Jun 26, 2011

नव यौवना मी गौरांगना


नव यौवना मी गौरांगना
मस्त मी मस्तीत माझ्या
धुंद मी धुंदीत माझ्या
जिंकीन मी ... स्वप्नेच माझी
हीच माझी कामना .....
............................ नव यौवना मी गौरांगना.

विश्व नाही पहिले मी ...
पाहिला न इतिहास माझा.
जगण्यास नव्या तय्यार आहे
स्वच्छंद आहे ध्यास माझा.
भाव माझा दाटला अन
पेटल्या या भावना .....
............................ नव यौवना मी गौरांगना.

स्वप्नं माझे वाट पाहे
वाट हि गंधाळलेली ...
भूलेस नाही भूलले मी
आर्जवे हि टाळलेली ...
स्वागताला कोण आहे ...?
अन मीच माझी प्रेरणा.
............................ नव यौवना मी गौरांगना.

चित्र नभी रेखिले मी
कल्पनेच्या कुंचल्याने
सूर्य आहे थांबलेला
या हातांनी झाकल्याने
दे भरारी, दे उभारी
हीच माझी प्रार्थना
............................ नव यौवना मी गौरांगना.

- रमेश ठोंबरे

|| सापडेना पंढरपूर ||


काय सांगू देवा तुला, पालटले रंग रे
सापडेना पंढरपूर अन पांडूरंग रे || धृ ||

तिथे एकली मी होती रम्य पहाटे भूपाळी
इथे भोंगा गिरणीचा सांगे सकाळची पाळी
सुई वरी घड्याळाच्या, जगण्याचा ढंग रे || १ ||

तिथे टाळ-चिपळी बोले, मृदंगाचे बोल रे
इथे ढोल ताशे झडती, भक्ती भाव फोल रे
विरला अबीर बुक्का, अन बदलले रंग रे || २ ||

तिथे नाही उणे दुने चाले पायरीची पुजा,
इथे मांडला बाजार, कळसाला नाही जागा
जिथे तिथे चाललेला, असंगाचा संग रे || ३ ||

तिथे नांदे चंद्रभागा, इथे वाहे मी अभागा
तिथे नाळ जुळलेली, इथे सापडेना धागा
काय करू देवा आता, सुचेना अभंग रे || ४ ||

- रमेश ठोंबरे

ये सोना .... सोना ... माझी मोना


ये सोना .... सोना ... माझी मोना
चल येतेस का, जायंगे फिरायला,
दिल Garden Garden करायला.


लाजून भल्ती, मारू नको कल्टी
पलटके देख जरा,
तुझा दिवाना... आशिक पुराना
प्यारसे दिल ये भरा.
नको म्हणूस आता ग Sorry
तुझी तऱ्हा हि अशीच न्यारी.
लागे डेटिंग ठरायला....
दिल Garden Garden करायला.


तुझी माझी दोस्ती, करू थोडी मस्ती,
आयेगा मजा बडा.
Period ला चाटा, Lecture को टाटा,
जियेंगे different थोडा.
का ग कशाला लावतेस नाट,
किती किती मी करावा wait
तुला नजरेत भरायला ....
दिल Garden Garden करायला.


माझी उडाली झोप, चढलाय ताप
कैसा ये बोलू तुझे ?
तुझ्या रुपाची जादू, मी झालो साधू
अपना बनाले मुझे.
कसे कसे ग टाकतेस फास
किती किती हा दिलाला ताप
चल प्रेमात झुरायला ....
दिल Garden Garden करायला.


रुपाची राणी, तू ग दिवाणी ....
बाहोमे आज जरा ?
लाजून चूर तू, जाऊ नको दूर तू
हाल ये दिलका बुरा ?
कसा लागला तुझा हा छंद,
आता दोघंच होऊ या धुंद
चल जोडीनं मिरवायला
दिल Garden Garden करायला.


- रमेश ठोंबरे

पाऊस आणि तुफान


तोच थेंब, तीच सर
अजून सुद्धा आठवत असते.
आठवणींची गर्दी होता,
वीण नव्याने उसवत असते.

तोच थेंब आठवत असतो
अधरांवरती अडलेला
तोच क्षण साठवत असतो
अधरांचा संगम घडलेला.

तीच सर आठवत बसतो
चेहर्यावरती झरलेली.
हृदयी चित्र जपण्यासाठी
बस... एक आठवण पुरलेली.

तोच पाऊस आठवत असतो
तुझ्या सोबत भिजलेला.
उब मिळता दोन मनांची
ओल्या मिठीत रुजलेला.

अन ते तुफान ... विसरत नाही
शीड फाडून घुसलेलं.
भरकटलेली नाव पाहून ..
विचकट विचकट हसलेलं.

