Aug 29, 2011

रमेश ठोंबरे: मोठी माणसं (ग्रामीण कथा)

रमेश ठोंबरे: मोठी माणसं (ग्रामीण कथा): पहाटचे चार वागले असतेल. सगळं गाव शांत झोपलेलं व्हत. सगळीकड शांतता व्हती. अचानक, एकाएकी शिरपाच्या घराजवळचा हापसा खटा-खटा वाजू लागतो त्या आव...

मोठी माणसं (ग्रामीण कथा)


पहाटचे चार वाजले असतेल. सगळं गाव शांत झोपलेलं व्हत. सगळीकड शांतता व्हती. अचानक, एकाएकी शिरपाच्या घराजवळचा हापसा खटा-खटा वाजू लागतो त्या आवाजात पहाटची शांतता भंग होते.

हाप्स्याचा आवाज कानी पडताच दररोज सकाळ होईस्तोर झोपणारा शिरपा आज खडबडून जागा व्हतो. आपल्या बायकोच्या नावानं बोंब मारीत शिरपा कश्या - बश्या कपड्याच्या घड्या घालतो. शिरपाच्या घड्या घालणं झालं तरी आणखी शिरपाची बायको उठलेली दिसत नाही. तसा शिरपाच तिच्या अंगावरचं गोदाड ओढून बाजूला फेकतो, तशी रकमा वैतागून शिरपावर खेकसते, ' काय लावलंय हे ? झोपू द्या कि थोडा येळ?"

'आग उठ कि तांबडं फुटलंय'
'तांबडं फुटलंय ? काय याड लागलय का म्हते मी ? ', खोपटा बाहीर डोकावत रकमा म्हणते व पुन्हा गोदाड घेऊन झोपू लागते.

'आता उठतीस का घालू कंबरडात लाथ ? ' शीरपाचा पार चढतो.
'आता ग बया, लैच ताव आलाय कि ? काय इशेष काम हाय व्हयं एवढ्या लकवर?' - रकमा
'राती सांगितलेलं इसरलीस व्हयं लगेच. आग मालकाच्या पोरीचं लगीन नाही व्हयं आज?' - शिरपा पुन्हा एकदा आठवण करून देतो.

रकमा आता उठून कपड्याच्या घड्या घालत घालत  म्हणते, 'मालकाच्या पोरीचच हाय नव्ह लगीन, तुमचं तर नाय न ? मग उगच काय नाचाय्लात रातर पसून ?'
'आग मालकाच्या घरचं काम म्हणजे आपल्याच घरचं काम, तसं मालकाच्या घरचं लगीन म्हणजे आपलंच ...'
'आपलंच लगीन म्हणा कि .......?' शीरपाचं बोलन संपायच्या आत रकमा बोलते.
"तसं नाही ग ... पर ..….  बर जाउदी, आत्ता ते नाही कळायचं तुला' .. जा घागर घेऊन ये उगच नसत्या चौकश्या करू नगस' शिरपा.
'घागर ... अन हित्क्या पहाटच पाणी आणायचं का काय म्हते मी ?' - रकमा
'मग आज काही धा-ईस घागरीन भागणार नाय,  धा-ईस टीपाड लागत्याल, लई लोक येणार हाय म्हनं लग्नाला' - शिरपा तोर्यात बोलतो. रकमा घागर काढून देते.
'घरी दोन चार खेपा आणा आदी !' रकमा बजावते
'दोन चार खेपा ! एक घागर बी मिळणार नाय ..... मालकाच्या घरी लगीन हाय तवा सार पाणी तिकडं' असं ऐटीत सांगत, रकमाच बजावणं धुडकावून लावत शिरपा घागरी उचलतो आणि निघून जातो. रकमा बिचारी नवर्याच्या त्या भोळ्या निरागस आणि निस्वार्थी आनंदाकड पाहताच राहते.

शिरपा घागरी घेऊन सरळ हप्स्यावर जातो. तिथ दामू वारीक पाणी हापसत असतो.
घागरी हप्स्यावर ठेऊन शिरपा उभा राहतो.
'काय शिर्प्या आज हित्क्या बिगीन ?' - दाम्याला दमच निघत नाही.
'व्हय, जरा लवकरच आलोय' शिरपा आटोपत घेतो.
'काही इशेष ?' माहित असूनहि सवयी प्रमान चौकशी केल्यावाचून दाम्याला चैन पडत नाही.
'लगीन हाय नव्ह मालकाच्या घरी !'
'मंग तू एकटाच पाणी टाकणार व्हय ?'
'व्हय '
'जादा पैसं दिलं अस्तेल मालकानं.'
'जादा नाय बा, जादा काय म्हून पगार देतोय कि महिन्याला एकशे-ईस रुपये' शिरपा छातीठोक सांगतो.
'मंग पांगरुन तरी करील कि ? लेकीच लगीन हाय तेच्या ... आन तू बी जुना गडी तेंचा खर कि नाय ?' दाम्या खिजवतो.
'पांगरुन ? आन ते कश्या पाई मी काय पाव्हना हाय तेंचा पर तसा माझा मालक लई मोठ्या मनाचा. मला कन्दि बी इसरत नाही बग रातीच बाजाउन सांगितलं मला म्हनला, ' उद्या रानातल काम बंद उद्या त्वा फकस्त घरचं काम बघायच.' शिरपा छाती फुगउन सांगतो.
' व्हय, व्हय, पर पांगरुन करायला पाहिजेत बग नाहीतर पगार काय काम केल्यावर कोणबी देतायाच कि... आर सरपंचाचा बाप मेलता तवा हज्यामतीला गेल्तो म्या सरपंचान काय झ्याक पांगरुन केले म्हणतोस मला,' दाम्या पुन्हा पुन्हा शिर्पाला कपड्यांविषयी सांगून त्याच्या मनात आश्या जागृत करतो. तसा शिरपाचा हि चेहरा टवटवू लागतो. त्याला आशा वाटू लागते.

