Showing posts with label ढापलेली गाणी. Show all posts
Showing posts with label ढापलेली गाणी. Show all posts

Sep 24, 2013

मनमौजी



आकाशाची छत्री करतो, गातो गाणी 
रस्त्याने तो चालत असतो उडवत पाणी 
कुठे जायचे, काय खायचे, नसते चिंता
डोक्यामध्ये नसते काही, नसतो गुंता !

पाठीवरती घेतो काही, भटकत फिरतो
त्यात कधी तो झाडांसाठी पाणी भरतो
पाहाल तर सोडून दावी ते नेटाने
आणले म्हणतो पक्षांसाठी चारच दाने !

वाट चालते त्याच्यासंगे मार्गक्रमाया
अन वाऱ्याशी सख्य जमवले, दिशा ठरवण्या
थकल्यावरती तरु पाहुनी अडवा होतो
डोक्याखाली दगड घेवूनी झोपी जातो !

घड्याळ म्हणजे, त्याला काही माहित नसते
त्याच्या लेखी जे सगळे ते 'त्याचे' असते.
तुला पाहिजे ? घेवून जा तू तुझेच आहे
मला पाहिजे त्याची चिंता 'त्याला' आहे !

अंतरात माझ्या लपून बसला आहे कुणी
त्याची न माझी ओळख बहुदा आहे जुनी
नाव पुसता हसतो नुसता एकांडा फौजी
मी हसतो, मनात म्हणतो, "आहे मनमौजी !"

- रमेश ठोंबरे 

Oct 6, 2012

तुमच्या-माझ्या मनात

तुमच्या-माझ्या मनात
एक तान्हं मुल रांगत असतं
मी अजून लहान आहे
हेच नव्यानं सांगत असतं.

थोडं कुठं दुखलं कि
आई आई म्हणत असतं
दु:ख तर असतच
पण दाखवण्यासाठी कण्हत असतं.

तुमच्या-माझ्या मनात एक
तान्हं मुल रांगत असतं

झोपाळ्यात बसलं कि
उगाच पोटात गोळा येतो
भीती लपवून चेहरा
खरच किती भोळा होतो ?

मला सांगा
मोठं झालं म्हणून काही
भ्यायचच नाही ?
डोळे मिटून दुध
आम्ही प्यायचच नाही ?     

चटक मटक दिसलं ... कि,
तुमच्या तोंडी पाणी सुटतं
'डॉक्टर गेला खड्ड्यात'
...मन बंड करून उठतं.

त्याला खाली बसवून
त्याची समजूत घालता
गरीब बिचारं मन...
खट्टू होवून बसतं
तुमचा चेहरा पाहून
तुमच्यावरती हसतं  
  
तुम्ही म्हणाल ..
मनात आलं म्हणून
सांगा कधी रांगता येत ?
मी म्हणेल ...
बालपण का सांगा 
खुंटीवरती टांगता येत ?

पण जावू द्या ना आता ..
लगेच कुठे रांगत आहात ?
तुम्ही अजून लहान आहात ..
हेच कशाला सांगत आहात ?     

कारण मला माहित आहे

तुमच्या-माझ्या मनात
एक तान्हं मुल रांगत आहे
मी अजून लहान आहे
हेच नव्यानं सांगत आहे !

- रमेश ठोंबरे
(ढापलेली गाणी) 

Sep 11, 2012

चांगभलं !

पिणाराचं चांगभलं
पाजणाराचं चांगभलं
एक घोट पोटामंदी
स्वस्ताईचं चांगभलं !

घेणाऱ्याचं चांगभलं
देणाऱ्याचं चांगभलं
दोन घोट पोटामंदी
महागाईचं चांगभलं !

चांगल्याचं चांगभलं
पांगल्याचं चांगभलं
तीन घोट पोटामंदी
वाटोळ्याचं चांगभलं !

करणाऱ्याचं चांगभलं
भरणाऱ्याचं चांगभलं
चार घोट पोटामंदी
घोटाळ्याचं चांगभलं !

भ्रष्टाचाराचं चांगभलं
शिष्टाचाराचं चांगभलं
पाच घोट पोटामंदी
या नेत्याचं चांगभलं !

लोकशाहीचं चांगभलं
ठोकशाहीचं चांगभलं
सहा घोट पोटामंदी
या देशाचं चांगभलं !

