Nov 28, 2012

पर्णकोवळी पहाट जेंव्हा ..

पर्णकोवळी पहाट जेंव्हा, दवभिजल्या अंगणी पसरते 
धुंद बोचरी, थंड हवेची, झुळुक अचानक तनात भरते 

दूर जागत्या क्षितिजावरुनी, रविकिरणांचा उत्सव होतो 
पहाटवेडा निसर्ग मग तो, चैतन्याला कवेत घेतो 

झुळझुळ वाहे नीर कुठेसे, नाद खळाळत कानी येतो
सवे सुगंधी, रान फुलांच्या, वारा मंगल गाणी गातो. 

धाव धावुनी थकले श्वापद, सरितेकाठी जरा विसावे
नेत्र मिटूनी, तोय प्राशिती, समीप मग ते कुणी नसावे 

रान मोकळ्या आभाळाशी, डोंगर करती गूज नवे
मोजत बसते पक्षी-पक्षी, अन पक्षांचे किती थवे ! 

मीच एकटी भटकत असते, माझ्या सोबत रानोमाळी 
मला शोधण्या, येशिल का रे, मंतरलेल्या एक सकाळी 

कधी अनामिक, कातरवेळी, आठवणींची होते गर्दी 
निसर्ग येतो गळा भेटण्या, तुला अचानक होते सर्दी !

- रमेश ठोंबरे

Nov 27, 2012

वेदना



तुला खरच काळजी असेल...
त्या निष्पर्ण, अभागी वृक्षाची
तर खरच त्याला पाणी घालत जा ...
तो बोलत नाही मनातलं ...
पण तू माझ्याबरोबर असलीस कि
नुसता सळसळत असतो !

मला अपराध्यासारख वाटतं ...

का दुर्लक्ष करतेस तू त्याच्याकडं ?
हिरवा गर्द ...,
डवरलेला असायचा म्हणे तो ...
आपली भेट होण्यापूर्वी.

दररोज पाणी घालायचीस

म्हणे तू त्याला ...
हितगुज करायचीस ...
तासनतास त्याच्याशी.
अशी अचानक कशी विसरलीस ?

तू अशी वागत जावू नकोस ....!

उन्मळून पडेल तो एकदिवस.
मला काळजी वाटते ग ...
त्याची आणि माझीही !

- रमेश ठोंबरे

Nov 24, 2012

अंधाराची साथ


अंधाराची साथ तिला, अंधाराचा ध्यास,
तिमिराचा भास झाला, काळोखाचा श्वास.

आवसेची वाट पाहे, पौर्णिमेची भीती
चढणीला रेंगाळली, अस्तापायी गती

अंधाराच नातं तिला, देवाजीनं दिलं,
दुनियेत आली अन, अंधारून आलं.

काजळल्या पापण्यांनी, डोळे केले बंद
काळ्याशार नयनांना, काजळाचा छंद.

खोल खोल विचारांची, मनामंदी दाटी
उजाडल्या अंतरात, काळजाची खोटी

अस काय उजेडाचं, अडलेलं माप ?
प्रकाशात केलं कोण्या, जनमाचं पाप !

- रमेश ठोंबरे
www.rameshthombre.com

‎'मराठी कविता समूहा'च्या 'कविता-विश्व दिवाळी विशेषांक २०१२' मध्य प्रकाशित कविता -