Apr 15, 2012

~ तुझी आठवण येते ~

तू नसताना रांगत रांगत तुझी आठवण येते
चोर पाउली लाजत लाजत तुझी आठवण येते 

जिकडे तिकडे भयाण शांती गहिवरलेली गाणी
दंगा मस्ती वाजत गाजत तुझी आठवण येते 

बोट सुटावे हाता मधुनी अडखळती पाऊले
दुडक्या चाली चालत चालत तुझी आठवण येते 

अबोल झाली शब्द विखुरल्या पुस्तकातली पाने
बोल बोबडे बोलत बोलत तुझी आठवण येते

कधी बोचतो डोळ्यांमधला विखार जो सांडला
नेत्र बोलके गाळत गाळत तुझी आठवण येते

कधी आठवे फुगलेल्या त्या गालावरचा पापा
नाक नवेले मुरडत मुरडत तुझी आठवण येते

कुणास सांगू किती रमेशा आठवांत मी रमतो
आठवणींना टाळत टाळत तुझी आठवण येते

- रमेश ठोंबरे

~ फेसबुकावर ~कितीक सारे मित्र 'च्याटले' फेसबुकावर 
तुझे नि माझे नित्य 'फाटले' फेसबुकावर.

गल्लीमधली पुसती सारी 'कोण पाहुणा ?'
'विश्वची माझे सगे' वाटले फेसबुकावर.

सोशल त्याचा श्वाश जाहला, जगणे झाले
झुकरबर्ग ने द्रव्य लाटले फेसबुकावर. 

अण्णा, बाबा सांगत सुटले 'देश वाचवा' 
दुकान त्यांनी नवे थाटले फेसबुकावर.

प्रकांड ज्ञानी सवे बैसुनी चर्चा करती
कसे कुणाचे नाक छाटले फेसबुकावर.

आम्हास अमुचे पुस्तक प्यारे, छापुन घेऊ  !
कसे रमेशा शब्द बाटले फेसबुकावर ?

- रमेश ठोंबरे

Apr 10, 2012

मी जागा शोधतो आहे ...


दुनियेच्या गर्दी पासून दूर
वखवखलेल्या नजरेपासून दूर
या इथे निवांत ....
काळोखलेल्या रात्री ...
तुझ्या रेशमी केसांच्या छायेत
मी हरून जायचो भ्रांत.

तू म्हणायचीस हि कसली रे जागा ...
हीच का आवडते तुला .... ?

का नाही आवडणार ....?
काळोखाला साथ करणारा चंद्र ...
शांततेचा पुरस्कर्ता हा वाडा..
निसर्गाच्या जिवंतपणाची साक्ष...देणारे हे वृक्ष !
वार्यासोबत डोलणारी हि हिरवळ.

सगळेच कसे असून हि नसल्यासारखे
तू येईपर्यंत साथ करणारे ...
आणि तू आली कि ...
.... आपलं स्वतःचही अस्तित्व विसरणारे.

तुला फक्त चंद्र आवडायचा ...
तू पुन्हा पुन्हा म्हणायचीस
या चंद्राप्रमाणे आयुष्यभर ..
तुझी साथ हवी आहे ...
मी हो म्हणायचो आणि
कधी तुझ्याकड अन
कधी चंद्राकड पाहत बसायचो ..!
..
...
....
आता तुलाच ही जागा जास्त आवडत होती.
माझ्या आधी तू हजर झालीस, तेंव्हाच समजलं होतं ...
पण इतकी आवडेल असं वाटलं नव्हतं  ....

.... तू चीरनिद्रेला कायमचं सर केलंस ....
चंद्राच्या नितळ छायेत घर केलंस ... !

मी मात्र आणखी ही ....
जागा शोधतो आहे ...
इथेच तुझ्या शेजारी !

- रमेश ठोंबरे

Apr 5, 2012

|| वसंत ||


झडूनिया गेली
पिवळी ती पानं
हिरवे हे रान
झाले आज ||

मन माझे वेडे
भरुनीया आले
आभाळ ते झाले
काळेभोर ||

मन असे ओले
हिरवे हि झाले
विसरून गेले
रितेपण ||

पुन्हा पुन्हा येतो
गहिवर फार
आठवांचा ज्वर
साहवेना ||

तुझ्या सवे जो मी
वसंत पहिला
तोची आठवला
पुन्हा आज ||


कवी - जावेद अख्तर
अभंगानुवाद - रमेश ठोंबरे

Apr 3, 2012

जिथं फाटलं आभाळ

जिथं फाटलं आभाळ

जिथं फाटलं आभाळ
तिथं बांधतो मी घर
मला रुजाया पाहिजे
भग्न दगडांचा पार

तुझा फटका पदर
किती झाकशील उर
आसं लपणार नाही
तुझ्या दु:खाचं काहूर

रात अंधारली गूढ
दूर एकटी निजली
दिस आठवात गेला
कूस अश्रूंनी भिजली

नको रिती होऊ देऊ
दु:ख भरली ओंजळ
रित्या रित्या या घरात
सुख दिसलं ओंगळ

गर्द झाकोळली रात 
ओल्या दु:खाचा गाभारा
सुख अनावर झालं
केला देवानं पोबारा !  
                         
- रमेश ठोंबरे