पिणाराचं चांगभलं
पाजणाराचं चांगभलं
घोटा मागून घोट गेले
या पोटाचं चांगभलं !

- रमेश ठोंबरे
www.rameshthombre.com

Mar 11, 2012

सलाम

समूहाच्या सर्व कवींना सलाम
वाचकांना सलाम ...
लिहित्याना सलाम, राहत्याना सलाम
नवकवींना सलाम,
भावकवींना सलाम.
जुन्या, नव्या सर्वाना सलाम

reply देणाऱ्यांना सलाम
reply घेणाऱ्यांना सलाम
सर्वाना सलाम !
छान छान लिहाणाऱ्यांना सलाम
मान पान देणाऱ्यांना सलाम
सलाम कविहो सलाम !

खोलवर आतलं लिहीणाऱ्यांना सलाम
मनात दाटलं लिहीणाऱ्यांना सलाम.
नवा विचार देणाऱ्यांना सलाम
जुना विचार घेनाराना सलाम.
'स्वप्नात' राहणारांना सलाम
'आठवणीत' जाणारांना सलाम
सलाम कविहो सलाम !

मैत्रीत अडकलेल्यांना सलाम
विरहात भडकलेल्यांना सलाम
पेल्यात बुडालेल्याना सलाम
चढल्यावर धड्कलेल्यांना सलाम
सलाम कविहो सलाम
run च्या ग्लासाला सलाम
कवितेच्या 'क्लासा'ला सलाम
ओळी लिहिणाऱ्यांना सलाम
चारोळी लिहिणाऱ्यांना सलाम
चारोळी लिहिता लिहिता ...
कविता लिहिणाऱ्यांना सलाम
सलाम कविहो सलाम !

दिवसा 'घेनाराना' सलाम
रात्री 'घेनाराना' सलाम
तसाच ....
दिवसा लिहिणाराना सलाम
रात्री लिहिणाराना सलाम,
पहाटे लिहिणाराना सुद्धा सलाम !
लिहिता लिहिता वाचणाराना सलाम
न लिहिता सुद्धा वाचणाराना सलाम
तसाच
न 'घेता' लिहिणाराना सुद्धा सलाम
सलाम कविहो सलाम !

खोलवरचं लिहिणाराना सलाम
वर-वरचं लिहिणाराना सलाम.
सरळ सोपं लिहिणाराना सलाम
चुकली मापं पाहणाराना सलाम.
अर्थ संगणाराना सलाम
व्यर्थ टांगणाराना सलाम.
सर्वाना सलाम ...!
कविता सरळ मांडणाराना सलाम
कवितेमधून भांडणाराना सलाम
सलाम कविहो सलाम !

मोठ्यांसाठी लिहिणाराना सलाम
छोट्यांसाठी लिहिणाराना सलाम
फायद्यासाठी लिहिणाराना सलाम
तोट्यासाठी लिहिणाराना सलाम
त्याच्यासाठी लिहिणाराना सलाम
तिच्यासाठी लिहिणाराना सलाम.
स्वता:साठी लिहिणाराना सलाम.
सर्वाना सलाम
भान विसरून लिहिणाराना सलाम
थोडसं घसरून लिहिणाराना सलाम
सलाम कविहो सलाम !

कवीच्या ... प्रेम कवितेला सलाम
कवीच्या ... विरह कवितेला सलाम
पावसाच्या कवितेला सलाम
पावसाच्या नवसाच्या कवितेला सलाम
काळोखाच्या गर्द काळ्या कवितेला सलाम
उजेडाच्या शुभ्र निळ्या कवितेला सलाम
भुकेल्याची भूक बनलेल्या कवितेला सलाम
चुकेल्याची चूक बनलेल्या कवितेला सलाम
आयुष्यभर झुलवणार्या कवितेला सलाम
भविष्यावर हुलवणार्या कवितेला सलाम ....
सलाम कविहो सलाम
तुमच्या सर्व कवितांना सलाम !

शिकता शिकता चुकलेल्यांना सलाम
चुकता चुकता शिकलेल्यांना सलाम
शिकता शिकता थकलेल्यानाही सलाम
अन
चुकण्यास नथकलेल्यानाही सलाम !
तुम्हा आम्हाला विरहात लोळवनाराना सलाम
तुमच्या आमच्या भावना चाळवनाराना सलाम.
खरं खरं लिहिणाराना सलाम
न्यारं न्यारं लिहिणाराना सलाम
प्यारं प्यारं लिहिणाराना सलाम
अन
खरं सुद्धा प्यारं लिहिणाराना सलाम.
सलाम कविहो सलाम !