शिरपा दुपार पस्तोर पाटलाच्या घरी पाणी भरतो आणि पाणी भरून झाल्यावर दुपारी घरी येतो. रकमा घरात सयपाक करीत असते. आल्या आल्या शिरपाला विचारते, 'आत्ता आलात व्हयं, सकाळधरन जेवान नाय का काय नाय, वाट बगून डोळ शिन्ल, घरी पाणी बी नाय टाकलं. म्याच आणल पाणी आन हेव उशीर झाला सयपाकाला, चला जेवान करून घ्या आता.'
'जेवान आन हितं ? येड लागलंय व्हयं तुला ? आग मी तिथच जेवीन कि आज, मालकाच्या घरी लगीन हाय माझ्या. घरी जेवलो तर मालक काय म्हणील !' शिरपा फुशारीन सांगतो.
'आसं व्हयं. मग सकाळी जेव्लाच आसाल माल्काच्यात ? तवाच तर पोट येवढं वरी आलंय.' शिरपाच्या खपाट्या पोटाकड आणि उतरलेल्या चेहर्याकड बघत रकमा विचारते.
'ह्या, आता दुपारीच जेवान हाय, आत्ताच तर कुठ पाणी झालंय, जरा पाणी देतीस का पियाला ?' घाम पुसत शिरपा हुकुम सडतो.
'का माल्कान नाही दिलं पाणी, मालकाच्या घरी तर. धा-ईस टिपाड भरलात नव्ह तुमी ?' रकमा.
'आत्ता तिथ कुमाला येळ हाय ?'
समदीकड नुसती गडबड चालली हाय बग, नुसता गोंधळ च हाय समदा, काय लोक बी आलंय भरमसाट, तरी वराड राह्यलाय आणखी यायचं. मालक तर सारखा येरजार्या घालतंय, हिकडून तिकडं अन तिकडून हिकडं., रक्मान दिलेला पाण्याचा तांब्या तोंडाला लावतो.
'पार म्या म्हणते थोडसं खावा पोटाला तिथ लई उशीर व्हईल., रकमा समजावते.
'नग-नग,' आस म्हणून शिरपा उठतो आणि पुन्हा काही आठवल्यागत खाली बसतो.
' ये रकमा, तेव दाम्या म्हणीत व्हता मालक पान्घूरण बी करल आपल्याला.' दाम्याच बोलणं शिरपा चांगलाच मनावर घेतो.
'याड तर नाही लागलं तुमाला, तुमी काय जावई हाय व्हयं पाटलाच ? म्हण पान्घूरण करल ?' आसं म्हणत रकमा शिर्पाकड पाहून हसू लागते, शिरपा हिरमुसतो त्याचा चेहरा पार सुकून जातो. ....
तो पुन्हा उभा राहतो आणि पुन्हा रकमावर खेकसून मालकाच्या मोठ्या मनाचं गुणगान करीत वाड्याकड निघतो.
दररोज हिथ-तीथ थांबणार शिरपा आज झर झर पावलं टाकीत सरळ वाड्याची वाट धरतो.
शिरपाचा हा उत्साह पाहून गावातील लोक विचारित " काय शिरप्या लई पळतुयास आर जरा टेक कि मर्दा तंबाकू देतो."
पण शिरपा न थांबता पुढ बघून सगळ्याना एकच उत्तर देत होता, "नग - नग ... जरा गडबडीत हाय.... मालकाच्या घरी लगीन हाय नव्ह आज ."

आस शिरपा आज दिवसभर धावपळीत होता त्याला हि त्यातच आनंद वाटत होता. सांगायच्या आधी काम उचलायचा. आता उन उतरलं होतं. सगळे लोक नवरदेवाच्या वर्हाडाची वाट पाहत होते तेवढ्यात वर्हाड आल्याची बातमी समजते. सगळे लोक वेशिकड धावतात. वाजत - गाजत वर्हाड गावात येत. शिरपा आता उगच घाबरून गेल्यासारखा इकड-तिकडं पळत होतां. कधी मालकाच्या मग तर कधी वर्हाडाच्या मागं. शिरपाचा उत्साह ओसंडून वाहत होतां. सगळे आपापल्या कामात दंग होते. शिरपाही प्रत्येक कामात पुढच होतां.

