव्य लाटले फेसबुकावर. 

अण्णा, बाबा सांगत सुटले 'देश वाचवा' 
दुकान त्यांनी नवे थाटले फेसबुकावर.

प्रकांड ज्ञानी सवे बैसुनी चर्चा करती
कसे कुणाचे नाक छाटले फेसबुकावर.

आम्हास अमुचे पुस्तक प्यारे, छापुन घेऊ  !
कसे रमेशा शब्द बाटले फेसबुकावर ?

- रमेश ठोंबरे

Apr 10, 2012

मी जागा शोधतो आहे ...


दुनियेच्या गर्दी पासून दूर
वखवखलेल्या नजरेपासून दूर
या इथे निवांत ....
काळोखलेल्या रात्री ...
तुझ्या रेशमी केसांच्या छायेत
मी हरून जायचो भ्रांत.

तू म्हणायचीस हि कसली रे जागा ...
हीच का आवडते तुला .... ?

का नाही आवडणार ....?
काळोखाला साथ करणारा चंद्र ...
शांततेचा पुरस्कर्ता हा वाडा..
निसर्गाच्या जिवंतपणाची साक्ष...देणारे हे वृक्ष !
वार्यासोबत डोलणारी हि हिरवळ.

सगळेच कसे असून हि नसल्यासारखे
तू येईपर्यंत साथ करणारे ...
आणि तू आली कि ...
.... आपलं स्वतःचही अस्तित्व विसरणारे.

तुला फक्त चंद्र आवडायचा ...
तू पुन्हा पुन्हा म्हणायचीस
या चंद्राप्रमाणे आयुष्यभर ..
तुझी साथ हवी आहे ...
मी हो म्हणायचो आणि
कधी तुझ्याकड अन
कधी चंद्राकड पाहत बसायचो ..!
..
...
....
आता तुलाच ही जागा जास्त आवडत होती.
माझ्या आधी तू हजर झालीस, तेंव्हाच समजलं होतं ...
पण इतकी आवडेल असं वाटलं नव्हतं  ....

.... तू चीरनिद्रेला कायमचं सर केलंस ....
चंद्राच्या नितळ छायेत घर केलंस ... !

मी मात्र आणखी ही ....
जागा शोधतो आहे ...
इथेच तुझ्या शेजारी !

- रमेश ठोंबरे

Apr 5, 2012

|| वसंत ||


झडूनिया गेली
पिवळी ती पानं
हिरवे हे रान
झाले आज ||

मन माझे वेडे
भरुनीया आले
आभाळ ते झाले
काळेभोर ||

मन असे ओले
हिरवे हि झाले
विसरून गेले
रितेपण ||

पुन्हा पुन्हा येतो
गहिवर फार
आठवांचा ज्वर
साहवेना ||

तुझ्या सवे जो मी
वसंत पहिला
तोची आठवला
पुन्हा आज ||


कवी - जावेद अख्तर
अभंगानुवाद - रमेश ठोंबरे

Apr 3, 2012

जिथं फाटलं आभाळ

जिथं फाटलं आभाळ

जिथं फाटलं आभाळ
तिथं बांधतो मी घर
मला रुजाया पाहिजे
भग्न दगडांचा पार

तुझा फटका पदर
किती झाकशील उर
आसं लपणार नाही
तुझ्या दु:खाचं काहूर

रात अंधारली गूढ
दूर एकटी निजली
दिस आठवात गेला
कूस अश्रूंनी भिजली

नको रिती होऊ देऊ
दु:ख भरली ओंजळ
रित्या रित्या या घरात
सुख दिसलं ओंगळ

गर्द झाकोळली रात 
ओल्या दु:खाचा गाभारा
सुख अनावर झालं
केला देवानं पोबारा !  
                         
- रमेश ठोंबरे

Mar 23, 2012

कोणी म्हणे ...... ३ ..................६)



कोणी म्हणे येथं
काव्य फार झाले
त्याला मी दावले
अभिप्राय ||

कोणी म्हणे येथं
चौर्य हि उदंड
दावला मी दंड
डिलीटाचा ||

कोणी खोट काढी
शील अश्लीलाची
त्याला दिल्या शाली
जोड्यां सवे ||

कोणी म्हणे 'फेक*'
आहे येथं फार
'ई-बुक' 'त्यांचेची*'
गाजविले ||

कोणी म्हणे आहे
पसाराच फार
त्याला वर्तमान
दाखविले ||

- म.क.
(रमेश ठोंबरे)

Mar 21, 2012

कोणी म्हणे ...... २ ..................५)



कोणी म्हणे मी रे
सहजची आलो |
येथलाची झालो
खर्या अर्थी ||

कोणी म्हणे माझी
भूक फार आहे
पूर रोज पाहे
कवितांचा ||

कोणी म्हणे गड्या
सापडला मार्ग
दूर आता स्वर्ग
दोन बोटे ||

कोणी म्हणे मज
आवडे हा मेळा
होती सर्व गोळा
एक धागी ||

कोणी म्हणे काय
आहे येथं खास
सोडवेना कास
माझे माय ||

- म.क.
(रमेश ठोंबरे)

कुणब्याच्या पोरा तुला ह्याचीच का लाज ? (दीर्घ कविता)


.. १ ..
रांगड्या या शेतामंधी रांगडा हा बाप
चालताना त्याच्यासंग माय खाई धाप

शिकशील चार बुक होशील तू मोठा,
तेंव्हा साऱ्या कष्टाला मग देशील तू फाटा.