रक्तरंजित भडक कवितेला सलाम
बेभान, तडक कवितेला सलाम
हळव्या, कोमल कवितेला सलाम
शामल शामल कवितेला सलाम
पंखाना उभारी देणाऱ्या कवितेला सलाम,
शंखांना माघारी नेणाऱ्या कवितेला सलाम
जगण्याचं भाष्य करणाऱ्या कवितेला सलाम
मरणाचं सुद्धा हास्य करणाऱ्या कवितेला सलाम ...
अस्तित्व बनू पाहणाऱ्या कवितांना सलाम
अस्तित्वहीन कवितांना सुद्धा सलाम.
सलाम कवी हो सलाम !

गझलेला सलाम ...
गाण्याला सलाम ....
अभंगाला सलाम ....
भजनाला सलाम ...
विडंबनाला सलाम ...
पोवाड्याला सलाम ....
लावणीला सलाम ...
त्रीवेनीला सलाम ...
छंदाला सलाम ...
मुक्तछंदाला सलाम ...
कवीच्या प्रत्येक रचनेला सलाम ...
सलाम कविहो सलाम.

कविहो सर्वाना सलाम
तुम्ही भेटलात म्हणून केला सलाम
तुम्ही दिसलात म्हणून केला सलाम
तुम्ही लिहिता म्हणून केला सलाम
तुम्ही पाहता म्हणून केला सलाम ....!
कधी सलाम कवीला ...
कधी सलाम कवीच्या कवितेला.
कधी सलाम कवितेतील शब्दाला
कधी सलाम कवितेतील अर्थाला.

सलाम कवी हो सलाम
समूहाच्या सर्व कवींना सलाम ....!
आणि हो ....
बिनधास्त .... बेधडक .....
खोचक .... भेदक ....
पाडगावकरांच्या 'सलाम' ला सलाम !

- रमेश ठोंबरे

Feb 23, 2012

फार फार बरं वाटलं

माझ्या ऑफिसपासून घराच अंतर तसं कमीच आहे गाडीवर वेगात असलं कि जाणवत हि नाही पण कालच पायी जाण्याचा योग आला तेंव्हा रोजचाच रस्ता नवीन वाटलं, अनोळखी दोस्तांच्या ओळखी झाल्या, तेवड्याच वेळात मोबईलवर उतरलेले हे अनुभव !     


फार फार बरं वाटलं

दररोज जातो गाडीवरून
काल असाच चालत गेलो
फार फार बरं वाटलं
चालणं सुद्धा खरं वाटलं.

चालता चालता करणार काय ?
आपलाच रस्ता आपलेच पाय  !
म्हणून जरा निवांत झालो
कमी स्पीडने सावकाश गेलो.
घड्याळाला हरूण आलो,
पण हरणं सुद्धा जाम पटलं ....  
फार फार बरं वाटलं
चालणं सुद्धा खरं वाटलं.

रस्त्यात दिसला तोच खड्डा,
रोज त्याला वळून जातो.
तो सुद्धा आपला वाटला,
आज त्याला भाळून गेलो.
खड्याकडे पाहताना ....
उगाच मन आतून दाटलं        
पण... फार फार बरं वाटलं
चालणं सुद्धा खरं वाटलं.

रस्त्यात एक भेळवाला,
रोज आशेनं पाहत असतो ...
आज त्याला खरं केलं, 
त्याचं देणं त्याला दिलं.
किती किती हलकं झालं
डोक्यावरचं वजन घटलं.
फार फार बरं वाटलं      
चालणं सुद्धा खरं वाटलं.

रस्त्यामधला एक चौक,    
नेहमी गोल फिरत असतो
आज थोडा सुस्त दिसला,
रोजच्यापेक्षा मस्त दिसला
एक हिरवी सुंदर गाडी ...
तिचं बोनट त्याला खेटलं  
फार फार बरं वाटलं      
चालणं सुद्धा खरं वाटलं.

रस्त्यावरचं एक वळण
उगाच वाकड्यात शिरत  होतं
मी आपला सरळच पण ..
मलाही त्यातलाच धरत होतं.
मी तिकडं केलो नाही.
इतकी सुद्धा प्यालो नाही     
जरी होतं मन पेटलं,
फार फार बरं वाटलं
चालणं सुद्धा खरं वाटलं.