थोड्या वेळाने वर्हाड शाळेकड रवाना झालं. लग्नाच्या आधी आहेर चढवण्याचा कार्यक्रम सुरु झाला. बऱ्याच पाहुण्यांना आहेर चढत होते. शिरपा सर्वांच्या पुढ जाऊन उभा होता. आहेराचे ताट पुढ देत होता. देता देता हळूच ताटातील कपड्यान्कड त्याची नजर झेप घेत होती. कधी हळूच एखादी घडी चाचपून पाहत होता. त्या भारी भारी कपड्यात तो स्वतः चे कपडे शोधत होता. एकामागून एक ताट येत होते... रिकामे होऊन जात होते. आहेराच्या कार्यक्रमान बराच वेळ घेतला त्यामुळे हा कार्यक्रम आटोपता घेतला आणि सर्वच लोक लग्न लावण्यासाठी मंडपात गोळा झाले. थोडस निराश होऊन शिरपान अक्षदाच टोपलं उचललं आणि अक्षदा वाटू लागला. अक्षदा वाटत वाटत शिर्पाच्या मनात पुन्हा - पुन्हा प्रश्न उभे राहत होते .... माझ्या पांघरूनाच काय झालं आसल ? ... मालक इसरला तर नसलं ... ? तशी गडबड होतीच कि मना .... !

इकड अक्षदा वाटायच्या कधी संपल्या .... मंगलअस्टक कधी झाल्या आणि लग्न कधी लागलं हे हि शिरपाला समजलं नाही. जेव्हा फटके आणि आद्ल्यांचे आवाज झाले तेव्हा शिरपा शुद्धीवर आला. तोप्ल्यातले चिमुटभर दाने हातात घेतले आणि नवरा - नवरीकड फेकले.


लग्न पार पडलं सगळे लोक जेवायला बसले शिपाकड कुणाच हि लक्ष नव्हत... तो बिचारा सकाळ पासून उपाशीच होता. पाव्हणे जेवायला बसले होते. वाढेकरी वाढत होते. चापात्याच टोपलं आजून जाग्यावरच होत, त्याच्यासाठी वाढणारा कुणी दिसत नव्हता. शिरपा पुढ आला आन त्यानं टोपलं उचललं. वाढायला सुरवात करणार तेवढ्यात कुणीतरी त्याच्या गालात आवाज केला. त्या इसमाचे पाचीच्या पाची बोटं शिरपाच्या गालावर उमटले.

" चल चल बाजूला हो ... बघतोस काय ... ? आर काही इचार तरी करायचास जातीचा ..... थोडीशी मोकळीक दिली कि लगेच डोक्यावरच चढलास कि .... लोकं खेटर घालतील कि आमाला .... चल हो बाजूला" आस म्हणत त्या इसमानं शिरपला बाजूला ओढलं. शिरपाच्या हातातलं टोपलं खाली पडल तश्या आणखी दोन लाथा शिरपाच्या पेकाटात पडल्या. आधीच सकाळ पासूनचा उपाशी त्यात हा पोटात आणि पाटीत मार. शिरपा पार अर्धमेला झाला. टाकल्या जागेवर बसून राहिला. डोक्यात पुन्हा विचारांचं काहूर माजलं ..... काय झालं आणि कश्यासाठी झालं ..... ? .... ? माझं पाणी चाललं ... मग भाकर वाढली तर कुठ बिघडलं .... ?
....... पर नाही माझच चुकलं, आता पास्तूर आस कधी झालंय का .... ? मग म्याच का उचललं आसल ते टोपलं .... ? मालक माझा हाय म्हणून ... ? पण हे लोकं, हे काय म्हणले असते मला. ... ? माझ्या मालकाला ... ? हो खरच माझंच चुकलं.

पंगती मागून पंगती उठत होत्या .... शिरपाचा मालक पाहुण्यांना आग्रहाने धरून आणून जेऊ घालत होता. पाहुण्यांचे जेवण झाले. गावातल्या लोकांचे झाले ... घरच्यांचे झाले. ..... दरच्यांचे झाले ... एवढंच काय वाढनार्यांचे झाले.... शिरपाच्या वस्तीतले महार-मांग आले वाढण घेऊन गेले .... पण शिरपा आजून उपाशीच होता. त्याच्याकड कुणाचच लक्ष नव्हत. त्याची नजर त्याच्या मालकाला शोधात होती. पण कश्याचा मालक शेवटपर्यंत शिर्पाकड कुणाचंच लक्ष गेलं नाही त्याला कुणीच जेव म्हणलं नाही. शिरपा निराश होऊन तीथच बसून राहिला. शेवटची पंगत उठली आणि कुणीतरी शिरपाला पाहिलं आणि आवाज दिला, " ये शिरप्या आर हिकडं ये. "
शिरपा तो आनंदानं उठला. दहा हत्तीच बळ त्याच्या अंगात आलं. तो धावत पळत त्या बोलाव्नाराकड गेला, " काय झालं आण्णा, कुणी बोलीव्लय .... मालकांनी ?" - शिरपा.

