May 6, 2017

कीर्तन आणि कीर्तनातील दृष्टांत !

कीर्तन आणि कीर्तनातील दृष्टांत !
वय कुठलंही असो, अगदी शाळकरी किंवा जक्ख म्हातारपण ....आणि शिकवण सुद्धा कुठलीही असो चांगली किंवा वाईट.... ती उदाहरणाशिवाय आपल्या पचनी पडत नाही हे अंतिम सत्य आहे, आपल्याला दृष्टांत लागतो तेंव्हाच समजत .... पण हि सुद्धा एक चांगली गोष्ट आहे, नाहीतर ... पुराण काळापासून काही गोष्टी काळाच्या कसोटीवर सिद्ध झालेल्या असताना त्याकड दुर्लक्ष करून .... सगळं काही होऊन गेल्यावर ... स्वतःच्याच उण्यापुऱ्या अनुभवातून चांगला वाईट दृष्टांत घेण्यात तरी काय अर्थ आहे !
कीर्तन, हि वारकरी सांप्रदायातुन आलेली आणि मोठा इतिहास असलेली महाराष्ट्रातील लोक प्रबोधनाची परंपरा आहे. 'समाज तमाशानं बिघडला नाही आणि कीर्तनानं सुधारला नाही' हे वरवर सत्य जरी वाटत असलं तरी काही मोजक्या समाजावर या गोष्टींचा नक्कीच परिणाम होत असतो, म्हणून स्वतःत बदल घडवून घेणाऱ्या आणि नीतिमत्ता जिवंत असणाऱ्या समाजावरच हे जग उभं आहे ! कीर्तन ऐकणे हा माझा आवडीचा छंद आहे, पूर्वी लहान असताना आजोबांच्या धाकाने आणि नंतर नंतर सवयीने मला कीर्तनाची गोडी लागली. कीर्तनातील नामस्मरण, कीर्तनातील वाद्यांचा नाद, कीर्तनातील अभंग, कीर्तनातील दृष्टान्त आणि विशीष्ट एका अभंगाभोवती उभे राहिलेले कीर्तन हा एक श्रवणीय सोहळा असतो. मी नववी दहावीला असेपर्यंत हा योग नियमित यायचा पुढे शिक्षणामुळे आणि अभ्यासामुळे गावाकडे जास्त राहता आले नाही. तरीही जमेल तेंव्हा त्याकाळी आकाशवाणीवरून प्रसारित होणारे कीर्तनाचे अनेक कार्यक्रम मी आवर्जून ऐकत असे, या नंतरच्या काळात मात्र, वर्ष-वर्ष असा योग्य जुळून येत नव्हता, आणि अलीकडच्या काळात तर योगा योगानेच हे शक्य व्हायचं ! असो
मी कीर्तनाकडं आकर्षित होण्याचे अनेक कारणं आहेत, किर्तनातलं कथाकथन, किर्तनातले उदाहरणं, कीर्तन सांगणाऱ्या महाराजांचा वाचिक आणि कायिक अभिनय, टाळ - मृदूंगाचा नाद आणि सहकाऱ्यांचा भक्तीमय जल्लोष. शाळेत असताना आमचे गुरुजी सांगायचे कीर्तनकाराला, गायन, नर्तन, अभिनय यासारख्या आणखी कितीतरी कला अवगत असाव्या लागतात. तो हजरजबाबी असावा लागतो, एकपाठी असावा लागतो, श्रोत्यांची नाडी ओळखून प्रभोधन करणारा अवलिया असावा लागतो एवढच नाही तर लेखक, कवी आणि कथाकार सुद्धा असावा लागतो, ! शाळेत शिक्षक जसे एखादं विधान समजून सांगण्यासाठी तितकंच चपखल उदाहरण द्यायचे तेच काम कीर्तनातील दृष्टांत करत असतात, मला आजही आठवतंय नागरिकशास्त्र विषय शिकवताना आमच्या शिक्षकांनी दिलेलं उदाहरणं. विधान होतं, 'एक वस्तू एखाद्यासाठी चैनीची वाटते पण तीच वस्तू दुसऱ्यासाठी गरजेची असते !' आता विधान उधारणाशिवाय सांगितलं तर त्या वयात तरी समजण्यासारखं नव्हतं, म्हणून गुरुजींनी शेतकऱ्याचं आणि डॉक्टरचं उदाहरण दिलं. कार ही शेतकऱयांसाठी चैनीची वस्तू आहे पण डॉक्टरसाठी तीच कार किती गरजेची असते हे वेगळं सांगायला नको. (पुढे विध्यार्थी बदलत गेले पण शिक्षकांचा दृष्टांत कित्तेक वर्ष तोच राहीला म्हणे !)
