Showing posts with label गीत लेखन. Show all posts
Showing posts with label गीत लेखन. Show all posts

May 20, 2014

हे… नववारी साडी न पोलकं

हे…  नववारी साडी न पोलकं
त्यात टपोरी टग्यांच टोळकं
मला माहित हाय हे सार
हे गाव लई मुलखाच बेरकं …. धृ


या गावाची रीत लय न्यारी
हात धरत्यात भरल्या दुपारी
नाही माहित होणार काही
कधी घेतील तुमची सुपारी
…. हे गाव लई मुलखाच बेरकं … १  


काय सांगू  ह्या गावाची गोष्ट
हे गाव लई खरच फास्ट    
याच भरलंय खरच पाप
याला लागलाय दुहीचा शाप
…. हे गाव लई मुलखाच बेरकं … २  


माझी इमेज हाय लय गोरी
करा खुशाल हवी ती चोरी
आता कश्याला करताय लेट
आज रातीला होवू दया भेट
…. हे गाव लई मुलखाच बेरकं … ३ 


मला भेटाया पाव्हणं थेट
जरा लावा कि इंटरनेट
पेन Drive लावून पुढं
करा व्हीडीओं डावूनलोड
…. हे गाव लई मुलखाच बेरकं … ४  




Oct 6, 2013

..जीव हारून निजला ... |

..............जीव हारून निजला ... |
असा दमला भागला
...............जीव हारून निजला ... ||

डोळा सले भूतकाळ ...
आत वेदना ती खोल.
मानव्याचा जनम र
आज असा वाया गेला ...... १
...............जीव हारून निजला

झोप लागणार कशी ?
उगा बदलतो कुशी.
चिता मिटवील चिंता
असा इचार र झाला ....२
...............जीव हारून निजला

त्याची गाय तूटलेली ...
याची माय विटलेली.
तिळ तिळ तुटे जीव
घर घर काळजाला .... ३
...............जीव हारून निजला

डोंगरात मरीआई ...,
कधी दिसलीच नाई
शेरडाच्या जीवा वरी
इथ लांडगा मातला ....४
...............जीव हारून निजला

फाटलेल्या आसऱ्याला
तुटलेल्या वासराला
घेर कुशीमंदी देवा ...
लई येळ आता झाला ... ५
...............जीव हारून निजला
असा दमला भागला
...............जीव हारून निजला ... ||


- रमेश ठोंबरे

Jul 15, 2012

विठ्ठल विठ्ठल म्हणा ....


कर्मावरती भक्ती असू द्या, तयास विठ्ठल म्हणा
विठ्ठल विठ्ठल म्हणा चला रे विठ्ठल विठ्ठल म्हणा !

जगी रंजले, किती गांजले
अन्न, वस्त्र अन स्वप्न भंगले
दिन दुबळा दिसता कोणी, तयास विठ्ठल म्हणा ||१||
विठ्ठल विठ्ठल म्हणा ....

शब्दावाचून उणेच सारे
शब्द बोलता, हसती तारे
शब्दावरती प्रेम असू द्या, तयास विठ्ठल म्हणा  ||२||
विठ्ठल विठ्ठल म्हणा ....

निसर्ग आहे आपुला पिता
अन धरती हि अपुली माता
नतमस्तक व्हा नित्य तिथे, तयास विठ्ठल म्हणा  ||३||
विठ्ठल विठ्ठल म्हणा ....

जिथे तिथे रे विठ्ठल वसतो
दगडा मध्ये विठ्ठल दिसतो
चरा-चराला विठ्ठल जाणा, तयास विठ्ठल म्हणा  ||४||

- रमेश ठोंबरे
  

 

   






Mar 18, 2012

मी लाडाची पाडाची बिजली


मी लाडाची पाडाची बिजली
भल्या भल्यांची मशाल इजली !
माझ्या पुढं र मशाल इजली !

माझा रंग गोरापान
तुझे उडालेले भान
हि रात सारी इष्कात भिजली || धृ ||
मी लाडाची पाडाची बिजली .........

डोळ्यात काजळ वेली
गाली र गुलाब लाली
माझ्या रुपाची नशा हि झाली
तिथं बाटली आडवी निजली .....||१||
मी लाडाची पाडाची बिजली .........