चालून पाय थकले नाहीत
रस्ता सुद्धा चुकले नाहीत
सरळ सरळ घरी आले
इतके सुद्धा हुकले नाहीत
स्वतःच स्व:ताशी बोलणं वाटलं
फार फार बरं वाटलं
चालणं कुठ चालणं वाटलं
स्वतःच स्व:ताशी बोलणं वाटलं !

- रमेश ठोंबरे
(ढापलेली गाणी)


  
 

Dec 5, 2011

ईतकं सुद्धा अवघड नसतं


थकलेल्याला साथ देणं
चुकलेल्याला हात देणं
ईतकं सुद्धा अवघड नसतं
दिव्यासाठी वात देणं

मित्रत्वाला साद देणं
शत्रुत्वाला दाद देणं
ईतकं सुद्धा अवघड नसतं
चर्चेसाठी वाद देणं

असलेल्याचा भास होणं
नसलेल्याची आस होणं
ईतकं सुद्धा अवघड नसतं
वासरासाठी कास होणं

पांगळ्याचा पाय होणं
आंधळ्याची माय होणं
ईतकं सुद्धा अवघड नसतं
दुधावरची साय होणं

भटकल्यावर दिशा देणं
सटकल्यावर नशा देणं
ईतकं सुद्धा अवघड नसतं
'PJ' वरती हशा देणं

गोड मुलीला फुल देणं
दोड मुलीला हूल देणं
ईतकं सुद्धा अवघड नसतं
सजलेल्या झूल देणं

- रमेश ठोंबरे

Nov 17, 2011

|| सोन्याहून सोनसळी ||


सोन्याहून सोनसळी
फुलाहून गोड कळी
कधी अफुचीच गोळी
प्रिया माझी || १ ||

मन नाही थाऱ्यावर
कोकीळाच तारेवर
चांदनीच धरेवर
प्रिया माझी || २ ||

नवतिचे रोप आहे
रोज नवे रूप दावी
रोज नवे वेड लावी
प्रिया माझी || ३ ||

सावलीच उन्हातली
परतली झाडाखाली
आणि पुन्हा वेडावली
प्रीया माझी || ४ ||

फैलावता हात दोन्ही
मिठीत न विसावली
का, न कधी लाडावली ?
प्रिया माझी || ५ ||

- रमेश ठोंबरे

Nov 15, 2011

..................... प्रार्थना ......................


सूर्या सूर्या उन दे
एक नवी धून दे
माझ्या खंबीर मनासाठी
अस्तित्वाची खुण दे

डोळ्या डोळ्या आस दे
एक दृष्टी खास दे
पुन्हा एकदा जगण्यासाठी
एक नवा श्वास दे

ढगा ढगा पाणी दे
ओठावरली गाणी दे
पुन्हा नव्या स्वप्नासाठी
एक नवी कहाणी दे !

धरणी धरणी थारा दे
चोचेला या चारा दे
उबलेल्या मनासाठी
तुझ्या कृपेचा वारा दे !

देवा देवा शक्ती दे
एक नवी युक्ती दे
पुन्हा तुझ्या सेवेसाठी
कष्टावर्ती भक्ती दे !

- रमेश ठोंबरे 
Ramesh Thombre 

Nov 8, 2011

गुगल गुगल गुगललं ........

गुगल गुगल गुगललं पण कुठेच नाही सापडलं
कळत नाही आज हे असं कस घडलं ?
हे सोबत असताना मला कसलीच चिंता नसते
नागमोडी वाट सुद्धा तेंव्हा मला सरळ दिसते.
याच्याच भरोश्यावर माझे हात चालत असतात,
कधी त्याच्याशी कधी तिच्याशी आतलं आतलं बोलत असतात.
हे नेहमी दिवस रात्र फक्त माझ्याच सोबत असतं
माझ्या खांद्याला-खांदा लाऊन Online राबत असतं.
याची एनर्जी भन्नाट असते ...
याच्या उत्साहात नेहमीच दिसते.
याचा वेग अफाट आहे, माझ्या पुढं धावत असतं,
याचं गणित सुसाट आहे, आकडे मोड लावत असतं.
कधी मला सोडत नाही ...
माझं म्हणणं खोडत नाही.
आज मात्र खट्टू झालंय ...
का कुणावर लट्टू झालंय ..?
मला कुटच दिसत नाही,
अन ओळखीचं हसत नाही.
आता माझं होणार कसं ..., याचा विचार मीच करतो,
आता माझं होणार हसं ..., याचा प्रचार मीच करतो.
आठवत नाही ... झालं कसं ...?
हे हरउन .. गेलं कसं ...!
काल पर्यंत सोबत होतं ... माझ्यासाठी राबत होतं ...
आज तिकडं गेलंय खरं ... अन तिचंच झालंय खरं !