आस गोड भविष्याची धरुनी ती मनी,
राबतोय उन्हामंदी कष्टाचा हा धनी.

उनाळ्याच्या दिसामंदी पळस फुलला,
तुझ्या सुखापायी त्यानं अंगार झेलला.

दमलेल्या अंगाला या कष्टाचाचं साज
कुणब्याच्या पोरा तुला ह्याचीच का लाज ?

..२..
माय तुझी बापासंग ओढतीय गाडा
वाचणार कशी तिच्या दु:खाचा र पाडा ?

गायीला त्या वासराचा येतोया आठवं
दाटतात तिच्या मग डोळ्यात आसवं

फाटलेली चोळी सांगे दारिद्र्याचं जीण,
अन काळ्याभोर धरतीचं हिरवं ते लेणं.

अनवाणी पायी माय चाले बिगी बिगी
सोडला दुष्काळ आहे डोळ्यामोर्ह सुगी

दिस येता डोईवर पदरी हि भिजं
कुणब्याच्या पोरा तुला ह्याचीच का लाज ?

..३..
शिकण्यास पोराची केली बोळवण,
शहरात आलं एक उंडारलेलं बेन.

शेत नको माती नको हवं याला काय ?
शिकणार नाय माती मसणात जाय !

बाप राबे शेतामंदी याला नाही तमा,
शहरात वागण्याची गाठणार सीमा.

शहरामंदी पोराचा हा पाहुनिया थाट,
वाकलेला बाप मग चाले बघा ताट.

पोऱ्या बोले इंग्लिश चाले बापा मोर्ह 
बापा वाटे शहरात शिकतंय पोरं

बापाच्या र बोलण्याचा नाकातून बाज
कुणब्याच्या पोरा तुला ह्याचीच का लाज ?

..४..
शहराची शानशोक विसरला गाव,
बापाचं हि येत नाही तोंडामध्ये नावं,

कॉलेजात जातो मग सजून धजून,
फाटलेल्या चड्डी मध्ये थोडासा बुजून.

कॉलेजात पाही अश्या पोरी गो-या गो-या,
एका वर्गामंदी चाले दोन दोन वा-या.

बुकामध्ये याचं मन रमणार कसं...?
याला आता लागलेला वेगळाच ध्यास.

दाणा नाही पोटामध्ये, शहराचा माज
कुणब्याच्या पोरा तुला ह्याचीच का लाज ?

..५..
बाप म्हणे शिकणार होणार हा मोठा,
कुणब्याच्या घरी नाही आनंदाला तोठा.

मायेन बी आस आहे जीवाला टांगली,
पाहतेया रातीला ती सपान चांगली.

मायेच्या या सपनाची काय तुला जाण,
बापाच्या हि कष्टाचे आहे कुठे ध्यान ?

दिसभर झोप घेइ, करी रातीचा दिवस
कोण्या मोसोबाला याचा घालावा नवस ?

मिळणार कसा तुला ज्ञानाचा र साज ....
कुणब्याच्या पोरा तुला ह्याचीच का लाज ?

..६..
सोडीला तू गाव झाला शहराचा बाबू,
गावामंदी येता नको नाक तोंड दाबू.

याच शाळेमंधी होता गिरवला 'एक'
आज हि न कळे तुला जगण्याची मेख.

हाच तुझा गाव आहे, हेचं ते राउळ.
नवस फेड्या मारुतीचं हेचं ते देऊळ.

बसायला दिला तुला पटक्याचा सोंगा,
तुझ्या डोक्या मंदी असे वेगळाच भुंगा.

गोठ्या मंधी शिरताच झाली तुला खाज
कुणब्याच्या पोरा तुला ह्याचीच का लाज ?

..७..
शिकला हा चार बुक विसरला गाव.
गोठ्यातल्या गायीचं हि विसरला नाव,

बहिण हि झाली आहे आता बघ मोठी
लाज तिची झाकातेय फाटकी चीरोटी

मन तिचं तुला कधी उमजलं नाही
डोळ्यातलं सपान बी समजलं नाही

बापाची हि चिंता आता वाढलीय फार
वयातली लेक त्याला वाटतीय भार

अंगावरी शोभे तिच्या योवानाचा साज
कुणब्याच्या पोरा तुला ह्याचीच का लाज ?

..८..
लेकी साठी रान आता टाकलं गहाण
पायामंदी टोचतीया रोजचीच वहाण

पांढरया या सोन्यानं बी दिला औंदा दगा
आता तरी थेंब सोड वांजोट्या रे ढगा

जमीन कोरडी पिक गेलं र जळून
वाट तुझी पाहता दिस गेला र ढळून

तुझ्या पायी लेका दिस-रात एक केली.
शेवटला तुला त्याची सय नाही आली,

गळ्यामंदी फास डोई सावकारी व्याज
कुणब्याच्या पोरा ठेव याची आता लाज ?


- रमेश ठोंबरे

Mar 18, 2012

मी लाडाची पाडाची बिजली


मी लाडाची पाडाची बिजली
भल्या भल्यांची मशाल इजली !
माझ्या पुढं र मशाल इजली !

माझा रंग गोरापान
तुझे उडालेले भान
हि रात सारी इष्कात भिजली || धृ ||
मी लाडाची पाडाची बिजली .........