माझा कसलेला घाट
तुझा बाणा लई ताठ
असा पाहुनिया थाट
आता माझी बी नियत लाजली ||२||
मी लाडाची पाडाची बिजली .........

माझी नागमोडी चाल
करी दिलाचे र हाल
त्यात ज्वानीची कमाल !
आता इष्काची बिर्याणी शिजली ||३||

तुझा डाव मला ठाव
नको उगी बडेजाव
डाव पांगण्याचा भ्याव
बघ भीती ही डोळ्यात सजली ||४||
मी लाडाची पाडाची बिजली .........
भल्या भल्यांची मशाल इजली !
माझ्या पुढं र मशाल इजली !

- रमेश ठोंबरे
Ramesh Thombre
(Item Song from Bijalibai)

Mar 14, 2012

माझ्या विठूच्या भूमीत



माझ्या विठूच्या भूमीत
गड्या नाद पावलाचे,
कड्या-कपाऱ्यां मधुन
गुण गाती विठ्ठलाचे ||

माझ्या विठूच्या भूमीत
हळदी कुंकवाची रास,
कधी हारांची आरास.
कधी फ़ुलांचे सुवास ||

माझ्या विठूच्या भूमीत
चंद्रभागेची पुन्याइ ,
पाप धुउन लेकराची
नाव लावते किनारी ||

माझ्या विठूच्या भूमीत
नित्य भक्तीचाच वारा,
कधी चंदनाचा लेप
दही दुधाच्या रे धारा ||

माझ्या विठूच्या भूमीत
येते लेकच माहेरा,
ओलावल्या लोचनांनी
भेटे भक्तीच्या सागरा ||

माझ्या विठूच्या भूमीत
टाळ फुला सम फ़ुले,
भोळा भाबडा मृदंग
मग शब्दागत बोले ||

माझ्या विठूच्या भूमीत
गडे भक्तीचाच भात,
वाढी आईच्या मायेने
विठू भाक्तीचेच हात ||

माझ्या विठूच्या भूमीत
चंद्रभागे पुण्य नांदे,
भक्त विठूचेच जरी
पुंडलिका आधी वंदे ||

- रमेश ठोंबरे
प्रेरणा - बा. भ. बोरकर (माझ्या गोव्याच्या भूमीत)

Dec 6, 2011

घनघोर केसांमधी ....





















सखे कळले न मला कधी ओलांडला शिव
..............घनघोर केसांमधी माझा अडलेला जीव ! || धृ ||

काळेभोर डोळे तुझे, झुके पापणी कम्माल
योवनाचा घाट न्यारा, मस्त मोरनीची चाल
बाण नजरेचा चाले, जरी झुकलेली मान
पाठ्म्होरा बांधा तुझा,  करी काळजाचे हाल !

वाट पाहून मी आहे ...कधी करशील घाव
कधी लावशील सखे, माझ्या नावासंग नाव    ||१ ||
.............. घनघोर केसांमधी माझा अडलेला जीव !

कातलेली तुझी काया, जसा गव्हाळ कातळ
माझ्या मनामंदी वाहे झरा प्रेमाचा खळाळ
मन झालं ग अधीर, तुझ्या अंगावर खेळ
कसा गावनार त्याला सखे अंतरीचा तळ
        
लाट भरतीची आली... बघ सोडली मी नाव ...
दूर राहिला किनारा .. तुझा सापडेना गाव || २ || 
.............. घनघोर केसांमधी माझा अडलेला जीव !

- रमेश ठोंबरे

Oct 4, 2011

रास रंगला ग सखे रास रंगला



रास रंगला ग सखे रास रंगला
रास रंगला ग सखे रास रंगला
आज प्रीतीचाच जणू 'क्लास' रंगला || धृ ||


तो मुजोर, चित्तचोर वेड लावतो
आणि हास्य मुखावरी गोड दावतो
वाटे 'फासण्याचा' पुन्हा फास रंगला || १ ||


हा असाच वाट पाहे आज दिसाची
रासक्रीडा चाले मग शृंगार रसाची
त्याच साठी आज पुन्हा 'खास रंगला' || २ ||


काय करू कशी खोडू याची सावली
चाले बघ पुन्हा त्याची तीच 'पावली'
पावलीत दांडियाचा 'भास' रंगला || ३ ||


