Showing posts with label पावसाच्या कविता. Show all posts
Showing posts with label पावसाच्या कविता. Show all posts

Nov 9, 2011

पावसात मी उभा




पावसात मी उभा
वाट तुझी पाहतो
घडयाळ मागे लावतो
आठवणीचं

ओलावलेले पक्षी
भान विसरून जातात
प्रीत गाणं गातात
संगतीनं

झाड वेली सारे
शांत उभे असतात
पुरस्कर्तेच दिसतात
शांततेचे.

चिवचिव चिमण्यांची
फडफडतो पक्षी
रेखित ओली नक्षी
अंगावरी.

मागे मागे जातं
माज़ वेड मन
मागचा तो क्षण
अठवित.

निसर्गच साथी
तू नसताना
चिंब भिजताना
पावसात.

- रमेश ठोंबरे
Ramesh Thombre 

Nov 3, 2011

नास्तिक


आपल्या प्रेमगोष्टी सुरु असतानाच ..
पावसाने धडाका लावला....!
तू लगेच निघालीस ...
उद्या परत भेटण्यासाठी .
'चल भेटू उद्या परत ५ वाजता इथेच
महादेवाच्या मंदिरात'.
तू म्हणालीस आणि माझं उत्तर एकायच्या आता...
निघालीस देखील...
तुला माझं उत्तर माहित होतं.
रोजच भेटतो आपण...या इथेच मंदिरात.
खरच मी आता इथे आलो कि आता ...
आस्तिक झाल्या सारखा वाटत ...
भेटीची ओढच असते तशी ...
तुझ्या भेटीची काय ... अन त्याच्या भेटीची काय ?
..
...
....
चार वाजले ...
आणि ठरल्या प्रमाणे
माझे पाय अपोआप मंदिराकडे वळले ....
तुझी वाट पाहत पायरीवर बसून होतो.
दूरवर तुला शोधात होतो ...
गाभार्यातील देव हरवल्यासारखा ...!
....
पाच वाजले ...
पाऊस सुरु झाला .... (आला)
तू नाहीस आली ..!
...
...
सहा वाजले ..
सात वाजले ..
पाऊस आणखीच जोमाने कोसळू लागला ...
मी आडोश्याला उभा, तुझी वाट पाहत... !
..
...
आठ वाजले ..
नऊ वाजले ..
मी पाय आपटत ... मंदिर सोडले ...
पाऊस आणखीही थांबला नव्हता ...
तो जास्तच पेटला होतां.
..
...
सकाळी समजलं ...
मी आणखीही नास्तिकच होतो ....
आणि तो पाऊस ....
तू येणार म्हणून ... रात्रभर ठाण मांडून बसला होतां,
तू यावीस म्हणून त्यानं ...देवाला पाण्यात ठेवलं होतं !

- रमेश ठोंबरे 
(Ramesh Thombre) 

Sep 18, 2011

तू समोर असताना

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
पाऊस
तुझ्या अंगणात पडतो,
तसाच माझ्या अंगणात पडतो.
पाऊस
मस्जिदिवर पडतो ..
तसाच मंदिरावरही पडतो.
पाऊस करत नाही कुठलाच भेदभाव.
..
...
पाऊस
कधी थेंब थेंब पाण्यासाठी
आभाळाकड पाहायला लावतो ...
पाऊस कधी कधी
पाण्यातच राहायला लावतो..,
पाऊस करत नाही कसलाच विचार !
..
...
पाऊस
संततधार बरसत असतो ...
अगदी मुक्काम सुद्धा ठोकून बसतो.
पाऊस ...कधी येतो आणि जातो ...
जसा चार घरचा पाहुणाच असतो.
पाऊस पाहत नाही कसलाच आधार
..
...
पाऊस
चोर पावलानं येतो ...
अगदी शांत ... अगदी निवांत....
पाऊस तांडव करत येतो ...
अगदी अचानक ... अगदी भयानक
पाऊस जोडत नाही कसलंच नातं.
..
...
हे असच असतं पावसाचं वागणं ....
तू समोर नसताना !
..
पाऊस ...करू लागतो भेदभाव
पाऊस ... करू लागतो विचार
पाऊस ....शोधू लागतो आधार ...
पाऊस ...जोडू लागतो नातं ..!
तू समोर असताना !