डोळ्यात काजळ वेली
गाली र गुलाब लाली
माझ्या रुपाची नशा हि झाली
तिथं बाटली आडवी निजली .....||१||
मी लाडाची पाडाची बिजली .........

माझा कसलेला घाट
तुझा बाणा लई ताठ
असा पाहुनिया थाट
आता माझी बी नियत लाजली ||२||
मी लाडाची पाडाची बिजली .........

माझी नागमोडी चाल
करी दिलाचे र हाल
त्यात ज्वानीची कमाल !
आता इष्काची बिर्याणी शिजली ||३||

तुझा डाव मला ठाव
नको उगी बडेजाव
डाव पांगण्याचा भ्याव
बघ भीती ही डोळ्यात सजली ||४||
मी लाडाची पाडाची बिजली .........
भल्या भल्यांची मशाल इजली !
माझ्या पुढं र मशाल इजली !

- रमेश ठोंबरे
Ramesh Thombre
(Item Song from Bijalibai)

|| बघा बघा कसा माझा खातोय सखा ||


या बाबा या,
बघा बघा कसा माझा खातोय सखा ll१ll

दिसत नसे,
हळुहळु कसा माझा सखा खातसे ll२ll

डोळे फिरवीतो ,
टुकु टुकु कश्या हिरव्या नोटा बघतो ll३ll

बघा बघा तो,
टेबलाच्या खालूनच कसा हसतो ll४ll

मला वाटते,
याला बाई सारें काही कसे कळते ll५ll

सदाच खातो,
कधि नको म्हणुनी न मागे वळतो ll६l

शहाणा कसा !
खावूनिया ढेकर न देतो दिवसा ll७ll

- रमेश ठोंबरे
(या बाई या चे विडंबन) दत्तात्रय कोंडो घाटे यांची माफी मागून

बाकी सगळं खोटं आहे !



प्रेम बीम झूट आहे,
सगळी सगळी लुट आहे.
सगळं सगळं लुटून
शेवटी ताटातूट आहे.

बजेट बिजेट थेर आहे
उगी जीवाला घोर आहे
भांडणारा हि चोर आणि
मांडणारा हि चोर आहे

नेत्याकडून विश्वास नाही,
तिकडून कुठलीच आस नाही.
एक पंचवार्षिक संपली कि
बाकी काहीच खास नाही.

शिक्षणाच्या आयचा घो
शिकून सवरून कपडे धो !
अंगठेबहाद्दर संस्था चालक
नुसता करतो यस -नो !

माझं-माझं कसलं काय ?
खाली मुंडकं वर पाय ! 
कालपर्यंत सुंदर होतं
आज काहीच दिसत नाय. 

निरस मन थोटं आहे, 
दु:ख किती मोठं आहे ...
'एक ओळ कवितेची'   
बाकी सगळं खोटं आहे !  


- रमेश ठोंबरे


  

Mar 16, 2012

- गांधीगिरी -


आयुष्यभर तुम्ही केलीत ...
म्हणून आम्ही हि करतो कधी कधी.
अन आयुष्यभर दादागिरी करणारे हि ...
करतात कधी कधी ...
............................. गांधीगिरी !

तुम्ही सर्वांसाठी केलीत ...
म्हणून आम्ही हि करतो कधी कधी
अन नेहमीच सर्वाना वेठीस घरणारे हि ...
करतात कधी कधी
............................. गांधीगिरी !

तुम्ही उघड उघड केलीत ....
म्हणून आम्ही हि उघडच करतो ....
अन कित्येक संसार उघड्यावर आणणारे हि
करतात कधी कधी
............................. गांधीगिरी !

तुम्ही केलीत ती केलीत...
म्हणून आम्हाला हि करावी लागली ...
अन ज्यांना करायची नव्हती कधीच ....ते हि
करतात कधी कधी
............................. गांधीगिरी !

गांधीगिरी ....
कधी भीती,
कधी मुरलेली राजनीती.
कधी ढोंग,
कधी समाजसेवेचा कोंभ.

कधी भास,
कधी टाकलेला फास.
कधी माज,
कधी लोपलेला आवाज.
....
गांधीगिरी ...
...................
..................
तुम्हाला समजली....
पण आम्हाला कधी समजणार ....?
गांधीगिरी ...!

- रमेश ठोंबरे


Mar 14, 2012

माझ्या विठूच्या भूमीत



माझ्या विठूच्या भूमीत
गड्या नाद पावलाचे,
कड्या-कपाऱ्यां मधुन
गुण गाती विठ्ठलाचे ||

माझ्या विठूच्या भूमीत
हळदी कुंकवाची रास,
कधी हारांची आरास.
कधी फ़ुलांचे सुवास ||

माझ्या विठूच्या भूमीत
चंद्रभागेची पुन्याइ ,
पाप धुउन लेकराची
नाव लावते किनारी ||

माझ्या विठूच्या भूमीत
नित्य भक्तीचाच वारा,
कधी चंदनाचा लेप
दही दुधाच्या रे धारा ||

माझ्या विठूच्या भूमीत
येते लेकच माहेरा,
ओलावल्या लोचनांनी
भेटे भक्तीच्या सागरा ||

माझ्या विठूच्या भूमीत
टाळ फुला सम फ़ुले,
भोळा भाबडा मृदंग
मग शब्दागत बोले ||

माझ्या विठूच्या भूमीत
गडे भक्तीचाच भात,
वाढी आईच्या मायेने
विठू भाक्तीचेच हात ||

माझ्या विठूच्या भूमीत
चंद्रभागे पुण्य नांदे,
भक्त विठूचेच जरी
पुंडलिका आधी वंदे ||