हीच संधी याच्यासाठी हर्षभराची
साठूउन ठेवी याद वर्षभराची
आता संगतीचा जणू त्रास 'रंगला' || ४ ||


रात होता याला फार जोर वाढतो
रात उलटता ताप मग वर चढतो
सरलेच नऊ दिन शेवटचा तास रंगला || ५ ||


हाच सखे माझ्यासाठी जीव टाकतो
चोरूनिया ओळखीचे बाण फेकतो
आज खरा आमचा 'सहवास' रंगला || ६ ||

- रमेश ठोंबरे
(Ramesh Thombre)

Sep 22, 2011

मी लाडाची पाडाची बिजली

मी लाडाची पाडाची बिजली
भल्या भल्यांची मशाल इजली !
माझ्या पुढं र मशाल इजली !

माझा रंग गोरापान
तुझे उडालेले भान
हि रात सारी इष्कात भिजली || धृ ||
मी लाडाची पाडाची बिजली .........

डोळ्यात काजळ वेली
गाली र गुलाब लाली
माझ्या रुपाची नाशा हि झाली
तिथं बाटली आडवी निजली .....||१||
मी लाडाची पाडाची बिजली .........

माझा कसलेला घाट
तुझा बाणा लई ताठ
असा पाहुनिया थाट
आता माझी बी नियत लाजली ||२||
मी लाडाची पाडाची बिजली .........

माझी नागमोडी चाल
करी दिलाचे र हाल
त्यात ज्वानीची कमाल !
आता इष्काची बिर्याणी शिजली ||३||

तुझा डाव मला ठाव
नको उगी बडेजाव
डाव पांगण्याचा भ्याव
बघ भीती ही डोळ्यात सजली ||४||
मी लाडाची पाडाची बिजली .........
भल्या भल्यांची मशाल इजली !
माझ्या पुढं र मशाल इजली !

- रमेश ठोंबरे
Ramesh Thombre

Jul 30, 2011

धुंद कुंद हा मुकुंद



धुंद कुंद हा मुकुंद रंग लावितो
गौर वर्ण राधिकेच अंग जाळितो

आज शाम, छेडणार जाणिता तिने
वाट तीच चालण्यास चित्त भाळितो

मेघशाम, रंग लाल, फेकतो कसा
राहतो मनात आणि स्पर्श टाळितो

रंगता तुझाच रंग चिंब सावळ्या
कोण रंग सांग तो मला खुनावितो

प्रेम रंग पाहिला तुझ्या मिठीत मी
आज कोणती उमंग खास दावितो ?

कृष्ण सावळा कसा कुणास शोधतो ?
सांग काय शाम तू मनात पाळितो ?


- रमेश ठोंबरे
(गाल गाल गाल गाल गाल गालगा)

घे घे विकेट ....तू खेळ क्रिकेट !


घे घे विकेट ....तू खेळ क्रिकेट !
घे घे विकेट ....तू खेळ क्रिकेट ! ..............(कोरस)


नकोस पाहू जे जे घडले
अन कोण ते उगाच भिडले
तुझ्या लढ्याला नकोत सीमा
बघ शर्थीचे दार उघडेल....
घे घे विकेट ....तू खेळ क्रिकेट !
घे घे विकेट ....तू खेळ क्रिकेट ! ..............(कोरस)


तुझी जिद्द रे तुफान आहे,
अन स्वप्नांचे दुकान आहे.
शक्ती ठाऊक तुझीची तुजला,
जग हे सारे अजाण आहे.
घे घे विकेट ....तू खेळ क्रिकेट !
घे घे विकेट ....तू खेळ क्रिकेट ! ..............(कोरस)


कर अशी रे धमाल आता
दाव जगाला कमाल आता
तुझ्याचसाठी यश हे झुरते
वाट पाहतो गुलाल आहे !
घे घे विकेट ....तू खेळ क्रिकेट !
घे घे विकेट ....तू खेळ क्रिकेट ! ..............(कोरस)


एका मागून एका डाव रे
यष्टी वरती बसे घाव रे ...
यश हे सारे तुझेच आहे
नकोस देऊ कुणा वाव रे
घे घे विकेट ....तू खेळ क्रिकेट !
घे घे विकेट ....तू खेळ क्रिकेट ! ..............(कोरस)