तोच थेंब, त्याच सरी
सरींसोबत विरल्या आहेत.
पाऊस सरला, तुफान सरले
आठवणी तेवढ्या उरल्या आहेत.


- रमेश ठोंबरे

Jun 14, 2011

~ शराबी शराबी ~

असा धुंद वारा, शराबी शराबी.
तुझा स्पर्श न्यारा, शराबी शराबी.

कशाला भुलावे, उगी त्या नशेला
तुझा ओठ प्यारा, शराबी शराबी.

जगावे कळेना, मरावे कळेना
तुझा दोष सारा, शराबी शराबी

उद्याला करावा, तुझा त्याग थोडा
असे फक्त नारा, शराबी शराबी

तुझे शब्द राणी, कसे सावरावे
सुरांचा पसारा, शराबी शराबी.

नको पावसाळा, नको चिंब होणे
नशेच्याच धारा, शराबी शराबी.

मनाची कवाडे, मनाच्याच भिंती
मनाचा पिसारा, शराबी शराबी

कसा रे रमेशा, कुणी घात केला
नशेने बिचारा, शराबी शराबी.

- रमेश ठोंबरे

Jun 13, 2011

- ती भेट तुझी - माझी -

ती भेट तुझी - माझी होणार आज आहे,
ते रूप तुझे राणी छळणार आज आहे. ..... || धृ ||

बोल तुझे माझ्या कानात साठलेले,
ते शब्द शब्द सारे ... माझेच वाटलेले.
ते स्वप्न पाहिलेले.... ते चित्र रेखीलेले.
ते चित्र पुन्हा नयनी भरणार आज आहे.
ती भेट तुझी - माझी ................................ १

तू चतुर शालिनी ग, किती गोड बोलली ग
तू भेट सांग तेंव्हा का सहज टाळली ग ?
हे गाव तुझे राणी मज फार दूर वाटे ...
बस स्वर्ग दोन बोटे उरणार आज आहे.
ती भेट तुझी - माझी ................................ २

मी शहर सोडिले अन गावात आज आलो,
गाण्यास प्रीत गाणे, कोकीळ आज झालो.
तू सूर छेड राणी... झालो अधीर आता,
हे गीत साक्ष पहिली, ठरणार आज आहे
ती भेट तुझी - माझी ................................ ३

तव रूप ते नशिले, पाहील आज जवळी,
अन दृष्ट त्या छबीची काढील त्याच वेळी.
रोखिले किती मी मजला, तव चित्र पाहताना
मी एक गोड गलती करणार आज आहे
ती भेट तुझी - माझी ................................ ४

- रमेश ठोंबरे

~ असे घाव देसी जिव्हारी कशाला ? ~


असे घाव देसी, जिव्हारी कशाला ?
म्हणे 'प्रेम केले, उधारी कशाला' ?


तुझा घोष झाला, उभा श्वास माझा
उगा ढोल, ताशे, तुतारी कशाला ?


पुरे नेत्र राणी, असे जीव घ्याया
तिथे कुंतलांची, दुधारी कशाला ?


जिथे दूध सौख्ये, मिळे मांजराशी
तिथे कावळ्याची, हुशारी कशाला ?


दुवा दे, सजा दे, मला काय त्याचे
मुक्या सावजाला, शिकारी कशाला ?


तुझे प्रेम माझा, फुका जीव घेते,
पुन्हा सांग घेऊ, भरारी कशाला ?


नको रे मना तू, तिचा ध्यास घेऊ,
जिथे देव नाही, पुजारी कशाला ?


रमेशा असा तू, कसा व्यर्थ गेला,
म्हणे प्रेम केले, बिमारी कशाला ?


- रमेश ठोंबरे

महाराष्ट्र बाणा


शिवरायाची आन जागवी, सवे स्वाभिमाना
मराठी (कोरस)
महाराष्ट्र बाणा, अमुचा महाराष्ट्र बाणा !

माय मराठी बोली आमुची
आर्त आर्त अन खोली आमुची
सह्याद्रीचा कडा बोलतो
इतिहासाचा धडा बोलतो
मर्द मराठी मना मनातून महाराष्ट्र जाणा
मराठी (कोरस)
महाराष्ट्र बाणा, अमुचा महाराष्ट्र बाणा !

ज्ञानेश्याची ओवी मराठी
तुकयाचा अभंग मराठी
मराठमोळ्या कलेस अर्पण
लावणीचे लावण्य मराठी
राष्ट्रासाठी प्राण पणाला, लावी शूर सेना
मराठी (कोरस)
महाराष्ट्र बाणा, अमुचा महाराष्ट्र बाणा !

महाराष्ट्र हे महान आहे
अन शौर्याचे निशाण आहे
इथेचे घडले मर्द मराठे
अगाध रत्नांची खाण आहे
टिळा ललाटी याच भूमीचा धन्य धन्य माना !
मराठी (कोरस)
महाराष्ट्र बाणा, अमुचा महाराष्ट्र बाणा !