- रमेश ठोंबरे
प्रेरणा - बा. भ. बोरकर (माझ्या गोव्याच्या भूमीत)

Mar 11, 2012

पाडगावकर तुम्ही चुकलातच

पुरस्कार काय तुम्हाला नवे आहेत पाडगावकर ...?
मग चालुद्याना जे चालू आहे ते,
पण गप्प बसणार ते पाडगावकर कसले...!
तुम्ही नको नको म्हणताना आम्ही तुम्हाला
साहित्य संमेलनाचे अध्यक्ष पदे देतो ...!
कधी कधी वाटलाच तर ...
मराठी साहित्यासाठी सल्ला हि घेतो !
मग तरी हि तुम्ही नाराज ...
पाडगावकर हे बरं नाही... !
तुम्ही म्हणालात आणखी लायक लोक बाकी आहेत...
तेंव्हा आम्हाला तर तुम्हीच दिसलात ...
तुम्ही इतरांबद्धलच बोलला आसाल
पण स्वताच्या लायकि वर हि हसलात.

आमचं कसंय पाडगावकर ...
आम्ही आमच्या फायद्याचं तेवढं उचलतो,
तुमचा स्वभाव तसा नाही ....,
तुम्ही इतरांचीच जास्त काळजी करता ....!
मागे म्हणाला होता ..."मला कुन्ही तरी बंदूक द्या !"
आणि काय रान उठलं माहित आहे ना ...!
आहो मराठी साहित्याचा गाडा चालवतो ना आम्ही...
मग हि काळजी करावीच लागते ...
तुमचे शब्दच असे धारदार ...
मग तुम्हाला बंदूक कशी देणार ?
तसंच आहे हे ...!
बोलगाणी लिहिणारे पाडगावकर
बंदूक मागतात तेव्हा चिंता वाटणारच आम्हाला.
आणि नको नको म्हणणारे पाडगावकर
पुरस्कार मागतात तेव्हा हि चिंता होणारच आम्हाला.
... तुमची नाही हो पाडगावकर ...!
मराठी साहित्याची चिंता ...
मराठी साहित्याचा गाडा चालवतो ना आम्ही...!
त्या चिंतेत आम्ही आता तुमचा राजीनामा मागणार ...
उद्याच्या संमेलनाच्या अध्यक्ष पदाचा हो ...!
ते यादव आठवतात का ...?
तसं होतं बघा काही तरी ...!
तेंव्हाच आमची चिंता मिटते ... आणि
आणि मराठी साहित्याचा गाडा चालू लागतो.
पाडगावकर हे असंच चालणार ..
तुमच्या मनातला जिप्सी जागा होणार ...
तो तुम्हाला काही तरी सांगणार ...
तुम्हाला राहवलं नाही जाणार ...!
तुम्ही काही तरी बोलणार ...."...."
वर तुम्ही म्हणणार अर्थाचा अनर्थ होतोय ...

पण तुमच्याच म्हणण्याचा अर्थ काढणारे तुम्ही कोण ?
तुम्हीच म्हणता ना कवीने कविता लिहावी आणि
वाचकांवर सोडून द्यावी ... ज्याचे त्याने त्याचा अर्थ काढावा ...
तसं ...
अर्थ तर आम्हीच काढणार ना ... !
ते म्हणाले तुम्ही खंत व्यक्त केली ती मराठी साहित्यीकांसाठी ...
आणि त्याने म्हणे पुरस्काराचीच प्रतिष्ठा वाढायला हवी ..!
खरं हि असेल त्यांचं ...
पण मला सांगा पाडगावकर ...
याने कुठे मराठी साहित्याचा गाडा चालतो का ...?
म्हणून म्हणतो .....
पाडगावकर तुम्ही चुकलातच ...!
आमचं कसंय माहिताय का ....
मराठी साहित्याचा गाडा चालवतो ना आम्ही...!

- रमेश ठोंबरे



सलाम

समूहाच्या सर्व कवींना सलाम
वाचकांना सलाम ...
लिहित्याना सलाम, राहत्याना सलाम
नवकवींना सलाम,
भावकवींना सलाम.
जुन्या, नव्या सर्वाना सलाम

reply देणाऱ्यांना सलाम
reply घेणाऱ्यांना सलाम
सर्वाना सलाम !
छान छान लिहाणाऱ्यांना सलाम
मान पान देणाऱ्यांना सलाम
सलाम कविहो सलाम !

खोलवर आतलं लिहीणाऱ्यांना सलाम
मनात दाटलं लिहीणाऱ्यांना सलाम.
नवा विचार देणाऱ्यांना सलाम
जुना विचार घेनाराना सलाम.
'स्वप्नात' राहणारांना सलाम
'आठवणीत' जाणारांना सलाम
सलाम कविहो सलाम !

मैत्रीत अडकलेल्यांना सलाम
विरहात भडकलेल्यांना सलाम
पेल्यात बुडालेल्याना सलाम
चढल्यावर धड्कलेल्यांना सलाम
सलाम कविहो सलाम
run च्या ग्लासाला सलाम
कवितेच्या 'क्लासा'ला सलाम
ओळी लिहिणाऱ्यांना सलाम
चारोळी लिहिणाऱ्यांना सलाम
चारोळी लिहिता लिहिता ...
कविता लिहिणाऱ्यांना सलाम
सलाम कविहो सलाम !