झुगारले तू अपयश सारे
यत्न तुझे रे फळास आले
क्रिकेट होते स्वप्नं तुझे अन
स्वप्नं तुझे ते वास्तव झाले !
घे घे विकेट ....तू खेळ क्रिकेट !
घे घे विकेट ....तू खेळ क्रिकेट ! ..............(कोरस)


- रमेश ठोंबरे

Jun 26, 2011

नव यौवना मी गौरांगना


नव यौवना मी गौरांगना
मस्त मी मस्तीत माझ्या
धुंद मी धुंदीत माझ्या
जिंकीन मी ... स्वप्नेच माझी
हीच माझी कामना .....
............................ नव यौवना मी गौरांगना.

विश्व नाही पहिले मी ...
पाहिला न इतिहास माझा.
जगण्यास नव्या तय्यार आहे
स्वच्छंद आहे ध्यास माझा.
भाव माझा दाटला अन
पेटल्या या भावना .....
............................ नव यौवना मी गौरांगना.

स्वप्नं माझे वाट पाहे
वाट हि गंधाळलेली ...
भूलेस नाही भूलले मी
आर्जवे हि टाळलेली ...
स्वागताला कोण आहे ...?
अन मीच माझी प्रेरणा.
............................ नव यौवना मी गौरांगना.

चित्र नभी रेखिले मी
कल्पनेच्या कुंचल्याने
सूर्य आहे थांबलेला
या हातांनी झाकल्याने
दे भरारी, दे उभारी
हीच माझी प्रार्थना
............................ नव यौवना मी गौरांगना.

- रमेश ठोंबरे

|| सापडेना पंढरपूर ||


काय सांगू देवा तुला, पालटले रंग रे
सापडेना पंढरपूर अन पांडूरंग रे || धृ ||

तिथे एकली मी होती रम्य पहाटे भूपाळी
इथे भोंगा गिरणीचा सांगे सकाळची पाळी
सुई वरी घड्याळाच्या, जगण्याचा ढंग रे || १ ||

तिथे टाळ-चिपळी बोले, मृदंगाचे बोल रे
इथे ढोल ताशे झडती, भक्ती भाव फोल रे
विरला अबीर बुक्का, अन बदलले रंग रे || २ ||

तिथे नाही उणे दुने चाले पायरीची पुजा,
इथे मांडला बाजार, कळसाला नाही जागा
जिथे तिथे चाललेला, असंगाचा संग रे || ३ ||

तिथे नांदे चंद्रभागा, इथे वाहे मी अभागा
तिथे नाळ जुळलेली, इथे सापडेना धागा
काय करू देवा आता, सुचेना अभंग रे || ४ ||

- रमेश ठोंबरे

ये सोना .... सोना ... माझी मोना


ये सोना .... सोना ... माझी मोना
चल येतेस का, जायंगे फिरायला,
दिल Garden Garden करायला.


लाजून भल्ती, मारू नको कल्टी
पलटके देख जरा,
तुझा दिवाना... आशिक पुराना
प्यारसे दिल ये भरा.
नको म्हणूस आता ग Sorry
तुझी तऱ्हा हि अशीच न्यारी.
लागे डेटिंग ठरायला....
दिल Garden Garden करायला.


तुझी माझी दोस्ती, करू थोडी मस्ती,
आयेगा मजा बडा.
Period ला चाटा, Lecture को टाटा,
जियेंगे different थोडा.
का ग कशाला लावतेस नाट,
किती किती मी करावा wait
तुला नजरेत भरायला ....
दिल Garden Garden करायला.


माझी उडाली झोप, चढलाय ताप
कैसा ये बोलू तुझे ?
तुझ्या रुपाची जादू, मी झालो साधू
अपना बनाले मुझे.
कसे कसे ग टाकतेस फास
किती किती हा दिलाला ताप
चल प्रेमात झुरायला ....
दिल Garden Garden करायला.


रुपाची राणी, तू ग दिवाणी ....
बाहोमे आज जरा ?
लाजून चूर तू, जाऊ नको दूर तू
हाल ये दिलका बुरा ?
कसा लागला तुझा हा छंद,
आता दोघंच होऊ या धुंद
चल जोडीनं मिरवायला
दिल Garden Garden करायला.