"मालकांनी .... ? काय जेवायचं हाय व्हय आणखीन एकदा, म्हनं कुणी बोलीव्लय मालकांनी ? .... ते पात्र कुणी उचलायचे ....? म्या का तुझ्या बा न !.... जा उचल ते पात्र " आण्णा नावाच्या इसमाने फर्मावलं आणि तो निघून गेला.
....
शिरपाचा धीर सुटला. पोटाला पीळ देऊन त्यानं कशी तरी पात्र उचलली आणि अंधारात वाट काढीत काढीत सरळ घरचा रस्ता धरला. पोटात कावले बोंब मारीत होते. पायात तर चालायला त्राण कसलं ते नव्हतंच.
उठत बसत कसा तरी शिरपा घरी आला. खोपटाच दर ढकललं. मनात विचार केला, आता सरळ रकमाला उठवावं आन शिळ पाकं काय आसल ते खाऊन घ्यावं ... शिरपा रकमा जवळ आला. पण पुन्हा थांबला.... मनात आलं रक्माला काय सांगायचं .... ? मालकानं एवढ्या मोठ्या लग्नात जेवयला सुद्धा घातलं नाही म्हणून. .... नाही नाही यानं तर मालकाची बदनामीच होयील... आज पाणी पिऊनच झोपलेलं बरं.
असा विचार करून शिरपा माठा जवळ आला.... हळूच माठ उघडून पाणी घेतलं. ढसा ढसा दोन तांबे पाणी पिऊन शिरपा अडवा झाला.

अर्धी रात्र उलटून चालली होती. शिरपाला डोळा लागत नव्हता. भूकेन त्याचं शरीर तळमळत होतं तर ... मन निराश होवून बंड करून उठत होतं .... नाही नाही ते विचार मनात येत होते. ज्या मालकासाठी आपण एवढं केलं त्यानं आपल्याला साध जेवायला सुद्धा विचारलं नाही. आशीच असतात का हि मोठी माणसं, लहानांची त्यानं काहीच किंमत नसते .... ? मनात विचार येत होते प्रत्येक प्रसंग डोळ्यासमोर उभा राहत होतां... पण शिरपाच अंतर्मन त्याला वेगळंच सांगत होतं, ते म्हणत होतं, "हीच का तुझी स्वामिभक्ती .... वर्षानुवर्ष ज्याची चाकरी केलीस, ज्याची भाकरी खाल्लीस ... त्याच्यावरच उलटलास ... ? ते हि एकाच दिवसात ... फक्त स्वार्थासाठी बदनाम करतोस त्याला ...? नाही शिरपा नाही तू चुकतो आहेस ... विचार कर विचार ....

अंतर्मनाने सल्ला दिला. शिरपाला तो पटला मनाची भूक भागली ... पण पोटाची भूक ... पोटाचं काय ... ? पोटाची भूक भागवायलाच हवी होती. शिरपा पुन्हा उठला. हळूच भाकरीची दुरडी काढली. भाकर काढून घेतली आणि पाणी घ्याला उठला. पाणी घेतलं आणि बसतानाच भरलेला तांब्या हातातून खाली पडला. रकमा धडपडून जागी झाली. पाहते तर नवरा मांजरावणी डोळे मिटून भाकरीचा घास मोडत होतां. शिरपाची अवस्था पाहूनच रकमान सगळा प्रकार ओळखला काही हि न बोलताच ती उठली शिरपाच्या भाकरीवर पिठलं वाढलं आन शेजारी येऊन बसली. शिरपा खाली मान घालून जेवत होतां.
...
"तुमी लइच मनाला लावून घेतलेलं दिसतंय ... आव कितीबी केलं तरी मला तेव मला आन नोकर तेव नोकरच बगा" - रकमा शिरपाला समजावते.
"आग तसं नाही ग ...... मालक नाही तसं ... पर बाकीची लोक .... मालक तर लई गडबडीत होत बग ... नाहीतर मला आस उपाशी पाठवलं असत व्हय त्यांनी " - शिरपा मालका विरुद्ध काहीही ऐकायला तयार नव्हता.
" बर ते जाउद्या ! तुम्ही जेवा आता .. " - रकमा
शिरपा पुन्हा पुढ बघून जेऊ लागतो ... तेवढ्यात खोपाटाच्या बाहेरून आवाज येतो - "शिरपा ... शिरपा !"
"एवढ्या राती कोण आसल ...? "
"दाम्या तर नसलं ? लई गुदगुल्या होत असत्यात त्याला ... उघड दार जा ... " - शिरपा
रकमा खोपाटाच दार उघडते, हातातला कंदील वर धरते आणि दंगच होते ..... दारात पाटील उभे असतात .... शिरपाचे मालक ...
"मालक तुमी ? इतक्या राती आन आमच्या घरी ... ? " - रकमा
"मालक ... ' शिरपाला हि आश्चर्य वाटत ताट लपउन तो बाहेर येतो. दारात खरच पाटलाला पाहून तोही दंग होतो ... मनातून थोडा घाबरतो हि ... 'उगाच हात लावला म्या भाकरीच्या तोप्ल्याला... '
शिरपा फक्त 'आ' वासून माल्काकड पाहत राहतो.
"आर घरात घेशील का नाय ? " - पाटील
" आ ! व्हय व्हय... या मधी या मालक "
पाटील खोपाटात येतात ... भाकरीची दुरडी आणि शेजारी दडवलेल ताट पाहून सर्व प्रकार पाटलाच्या ध्यानात येतो.
" हे र काय शिरपा, लेका माझ्या घरी सगळं गाव जेऊन गेला आन तू उपाशी .... आर म्या जेव म्हणलं नाही म्हणून काय झालं ... घरच्या माणसाला काय जेवायच सांगावं लागतं व्हय ?" - पाटील शिरपाच्या जवळ जाऊन म्हणतात. शिरपाच्या डोळ्यात पाणी येतं