गर्व आम्हाला इथे जन्मलो
धन्य म्हणू जर इथेच मेलो.
बोली अमुची माय मराठी,
अन राष्ट्राला पिता म्हणालो.
नडेल कोणी आम्हास जर का, मुकेल मग प्राणा
मराठी (कोरस)
महाराष्ट्र बाणा, अमुचा महाराष्ट्र बाणा !

- रमेश ठोंबरे

Jun 9, 2011

~ कशाला ? ~


असे पावसाने, छळावे कशाला ?
तिला गाठण्या, कोसळावे कशाला ?


जिला पाहुनी, इंद्र बेहोष होतो
तिच्या आशिकाने, जळावे कशाला ?


म्हणे मीच बाबा, म्हणे मीच योगी
प्रसिद्धीस त्याने, चळावे कशाला ?


कळेना जिथे रे, 'असे काय गांधी ?'
हजेरीस त्याच्या, पळावे कशाला ?


उभा जन्म गेला 'नशेच्या' विना रे
उगा शेवटी हळहळावे कशाला ?


नको रे रमेशा, असा जीव लाऊ
जगावे सुखी, तळमळावे कशाला ?

- रमेश ठोंबरे

Jun 4, 2011

Lovers Corner


रात्री खुणेची डोअरबेल वाजली
म्हणून अधीर होऊन दरवाजा उघडला...
....मागे पुढे पाहत ओशाळलेली ती दारात उभी होती.
....नखशिकांत ओलावलेली ... मनातून गोंधळलेली ....
गारठलेला चेहरा ... भिजलेले केस ...
अस्ताव्यस्त ओढणी ... चुरगळलेला ड्रेस ..
गालावरची लाली ... ओघळणारा शृंगार ...
विरगळलेली लिपस्टीक ... अन थरथरणार्या ओठांवर दातांचा भार.
डोळ्यांच्या पप्न्यावरून टपकणारं पाणी ...
केसांच्या जाळीतून चमकणारा मुखचंद्र ...!
पाहून मी हैराण ....
आज हिला आठवण आली तर ...!
..
...
....
तिला दारातच थांबउन मी तिचं सौंदर्य निरखत होतो ...
हि खरच किती सुंदर दिसते ... या अश्या हि अवतारात ....
किती हि ओढ ... किती हि शालीनता ..
किती हा निरागस चेहरा ...!
..
...
त्या थंड वातावरणात हि तिचे उष्ण श्वाश
माझ्या श्वासाना भिडले ....
आणि मी शुद्धीवर येऊन विचारले ...
काय गं हे ? काय हा अवतार ... ?
कुठे निघाली होतीस ?
...
...
तर पुन्हा खाली मान घालून ती म्हणाली....
"काही नाही रे आज तुझी आठवण आली म्हणून ...
निघाले होते तुझ्याकडेच .... तर ...वाटेतच ...
'Lovers Corner' वर पावसानं गाठलं ! "

- रमेश ठोंबरे

'तो' ती आणि मी


आज मस्त कोवळं उन पडला होतं,
गच्चीवर ती तिचे ओले केस सुकवत होती.
खिडकीच्या बारीक फटीतून मी निरागस कोण साधला होता ....
भिजलेले केस ... भिजलेला चेहरा .....
केस सुकवण्यासाठी तिचा चाललेला आटापिटा,
मी दुरूनच पाहत होतो.

माझ्याकडं तिचं अजिबात लक्ष नव्हतं ...
कधीच नसतं ...
...
असं ती दाखवत असते.
पण आज खरच नसावं ...!
कारण .... ती खरच ओले केस सुकवत होती.
...
....
मी थोडीशी खिडकी उघडली ....
बारीकसा आवाज केला ...
तेवढ्यात ....
ढगांचा गडगडाट ... , विजांचा कडकडात .....
आणि ....
पुन्हा त्याचं थैमान .... !
सगळं काही विसरून ...
आज तर गच्चीवरच गाठलं.
...
....
अगदी काही क्षणा पूर्वी तो कुठेच दूरपर्यंत दिसत नव्हता.
आणि ती हि ओले केस सुकवत होती....!
आता त्याचं आगमन झालं ....
आणि आता ती ...
सुकलेले केस भिजवत होती.

- रमेश ठोंबरे

सुपारी दिलीय 'साल्याची' ....


वाट अडउन बसतो ...
तिच्या छत्रीत घुसतो.
माझ्या कडे मात्र ...
विचकट विचकट हसतो.

रोज रस्त्यात गाठतो ...
तिला योग-योग वाटतो,
माझा मात्र पाहताच ...
खरोखर जीव फाटतो.