दिवसा 'घेनाराना' सलाम
रात्री 'घेनाराना' सलाम
तसाच ....
दिवसा लिहिणाराना सलाम
रात्री लिहिणाराना सलाम,
पहाटे लिहिणाराना सुद्धा सलाम !
लिहिता लिहिता वाचणाराना सलाम
न लिहिता सुद्धा वाचणाराना सलाम
तसाच
न 'घेता' लिहिणाराना सुद्धा सलाम
सलाम कविहो सलाम !

खोलवरचं लिहिणाराना सलाम
वर-वरचं लिहिणाराना सलाम.
सरळ सोपं लिहिणाराना सलाम
चुकली मापं पाहणाराना सलाम.
अर्थ संगणाराना सलाम
व्यर्थ टांगणाराना सलाम.
सर्वाना सलाम ...!
कविता सरळ मांडणाराना सलाम
कवितेमधून भांडणाराना सलाम
सलाम कविहो सलाम !

मोठ्यांसाठी लिहिणाराना सलाम
छोट्यांसाठी लिहिणाराना सलाम
फायद्यासाठी लिहिणाराना सलाम
तोट्यासाठी लिहिणाराना सलाम
त्याच्यासाठी लिहिणाराना सलाम
तिच्यासाठी लिहिणाराना सलाम.
स्वता:साठी लिहिणाराना सलाम.
सर्वाना सलाम
भान विसरून लिहिणाराना सलाम
थोडसं घसरून लिहिणाराना सलाम
सलाम कविहो सलाम !

कवीच्या ... प्रेम कवितेला सलाम
कवीच्या ... विरह कवितेला सलाम
पावसाच्या कवितेला सलाम
पावसाच्या नवसाच्या कवितेला सलाम
काळोखाच्या गर्द काळ्या कवितेला सलाम
उजेडाच्या शुभ्र निळ्या कवितेला सलाम
भुकेल्याची भूक बनलेल्या कवितेला सलाम
चुकेल्याची चूक बनलेल्या कवितेला सलाम
आयुष्यभर झुलवणार्या कवितेला सलाम
भविष्यावर हुलवणार्या कवितेला सलाम ....
सलाम कविहो सलाम
तुमच्या सर्व कवितांना सलाम !

शिकता शिकता चुकलेल्यांना सलाम
चुकता चुकता शिकलेल्यांना सलाम
शिकता शिकता थकलेल्यानाही सलाम
अन
चुकण्यास नथकलेल्यानाही सलाम !
तुम्हा आम्हाला विरहात लोळवनाराना सलाम
तुमच्या आमच्या भावना चाळवनाराना सलाम.
खरं खरं लिहिणाराना सलाम
न्यारं न्यारं लिहिणाराना सलाम
प्यारं प्यारं लिहिणाराना सलाम
अन
खरं सुद्धा प्यारं लिहिणाराना सलाम.
सलाम कविहो सलाम !

रक्तरंजित भडक कवितेला सलाम
बेभान, तडक कवितेला सलाम
हळव्या, कोमल कवितेला सलाम
शामल शामल कवितेला सलाम
पंखाना उभारी देणाऱ्या कवितेला सलाम,
शंखांना माघारी नेणाऱ्या कवितेला सलाम
जगण्याचं भाष्य करणाऱ्या कवितेला सलाम
मरणाचं सुद्धा हास्य करणाऱ्या कवितेला सलाम ...
अस्तित्व बनू पाहणाऱ्या कवितांना सलाम
अस्तित्वहीन कवितांना सुद्धा सलाम.
सलाम कवी हो सलाम !

गझलेला सलाम ...
गाण्याला सलाम ....
अभंगाला सलाम ....
भजनाला सलाम ...
विडंबनाला सलाम ...
पोवाड्याला सलाम ....
लावणीला सलाम ...
त्रीवेनीला सलाम ...
छंदाला सलाम ...
मुक्तछंदाला सलाम ...
कवीच्या प्रत्येक रचनेला सलाम ...
सलाम कविहो सलाम.

कविहो सर्वाना सलाम
तुम्ही भेटलात म्हणून केला सलाम
तुम्ही दिसलात म्हणून केला सलाम
तुम्ही लिहिता म्हणून केला सलाम
तुम्ही पाहता म्हणून केला सलाम ....!
कधी सलाम कवीला ...
कधी सलाम कवीच्या कवितेला.
कधी सलाम कवितेतील शब्दाला
कधी सलाम कवितेतील अर्थाला.

सलाम कवी हो सलाम
समूहाच्या सर्व कवींना सलाम ....!
आणि हो ....
बिनधास्त .... बेधडक .....
खोचक .... भेदक ....
पाडगावकरांच्या 'सलाम' ला सलाम !

