Showing posts with label प्रासंगिक कविता. Show all posts
Showing posts with label प्रासंगिक कविता. Show all posts

Mar 6, 2015

दैनंदिनी (महिला दिन)



एकीवर बलात्कार
एकीचा खून ...
एक फारच अबला
मेली आपणहून ...!

गावातली सरपंच
उंबऱ्याच्या आत ...,
कारभार पाहतात,
पदाचे नाथ ... !

काळाची गरज,
महिला आरक्षण
आरक्षित शीटाचे
जन्मापासून भक्षण !

सासरचा जाच
कोरडी विहीर
महिला दिनी
सफल वीर ...!

वर्तमान पत्रातले
आजचे वर्तमान
दैनंदिनीत
तेवढेच ज्ञान !

- रमेश ठोंबरे
08/03/2010

वरील ओळीत कुठेच काव्य नाही असा आरोप होऊ शकतो ...!
कुणाला अढळल्यास निव्वळ योगायोग समजावा.
...... कारण वरील ओळी देशाच्या  दैनंदिनीतून साभार घेतल्या आहेत.
(सोमवार, दी. ०८/०३/२०१०)

May 25, 2012

विवाहितेची आत्महत्या


काल एक बातमी कानावर आली ...
विवाहितेने आत्महत्या केली... !
मनात विचारचक्र सुरु झाले
का ? कसे ? असे का केले.

तर्क वितर्कांचे ... थैमान सुरु झाले

नवर्याचा जाच असावा,
सासर्याचा त्रास असावा.
सासू खूप बोलत असेल,
नणंद मनात सलत असेल.

जगण्याला कंटाळली ...
कि आणखी कुणाला भाळली असेल
कोणी तरी नडले असेल
म्हणून अघटीत घडले असेल.

जगणं सध्या महाग आहे,
महागाईन घेरलं असेल.
डोक्यावर मोठा डोंगर असेल,
म्हणून सावकारीन मारलं असेल.

दुनियेलाही तो भीत नसावा,
नवरा दारू पीत असावा.
हे हि दु:ख दाटलं असेल
म्हणून 'औषध' घेतलं असेल. 

शेवटी काय ... !
जगणं तिला झेपलं नसेल
काळीज तिचं इतकं छोटं
कि दु:ख त्यात लपलं नसेल.

तर्क वितर्क हजार झाले ..
मनालाही पटून गेले.
यात तिचं चुकल काय ?
कित्तेक जीव असेल गेले.

सगळीकडचा आक्रोश
तिची कहाणी सांगत होता
माझ्या मनातला हरेक तर्क
मनात पुन्हा रांगत होता.

तेवड्यात एक टाहो आला
भुकेल्या पोटाचा .....,
दुधाच्या ओठाचा ....!

आता सगळे तर्क मातीत गेले
रांगते विचार जागीच मेले,
ती विवाहिता,
विवाहीताच राहिली असेल...
तिला शेवटपर्यंत
आईपण कळलं नसेल ! 

- रमेश ठोंबरे    

Mar 11, 2012

पाडगावकर तुम्ही चुकलातच

पुरस्कार काय तुम्हाला नवे आहेत पाडगावकर ...?
मग चालुद्याना जे चालू आहे ते,
पण गप्प बसणार ते पाडगावकर कसले...!
तुम्ही नको नको म्हणताना आम्ही तुम्हाला
साहित्य संमेलनाचे अध्यक्ष पदे देतो ...!
कधी कधी वाटलाच तर ...
मराठी साहित्यासाठी सल्ला हि घेतो !
मग तरी हि तुम्ही नाराज ...
पाडगावकर हे बरं नाही... !
तुम्ही म्हणालात आणखी लायक लोक बाकी आहेत...
तेंव्हा आम्हाला तर तुम्हीच दिसलात ...
तुम्ही इतरांबद्धलच बोलला आसाल
पण स्वताच्या लायकि वर हि हसलात.