- रमेश ठोंबरे 
(Ramesh Thombre)

Sep 17, 2011

पाऊस मला भेटला .....

















||१||
दूरवर उंच उंच .. अलगद खाली येणारा,
आभाळाचा थेंब घेऊन धरतीला देणारा.
उजाड उजाड ... उदास उदास माळावर ....,
पाऊस मला भेटला
कणखर, बेडर डोंगराच्या भाळावर. 
||२||
बेधुंद आवेगाने झरझर कोसळणारा,
उतावीळ, अधीर अल्लड फेसाळणारा.
चिंब ओल्या काळ्याशार केसांच्या दाटीत ....,
पाऊस मला भेटला
धुंद, मदहोश प्रेयशीच्या मिठीत. 
||३||
रस्ता चुकलेला.. एकटाच मनमोज्जी
अडउन धरतो वाट ... एकांडा फौजी.
अज्ञात निर्जन अनोळखी वाटेवर .....,
पाऊस मला भेटला
स्वछंदी, आनंदी वार्याच्या लाटेवर.
||४||
काळ्या मातीस भेटण्यास आतुर,
बंद मुठीत प्रेमाचं काहूर.
सळसळनार्या हिरव्यागर्द शेतावर ....,
पाऊस मला भेटला
राकट, दनगट शेतकऱ्याच्या हातावर.
||५||
पावलो पावली अडखळनारा,
जीव मुठीत घेऊन ढासळणारा.
एकसंघ...एकसाची जुनाट किल्लीमध्ये ...
पाऊस मला भेटला
अरुंद, खोलगट अश्वासक गल्लीमध्ये.
||६||
नित्य-नेमाने डोंगररस्ता गाठणारा,
भक्ती भावाने ओत प्रोत भिजणारा.
भोळा भाबडा...दर्शनाच्या तयारीतला ...
पाऊस मला भेटला
भक्तीमय, शक्तीमय पंढरीच्या वारीतला.
||७||
स्वच्छ, नितळ, पांढरा शुभ्र भासणारा
नोकरदाराच्या फजितीवर हसणारा
रात्रभर जगलेला..दिवसाच्या झोपेतला
पाऊस मला भेटला
घड्याळावर चालणाऱ्या नियोजनबद्ध शहरातला
||८||
वेगाला भावणारा, धावत्याला शिवणारा,
ज्याचा वेग चुकला त्यालाच पावणारा.
साखरमान्याच्या टोपीत, चाकरमान्याच्या झब्यात
पाऊस मला भेटला
वक्तशीर, दाटीवाटीच्या लोकलच्या डब्यात.
||९||
स्वच्छंदी, उनाड वर वरच्या प्रेमाचा
मौज मजा अन सुट्टीच्या नेमाचा.
भेल, पाणी पुरी, आईस्क्रीमच्या पाटीवर
पाऊस मला भेटला
सजल्या गजबजल्या मुंबईच्या चौपाटीवर
||१०||
सात्विक, शुद्ध सांस्कृतीक चालीचा,
तर्कट, हेकट शहाणपणाच्या ढालीचा.
सरळ मार्गातील वाकड्या वाटेतला.....
पाऊस मला भेटला
रुंद अरुंद वक्तशीर पुणेरी पेठेतला. 
||११||
जीर्ण नाती मनापासून जोडणारा,
आयुष्याचे दिवस कसे तरी ओढणारा.
पोट भरल्यानंतर लाथाडलेल्या ताटावर ....
पाऊस मला भेटला,
निराधार, निराश्रित म्हातारीच्या बेटावर.
||१२||
अथांग, दूर दूरपर्यंत पसरलेला,
लाज, लज्जा सर्व सर्व विसरलेला.
बेभान, बेपर्वा आयुष्याच्या पिचवर....
पाऊस मला भेटला
उघड्या, नागड्या, थिल्लर विलासी बीचवर.
||१३||
बेरहम, बेदरकार एकट एकट गाठणारा
बेमालूम, बेसावध शेवटचं भेटणारा.
अवघं जगणं जिंकताना हरलेल्या मरणावर....
पाऊस मला भेटला,
मरनासन्न, असहाय, प्रेतावरच्या सरणावर.
||१४||
तरुण, तडफदार होयबानसोबत फिरणारा,
नाटकी, बेगडी पण सर्वांचा आवाज ठरणारा.
विरोधासाठी विरोध म्हणून चाललेल्या चर्चांवर
पाऊस मला भेटला
कष्टकरी, कामगारांच्या विकल्या गेलेल्या मोर्च्यांवर.
- रमेश ठोंबरे
(Ramesh Thombre)

Aug 25, 2011

... म्हणूनच मी पावसाला पाण्यात पाहतो !