"मालक चुकलो मी ... ओळखलं नाही मी तुम्हाला ... " शिरपा पाटलाचे पाय धरतो.
" आर आर उठ तू चुकला नाहीस ... चुकलो तो मीच .... लगीन घाईत मी एवढ मोठं काम पार पडलं पार माझ्या घरचाच माणूस उपाशी राहिला कि .... शिरपा मला माफ कर ... चुकलं माझं". पाटील शिरपा पुढं वाकतात. हे पाहून शिरपाला काय बोलाव हेच समजत नाही... ज्या माणसाच्या समोर भले भले माना झुकावतात तो आपल्या समोर आपल्याला माफी मागतोय ? नाही नाही हे शक्य नाही. क्षणभर शिरपा गोंधळून जातो आणि नंतर पाटलाच्या पायावर पडून रडू लागतो.
रकमा हे सर्व पाहून शरमिंदी होते. पाटील शिरपाला उठवतात आणि म्हणतात ..., " शिरपा झालं ते विसरून जा .... उद्या तुम्ही दोघ जोडीनं वाड्यावर या तुमचा आहेर वाट बघतोय तुमची"
"आहेर .... आमचा आहेर " - रकमा
"व्हय पोरी ... आग शिरपा म्हणजे मला घरचाच आहे ...... घरचं पाहिलं कार्य होतं तवा त्याला त्याचं मान नगं व्हय मिळायला... शिरपा येतो आता मी ... आन हो जेऊनच जायच बरका उद्या ..... " - येवढं बोलून पाटील खोपाटा बाहेर पडतात. अंधारात ते दिसेनासे होतात. शिरपा त्यांची पाठमोऱ्या कोलोखात गढून गेलेल्या आकृतीला पाहताच राहतो आणि सहज त्याच्या तोंडून शब्द निघून जातात ... " मोठी माणसं .... खरच मोठी असत्यात .... धानन अन मनान बी .... देवान धन द्यावं तर मन बी आसाच मोठं द्यावं !

- रमेश ठोंबरे 

Aug 28, 2011

|| ज्वारीची करू दारू ||


धान्यापासून मद्य निर्मितेचे परवाने ...
मग काय .... ?

....................................................

शेत शेत हे पिकवू
ज्वारीची करू दारू
द्राक्षालाही मागे सारू
हिमतीने || १ ||

सरकार माय बाप
त्याने दिले वरदान
आता द्यावे अवधान
दारू वरी || २ ||

उगी नको व्यर्थ शंका
अन काळजी खाण्याची
सोय सकळा पिण्याची
होणार हो || ३ ||

दिन-रात दारू गाळू
हेची लागू द्यावे वेडू
अवघे झिंगून सोडू
सर्व जन || ४ ||

भाव नाही ना धन्याला
उपाय काढला नामी
आला पुन्हा तोच कामी
सोमरस || ५ ||

हवे कशाला बंधनं
नको आता परवाने
सारे करा नित्य नेमे
बेधडक || ६ ||

अवघे राष्ट्र बदलू
बदलू हा शेतकरी
नादी लाऊ कष्टकरी
उगे उगे || ७ ||

सरकारी निर्णय हा
सुपीक मतीचा योग्य
फळफळूद्या भाग्य
दारुड्याचे || ८ ||

दया मरण नाही दिले
मृत्युचा हा मार्ग दिला
आत्महत्या करू चला
सवे सवे || ९ ||

बये मंदिरे सांभाळ
शरण तुज आलो मी
दे सुख शांतीची हमी
घरो घरी || १० ||

रमेश ठोंबरे
(Ramesh Thombre)

Aug 25, 2011

माझं पाहिलं प्रेममी कवितेसाठी खूप काही केलं, असं म्हणण्यात तथ्य नाही
जे काही केलं ते कवितेन केलं, या शिवाय दुसरं सत्य नाही।कविता ! माझ्या अत्यंत जिव्हाळ्याची, कवितेची आणि माझी ओळख फार पूर्वी मी जेमतेम बारा वर्षाचा असतानाच झाली, तेव्हाच आमचं प्रेम जमलं। अगदी प्रेम म्हणजे काय हे माहित नसतानाच ! कविता कविता म्हणत मी कवितेच्या जवळ गेलो आणि प्रेम एक प्रेम म्हणताना कवितेच्या प्रेमात पडलो. आमच्यात एक भावनिक नातं निर्माण झालं आणि आम्ही एक-दुसर्या शिवाय अर्थहीन बनून गेलो. तेव्हापासूनची माझी आणि तिची जवळीक आहे. पुढे भेटीनं भेट वाढत गेल्यावर आमच्यातील दरी आणखी कमी झाली आणि शेवटी कविता म्हणजे मी आणि मी म्हणजे कविता असंच काहीसं आमचं नातं निर्माण झालं.