आमचं कसंय पाडगावकर ...
आम्ही आमच्या फायद्याचं तेवढं उचलतो,
तुमचा स्वभाव तसा नाही ....,
तुम्ही इतरांचीच जास्त काळजी करता ....!
मागे म्हणाला होता ..."मला कुन्ही तरी बंदूक द्या !"
आणि काय रान उठलं माहित आहे ना ...!
आहो मराठी साहित्याचा गाडा चालवतो ना आम्ही...
मग हि काळजी करावीच लागते ...
तुमचे शब्दच असे धारदार ...
मग तुम्हाला बंदूक कशी देणार ?
तसंच आहे हे ...!
बोलगाणी लिहिणारे पाडगावकर
बंदूक मागतात तेव्हा चिंता वाटणारच आम्हाला.
आणि नको नको म्हणणारे पाडगावकर
पुरस्कार मागतात तेव्हा हि चिंता होणारच आम्हाला.
... तुमची नाही हो पाडगावकर ...!
मराठी साहित्याची चिंता ...
मराठी साहित्याचा गाडा चालवतो ना आम्ही...!
त्या चिंतेत आम्ही आता तुमचा राजीनामा मागणार ...
उद्याच्या संमेलनाच्या अध्यक्ष पदाचा हो ...!
ते यादव आठवतात का ...?
तसं होतं बघा काही तरी ...!
तेंव्हाच आमची चिंता मिटते ... आणि
आणि मराठी साहित्याचा गाडा चालू लागतो.
पाडगावकर हे असंच चालणार ..
तुमच्या मनातला जिप्सी जागा होणार ...
तो तुम्हाला काही तरी सांगणार ...
तुम्हाला राहवलं नाही जाणार ...!
तुम्ही काही तरी बोलणार ...."...."
वर तुम्ही म्हणणार अर्थाचा अनर्थ होतोय ...

पण तुमच्याच म्हणण्याचा अर्थ काढणारे तुम्ही कोण ?
तुम्हीच म्हणता ना कवीने कविता लिहावी आणि
वाचकांवर सोडून द्यावी ... ज्याचे त्याने त्याचा अर्थ काढावा ...
तसं ...
अर्थ तर आम्हीच काढणार ना ... !
ते म्हणाले तुम्ही खंत व्यक्त केली ती मराठी साहित्यीकांसाठी ...
आणि त्याने म्हणे पुरस्काराचीच प्रतिष्ठा वाढायला हवी ..!
खरं हि असेल त्यांचं ...
पण मला सांगा पाडगावकर ...
याने कुठे मराठी साहित्याचा गाडा चालतो का ...?
म्हणून म्हणतो .....
पाडगावकर तुम्ही चुकलातच ...!
आमचं कसंय माहिताय का ....
मराठी साहित्याचा गाडा चालवतो ना आम्ही...!

- रमेश ठोंबरे



Nov 20, 2011

ती नसताना पाऊस येतो ?


तिचा आठव त्याला अनावर होतो.
तिचा आठवात ...
तो उभ्या उभ्या न्हातो.
तिची सय त्याला झुरायला लावते.
ओलं ओलं होऊन ...
तिच्यावर मरायला लावते.

तिचे काळे केस ...
त्याला वेड लावतात.
त्याच काळ्याभोर केसांच्या
छायेत मग आठवांचे ...
ढग जमू लागतात..
तिचे पाणीदार टपोर डोळे
त्याला त्याच्या थेम्बासारखे वाटतात ...
त्यांचं प्रदर्शन करण्यासाठी ...
तो आतुर होतो.

तिची मेघ श्यामल काया ...
कधी तरी पहिली त्यानं
अन ... तो थांबायचच विसरून गेला.
तीच त्याला पुन्हा पुन्हा
खुणाउ लागते ...

आज पुन्हा तीच आठवण गडद होते...
त्याचं मन तुडुंब भरून येतं
तो तिच्या आठवात रानभरी ...
होऊन कोसळत जातो ....
..
....
......

कोण म्हणत .....
ती नसताना पाऊस येतो ?

- रमेश ठोंबरे

Nov 10, 2011

सोडून द्या त्या कसाबला

सोडून द्या त्या कसाबला
तो अजून अंजान, निरागस आहे.
अजाणतेपणी गोळ्या सुटल्या त्याच्या पिस्तुलातून,
हा काय त्याचा अपराध आहे ?
समोर आलात तुम्हीच निधड्या छ्यातीने
आणि शिकार झालात त्या..
निष्पाप बंदुकीच्या गोळ्यांचे.
आज त्याच निरागस हास्य,
तुम्हाला छद्मी वाटत.
अन त्याचे ते अश्रू म्हणजे
पश्याताप वाटतो तुम्हाला ?
...
पश्याताप कशाचा करायचा त्यानं ?
गोळ्यांसमोर आलेल्या अन शहीद झालेल्या सैनिकांचा...
की त्याला शिकवल्या गेलेल्या जिहादचा ?