- रमेश ठोंबरे 
Ramesh Thombre 

Oct 22, 2011

सांगा कस खेळायचं ? (बोल गाणी मधून)

सांगा कस खेळायचं ?
कण्ह्त कण्ह्त की गाणं म्हणत
तुम्हीचं ठरवा!

डोळे भरुन तुमचा खेळ
कोणीतरी पाहत असतंच ना?
तास तास - दिवस दिवस
तुम्च्यासाठी देत असतंच ना?
वन-वन करायचं की Six, Four मरायचं
तुम्हीचं ठरवा!

संततधार पावसात
जेव्हा काही दिसत नसतं
तुमच्या साठी कोणीतरी
छत्री घेऊन उभं असतं
पावसासाठी कुढायचं की चेंडूसारखा उडायचं
तुम्हीचं ठरवा!

पायातले बूट रुतुन बसतात
हे अगदी खरं असतं;
पण क्षणात आभाळाकडे झेप घेतात
हे काय खरं नसतं?
चिखला मध्ये रुतायचा कि आभाळाला भेटायचं
तुम्हीचं ठरवा!

खेळ अर्धा सरला आहे
असं सुद्धा म्हणता येतं
खेळ अर्धा उरला आहे
असं सुद्धा म्हणता येतं
सरला आहे म्हणायचं की उरला आहे म्हणायचं
तुम्हीचं ठरवा!

सांगा कस खेळयचं?
कण्ह्त कण्ह्त की गाणं म्हणत
तुम्हीचं ठरवा !

- रमेश ठोंबरे
(मंगेश पाडगावकरांची माफी मागून)

Oct 21, 2011

घाबरू नका



कॉलेजातली एक मुलगी
लग्नानंतर भेटली असेल
तेंव्हा जितकी सुंदर होती
त्याहून सुंदर वाटली असेल.

घाबरू नका
हे तारुण्याचं लक्षण आहे
तुम्ही अजून तरुण आहात
हेच यातलं शिक्षण आहे !

तुम्ही म्हणाल ...
तेंव्हा अशी नव्हती हसत
जरी इतकीच सुंदर
होती दिसत !

घाबरू नका
तेंव्हा तुम्ही शोधलत तिला
आज तीच तुम्हाला शोधत असेल
तेंव्हा चटकन उठली होती,
आज नक्कीच सोबत बसेल.

आहो .... ! हे काही भविष्य नाही
हे हि तरुण्याचच लक्षण आहे ....
ती हि अजून तरुण आहे
हेच यातलं शिक्षण आहे !

ती जवळ आल्यावर
तुम्ही आणखी जवळ याल
तिने बोट दिल्यावर
तुम्ही हात हातात घ्याल !

हात हातात आल्यावर
तुम्ही नक्की हरवून जाल
तिने "पुढे काय म्हटल्यावर"
पुन्हा तुम्ही भानावर याला ..

मग मला विचाराल ...
"आता हे कसलं लक्षण आहे ..?"
मी म्हणेल ....
यात माझं हि अधुरंच शिक्षण आहे !

पण घाबरू नका ...!
हे काही खरं नसतं ...
तुझे-माझे श्वास वगेरे ...
नुसते मनाचे भास वगेरे !
लोक म्हणतील "लागलं पिसं,
वयानुरूप होतं असं ...."

पण घाबरू नका
हे तारुण्याच लक्षण आहे
तुम्ही अजून तरुण आहात
हेच यातलं शिक्षण आहे !

- रमेश ठोंबरे
Ramesh Thombre

Oct 17, 2011

असावी - नसावी (कविता)



मस्तीत चालणार
धुंदीत बोलणार
गंधित करणार असावी ... !

गद्यात भेटणार
पद्याने बाटणार
फितूर वाटणार नसावी ... !