पाऊस मलाही आवडायचा
तुला आवडतो तसाच ...!
..
...
कॉलेजातील ते दिवस ....
पाऊस सुरु झाला कि आम्ही कट्ट्यावर ...
येणाऱ्या जाणार्या, पावसात भिजणाऱ्या ..
कॉलेजकन्या पाहताना अगदी भरून यायचं
आभाळ भरून आल्यागत.
आज हि, तर उद्या ती ...
जी पावसात दिसेल ती ...!
आमच्या दिलाची धडकन असायची.
हो आमच्या म्हणजे सर्वांच्या ... दिलाची ...!
मित्रच होत आम्ही तसे ...
सगळं सगळं share करणारे.
..
...
....
पण त्या दिवशी तुला पाहिलं ..
पावसात भिजताना ...
काय झालं काय माहित ..
दिलाची धडकन बंद व्हावी आशी वीज कडाडली.
अन share करणाऱ्या मित्रांच्या comments ..
कानात तापू लागलाय ... !
"क्या दिखती है यार ...!
और उपरसे येह बारीश ... मार डाला ! "
त्या दिवसापासून ...
तू पावसात दिसलीस कि ...
मी share करणं विसरून जातो...!
..
...
....
तुझं प्रेम ... तुझं हसणं, तुझं भिजणं
यात sharing मला नाही जमणार ...!
बस आणखी काय सांगणार ...
पाऊस ....
असाच टपून राहतो ...!
म्हणूनच मी पावसाला पाण्यात पाहतो !

- रमेश ठोंबरे
(Ramesh Thombre)

Jun 4, 2011

Lovers Corner


रात्री खुणेची डोअरबेल वाजली
म्हणून अधीर होऊन दरवाजा उघडला...
....मागे पुढे पाहत ओशाळलेली ती दारात उभी होती.
....नखशिकांत ओलावलेली ... मनातून गोंधळलेली ....
गारठलेला चेहरा ... भिजलेले केस ...
अस्ताव्यस्त ओढणी ... चुरगळलेला ड्रेस ..
गालावरची लाली ... ओघळणारा शृंगार ...
विरगळलेली लिपस्टीक ... अन थरथरणार्या ओठांवर दातांचा भार.
डोळ्यांच्या पप्न्यावरून टपकणारं पाणी ...
केसांच्या जाळीतून चमकणारा मुखचंद्र ...!
पाहून मी हैराण ....
आज हिला आठवण आली तर ...!
..
...
....
तिला दारातच थांबउन मी तिचं सौंदर्य निरखत होतो ...
हि खरच किती सुंदर दिसते ... या अश्या हि अवतारात ....
किती हि ओढ ... किती हि शालीनता ..
किती हा निरागस चेहरा ...!
..
...
त्या थंड वातावरणात हि तिचे उष्ण श्वाश
माझ्या श्वासाना भिडले ....
आणि मी शुद्धीवर येऊन विचारले ...
काय गं हे ? काय हा अवतार ... ?
कुठे निघाली होतीस ?
...
...
तर पुन्हा खाली मान घालून ती म्हणाली....
"काही नाही रे आज तुझी आठवण आली म्हणून ...
निघाले होते तुझ्याकडेच .... तर ...वाटेतच ...
'Lovers Corner' वर पावसानं गाठलं ! "

- रमेश ठोंबरे

'तो' ती आणि मी


आज मस्त कोवळं उन पडला होतं,
गच्चीवर ती तिचे ओले केस सुकवत होती.
खिडकीच्या बारीक फटीतून मी निरागस कोण साधला होता ....
भिजलेले केस ... भिजलेला चेहरा .....
केस सुकवण्यासाठी तिचा चाललेला आटापिटा,
मी दुरूनच पाहत होतो.

माझ्याकडं तिचं अजिबात लक्ष नव्हतं ...
कधीच नसतं ...
...
असं ती दाखवत असते.
पण आज खरच नसावं ...!
कारण .... ती खरच ओले केस सुकवत होती.
...
....
मी थोडीशी खिडकी उघडली ....
बारीकसा आवाज केला ...
तेवढ्यात ....
ढगांचा गडगडाट ... , विजांचा कडकडात .....
आणि ....
पुन्हा त्याचं थैमान .... !
सगळं काही विसरून ...
आज तर गच्चीवरच गाठलं.
...
....
अगदी काही क्षणा पूर्वी तो कुठेच दूरपर्यंत दिसत नव्हता.
आणि ती हि ओले केस सुकवत होती....!
आता त्याचं आगमन झालं ....
आणि आता ती ...
सुकलेले केस भिजवत होती.

- रमेश ठोंबरे

सुपारी दिलीय 'साल्याची' ....


वाट अडउन बसतो ...
तिच्या छत्रीत घुसतो.
माझ्या कडे मात्र ...
विचकट विचकट हसतो.

रोज रस्त्यात गाठतो ...
तिला योग-योग वाटतो,
माझा मात्र पाहताच ...
खरोखर जीव फाटतो.