- रमेश ठोंबरे

Mar 9, 2012

नेत्याचं भुत



खरच कधी - कधी खुप चिड येते
आणि डोक गरगरायला लागत,
राजकारण डोक्यात घुसल्यावर
खरच कितीही आत गेल तरी...
नेत्याचं मन कळत नाही ...
नेत्याचं भुत मानगुटीवर बसल्यावर.
..
आसच एकदा एका रात्री
नेत्याच भुत मानगुटीवर बसलं,
मी वळून मागं पाहिल्यावर,
निर्लज्यपणे ओळखीच हसलं .
..
थोडावेळाने माझा कल पाहून,
त्याने आपल पुराण सुरु केलं
मीच कसा श्रेष्ट आहे ?
हे स्व:स्तुती करून खर केलं.
..
मी त्याला त्याच्यातले दोष..
सांगत होतो,
आणि ते नपटणारे दाखले देउन,
माझ म्हणंन खोडत होत.
वरचेवर जबरदस्ती करून,
माझ मत मोडत होत.
..
शेवटी त्याला सांगुन सांगुन,
रोजच्याप्रमाणे मी गप्प झालो.
त्याच पांचट नेतेपुराण एकुन ,
मी पुरता ठप्प झालो.
..
आता माझ्यावर विजय मिळवून,
नेत्याच भुत भटकू लागलं
मी मौन व्रत धारण केल्यावर,
ते वेताळाप्रमाण  ...
विधानसभेवर लटकू लागलं.

- रमेश ठोंबरे

Mar 8, 2012

स्वत:चा रंग शोधूया

सगळीकडे रंगच रंग
रंग लाल, हिरवा नि निळा,
रंग पिवळा, पांढरा नि काळा
आकाशाला भिडणारे रंग..
जमिनीवर कुढणारे रंग,
उत्साहाने नाचणारे रंग
निराशेने खचणारे रंग.

.... रंग निराळे द्वेशाचे,
.... रंग निराळे आशेचे.
.... रंग निराळे संवादाचे..
.... रंग निराळे भाषेचे.

रंग काळा द्वेशाचा,
रंग पांढरा शांतीचा.
रंग हिरवा प्रसन्नतेचा
रंग लाल क्रांतीचा.

रंग, कुणी केशरी, केशर उधळत आले
रंग, कुणी गुलाबी, फुलांवर जावून बसले.
रंग, कुणी हसरे, हसत नाचत आले
रंग, कुणी लाजरे, रंगात हरउन बसले
रंग, कुणी बोलके, रंगरंगत बोलून गेले
रंग, कुणी अबोले न बोलता सांगून गेले.
रंग, कुणी फुलांचे, फुलांवरील फुलपाखरांचे
रंग कुणी मायेचे, मायेच्या लेकरांचे.

. ....
कुणी रंग - तरल डोळ्यांचे
कुणी डोळ्यांवरील फुटक्या काचांचे
कुणी रंग मस्त जीवनाचे
कुणी अडखळलेल्या शेवटच्या श्वांसांचे.
रंग सगळेच वेगळे ..
रंग सगळेच निराळे.

..... रंग भाकरीचा, भुकेसाठी अमूल्य आहे
..... रंग चाकरीचा मूल्यात तुल्य आहे.
..... रंग आसवांचा संथ ओघळणारा..
..... रंग गोड चवीचा, जिभेवर विरघळणारा.

रंग वेगळा खेड्याचा
खेड्यातील झाडांचा...
रंग वेगळा शहरांचा
शहरांतील जंगलाचा.
रंग गर्द हिरवा झाडाचा
आणि काळा पांढरा शहरातील जंगलांचा...
आग ओकना-या भट्याचा ...
आणि धूर फेकणा-या चिमण्यांचा.

..... वेगळा रंग डोंगराचा
..... डोंगरातील त्या दर्यांचा
..... वेगळा रंग रस्त्यांचा
..... रस्त्यांशेजारील मोर्यांचा.

जिकडे तिकडे रंगच रंग ...
पहाल तिकडे रंगच रंग ...
मग तुमचा रंग कोणता ?
रंगरंगात मिसळणारा भामटा ..
कि अलिप्तवादी पांढरपेशी ?
सर्वात मिसळून सामाजिक भावनेन वावरणारा
कि, स्वतंत्र अस्तित्वासाठी झटणारा ?
वाटाघाटी करणारा...
कि तत्वासाठी भांडणारा ?
घाबरून मागे सरणारा
कि प्रसंगी टक्कर देणारा ?

....
आज आहे तो उत्सव...
हजारो लाखो रंगांचा
रंगांच्या त्या ढंगाचा ...
चला आता रंग शोधूया
चला आता संग शोधूया
रंगाच्या या उत्सवात
स्वत:चा रंग शोधूया.

- रमेश ठोंबरे

Mar 7, 2012

प्रतिसाद


प्रेम म्हणजे काय हे माहित नसतानाच
त्यानं तिच्यावर प्रेम केलं.
अगदी जीव फेकून
आणि र्हदय विकून

तिनंही प्रतिसाद दिला
उगीच तिरका डोळा केला
तो ही खुश झाला अनं
नकळत जळत गेला,
कारण त्यानं ऐकलं होतं
प्रेम म्हणजे जळत जाण
त्या दिवशीपर्यंत तो खुश होता
तिनं दिलेल्या प्रतिसादावर

पण ... त्याच दिवशी तिनं
आणखी एक प्रतिसाद दिला,
त्याच्याच जिवलग मित्राला.
आणि खरच तो जळत गेला ..
प्रेम नावाच्या नशेपासून
प्रेम नावाच्या चितेपर्यंत !

- रमेश ठोंबरे
http://rameshthombre.blogspot.com/

Mar 5, 2012

मराठी


माझ्या मराठीला नका दावणीला बांधू
जग भ्रमंतीचा तिला घेउद्या आनंदू.

माझ्या मराठीचं नका दु:ख आता सांगू
फुकाचेच लख्तरे नका वेशीला ते टांगू.