लटकना सारखा लोम्बतो
अंगा-अंगाला झोंबतो
मी दूर दिसलो कि ...
तिच्या आडोश्याला थांबतो.

याच्या डोक्यात नेहमीच मला
चिडवण्याची खाज आहे .
रस्त्यात तिला चिकटतो ..
याला कसली लाज आहे !

तो तसा साव आहे ..
हा त्याचाच डाव आहे.
माझ्या पेक्षा हि वाढलेला
सध्या त्याचा भाव आहे.

तेंव्हा, तो मला टाळायचा
आता तीच मला टाळते ...,
कळत नाही कशी याच्या
ओलाव्याला भाळते.

आता सहन होत नाही ..
ती प्रीत गाणं गात नाही
मी साद घालतो तेंव्हा ..
कधीच 'ओ' देत नाही.

सगळा त्याचा खेळ आहे...
ढगाळलेला काळ आहे,
सुपारी दिलीय 'साल्याची' ....
आता माझी वेळ आहे,

- रमेश ठोंबरे

त्याच्या शिवाय भेटशील काय ?


प्रिये, रागावलीस न ?
मला माहीतच होतं मी पावसावर रागावलो कि ..
तू माझ्यावर रागावणार ...

तुला आठवतंय ...
किती तिटकारा होता तुला पावसाचा ...
तू कॉलेजला निघालीस कि तो यायचा ...
तू केलेला तो शृंगार ... अगदी गार व्ह्यायचा.
.
.
तू तपायचीस ...
पावसाचा तोंड भरून उद्धार करायचीस.
पण मला त्याचा हेवा वाटायचा...,
काहीहि न बोलता तो डाव साधायचा.

मला नाही जमलं कधीच,
सारं काही विसरून जगणं
मनात असून हि तुझ्यासोबत ...
पावसासारखा वागणं.

त्याचाच फायदा घेतो तो ...
तुला रस्त्यात गाटताना.
त्याला कसली आलीय लाज ...
चिंब होऊन भेटताना ...!

पण तू मात्र विसरतेस ....
त्याच्या सोबत भिजण्याच्या मर्यादा.
.
.
म्हणून येतो राग ...कधी कधी ...
पाऊस बरसात असताना ..!
खरंच मी कोरडाच असतो ..
तू सोबत नसताना.

त्याला एकदा चुकाऊन ...
पुन्हा कॉलेज गाठशील काय ?
सोड आता त्याचा नाद ....
त्याच्या शिवाय भेटशील काय ?

- रमेश ठोंबरे

पाउस

.................

काल वारा जोरात होता ...
तिच्या हातातील छत्री ...
अलगत उडून गेली
आन त्यानं पुन्हा डाव साधला.

पाऊस ...
तिच्या पेक्षा मलाच जास्त छळतो,
मी एका स्पर्शासाठी आसुसलेला
अन वरतून हा अंग अंग जाळतो.

पाऊस ...
जणू आंधळाच बनून ...
तिचा हात धरून ...
तिच्या मागं मागं चालतो.

ती त्याला बाहेर सोडून आत जाते.
आरश्या समोर उभी राहून ...
स्वता:लाच न्ह्याळत असते....,
आता तिलाच तिच्या सौंदर्याची जाणीव होते ...
पुन्हा एकदा पावसाकडे नजर टाकत ..
ओले वस्त्र बदलू लागते... !

अन..
अंधळा झालेला पाऊस ....
आणखीच जोमानं कोसळू लागतो.

पाऊस ...
तसे सर्वच संकेत पाळतो ....,
कदाचित म्हणूनच मला टाळतो.

- रमेश ठोंबरे

पाऊस, कालपासून भलताच पेटलाय !


पाऊस ...
ये म्हटल्याने येत नाही ...
जा म्हटल्याने जात नाही ...

पाऊस ...
माझ्याशी असाच तुसड्या सारखा वागतो
मी रेनकोट घरी ठेवला कि
हात धुउन मागे लागतो.

पाऊस ...
मी हजारदा बजावलं तरी
मी नसताना तिला एकटी गाटतो ...
तिच्या छत्रीतून लगट करतो.
काल असाच त्यानं मुक्काम थाटला ...
धूसमुसळेपणान तिला खेटला.

वाटलं आता हिचा तोल जाणार ....
हि गरम होणार ...
हिला ताप येणार.

पण झालं भलतंच ...!
पाऊस ...
जेंव्हा तिच्या उष्ण श्वासाना भेटलाय.
पाऊस, कालपासून भलताच पेटलाय !

मी, दोष कुणाला देणार ...?
चूक माझीहि नसते ... तशीच त्याची हि नाही ... !
आणि ती तर नेहमीप्रमाणे नामानिराळी.

- रमेश ठोंबरे