आत्ताच तर कुठे तो अक्षर गिरवतोय ... त्याच्या धर्माचं.
दहशतवाद त्याचा धर्म आहे,
तो त्याचा धर्म पळतोय.
तुम्ही तुमचा धर्म पाळा.
...............विसरलात काय .....?
खुर्ची तुमचं मर्म अन
राजकारण तुमचा धर्म आहे.
...
जनतेचा विचार कसला करताय ?
जनतेला तर विस्मृतीचा शाप आहे.
अन इतिहास जमा गोष्टींवर
बोलणं सुद्धा इथ पाप आहे !
म्हणून तर ...
उद्या, २६ /११ म्हणजे फक्त एक तारिक असेल,
अन कसाब तर कुणाच्या ध्यानात हि नसेल.
...
सोडून द्या त्या कसाबला,
तुमच्या साठी ते नवीन नाही.
सोडा जरूर सोडा ...
पण सोडताना जनतेला तुमच्यात धरू नका
अन तुमच्या पळपुटेपणासाठी
गांधीवादाला बदनाम करू नका !


- रमेश ठोंबरे (Ramesh Thombre)
दि. २२ जून २००९

Sep 14, 2011

नाम उनका 'पाक' है !














हरलेला कुत्रा आता,
गल्लीत जाऊन भुंकतो आहे.
खालमानेने गेला आता,
वर तोंडाने थुंकतो आहे.

कधी गोड कधी कडू,
गरळ अशी ओकशील किती ?
हा असा, तो तसा,
धूळ उगा फेकशील किती ?

तुमच्यासारखे नाहीच आम्ही ...
हे अगदी खरं आहे.
तुमच्या आमच्यात फरक राहो
हेच शेवटी बरं आहे.

तुमची बरोबरी हवी कशाला,
आम्ही खूप पुढे आहोत.
पाठीमागून वार कश्याला
छाती काढून खडे आहोत !

नळीत घाला, नळी वाकेल
जग हे पाहणार आहे !
'ना-पाक' इरादेवाल्या तुझे
शेपूट वाकडेच राहणार आहे !

अल्लाह अब तू बता ..
कैसा तेरा इन्साफ है ...?
ना-पाक इरादे है जिनके
नाम उनका 'पाक' है !



- रमेश ठोंबरे
दि. ०४ / ०४ / २०११

Aug 28, 2011

|| ज्वारीची करू दारू ||


धान्यापासून मद्य निर्मितेचे परवाने ...
मग काय .... ?

....................................................

शेत शेत हे पिकवू
ज्वारीची करू दारू
द्राक्षालाही मागे सारू
हिमतीने || १ ||

सरकार माय बाप
त्याने दिले वरदान
आता द्यावे अवधान
दारू वरी || २ ||

उगी नको व्यर्थ शंका
अन काळजी खाण्याची
सोय सकळा पिण्याची
होणार हो || ३ ||

दिन-रात दारू गाळू
हेची लागू द्यावे वेडू
अवघे झिंगून सोडू
सर्व जन || ४ ||

भाव नाही ना धन्याला
उपाय काढला नामी
आला पुन्हा तोच कामी
सोमरस || ५ ||

हवे कशाला बंधनं
नको आता परवाने
सारे करा नित्य नेमे
बेधडक || ६ ||

अवघे राष्ट्र बदलू
बदलू हा शेतकरी
नादी लाऊ कष्टकरी
उगे उगे || ७ ||

सरकारी निर्णय हा
सुपीक मतीचा योग्य
फळफळूद्या भाग्य
दारुड्याचे || ८ ||

दया मरण नाही दिले
मृत्युचा हा मार्ग दिला
आत्महत्या करू चला
सवे सवे || ९ ||

बये मंदिरे सांभाळ
शरण तुज आलो मी
दे सुख शांतीची हमी
घरो घरी || १० ||

रमेश ठोंबरे
(Ramesh Thombre)

Jul 14, 2011

निषेध


निषेध


आम्हाला वेळोवेळी डीवचल जातय
कधी आमच्या भागात केली जाते घूसखोरी
तर कधी पळवल जात आमच विमान.
कधी उडवल्या जातात आमच्या सैनिकांच्या छावण्या
तर कधी केला जातो बुद्ध मुर्तिंचा अवमान.
पण आम्ही शांत आहोत.
आमचा देश शांत आहे !

तलवारीनं केलं केल जातय शिरकाण
अन तोफानी घेतले जातात हजारो निरापराध्यांचे प्राण .
मारतानाही केला जातो अमानुष विचार
अन हिंसेलाही लाजवतील असे भयानक अत्त्याचार.
तरीही आम्ही शांत आहोत...
आमचा देश शांत आहे !
आमचा देश अहिंसक आहे !