काव्याचे अंग
अन रसराज संग
मैफलीत गाजणार असावी ... !

शब्दांच्या ओझ्यात
यमकांच्या बोझ्यात
अर्थाला बुजणार नसावी ... !


छंदाशी खेळणार
गंधाशी भाळणार
मुक्तीत लोळणार असावी ...!

ओळीला ओळ
अन कळेना घोळ
अंत ती पाहणार नसावी ... !


वाचताना छोटी
अन अर्थाला मोठी
सुखद 'अट्याक' असावी ... !

अवघड - बोजड
ज्ञानियाना डोईजड
डोक्याला 'हेड्याक' नसावी ... !


लयीत हसणार
व्रतात बसणार
मनात ठसणार असावी ... !

अलंकाराचे नसणे
वर - वर दिसणे
तालात चुकणार नसावी ... !

- रमेश ठोंबरे 
(Ramesh Thombre)

Aug 15, 2011

५) एक उनाड दिवस जगून पहा !

रोजच तुम्ही काम करता
घड्याळाच्या आकड्यांना हरता
आज ऑफिस दुरून पहा,
एकदा दांडी मारून पहा.

रोज जाता लोकलने
तेच स्टेशन ....
तीच लोकल
त्याच रुळावर तोच वेग
चिमणीवरचा तोच मेघ.
एकदा स्टेशन चुकउन पहा
एकदा लोकल हुकउन पहा.
एक उनाड दिवस जगून पहा !

रोजच चालतो वरण भात
रोजच असतात हातात हात
आज जोडी बदलून पहा
आज 'गोडी' बदलून पहा !

मग Picture वेगळा दिसेल
तुमचाच सिनेमा सगळा असेल !
.... तेव्हा Entry मारून पहा
थोडी Country मारून पहा !
एक उनाड दिवस जगून पहा !

रोज असते तेच गाव
रोज सांगता तेच नाव
एकदा भलत्याच गावी जाउन पहा
अन भलत्याच सारखं वागून पहा !
एक उनाड दिवस जगून पहा !

रोज तुमची तीच ओळख
रोज तुमचा तोच कट्टा
रोज तुमचे तेच मित्र
रोज तुमच्या जुन्याच थट्टा
तुमचा चेहरा बाजूला ठेऊन
एकदा ओळख विसरून पहा !
रोज असता साळसूद तुम्ही
आज थोडे घसरून पहा .
एक उनाड दिवस जगून पहा !

हा भेटो किंवा तो भेटो
रोज तुमचा तोच फोटो !
रोज तुमची तीच style
रोज तुमच तेच Profile.
एकदा Moto बदलून पहा.
एकदा फोटो बदलून पहा.
एक उनाड दिवस जगून पहा !

- रमेश ठोंबरे (Ramesh Thombre)
२८ ऑक्टोबर ०९

४) ----- वेड्याच गाणं ------

तो तसा पागल आहे
डोळ्यावर त्याच्या गॉगल आहे
कधी कधी हसत नाही
रिकामाही बसत नाही.

हातात घेऊन एक काठी
वन-वन फिरत असतो
शांत सावलीत कधी बसून
उन्हा सारखा झुरत असतो.

त्याची कहाणी कळत नाही,
धागा सुद्धा मिळत नाही.

जाता जाता तो एकदा
सिनेमाला जाऊन आला.
येता येता तशीच एक
मैत्रीण सोबत घेऊन आला.

ती हि तशीच पागल असते
मधून मधून उगीच हसते .
हसनारीही पागल आहे
दिसणाराही पागल आहे !

दोघांची आता यारी आहे
ती त्याची प्यारी आहे .
दोघे खूप फिरत असतात,
चौपाटीवर चरत असतात.

तरीही तो पागल असतो
डोळ्यावर त्याच्या गॉगल असतो
कधी कधी रुसत नाही
मान लटकून बसत नाही.

आता त्याची ओळख पटली,
तशी खून सुद्धा थोडी पटली.

तो तिलाच पाहत होता
म्हणून वेड्या सारखा राहात होता

दोघे आता भेटल्यावर
रोज नव गाणं गातात,
गाणं आता संपल्यावर
पुन्हा दोघे एक होतात.

