Showing posts with label अभंग. Show all posts
Showing posts with label अभंग. Show all posts

Apr 22, 2020

|| एका सुक्षमाने ||



वाढले अंतर
वाढला दुरावा
समतेचा दावा
फोल केला ||

माणसाचा कर
माणसाचे घर
माणसाचा श्वास
नासविला ||

ऐसे कैसे आले
अमंगळा उत
अ-स्पृश्याचे भूत
मातीयले ||

एका सुक्षमाने
गिळीले आकाश
गिळीला प्रकाश
विश्वाचा या ||

- रमेश ठोंबरे

Apr 2, 2014

>>>

>>>

गाठण्यास लक्ष 
उभारली गुढी 
हातामध्ये घडी
बांधलेली ।।१।। 

जपतात सारे 
नमो नमो मंत्र 
धनुष्याचे तंत्र 
विसरले ।।२।।

महायुती साठी
समतेचा पूर
इंजिनाचा धूर
दूर दूर ।।३।।

शब्द बाण ओठी
घेवूनी चौकात
काढिती औकात
स्वकीयांची ।।४।।

'आप'ल्या हातात
घेवूनीया झाडू
कॉर्पोरेट लाडू
बोलू लागे ।।५।।

टाकतात धाडी
खादितले टोळ
बोलेरोची धूळ
खेडो पाडी ।।६।।

उघडूच नये
अपेक्षांची मुठ
धोंड्या परी विठ
मऊ म्हणा ।।७।।

परिवर्तन हे
घडायास हवे
पक्षी यावे नवे
घरट्यात ।।८।।

- रमेश ठोंबरे 

Jul 6, 2012

रूप तुझे देवा

रूप तुझे देवा 
साठवावे डोळा 
तो नेत्र सोहळा 
सर्वश्रेष्ठ 
विठ्ठल विठ्ठल 
देह सारा बोले 
अनु रेणू झाले 
विठूमय 

विठ्ठलाचे सख्य
मागतो मी नित्य 
जीवनाचे सत्य 
हेची एक

तन हे विठ्ठल
मन हे विठ्ठल 
कर्म हि विठ्ठल
व्हावे आता.

 - रमेश ठोंबरे

Nov 5, 2011

१) || ससा आणि कासव ||




एक शुभ्र ससा छान | उंचाउनी दोन्ही कान |
गर्वे करी गुणगान | चपळतेचे || १ ||

म्हणे वेग माझा फार | वात होई चूर-चूर |
असता मी भले दूर | पुन्हा इथे || २ ||

कासवाचे करी हसे | म्हणे चाले बघा कसे |
याला ध्येय कसे दिसे | आळ्श्याला || ३ ||

जाया निघे बारश्याला | काळ उलटुनी गेला |
पोचे मग लगनाला | कसा तरी || ४ ||

करू म्हणे थोडी मौज | त्याने लावियली पैज
कासवास जिंकू आज | शर्यतीत || ५ ||

कोण जाई म्हणे वेगे | डोंगराच्या पाठी मागे
त्याचे मग नाव लागे | जिंकण्याला || ६ ||

कासवही धन्य धन्य | पैज त्याने केली मान्य |
करू म्हणे आज शून्य | गर्व याचा || ७ ||

रोज आहे उड्या घेत | वर तो वाकुल्या देत |
करू याचे नेत्र श्वेत | एकदाचे || ८ ||

पैज ठरे, दिस ठरे | संगतीला सखे खरे |
कोण जिंके कोण हारे | दिसे आता || ९ ||

पैज झाली आता सुरु | ससा लागे मार्ग धरू
कासव हि तुरु तुरु | चालू लागे || १० ||

दूर दूर गेला ससा | झाला आता दिसेनासा |
उमटेल कसा ठसा | कासवाचा ? || ११ ||

ससा गेला वेगे दूर | जसा भरला काहूर |
त्याला सापडला सूर | जिंकण्याचा. || १२ ||

ससा पाहे आता मागे | कुठे कासवाचे धागे |
त्याला वेळ किती लागे | गाठण्याला || १३ ||

कासव ते दूर म्हणे | कधी व्हावे इथे येणे |
तोवर ते शांत होणे | गैर नाही || १४ ||

ससा झाला कि निश्चिंत | त्याची मिटलीच भ्रांत
विसावला थोडा शांत | तरू तळी || १५ ||

वनी देखिले गाजर | क्षुधाग्णी तो पेटे फार |
कंद ते घेऊन चार | भक्षीतसे || १६ ||

कोवळे ते खाता कंद | हालचाल होई मंद |
नयनहि होती धुंद | व्याकुळले || १७ ||

प्राशी नीर ते शीतल | मग डळमळे चाल |
नयनी निद्रेचा ताल | घुमू लागे || १८ || 
 
निद्रे झाला अर्धमेला | सुख स्वप्नी तो रंगला |
वाटे जसा स्वर्गी गेला | आपसूक || १९ ||

पुढे कासव ते चाले | त्याची एकलीच चाल |
त्याचा एकलाच ताल | योजिलेला || २० ||

नाही थांबले ते कुठे | जरी कोणी मित्र भेटे |
न ही जिद्द त्याची सुटे | चालण्याची || २१ ||