तेव्हा जवळ जवळ सात-आठ वर्षापूर्वी भेटलेली ती कविता थोडीशी अबोली होती, लाजरी होती, वेन्धळी होती बालमनान विचार करणारी आणि बालकथेत रमणारी होती. गम्मत जम्मत करणारी, हळूच इसाप्नितीत शिरून हलकीसी शिकवण देणारी होती. मीही तसाच कविते प्रमाणे अबोल होतो. पण आज माझ्यात बदल झालेत. आज मी बोलू लागलोय. तेव्हा बालमनाने विचार कवित होतो आता विचारांना प्रोढत्व आलंय, सामाजिक जाणीव झालीय. माझ्या बरोबर कविताही बदलत गेलींय तेव्हाची अबोली आता खरच बोलू लागलीय, लाजरी तशीच पण विद्रोही झालीयं, गांधी वादाचा पुरस्कार करते पण एका गाला पुरताच ! दुसर्या वेळेचा गांधी विरोधी आवाज समोरच्याच्या गालात करते. गांधीची काठी म्हणजे कधी तिला आधारस्तभ वाटतो तर कधी त्यांच्या शिकवणीत उणीव राहिल्याची जाणीव हि तिला प्रकर्श्याने होते. आजही शक्य तोवर ती सत्याग्रहच करते तर कधी नाविलाजास्तव तीच अहिंसावादी कविता हिंसक बनते. तेव्हाचा तिचा प्रखर चेहरा मला बरंच काही सांगून जातो. तिच्यातील संयम आणि कुठे तरी धगधगत असणारा निखारा !

आज आमच्यात इतके बदल होऊनही आमच्यातील नातं भावनिक आहे, वैयाक्तिक आहे, त्याचा उहापोह उघड्यावर काही आंबटशौकिन्यांसमोर करावा असा विचारही माझ्या मनात येत नाही। मला नेहमीच वाटत वक्त्याने भाषण कराव खऱ्या श्रोत्यांसमोर, गायकाने आलाप घ्यावा खऱ्या रसिकांपुढे आणि कवीने मनातील कविता ओठावर न्यावी खऱ्या काव्यप्रेमिंपुढे.

मला बऱ्याच वेळेस मोह झाला आमचे 'प्रेमप्रकरण' 'कॉमन' करण्याचा, पण का कुणास ठाऊक कवितेचा विचार करताना मला ते सुरक्षित वाटलं नाही, उगीच मनात भिती वाटली दुनियेच्या नजरांची, समाजाच्या बटबटीत डोळ्यांची आणि आपल्या खेरीज सगळी दुनिया म्हणजे चेष्टेचा विषय आहे असं समजणाऱ्या कूपमंडूकांची ! आज जेव्हा जेव्हा मी या आणि अश्याच काही विचारांनी वेडा होतो तेव्हा कविताच माझी समजूत काढते, माझ्यातील आत्मविश्वास वाढवते. समाजाला सामोरे जाण्याचे आणि चेष्टेखोर नजराणा नजर देण्याचे धर्य माझ्यात असल्याची जाणीव करून देते.

कवितेच्या त्या पहिल्या भेटीनंतर मी तिच्या प्रेमाबद्दल साशंक होतो पण त्यानंतरची प्रत्येक भेट माझा आत्मविश्वास वाढवत गेली, आमचं प्रेम वाढवत गेली। आज मी तिच्या आणि माझ्या भविष्याबद्दल ठामपणे बोलू शकतो यातच मला माझ्या आणि तिच्या प्रेमाची सार्थकता जाणवते.

आज इतक्या वर्षानंतर हि आमच्या प्रत्येक भेटीत मला कवितेच नाविन्य दिसून येते. तिची प्रत्येक कल्पना नवीन आणि या प्रत्येक कल्पनेचा एक नवीन अविष्कार, हेच तिचं खास वैशिष्टे कधी कधी असंच कवितेशी एकरूप झालेलो असताना तिच्यातील एखाद्या नव्या खुबीचा मला साक्षात्कार होतो आणि उगीच मनात विचार येंउन जातो. वाटत इतक्या वर्ष्यानंतर हि मी हिला पूर्णपणे कसा ओळखू शकलो नाही पण आता अनुभवाने मला हे कळून चुकलंय कि, कवितेचं विश्व आणि मन खरोखरच गूढ आहे, तिला पूर्णपणे जाणून घेण्यास निदान हा जन्म तरी अपुरा आहे

आजच्या प्रेमिकांच्या भेटी वाढत जातात तसं त्यांच्यातील शारीरिक अंतर कमी होतं पण मनानं ते पुढ-पुढ उदासीन होऊ लागतात। पहिल्या भेटीनंतरची ती ओढ दुसऱ्या प्रत्येक भेटीनंतर कमी कमी होत जाते आणि आत्मिक प्रेमातील अंतरही वाढत जातं. परंतु कवितेच्या आणि माझ्या प्रेमात आस कधी झालं नाही. कवितेच्या प्रत्येक भेटीत तिच्या अनेक कल्पनांनी मला तिच्यातील अगणित अविष्कारांची जाणीव झाली. प्रत्येक वेळी कवितेची एक नवीनच छबी माझ्यासमोर येत गेली तिचे नाविन्य मला भावत गेलं .... आव्हान देत गेलं . तिच्या आणि माझ्या प्रत्येक भेटीत मी तिच्या अधिक जवळ गेलो आणि नयनांच्या मुक्या संवादांनी आमची मन एकमेकांत गुंतली गेली. कधी तिच्या सौद्न्दार्यान कधी स्वभावानं , कधी लाडिक, विलोभनीय हास्यानं कधी लटक्या रागान तर कधी निरागस प्रेमानं मला मोहित केलं आणि मी प्रेमांकित झालो.

