Jul 19, 2013

॥ रोजचीच आहे ॥

रोजचीच आहे  
पायपीट सारी 
पंढरीची वारी 
आठवे गा  

सुटता सुटेना 
जगण्याची होड
अंतरात ओढ
भेटण्याची ॥२

खुणावतो देवा
चंद्रभागा तीर  
आता मज धीर 
धरवेना ॥३

भव चिंता सारी 
तुजवरी देवा
म्हणोनि विसावा  
चरणाशी ॥४ 

मागणे ते काय 
नाही माझे फार 
पडावा विसर 
जगताचा ॥५ 

एक व्हावे मन 
एक व्हावे तन 
आणिक वर्णन 
काय करू ? ॥६

शेवटचे देवा
मागतो मागणे 
येणे आणि जाणे 
घडू दे गा ! ॥७   

- रमेश ठोंबरे

Jul 18, 2013

अर्ज किया है

सुख असते ओंगळवाणे, दु:ख चिरंतर देणे 
इतकेच मागणे तरिही , 'सुखात असुदे देवा!' 
 …………………………….……………………………. 


रंगांना नसते बोली, रंगांना नसते भाषा, 
पण रंग बदलल्यावरती, धर्मांतर झाले म्हणती ! 
…………………………….
……………………………. बांधल्या असतील गाठी जर नभीच्या ईश्वराने 

का अशी तुटतात नाती बिनबुडाच्या संशयाने ?
…………………………….……………………………. 


ओळखतो मी पावसास या किती चांगले ? 
डोळ्यांमधुनी तिच्या बरसता कळतो पाऊस ! 
…………………………….……………………………. 


दु:खाला मी वाट मोकळी करून देता 
सुखही थोडे त्याच्या सोबत निघून गेले. 
…………………………….……………………………. 


हुशार मी रे जेंव्हा पासून रांगत होतो 
कतरिना सम हवी बायको सांगत होतो ! 
…………………………….…………………………….

- रमेश ठोंबरे 


Jul 15, 2013

दिशा


मी माझा आहे ….
माझ्यावर फक्त माझाच हक्क आहे
वागण्यातला बिनधास्तपणा …. माझ्यासाठी
जगण्यातली बेफिकिरी ….माझ्यासाठी !

कोणावाचून माझं काही अडत नाही.
मला कोणाचीच गरज नाही,
मी मला हवं तसं जगणार ….
हवं तसं वागणार
मी बोलेन तीच भाषा
मी ठरवेन तीच दिशा !

माझं तत्व खरच न्यारं आहे
माझं स्वत्व मला प्यारं आहे
म्हणून मी असच वागतो
मी फक्त माझ्यासाठीच जगतो !

कालपर्यंत हे सगळं असंच होतं !
अगदी तंतोतंत !

पण काल मी बाहेर पडताना
तू माझं बोट तुझ्या चिमुकल्या
हातात घेतलस आणि म्हणालास
"पप्पा लवकर घरी या …
मी तुमची वाट बघतोय !"

मी बाहेर पडल्यापासून
घरी कोणीतरी माझी वाट बघतंय ….
हे तुझ्या डोळ्यात दिसलं
आणि माझ्या जगण्याची …
दिशाच बदलून गेली !

- रमेश ठोंबरे