Mar 12, 2018

रंग भिंतीचे उडाया लागले


रंग भिंतीचे उडाया लागले
स्वप्न नवतीचे पडाया लागले

एक पिल्लू पाहुनी नभचांदवा
पंख नसताना उडाया लागले

सोडला मग हातही जेंव्हा तिने
स्वप्न सत्यावर रडाया लागले

पाहुनी अवयव प्रत्यारोपणे
प्रेम हृदयावर जडाया लागले

संपल्यावर दिवस प्रेमाचे अता ...
मन तिचे अन उलगडाया लागले

बैसल्यावर भूक पंगत पाहुनी
श्लोक कोणी बड्बडाया लागले

राग, मत्सर, द्वेष, कोत्या भावना
जे नको ते सापडाया लागले

- रमेश ठोंबरे

Feb 5, 2018

~ वाटले मिसळून जावे शेवटी ~


°
सोडलेली ती कधी ना भेटली
मी पुन्हा वहिवाट आहे सोडली
°
जीवना मी काय मागू सांग ना
लिस्ट आहे फार माझी लांबली
°
गाव माझे गाव नाही राहिले
लांब पडते आज त्याची सावली
°
वाटले टाळून गेल्यासारखी
पण पुढे खिडकीत होती थांबली
°
मी प्रियेला पाठमोरी पाहिले
अन पुन्हा मग पाठ नाही सोडली
°
सोबतीच्या फार झाल्या वल्गना
सापडेना एक आठवण चांगली
°
वाटले मिसळून जावे शेवटी
पण बघा गर्दीच इथली पांगली
°
- रमेश ठोंबरे

Jan 22, 2018

मी रात्रीला सजवत नाही

…………

मी रात्रीला सजवत नाही
स्वप्न मला जर बघवत नाही

पाऊस 'रडतो' असे म्हणू का ?
पाऊस 'पडतो' म्हणवत नाही

दिवसाला जर छळले मी तर
रात्र मला मग 'निजवत' नाही

मी चंद्राची होळी करतो ....
चंद्र मला जर विझवत नाही

सावलीतल्या मातीमध्ये
स्वप्न उन्हाचे उगवत नाही

माझ्यासाठी अगम्य सारे,
जे जे मजला समजत नाही

जुनेर झाले आयुष्याचे
दु:ख तरी का उसवत नाही ?

- रमेश ठोंबरे