लटकना सारखा लोम्बतो
अंगा-अंगाला झोंबतो
मी दूर दिसलो कि ...
तिच्या आडोश्याला थांबतो.

याच्या डोक्यात नेहमीच मला
चिडवण्याची खाज आहे .
रस्त्यात तिला चिकटतो ..
याला कसली लाज आहे !

तो तसा साव आहे ..
हा त्याचाच डाव आहे.
माझ्या पेक्षा हि वाढलेला
सध्या त्याचा भाव आहे.

तेंव्हा, तो मला टाळायचा
आता तीच मला टाळते ...,
कळत नाही कशी याच्या
ओलाव्याला भाळते.

आता सहन होत नाही ..
ती प्रीत गाणं गात नाही
मी साद घालतो तेंव्हा ..
कधीच 'ओ' देत नाही.

सगळा त्याचा खेळ आहे...
ढगाळलेला काळ आहे,
सुपारी दिलीय 'साल्याची' ....
आता माझी वेळ आहे,

- रमेश ठोंबरे

त्याच्या शिवाय भेटशील काय ?


प्रिये, रागावलीस न ?
मला माहीतच होतं मी पावसावर रागावलो कि ..
तू माझ्यावर रागावणार ...

तुला आठवतंय ...
किती तिटकारा होता तुला पावसाचा ...
तू कॉलेजला निघालीस कि तो यायचा ...
तू केलेला तो शृंगार ... अगदी गार व्ह्यायचा.
.
.
तू तपायचीस ...
पावसाचा तोंड भरून उद्धार करायचीस.
पण मला त्याचा हेवा वाटायचा...,
काहीहि न बोलता तो डाव साधायचा.

मला नाही जमलं कधीच,
सारं काही विसरून जगणं
मनात असून हि तुझ्यासोबत ...
पावसासारखा वागणं.

त्याचाच फायदा घेतो तो ...
तुला रस्त्यात गाटताना.
त्याला कसली आलीय लाज ...
चिंब होऊन भेटताना ...!

पण तू मात्र विसरतेस ....
त्याच्या सोबत भिजण्याच्या मर्यादा.
.
.
म्हणून येतो राग ...कधी कधी ...
पाऊस बरसात असताना ..!
खरंच मी कोरडाच असतो ..
तू सोबत नसताना.

त्याला एकदा चुकाऊन ...
पुन्हा कॉलेज गाठशील काय ?
सोड आता त्याचा नाद ....
त्याच्या शिवाय भेटशील काय ?

- रमेश ठोंबरे

पाउस

.................

काल वारा जोरात होता ...
तिच्या हातातील छत्री ...
अलगत उडून गेली
आन त्यानं पुन्हा डाव साधला.

पाऊस ...
तिच्या पेक्षा मलाच जास्त छळतो,
मी एका स्पर्शासाठी आसुसलेला
अन वरतून हा अंग अंग जाळतो.

पाऊस ...
जणू आंधळाच बनून ...
तिचा हात धरून ...
तिच्या मागं मागं चालतो.

ती त्याला बाहेर सोडून आत जाते.
आरश्या समोर उभी राहून ...
स्वता:लाच न्ह्याळत असते....,
आता तिलाच तिच्या सौंदर्याची जाणीव होते ...
पुन्हा एकदा पावसाकडे नजर टाकत ..
ओले वस्त्र बदलू लागते... !

अन..
अंधळा झालेला पाऊस ....
आणखीच जोमानं कोसळू लागतो.

पाऊस ...
तसे सर्वच संकेत पाळतो ....,
कदाचित म्हणूनच मला टाळतो.

- रमेश ठोंबरे

पाऊस, कालपासून भलताच पेटलाय !


पाऊस ...
ये म्हटल्याने येत नाही ...
जा म्हटल्याने जात नाही ...

पाऊस ...
माझ्याशी असाच तुसड्या सारखा वागतो
मी रेनकोट घरी ठेवला कि
हात धुउन मागे लागतो.

पाऊस ...
मी हजारदा बजावलं तरी
मी नसताना तिला एकटी गाटतो ...
तिच्या छत्रीतून लगट करतो.
काल असाच त्यानं मुक्काम थाटला ...
धूसमुसळेपणान तिला खेटला.

वाटलं आता हिचा तोल जाणार ....
हि गरम होणार ...
हिला ताप येणार.

पण झालं भलतंच ...!
पाऊस ...
जेंव्हा तिच्या उष्ण श्वासाना भेटलाय.
पाऊस, कालपासून भलताच पेटलाय !

मी, दोष कुणाला देणार ...?
चूक माझीहि नसते ... तशीच त्याची हि नाही ... !
आणि ती तर नेहमीप्रमाणे नामानिराळी.

- रमेश ठोंबरे