Feb 28, 2014

…. शोध ….


मी शोधत असतो भूतकाळातले संदर्भ 
मी तपासात असतो वर्तमानातील नोंदी 
मला खुणावतात उत्खनन न होऊ शकलेल्या 
कित्तेक वर्षापासून भूगर्भात आपलं,
अस्तित्व हरवून आणि रहस्य दडवून असलेल्या वास्तू
माझ्याकडे आशेनं पाहतात विद्रोह मांडू न शकलेल्या
माझ्याच घरातील कित्तेक अबोल वस्तू.

तसा मीही शोधतच असतो विसंगतीना सामोरं जाणारं उपेक्षित जग
कित्तेक वर्षांपासून पेटून उठण्यासाठी बेमालूमपणे
धुमसत राहणाऱ्या काळजातली धग.

मला काढावी वाटतात जळमटं,
मला तोडाव्या वाटतात बेड्या,
मला फोडाव्या वाटतात भिंती विद्रोहाला बंदिस्त करू पाहणाऱ्या.

मी शोधत असतो टेकू लावण्यासाठी प्रथ्वी बाहेरची एक जागा,
जिथं उभं राहून मी हलवू शकेल हे निद्रस्त जग.

हे सगळं शोधत असतानाच मी हरवून जातो स्वतः ला,
कारण मला माहित आहे, मी स्वतः हरवलो की,
सुरु होतो पुन्हा नव्याने शोध !
मी शोधू लागतो भूतकाळातले संदर्भ
मी तपासू लागतो वर्तमानातील नोंदी !

- रमेश ठोंबरे 

Feb 23, 2014

मी स्वार्थी आहे



मी स्वार्थी आहे,
कारण मी सहभागी केलं नाही कोणालाही माझ्या दु:खात.
मी लोटून दिलंय स्वतःला
काळ्या कभिन्न कोठडीत …
दु:ख आणि वेदनांनसोबत.
कारण मला माहित आहे,
हे सारं जग एकदिवस मला पाठ दाखवणार आहे
तेंव्हा माझ्या पाठीशी असतील
फक्त माझी दु:ख आणि माझ्या वेदना !

माझी दु:ख माझी आहेत
माझ्या वेदना माझ्या आहेत
त्यांनी शेवटपर्यंत माझी पाठराखण करावी
हाच माझा स्वार्थ !
म्हणूनच
उर बडवून मांडला नाही मी कधीच
माझ्या दु:खांचा बाजार,
अन कधी साजरा केला नाही वेदनांचा उत्सव हि !

- रमेश ठोंबरे 

Feb 7, 2014

--- निष्कर्ष ---



काळ इतका सोकावलाय कि, 
वाटतं, एक दिवस … 
उलथा पालथ होईल साऱ्या विश्वाची, 
काहीच खुणा उरणार नाहीत अस्तित्वाच्या. 
भूगर्भात नाहीशी होईल संपूर्ण मानवजात,
हजारो, लाखो, करोडो … आणखी कितीतरी वर्षासाठी.

पुढे कधीकाळी पुन्हा होईल उत्खनन,
त्यावेळी अस्तित्वात असलेल्या पुरातत्व विभागाकडून,
हडप्पा आणि मोहन्जोधडो च्या धर्तीवर.

मानवाच्या शरीराचे अवशेष नष्ट झालेले असतील
तेंव्हा सापडतील फक्त खोल खोल इमारतींची,
अस्ताव्यस्त शहरं.
पुतळ्यांचे खोल खोल चौथरे,
त्याखाली आणखी खोल विस्तीर्ण चौक ….
चौकापासून पळत सुटलेले अतिक्रमित रस्ते …
आणि चौथऱ्यापासून विलग होऊन बाजूलाच पडलेले,
हात, पाय अन काठी तुटलेले …
निराधार, निराश्रित, असहाय्य दगडांचे कितीतरी पुतळे.

तेंव्हा संशोधनाचा एक भाग म्हणून ….
आपल्याच पूर्वजांचे अस्तित्वाच्या खुणा शोधण्यासाठी,
जमा केले जातील सगळ्या पुतळ्यांचे जीर्ण अवशेष,
आणि अभ्यासपूर्वक काढले जातील काही निष्कर्ष !

"इ.स.न. अमुक अमुक वर्षांपूर्वी,
पाषाण युगात वावरत होती उंचच उंच,
दगडाचं काळीज घेवून फिरणारी दगडाची माणसं,
ज्यांनी निसर्गाशी स्पर्धा करून …
गिळंकृत केला निसर्ग आणि,
ओढवून घेतला पाषाण युगाचा अंत !"

- रमेश ठोंबरे