मागे एकदा, एका कीर्तनकारांनी असाच छान दृष्टांत दिला होता. महाराज म्हणाले, 'मी रस्त्याने चाललो होतो तेवढ्यात मला एक शाळकरी मुलगा भर उन्हात भलंमोठं दप्तर पाठीवर घेऊन सायकलला ढकलत जाताना दिसला. मी त्याला थांबवून विचारल, 'बाळा काय झालं, असं सायकल ढकलत का चाललास ?', मुलगा बोलका होता म्हणाला, 'आहो महाराज बघा कि सायकल पंचर झालीय !, आता पंचर काढावं लागल !' मी म्हणलं 'आर कशाला वेळ घालवतोस, हवा मार टायरात अन जा शाळेत'. पोरानं माझ्या धोतर पटक्याकडं पाह्यल अन म्हणलं , 'तसं नस्तय महाराज ते, पंचर काढलं नाय तर, भरलेली हवा थोड्या वेळात पुन्हा निघून जाईल. मग हवा भरून काय फायदा ? हवा भरलेली टिकायला पायजे असलं तर पंचर काढावं लागल !' एवढी गोष्ट सांगून महाराज मूळ मुद्द्या कड वळतात आणि श्रोत्यांना सांगतात, 'कीर्तन ऐकायला आलेल्या तुम्हा श्रोत्यांमध्ये ज्ञान, भक्ती आणि शक्तीची हवा भरणं हे कीर्तनकाराचं काम आहे पण मुळात श्रोता हा पंचर असता काम नाही !' ठ ल विठ्ठल विठ्ठल !
आणखी एक छान दृष्टांत आहे .... 'सत्याचरण' या विषयावर 'नुसतं चांगलं बोलून चालत नाही तर स्वतः सुद्धा चांगलं वागलं पाहिजे' हे सांगणारा. एक गोष्ट सांगितले जाते अध्यात्मात तुकारामाच्या जीवनातील म्हणून सांगितली जाते तर मोटिवेशनल प्रोग्राममध्ये गांधीजींच्या जीवनातली म्हणून सांगितले जाते. माझ्या माहिती नुसार गांधींच्या आत्मचरित्रातली असावी. (जाणकारांनी मार्गदर्शन करावे) एकदा एका मुलाची आई मुलाची तक्रार घेऊन गांधीजींकडे आली आणि म्हणाली, "बापू हा मुलगा खूप गुळ खातो ... आता याला तुम्हीच काहीतरी सांगा." गांधीजींनी तक्रार फक्त ऐकून घेतली आणि ... त्या दोघांना आठ दिवसांनी पुन्हा यायला सांगितले. आई आणि मुलगा तेंव्हा निघून गेले. आठ दिवसांनी परत आले. पुन्हा आई म्हणाली 'आता सांगा ऐकलं तो तुमचं तरी'. गांधीजी शांतपणे पाहत त्या मुलाला म्हणाले, "बाळा जास्त गुळ खाऊ नकोस, गुळ खाल्ल्याने पोटात जंत होतात" एवढं सांगून त्या मुलाला जायला सांगितलं. आता, त्या बाईला काही समजेना ती म्हणाली 'बापू, इतकंच सांगायचं होतं तर मग आठ दिवस कश्याला लावले, तेंव्हाच सांगायचे होते !" बापू म्हणाले, " आठ दिवसांपूर्वी मी सुद्धा गुळ खात होतो ! ..... म्हणुन तेंव्हा मला हे त्याला सांगण्याचा अधिकार नव्हता .... आता मागच्या आठ दिवसात मी गुळ खाणे सोडले आहे !" तर हे आहे सत्याचरन, त्यावरील हा उत्तम दृष्टांत !
तर असे हे कीर्तनातले दृष्टांत, आणि हे सगळं आता आठवायचं कारण म्हणजे काहीदिवसांपूर्वी, ११ वी - १२ वीला माझा वर्गमित्र असलेल्या आणि प्रबोधनाचं कीर्तन करत असलेल्या अशोक महाराज गेंदले यांचं कीर्तन इथे औरंगाबाद येथे असल्याचं समजलं, मित्राला कीर्तनातून ऐकण्याची पहिलीच संधी होती म्हणून मी हा कीर्तन सोहळा ऐकण्यासाठी गेलो होतो, छोटेखाने कार्यक्रम पण हळूहळू करत भरपूर श्रोते जमले होते आणि कीर्तनसुद्धा रंगात आलेलं होतं. या वेळी 'संत-संगतीचा महिमा, किंवा सद्गुणांच्या संगतीत आल्यानं काय होतं हे सांगताना महाराजांनी दोन दृष्टांत दिले ते अगदीच सडेतोड होते. एक दृष्टांत होता पुराणातला, जो कीर्तन ऐकायला बहुसंख्येने उपस्थित असलेल्या स्त्रियांना समोर ठेवून असावा ..... दृष्टांत रामायणातील .... रावण सीतेला पळवून आणतो ... अशोक वनात ठेवतो ... विचार असतो सीतेशी लग्न ...! पण रावण असला तरी, सीतेच्या संमत्तीशिवाय तिच्याशी लग्न त्याला मान्य नव्हतं, म्हणून तो रोज येऊन सीतेची नानाप्रकारे मनधरणी करायचा ... साम, दाम, दंड, भेद असे सगळे मार्ग अवलंबून झाल्यावर तो पत्नी मंडोदरी कडे गेला, या कामी पत्नीची काही मदत होते का हे पाहण्यासाठी त्यांन मंडोदरीला 'तुझा पत्नीधर्म म्हणून, मला सीतेला वश करण्यासाठी काही तरी उपाय सांग', असे सांगितले. तेंव्हा मंदोदरी म्हणते ! 'नाथ आपण सगळे उपाय करून थकला असाल तर आता एक करा, परकाया प्रवेश .... तुम्ही असेही सोंग घेण्यात माहीर आहात ... तर मग तुम्ही रामाचेच सोंग घेऊन तुमचं लक्ष का साध्य करत नाही ?' ... हे ऐकून रावण शांत आणि निराश झाला .... म्हणाला, 'मंदोदरी.... तुला असं का वाटतं कि मी हा उपाय केला नसेल म्हणून, मी ते हि करून बसलोय .... ! ..... पण ... हे काय होतंय समजत नाही .... मी रामाचं सोंग घेतलं कि माझ्यातली वासनाच नष्ट होते आणि जे मला करायचं ते मी करू शकत नाही !'' .... .... ... ... ... ... .... तर महाराज हे आहे सद्गुणांच्या सानिध्याची ताकद, नुस्त रामचं सोंग घेतलं तरी रावणाचा खरोखर राम होतो .... मग सद्गुणांचं आचरण केल्यास तुमच्यात बदल हा होणारच ! म्हणून संतसंगती महत्वाची !