- रमेश ठोंबरे

Jun 13, 2011

- ती भेट तुझी - माझी -

ती भेट तुझी - माझी होणार आज आहे,
ते रूप तुझे राणी छळणार आज आहे. ..... || धृ ||

बोल तुझे माझ्या कानात साठलेले,
ते शब्द शब्द सारे ... माझेच वाटलेले.
ते स्वप्न पाहिलेले.... ते चित्र रेखीलेले.
ते चित्र पुन्हा नयनी भरणार आज आहे.
ती भेट तुझी - माझी ................................ १

तू चतुर शालिनी ग, किती गोड बोलली ग
तू भेट सांग तेंव्हा का सहज टाळली ग ?
हे गाव तुझे राणी मज फार दूर वाटे ...
बस स्वर्ग दोन बोटे उरणार आज आहे.
ती भेट तुझी - माझी ................................ २

मी शहर सोडिले अन गावात आज आलो,
गाण्यास प्रीत गाणे, कोकीळ आज झालो.
तू सूर छेड राणी... झालो अधीर आता,
हे गीत साक्ष पहिली, ठरणार आज आहे
ती भेट तुझी - माझी ................................ ३

तव रूप ते नशिले, पाहील आज जवळी,
अन दृष्ट त्या छबीची काढील त्याच वेळी.
रोखिले किती मी मजला, तव चित्र पाहताना
मी एक गोड गलती करणार आज आहे
ती भेट तुझी - माझी ................................ ४

- रमेश ठोंबरे

महाराष्ट्र बाणा


शिवरायाची आन जागवी, सवे स्वाभिमाना
मराठी (कोरस)
महाराष्ट्र बाणा, अमुचा महाराष्ट्र बाणा !

माय मराठी बोली आमुची
आर्त आर्त अन खोली आमुची
सह्याद्रीचा कडा बोलतो
इतिहासाचा धडा बोलतो
मर्द मराठी मना मनातून महाराष्ट्र जाणा
मराठी (कोरस)
महाराष्ट्र बाणा, अमुचा महाराष्ट्र बाणा !

ज्ञानेश्याची ओवी मराठी
तुकयाचा अभंग मराठी
मराठमोळ्या कलेस अर्पण
लावणीचे लावण्य मराठी
राष्ट्रासाठी प्राण पणाला, लावी शूर सेना
मराठी (कोरस)
महाराष्ट्र बाणा, अमुचा महाराष्ट्र बाणा !

महाराष्ट्र हे महान आहे
अन शौर्याचे निशाण आहे
इथेचे घडले मर्द मराठे
अगाध रत्नांची खाण आहे
टिळा ललाटी याच भूमीचा धन्य धन्य माना !
मराठी (कोरस)
महाराष्ट्र बाणा, अमुचा महाराष्ट्र बाणा !

गर्व आम्हाला इथे जन्मलो
धन्य म्हणू जर इथेच मेलो.
बोली अमुची माय मराठी,
अन राष्ट्राला पिता म्हणालो.
नडेल कोणी आम्हास जर का, मुकेल मग प्राणा
मराठी (कोरस)
महाराष्ट्र बाणा, अमुचा महाराष्ट्र बाणा !

- रमेश ठोंबरे

May 30, 2011

रे सख्या, मी चिंब भिजले रे ....


रे सख्या, मी चिंब भिजले रे ....
तू बोललास काही अन ... जीवन सजले रे.

हि धुंद झाली हवा ....
हा पाऊस वाटे नवा,
ओले हे अंग असे
अन नजरेचा गोडवा.
रे सख्या, मी चिंब भिजले रे .....

मन माझे अधीर होते,
हि आसुसलेली काया ...
तू आलास घेऊन धुंदी
अन ओली-ओली माया.
रे सख्या, मी चिंब भिजले रे .....

घे समजून घे सख्या,
या धरतीची याचना ....
कर शिडकाव सरींचा
बघ दाटल्या भावना !
रे सख्या, मी चिंब भिजले रे .....

व्यापून आयुष्य माझे
तू बोलतोस काही ...
तू प्रश्न टाकला ऐसा
कि उत्तर ...गंध होई..
रे सख्या, मी चिंब भिजले रे .....

- रमेश ठोंबरे
३० मे २०११