आज मी कवितेशिवाय माझ्या जीवनाचा विचार करतो तेव्हा मला ते निस्तेज वाळवंटा समान भरकटलेल दिसत, कवितेच्या प्रेमाशिवाय जीवन हि कल्पनाच मला करवत नाही. आज कविता मला जो आत्मिक आनंद देऊन जाते तो आनंद मला इतरत्र कुटेच मिळत नाही. माझ्या मनाला भूक आहे ती कवितेच्या प्रेमाची तिच्या प्रेमाशिवाय तिच्याकडून मला फारशी काश्याचीच अपेक्षा नाही. असलीच तर ती विनंती आहे तिचं माझ्यावरील प्रेम सदैव दुव्गुनीत करण्याची.

आता या विद्येच्या अराध्य देवतेकडे, सरस्वती कडे काही मागाव आस काहीच उरलं नाही. मला जे हवं होतं ते तीन न मागताच दिलंय, शब्दांची साथ, यमकांची जाण ! आणि कवितेचं चिरंतर प्रेम. म्हणूनच कविता हेच माझं पहिल प्रेम ! शेवटी त्या आणि तिच्या अराध्य देवतेन स्वत: कवितेन आणि तिच्या रसिकांनी यवढच जाणून घ्याव कि -

माझं पहिल प्रेम फसल्यावर, दुसरं प्रेम हसवू शकणार नाही,
र्हुदय माझं प्रेमांकित आहे प्रेमभंग पचवू शकणार नाही.

--- रमेश ठोंबरे
दि. १/१/१९९७


Anna Deanआण्णा-आण्णा
... म्हणूनच मी पावसाला पाण्यात पाहतो !


पाऊस मलाही आवडायचा
तुला आवडतो तसाच ...!
..
...
कॉलेजातील ते दिवस ....
पाऊस सुरु झाला कि आम्ही कट्ट्यावर ...
येणाऱ्या जाणार्या, पावसात भिजणाऱ्या ..
कॉलेजकन्या पाहताना अगदी भरून यायचं
आभाळ भरून आल्यागत.
आज हि, तर उद्या ती ...
जी पावसात दिसेल ती ...!
आमच्या दिलाची धडकन असायची.
हो आमच्या म्हणजे सर्वांच्या ... दिलाची ...!
मित्रच होत आम्ही तसे ...
सगळं सगळं share करणारे.
..
...
....
पण त्या दिवशी तुला पाहिलं ..
पावसात भिजताना ...
काय झालं काय माहित ..
दिलाची धडकन बंद व्हावी आशी वीज कडाडली.
अन share करणाऱ्या मित्रांच्या comments ..
कानात तापू लागलाय ... !
"क्या दिखती है यार ...!
और उपरसे येह बारीश ... मार डाला ! "
त्या दिवसापासून ...
तू पावसात दिसलीस कि ...
मी share करणं विसरून जातो...!
..
...
....
तुझं प्रेम ... तुझं हसणं, तुझं भिजणं
यात sharing मला नाही जमणार ...!
बस आणखी काय सांगणार ...
पाऊस ....
असाच टपून राहतो ...!
म्हणूनच मी पावसाला पाण्यात पाहतो !

- रमेश ठोंबरे
(Ramesh Thombre)

Aug 24, 2011

असावी - नसावी (कविता)मस्तीत चालणार
धुंदीत बोलणार
गंधित करणार असावी ... !

गद्यात भेटणार
पद्याने बाटणार
फितूर वाटणार नसावी ... !


काव्याचे अंग
अन रसराज संग
मैफलीत गाजणार असावी ... !

शब्दांच्या ओझ्यात
यमकांच्या बोझ्यात
अर्थाला बुजणार नसावी ... !


छंदाशी खेळणार
गंधाशी भाळणार
मुक्तीत लोळणार असावी ...!

ओळीला ओळ
अन कळेना घोळ
अंत ती पाहणार नसावी ... !


वाचताना छोटी
अन अर्थाला मोठी
सुखद 'अट्याक' असावी ... !

अवघड - बोजड
ज्ञानियाना डोईजड
डोक्याला 'हेड्याक' नसावी ... !


लयीत हसणार
व्रतात बसणार
मनात ठसणार असावी ... !

अलंकाराचे नसणे
वर - वर दिसणे
तालात चुकणार नसावी ... !