महाराजांनी दिलेलं दुसर उदाहरण होतं जरा अलीकडच्या काळातलं, सिनेमा आणि अध्यात्मातलं, इ.स. १९३६ मध्ये 'संत तुकाराम' हा मराठी चित्रपट प्रदर्शित झाला, या चित्रपटाने त्यावेळी देश विदेशात अनेक विक्रम केले हा चित्रपट भारतात एका चित्रपटगृहात तर वर्षभर सुरू होता. हा त्या वेळचा एक उच्चांक होता. खरी गोष्ट तर पुढेच आहे या चित्रपटात तुकारामांची भूमिका केली होती विष्णुपंत पागनीस यांनी, ज्या भूमिकेने पुढे त्यांना अजरामर केलं. त्यावेळी चित्रपट प्रदर्शित झाला. चित्रपट अजरामर झाला. चित्रपटाने चांगला धंदा सुद्धा केला, आता वेळ होती कलाकारानचं मानधन द्यायची, त्याकाळी चित्रपट काढणंच खरं म्हणजे दिव्य असायचं त्यामुळे कलाकारांचं मानधन हे बहुतेक वेळी चित्रपट प्रदर्शित झाल्यावरच मिळायचं, इथेतर चित्रपट गाजला सुद्धा होता म्हणून निर्माते सुरवातीला विष्णुपंतांकडे आले, मानधनाचं पाकीट समोर ठेवलं म्हणाले, 'महाराज, हे आपलं मानधन !', चित्रपटातिल तुकारामाच्या भूमिकेनंतर निर्माते विष्णुपंतांना 'महाराज' म्हणत असत. पाकीट पाहून विष्णुपंत म्हणाले, 'मानधन.... ? मी घेणार नाही.' ...
निर्माते म्हणाले ... "महाराज, ठरल्या पेक्षा दुप्पट आहे !". विष्णुपंत म्हणाले "तरीही घेणार नाही !. आता निर्मात्यांना काही कळेना ... त्यांना वाटलं, चित्रपट इतका गाजला, चित्रपटाने जास्त धंदा केला म्हणून पंतांना जास्त मानधनाची अपेक्षा असणार ..., "म्हणाले चारपट देतो... आतातरी घ्या !'. या नंतर विष्णुपंत शांतपणे म्हणाले, "ज्या निर्मोही तुकारामाच्या भूमिकेनं मला अजरामर केलं, त्या भूमिकेसाठी मी मानधन घेवू ? मी मानधन घेणार नाही ! " निर्मात्यांनी हि त्यांनी घेतलेल्या भूमिकेला मान दिला. विष्णुपंतांनी भूमिकेसाठी तुकारामांचा वेष परिधान केला आणि त्या चित्रपटा दरम्यान ते तुकाराम जगले, नंतर ते खऱ्या अर्थानं विरक्त झाले ! आज खऱ्या तुकारामहाराजांचा फोटो देहुतही उपलब्ध नसताना आपण जे फोटो सर्वत्र पाहतो पुजतो ते फोटो सुद्धा विष्णुपंत पागनीसांचे आहेत, हि त्यांच्या अभिनयाची आणि संत संगतीची किमयाच नव्हे काय आणि याही पुढची गोष्ट म्हणजे ज्या भूमिकेवर रसिकांनी इतकं प्रेम केलं त्या तुकारामाचा वेष त्यांनी शेवटपर्यंत उतरवला नाही, ते शेवटपर्यंत तुकारामांच्याच वेषात वावरले !
म्हणून महाराज म्हणतात 'सद्गुणांच सोंग जरी घेतलं तरी ते त्या माणसात उतरतात, म्हणून भक्ती करा .... संत संगती करा, ठ ल विठ्ठल विठ्ठल !"

- रमेश ठोंबरे