चाले संथ गती तरी | त्याची साधना ती खरी
आणि खात्री मनी धरी | जिंकण्याची || २२ ||

चाले असे लगबगे | पाठी घेउनिया ओझे |
ध्येय गाठण्यास चोजे | शर्यतीचे || २३ ||

त्याने सोडीयेले मागे | बघा आळसाचे धागे |
पुन्हा पुढे चालू लागे | लक्ष्याकडे || २४ ||

पहिला तो ससा त्याने | झोपलेला तरू तळी |
झोप उतरली गळी | सारी सारी || २५ ||

कासवाने केली शर्त | म्हणे नडलाची धूर्त |
श्रम नाही गेले व्यर्थ | धावण्याचे || २६ ||

मग पुन्हा घेई वेग | मागे मागे धावे मेघ |
नाही आली प्राण्या जाग | झोपलेला || २७ ||

लक्षभेद कासवाचा | पोहचला शेवटला
तेंव्हा वेग मंदावला | विसाव्याला || २८ ||

दिस ढळे जाग येई | आता काही खैर नाही |
ससा मागे पुढे पाही | कासवाला || २९ ||

शोधीयेले काटे कुटे | कासव न दिसे कुठे |
आता मनी भीती वाटे | हरण्याची || ३० ||

लागे मग पुन्हा पळू | आणि पुन्हा मागे वळू
आता कशी हर टाळू | दिसणारी || ३१ ||

एक तो प्रहर झाला | डोंगराच्या मागे आला |
पाहून तो घाबरला | कासवाला || ३२ ||

कासव ते हसे गाली | कशी तुझी गती गेली
म्हणे फजितीच झाली | वेगा ची हो || ३३ ||

करू नको गर्व म्हणे | कष्टा विन सर्व सुने |
आळसाचे तुझे जिने | नडले रे || ३४ ||

ससा म्हणे चूक झाली | उगी तुझी थट्टा केली
जागा मला दाखविली | तूच लेका || ३५ ||

रमा म्हणे गर्व नको | करता हे काम मोठे
भोगीयले त्याचे तोटे | ससोबाने || ३६ ||

- रमेश ठोंबरे
अभंग गोष्टी (अधारित) 

Nov 3, 2011

|| आळस महात्म्य ||


आळस महात्म्य, सांगतो तुम्हासी |
जवळीक खासी, वाढवावी || १ ||

आळस आळस, वाढवावा नित्य |
हेच एक कृत्य, आवडसी || २ ||

आळसाने केले, जगणे काबीज |
गळ्यात ताबीज, मिरवतो || ३ ||

आळस मला रे, प्राणाहून प्रिय |
मिळविण ध्येय, योजिलेले || ४ ||

उठतो मी रोज, दुपार प्रहरी |
दिसे मग हरी, पेंगलेला || ५ ||

आळसासाठी मी, राबतोय रोज |
आळसाचे व्याज, मिळवीन्या || ६ ||

वाढवा जीवन, वाढवा आळस |
वाढवा कळस, आळसाचा || ७ ||

द्यावी रे ताणून, सकाळी दुपारी |
संधी पुन्हा भारी, रात्री आहे || ८ ||

आळसासाठी हो, करू नका काही
प्रसन्न तो होई, आपसूक || ९ ||

सांगतो रमेश, नको रे आळस,
लावण्या तुळस, आळसाची || १० ||

- रमेश ठोंबरे 
Ramesh Thombre 

Aug 17, 2011

|| मुर्खांची लक्षणे ||

मुर्खांची लक्षणे
सांगतो तुम्हासी
अवधान थोडे
असू ध्यावे || १ ||

व्यसनांचा संग
बाटलीत दंग
दिसेना उमंग
जीवनात || २ ||

जुगारी दंगला
सोडुनिया कर्म
जगण्याचे मर्म
विसरला || ३ ||

आई- बाप सोडी
मिळताची धन
बावरले मन
शत लोभी || ४ ||

बायकांत गेला
तोची एक 'मेला'
त्याचा अंत झाला
एडसाने || ५ ||

तो हि एक मूर्ख
म्हणूनिया सोडू
त्याला हात जोडू
शेवटाले || ६ ||

- रमेश ठोंबरे

Jul 31, 2011

|| मुकुट मस्तकी ||





मुकुट मस्तकी
पाहूनिया थेट
होयील कि भेट
कैवल्याची ||१|

चंदन तो टिळा
शोभतसे भाळी
ब्रह्मानंदी टाळी
लागलेली ||२||

पितांबर शोभे
परिधान खास
भक्तांचा तो ध्यास
मनी आहे ||३||

सावळे ते ध्यान
कर कटे वरी
चिंता नित्य करी
सकलाची ||४||

वीट पुंडलीके
पावन ती केली
चरणी लागली
सावळ्याच्या ||५|| |

लागली समाधी
देवाचीच आता
आठवण होता
ज्ञानियांची ||६ ||

- रमेश ठोंबरे

Jul 12, 2011

|| तन हे मृदंग ||


तन हे मृदंग,
मन हे पंढरी |
टाळ नाद करी
विठ्ठलाचा ||१||

विठ्ठल -विठ्ठल,
लागलीची गोडी |
सोडीयली होडी,
चान्द्रभागी ||२||

आजचा हि दिन,
नाही मज रिता |
अडलो पुरता,
प्रपंचात ||३||

आठवण येता,
सैर-भैर मन |
शोधीतसे धन
सावळ्याचे ||४||

भेटीसाठी मन,
आतुरले खूप |
पाहिले ते रूप,
देव्हा-यात ||५||

- रमेश ठोंबरे