Jan 30, 2015

सगळे सगळे बोलतात ….

सगळे सगळे बोलतात ….
सालं ऐकत कोणीच नाही !

जन्माला येताच रडायला लागतं बाळ !
भूक लागल्या ओठांना विद्रोह शिकवावा लागत नाही,
सगळे सगळे बोलतात  ….
सालं ऐकत कोणीच नाही !

तोंडपट्टा सुरु असतो ज्याचा त्याचा येथे
कोणी उपदेश, कोणी संदेश, कोणी प्रबोधन करत असतो
कोणी इतका हावरट, कोणी इतका चिवट,
राशनच्या रांगेसमोर भाषण मारत असतो !
बोलणाराच खरच का, बोलल्या शिवाय भागत नाही ?
सगळे सगळे बोलतात  ….
सालं ऐकत कोणीच नाही !

'मेरी सुनो' म्हणत कोणी आत्मप्रोढी झाडतो,
'अंतिम सत्य' म्हणत कोणी तत्वज्ञान झोडतो.
स्वभावाचा विनयभंग अन कानावरती बलात्कार,
ऐकणार्याच्या सहनशीलतेचे सगळे रेकॉर्ड मोडतो !
शेवटी गणित शुन्य अन बोलण्याचाही थांग लागत नाही !
सगळे सगळे बोलतात  ….
सालं ऐकत कोणीच नाही !

याची मागणी, त्याचं धोरण, आंदोलनांचा रेटा
जाळ -पोळ,  रास्ता रोको, उपोषणाचा गोल गोटा
'ऐक ऐक' म्हणून हि जर ऐकलं नाही कोणी ….
ऐकत नाही त्याच्या खिशात, मग हजार गांधी नोटा
'तोंडावरती बोट' असं कोणीच वागत नाही !
सगळे सगळे बोलतात  ….
सालं ऐकत कोणीच नाही !
   
शिक्षणाची डिग्री घेवून दारोदार फिरतो,
'माझं ऐका' म्हणत कोणी आत्महत्या करतो.
ऐकण्यासाठी पाठवलेला …. गोल गोल बोलतो
सरते शेवटी मिळेल त्याच्या दावणीवरती चरतो.
एवढं होऊन सुद्धा कोणी शब्दाला जागत नाही.  
सगळे सगळे बोलतात  ….
सालं ऐकत कोणीच नाही !

कानावरती हात ठेवून तोंड सताड उघडं
बोल बोल बोलणारचं भविष्य किती नागडं
'आधी करा … नंतर बोला' दाखवून गेलात तुम्ही
गांधी बाबा, तरी सुद्धा सुटलं नाही तागडं
हातात चरखा घेवून कोणी बडबड त्यागत नाही.  
सगळे सगळे बोलतात  ….
सालं ऐकत कोणीच नाही !      

- रमेश ठोंबरे 

Jan 5, 2015

छंदमुक्त !

 छंदमुक्त !

लिहिण्याच्या आणि व्यक्त होण्याच्या पद्धतीनुसार वाचकांच्या आणि वर्गीकरणाच्या सोयीसाठी म्हणून साहित्यात गद्य आणि पद्य विभाग आले, त्यानंतर गद्य साहित्य आणि पद्य साहित्य असे वर्गीकरण करण्याची सोय झाली. नंतर पद्यामध्ये असेच 'मुक्त' आणि 'छंद / वृत्त' असे वर्गीकरण झाले इथपर्यंत सगळंच आलबेल होतं.

कवितेमध्ये जेंव्हा  'मुक्त' आणि 'छंद / वृत्त' असं वर्गीकरण झालं तेंव्हा मुक्त लिहिताना, मुक्तपणाचे आणि वृत्त किंव्हा छंद लिहिताना त्यातील बंधनाचे नियम पाळले जावेत असं काहीसं ठरलं असावं. मग ज्यांना मुक्त जमतं त्यांनी मुक्त लिहावं ज्यांना छंद आवडतो त्यांनी तो अचूक लिहावा एवढी अपेक्षा असणं गैर आहे काय ?

मग छंद किंवा वृतात लिहिताना, "मी अर्थाला 'जास्त' महत्व देतो, मला 'शब्द खेळ' नको असतो" अश्या सबबी देवून 'छंद मुक्त' लिहिण्याचा अट्टाहास कशासाठी ? त्यासाठी तितक्याच ताकदीचा मुक्तछंद आहे की.  वृतामध्ये लिहिण्याचा प्रयत्न हि न करता, तेवढी मेहनत न घेताच  "वृतात्मध्ये अर्थाला महत्व नसत, छंदात लिहिणे म्हणजे नुस्ता शब्दखेळ असतो"  असं म्हणण्याचा अधिकार तुम्हाला कुणी दिलाय ?

जमत नाही तर तिकडं जावू नका, गेलात तर बंधनं पाळा, आणि खरच तुमचं 'छंदमुक्त' (मुक्त नव्हे, छंद आणि मुक्त च्या मधलं - छंदमुक्त !)   लिहिणं इतकंच अर्थपूर्ण असेल तर तेच छंदात लिहा, लिहिताना  'अर्थ' आणि 'वृत्त' याचं आव्हान स्वीकारा !    सोप्प्प आहे, नाही का ?