- रमेश ठोंबरे (Ramesh Thombre)
२६ ऑक्टोबर ०९

Aug 10, 2011

३) --------- दु:खाचं गाणं --------

तुम्ही म्हणता जगामध्ये
दु:ख आहे भरलेलं
आणि कुणी - कुणीतर
स्वप्नात सुद्धा हरलेलं.

हरलं तर हरू द्या,
भरलं तर भरू द्या !
दु:खा साठी झुरू नका
हरण्यावरती मरू नका.

तुम्ही तुमचे चालत रहा,
ओठातलं गाणं बोलत रहा.

एक दिवस असा येईल,
दु:ख सुद्धा गाणं होईल.
तेव्हा त्याला गात जा,
हळूच कवेत घेत जा.

मग त्याला सांगून टाका
मी तुला भीत नाही.
फक्त-फक्त सुख म्हणजेच
माझ्या साठी गीत नाही.

मी आनंदात गाणं गातो
दु:खात सुद्धा तसाच न्हातो.

..... पुन्हा म्हणाल ?
जगामध्ये दु:ख आहे भरलेलं
आणि कुणी - कुणीतर
स्वप्नात सुद्धा हरलेलं.

मी म्हणेल .... !

हरलं तर हरू द्या,
भरलं तर भरू द्या !

तुम्ही तुमचे चालत रहा,
ओठातलं गाणं बोलत रहा.

- रमेश ठोंबरे
२७ ऑक्टोबर ०९

Jul 30, 2011

२) --------- मन ---------


झाडावरती चढून मन
दूर दूर फिरत होतं,
उंच उंच जाऊन सुद्धा
जमिनीवरच ठरत होतं.

कधी जाऊन उन्हामध्ये
कोवळे चटके घेत होतं,
कधी येऊन सावलीत
मन माझा होत होतं.

असंच मन कधी कधी
वेगळं-वेगळं वागत असतं
हातात सर्व असतानाही
सगळं-सगळं मागत असतं.

कधी-कधी खट्टू होतं
कधी-कधी लट्टू होतं,
कधी ओझं डावलूनही
ओझ्याखाल्च तट्टू होतं.

तेव्हा मन गात नाही
मला सोडून जात नाही,
तेव्हाच ते माझा असतं.
त्यालाच त्याचं ओझं असतं.

- रमेश ठोंबरे
२६ ऑक्टोबर ०९

१) ---- ढापलेल गाणं ----

सगळी गाणी ढापली आहेत
तरी सुद्धा आपली आहेत ... !
तुमचं आमचं गाणं आहे ....
ओठावरच लेणं आहे.

कधी सूर कधी ताल
शीर्षक सुद्धा ढापल आहे,
कधी शब्द, कधी स्तब्द
एक कडवं आपलं आहे ... !

प्रेरणा सुद्धा ढापली आहे
जश्याच तशी चोपली आहे,
कारण कवी आपला आहे
म्हणून तसाच ढापला आहे.

तुम्ही उगाच घाबरू नका
फक्त Inspiration घेतली आहे
हे काही 'बाईट' नाही
इतक सुद्धा 'वाईट' नाही.

जस गाणं हवा असत
दु:खात थोडं जगण्यासाठी
तशी प्रेरणा हवी असते
शब्द सुख भोगन्यासाठी

म्हणून गाणं ढापल आहे
तरी सुद्धा आपल आहे ... !

तुमच आमच होउन जायील
कवीची आठवण देऊन जायील.


- रमेश ठोंबरे
२६ ऑक्टोबर ०९

ढापलेली गाणी

या धाग्यावरील सर्व गाणी ढापलेली आहेत. कधी ताल, कधी सूर, कधी लय, कधी शीर्षक तर कधी अख्खे गाणे हि.
काही गाणी नुकतीच जन्माला आली आहेत, काहींच्या प्रसव वेदना सुरु आहेत, तर काही अवघडलेल्या अवस्थेत आहेत.

काही आपल्या प्रतिक्रियातून जन्म घेतील... ती अर्थात आपलीही असतील॥, त्यांना पुन्हा जग ढापलेली (न-जायज) म्हणेल !त्याची आपल्याला परवा नाही ! आपल्याला बस inspiration महत्वाच्या आहेत .....
प्रसव वेदना मी सोसलेल्या आहेत तेव्हा त्याच्यावर 'माझाही' अधिकार आहे !

Inspiration आहेच पण कोणाची (कोणाकोणाची) ? ते हि आपणच ठरवा .... अहो धागाच आपला आहे ... !