पाकिस्तान कुरापती काढतो आहे
चीन ही कधी कधी लढतो आहे ..
आणि आता तर ..
ज्यांचे नावही नकाश्यावर लवकर सापडणार नाही ..
असे ही करत आहेत उघड - उघड हल्ले.
आम्ही त्याना उत्तर देतो..
पाठवतो एखाद प्रेमपत्र.
आमचा प्रेमाचा संदेश
आमच्या देशाचा प्रेमाचा संदेश  !

एवढ सगळ झाल्यावर
आम्ही धरतो आग्रह सत्याचा,
आम्हालाच गिळंकृत करू पाहना-या..
महासत्ताक दलालांकडे ..
त्यांच्या समोर मांडतो सगळ सत्य...
अन करतो सत्याग्रह.

डीवचतानाही शांत राहतो.
हिंसेत ही अहिंसा पाळतो.
द्वेष करणाऱ्यांना प्रेम-पत्र देतो
आणि नेहमी सत्याचा आग्रह धरतो.
अन झाल्या प्रकाराबद्दल खुपच संताप आला तर ...
पत्रकार परिषद् बोलावून
भिंतीवर निरागस हास्य करत लटकणाऱ्या
महात्म्याच्या साक्षीने
व्यक्त करतो तीव्र निषेध !

- रमेश ठोंबरे 

शोकांतिका


आपण वर्तमानात जगतो,
भूतकाळ फार लवकर विसरतो
कारण, रोजच नवीन विचार... रोजच नवीन वाद आहे !
कधी मुंबई, कधी दिल्ली तर कधी हैदराबाद आहे !

रोज नवा दहाशतवाद, रोज नवीन बळी आहेत
पुन्हा तीच गोळी अन मानवतेची होळी आहे !
शहिदांच्या पार्थिवावर वीरचक्र अर्पण केले जातात,
त्यांच्या विधवांना आश्वासने दिली जातात,
मिडिया समोर ढोल बडवले जातात,
अन वर्तमानपत्रांचे रकाने भरले जातात ...

कोण अफजल गुरु, कोण अजमल कसाब....?
कोण होते दहाशतवादी कोणाला विचारणार जाब !

कोण हेमंत करकरे, अन कोण विजय साळसकर ?
कितीदिवस आठवतील ह्या शहिदांची नावं..
अन आठवली तरी, बनून राहतील फक्त नावच...
२६/११ च्या आतंकवादी हल्ल्यातील !

दर वर्षी दर दिवस घेतल्या जातील शोकसभा,
जळणाऱ्या मेनबत्त्यानाच फक्त अश्रू ढाळण्याची मुभा ?

काल झालेली हि एकांकिका नव्हती !
तीन-चार दिवस चाललेली Live commentary तर नव्हतीच नव्हती !
हि होती शोकांतिका लोकशाहीची, देश्याच्या राजकारणाची !

आपण या शोकांतिकेचे नेहमीच प्रेक्षक ठरणार आहात ..!
सांगा, हि थांबवण्यासाठी आपण काय करणार आहात ?

- रमेश ठोंबरे

Jun 2, 2009

दिवस तो उजाड़ता (३० सप्टेम्बर १९९३)

दिवस तो उजाड़ता रात्र का हो झाली,
मूल, बाळ संसारही रस्त्यावर आली.
रात्र सारी आश्रुनी न्हाहुनी हो गेली,
म्हणे एक कवी, 'उष:काल होता होता काळरात्र झाली'
हादरली जमीन सर्व हालले सामान,
मृत्यु नेही तेथे तेंव्हा घातले थैमान.
कोसळले घर म्हणे झाला हो भूकंप,
जीवनाचा कित्तेकांच्या तेथे झाला की हो संप.
नाही ऐकू आली राम-प्रहरी भूपाळी,
भूकंप म्हणोनी कोणी ठोकली आरोळी.
मातेनच दिली लेकराना ललकारी,
उध्वस्त झाली तेंव्हा तेथे ती किल्लारी.
तिस सप्टेम्बर काळा दिवस ठरला,
नाही म्हणता-म्हणता सर्व महाराष्ट्र हालला.
रुद्रावतार असा कसा धरणी मातेचा ?
जीव घेतला त्यान हजारो लेकरांचा.
भूकंप - भूकंप म्हणता कोसळले घर,
रडा-रडीतच झाला सकाळचा प्रहर.

- रमेश ठोम्बरे Ramesh Thombre
दि. २/१०/१९९३
(कवितेला लातूर जिल्ह्यातील किल्लारी येथे झालेल्या भूकंपाची पार्श्वभूमी आहे.
तेंव्हा मी ११ वीत धारुर जिल्ला बीड येथे शिकत होतो )