ज्ञानियाची भाषा आणि रसाळ हि बोली,
हिच्या अस्तित्वाची उगा मोजतात खोली.

राकट, काटक अन लावण्याची भाषा,
मराठीच आहे माझ्या जगण्याची आशा.

मराठी मराठी भाषा मराठी बोलेन,
भविष्याच्या मुखी शब्द मराठी घालेन.

माझ्या मराठीचा रस चाखतात लोक,
भाषे मंदी भाषा गोड मराठीच एक !

माझ्या मराठीला नाही शब्दाचं बंधन
अलंकार अन वर वृतांच गोंदण !

तरेल मराठी पुन्हा उरेल मराठी,
जगामंदी श्रेष्ठ अशी ठरेल मराठी !


- रमेश ठोंबरे

Feb 24, 2012

~ .............. ~

मराठी कविता समूहाच्या  "अशी जगावी गजल - भाग १४" या सदाबहार उपक्रमातील माझा सहभाग


देवही मज ज्ञात असावा 
ध्यास असा दिन रात असावा 

पडता पडता उठलो आहे 
डोई 'त्याचा' हात असावा   
 
बाळ कुपोषित रडते आहे    
नेता कोणी खात असावा   

आज अचानक भिडले डोळे 
प्रेम नव्हे आघात असावा !

देव बहीरा ऐकत आहे    
मुकाच कोणी गात असावा  

म्हणे रमेशा जरी हरवला  
फक्त तिच्या हृदयात असावा

- रमेश ठोंबरे   

 

Feb 23, 2012

फार फार बरं वाटलं

माझ्या ऑफिसपासून घराच अंतर तसं कमीच आहे गाडीवर वेगात असलं कि जाणवत हि नाही पण कालच पायी जाण्याचा योग आला तेंव्हा रोजचाच रस्ता नवीन वाटलं, अनोळखी दोस्तांच्या ओळखी झाल्या, तेवड्याच वेळात मोबईलवर उतरलेले हे अनुभव !     


फार फार बरं वाटलं

दररोज जातो गाडीवरून
काल असाच चालत गेलो
फार फार बरं वाटलं
चालणं सुद्धा खरं वाटलं.

चालता चालता करणार काय ?
आपलाच रस्ता आपलेच पाय  !
म्हणून जरा निवांत झालो
कमी स्पीडने सावकाश गेलो.
घड्याळाला हरूण आलो,
पण हरणं सुद्धा जाम पटलं ....  
फार फार बरं वाटलं
चालणं सुद्धा खरं वाटलं.

रस्त्यात दिसला तोच खड्डा,
रोज त्याला वळून जातो.
तो सुद्धा आपला वाटला,
आज त्याला भाळून गेलो.
खड्याकडे पाहताना ....
उगाच मन आतून दाटलं        
पण... फार फार बरं वाटलं
चालणं सुद्धा खरं वाटलं.

रस्त्यात एक भेळवाला,
रोज आशेनं पाहत असतो ...
आज त्याला खरं केलं, 
त्याचं देणं त्याला दिलं.
किती किती हलकं झालं
डोक्यावरचं वजन घटलं.
फार फार बरं वाटलं      
चालणं सुद्धा खरं वाटलं.

रस्त्यामधला एक चौक,    
नेहमी गोल फिरत असतो
आज थोडा सुस्त दिसला,
रोजच्यापेक्षा मस्त दिसला
एक हिरवी सुंदर गाडी ...
तिचं बोनट त्याला खेटलं  
फार फार बरं वाटलं      
चालणं सुद्धा खरं वाटलं.

रस्त्यावरचं एक वळण
उगाच वाकड्यात शिरत  होतं
मी आपला सरळच पण ..
मलाही त्यातलाच धरत होतं.
मी तिकडं केलो नाही.
इतकी सुद्धा प्यालो नाही     
जरी होतं मन पेटलं,
फार फार बरं वाटलं
चालणं सुद्धा खरं वाटलं.

चालून पाय थकले नाहीत
रस्ता सुद्धा चुकले नाहीत
सरळ सरळ घरी आले
इतके सुद्धा हुकले नाहीत
स्वतःच स्व:ताशी बोलणं वाटलं
फार फार बरं वाटलं
चालणं कुठ चालणं वाटलं
स्वतःच स्व:ताशी बोलणं वाटलं !

- रमेश ठोंबरे
(ढापलेली गाणी)


  
 

Feb 22, 2012

तेंव्हा मला चीड येते


असत्य सत्यावर विजय मिळवत,
आणि हिंसा अहिंसेच्या मानगुटीवर बसते ... ...
एक एका आदर्शाची पायमल्ली होते ...
तेंव्हा मला चीड येते.
.
.
काळ्या मातीसाठी शेतकरी जीवाचं रान करतो ...
वरुण राजाच्या आगमनाची ....
बळीराजा चातकासारखी वाट पाहतो ....
अन राजा मुरलेल्या राजकारण्यासारखा वागतो ....
बळीराजाशी वरुणराजा राजकारण खेळतो ....
पाणी हवं तेंव्हा तोंड काळ करतो ...
अन नको तेंव्हा भोकाड पसरतो
तेंव्हा मला चीड येते.
.
.
कोणी तरी गाव गुंड ...
सुतकी कापडं घालतो ...
सुतकी चेह्रेयावर कावेबाज हसू पेरतो ...
जनतेचा विश्वास संपादन करून ...
उभ्या आयुश्यावर गोमुत्र शिंपडतो ...
हिरव्या गांधी नोटांची बरसात करतो ...
आणि तुमच्या आमच्या साक्षीने,
पाच वर्षासाठी पुन्हा ... देश विकत घेतो ..
तेंव्हा मला चीड येते.
.
.
हजार वेळा निषेद केला जातो ...
हजारदा वीर-चक्र प्रदान केले जातात ...
हजोरोंचे बळी घेणारे हात ...
कायद्यापासून मोकळे सुटतात ...
साक्ष, खरं, खोटं पुन्हा पुन्हा ...
गाढलेले मढे उकरले जातात ...
ज्यांच्या बळावर खटला ...
वर्ष ... दोन वर्षे ... दहा वर्षे ...
वर्षा मागून वर्षे चालवले जातात ....
जनतेच्या पैश्यावर अतिरेकी पोसले जातात,
आणि पुन्हा त्यांना सोडण्याची वेळ येते ....
तेंव्हा मला चीड येते.
.
.
.
सर्वांगीण विकासासाठी बाप मुलाला शाळेत घालतो ...
स्वतः रोजंदारी करून कुटुंब पोसतो ...
लेकराची शाळा दुरून पाहतो ...
तेंव्हा ... स्वप्नात हरवतो ...
लेक साहेब आणि स्वतः साहेबाचा बाप बनतो ...
लेक शिकला सार्थक झाले असे वाटण्याचे दिवस ...
पण लेकाच्या हातातील पुंगळीची,
शिक्षणाच्या बाजारात विक्री केली जाते ... ?
तेव्हा मला चीड येते.
.
.
समाजात काही तरी ...
समाजविरोधी घडत ...
समाजसुधारक ... जनतेचे कैवारी ...
महिला जाग्रुती ... नारी संगठना ...
कामगार नेते ...
सर्व स्थरातून निषेध नोंदवले जातात ...
वर्तमानपत्रांचे रकानेच्या रकाने भरले जातात ...
चौका-चौकात मोर्चे निघतात,
पुतळे जाळले जातात ...
तेंव्हा मला चीड येते.
.
.
तेंव्हा मला चीड येते.
.
.
आणि
.
.
आणि जेंव्हा जेंव्हा मला चीड येते ..
तेंव्हा मी सत्याग्रह करतो ...
निषेद करतो ...
आवाज उठवतो ...
एक कविता करतो !
वांझोटी कविता .... !

आणि पुन्हा मला चीड येते
माझ्याच वांझोट्या कवितेची
आणि नपुंसक कवित्वाची !
.
.
- रमेश ठोंबरे
Mob. : 9823195889

Feb 21, 2012

इथं असंच होतं


कोणालाच - कोणाची चिंता नसते ...
जो तो आपलीच कातडी वाचवण्याच्या प्रयत्नात असतो.
कधी कंपूशाहीत सामील होण्यासाठी ...
कधी सत्तेत येण्यासाठी ....
तर सत्तेत आल्यानंतर सत्ता टिकवण्यासाठी.

वारे तापते ...
सभांचे, भाषणांचे, आश्वासनांचे,
आरोप-प्रत्यारोप, शिव्याच्या लाखोळ्यांचे
आणि गटारगंगेतील राजकारणाचे  !            

वाभाडे काढले जातात, 
पाय ओढले जातात.
कधी तत्वांचे, कधी आदर्शांचे
कधी देशाचे, तर कधी लोकशाहीचेही.

काही जेलमध्ये जातात,
काही बाहेरसुद्धा येतात.
पुन्हा नवे डाव मांडतात ...
कालचे कावळे,
आज पुन्हा बगळे होतात ....
धुतल्या तांदळासारखे ...
उजळ माथ्याने फिरू लागतात.

तुम्हा-आम्हाला काहीतरी चुकल्यासारखं वाटत,
'पूर्व-पश्चिम' हुकल्यासारखं वाटत.
कधी वाटत ...      
आपणच झोल आहोत
हे सगळं समजून घेण्यासाठी ...
आणि समजलेच तर पचवून घेण्यासाठी,
फोल आहोत !
...
...
...
इथं
जे नको आहे तेच होतं.
घोड्यावर पैसा लावला कि ...
गाढव निवडून येतं.
चुकून घोडं निवडून आलंच ...
तर त्याचं सुद्धा गाढव होतं
इथ असंच होतं

कारण ...
इथं असंच चालतं !
  
- रमेश ठोंबरे

येता जाता

थंडी मजला छळते आहे येता जाता
ऊब एकटी जळते आहे येता जाता

अश्लिलतेचे थेर चालती गल्लो गल्ली
संसदही मग चळते आहे येता जाता

देशी म्हणता इंग्लिश दिसली समोर जेंव्हा
नीयत त्यांची ढळते आहे येता जाता  

देवाला का कधी कुणी हो विसरत असतो 
दुखरे पाऊल वळते आहे येता जात  

हाव तुपाची जेंव्हा जेंव्हा भारी पडते
तेल हि मग ते गळते आहे येता जाता

"गुंड असावे" प्रमाण झाले 'नेत्या'साठी
जनतेला हे कळते आहे येता जाता 

जरी रमेशा खराच आहे गांधीवादी
का रे पित्त खवळते आहे येता जाता


- रमेश ठोंबरे
http://rameshthombre.blogspot.com/