- रमेश ठोंबरे
Ramesh Thombre

Aug 22, 2011

अन्नागिरी (गुगली -९)बापू - फ़क्त कवितेचा विषय (एक खंत)
कविता लिहिण्यासाठी विषय न आठवल्यास,
मी हमखास बापुंचा विचार करतो.
ओळीने -ओळ आठवण्यासाठी
बापूंच्या विचारांना हाती धरतो.
बापू म्हणजे] आज फक्त कवितेचा विषय झालेत.
आज पर्यंत कित्येकजन बापुना कवितेत घेऊंन गेलेत.
बापुनी मलाही हवा तेंव्हा आधार दिलाय,
'बापू' म्हणजे आज साहित्यातील यशस्वी विषय झालाय.
मी ही आज बिनधास्त बापुना हाती घेतो,
आणि मनासारखी कविता झाल्याचे समाधान भोगतो.
.
.

बापू आज माझ्यासाठी फारच जवळचे झालेत
कित्येकदा ते माझ्या ओळीत सहज बसून गेलेत.
बापूंच्या सत्याने ही मला आधार दिलाय.
कवितेतच मी कित्येकदा सत्याग्रह केलाय.
बापूंची अहिंसाहि फार मोठी वाटते.
हिंसक कवितेच्या शब्दात दाटते.

म्हणूनच बापूंच्या विचारांचा ....
आज हमखास विचार होतोय,
त्यांचा प्रत्येक विचार आज ...
नविन कविता देऊन जातोय.
... कविता - कविता म्हणता बापू धावून येतात
यमकासाठी धडपडणाऱ्या कवीला ...
यमक जुळवून देतात.

- रमेश ठोंबरे
(Ramesh Thombre)

Aug 21, 2011

मंदिर

मंदिर नको मस्जिद नको, नव निर्माण करा दोस्तहो
दुभंगलेत अवशेष जे एकजान करा दोस्तहो !
..

कर्म, धर्म अन स्वाभिमान, जपू मग आपले इमान
बस, एकतेसाठीच झुका, तन कमान करा दोस्तहो !
..

जाहला इतिहास जादा, उकरलेत जे पुरावे
तेच आता ऐक्यासाठी, चला दान करा दोस्तहो !
..

मातेल ती हिंसा इथे, भडकेल तो वनवा नवा
आज आता शांततेचे, एक फर्मान करा दोस्तहो !
..

उगीच वाहता पखाली, चिथावन्या अन भावनांच्या
मन जे रानभैर झाले, आसमान करा दोस्तहो !
..

उठतील हाथ ते हजार, बरबटीत सारे खुशाल
अहिंसे पुढे आज हिंसा, बेजान करा दोस्तहो !
..

काय आहे अशक्य पहा, नव्या दमाच्या सारथ्याला
असह्य झालं जगणं जरा, आसान करा दोस्तहो !
..

मी तुम्हाला सांगतो अन, मीच का साशंक आहे
विश्वास द्या अन जीवाचे, उभे रान करा दोस्तहो !


- रमेश ठोंबरे (Ramesh Thombre)
२७ सप्टेबर २०१०

~ किती जीव घेणे ~


तिचे मुग्ध होणे किती जीव घेणे
तिचे बोलणे हे किती जीव घेणे

तिला काय झाले मला आकळेना
तिला जाणणे हे किती जीव घेणे

मला टाळताना तिला पाहतो मी
तिचे पाहणे हे किती जीव घेणे

तिचे दूर जाणे जिथे साहवेना
तिचे पास* येणे किती जीव घेणे

तिची याद* येता मला त्रास होतो
तिला त्रास होणे किती जीव घेणे

तिचे नाव ओठी रुळावे खिळावे
तिने 'नाव घेणे' किती जीव घेणे

- रमेश ठोंबरे (Ramesh Thombre)
(दि. २३ फेब्रु. २०११)
[ भुजंगप्रयात : लगागा लगागा लगागा लगागा ]

२४. || प्रियेच्या घराची ||


प्रियेच्या घराची
वाट ती बिकट
गाव हि राकट
भासतसे || १ ||

गावामध्ये तिच्या
अवलिया भेटे
तो हि भक्त वाटे
प्रेयसीचा || २ ||

म्हणे प्रेमी तिचा
आहे मीच खास
गत-जन्मी ध्यास
घेतला रे || ३ ||

काय तुझे कर्म
काय तुझी ख्याती
फुगलेली छ्याती
नको इथे || ४ ||

भेटणार कशी
तूज पामराला
जन्म माझा गेला
दर्शनात || ५ ||

- रमेश ठोंबरे
(Ramesh Thombre)
२१ डीसे- २००९

Aug 18, 2011

३) प्रियेचे श्लोक

भुजंगप्रयात - लगागा लगागा लगागा लगागा

प्रियेचे बहाणे पुरे जाणतो मी |
प्रिया फक्त माझी असा तर्क आहे ||
प्रियेच्या दिलाला खुले पहिले मी |
असे ज्यास वाटे भला मूर्ख आहे || ११ ||

प्रियेच्या दिलाला कधी काय द्यावे ?
प्रिया काय बोले, मला सर्व ठावे ||
कुणी काय सांगो कुठे सत्य आहे ?
अहो सर्व खोटे पुन्हा सर्व दावे || १२ ||

नेत्र भारी सदा वेड लावी,
प्रियेच्या कटाक्षी असे फार गोडी |
परी त्या क्षणी ते असे काय होते,
'तुझी मी म्हणाया', तिचे काय जाते ? || १३ ||

तिला आठवावे, तिने पेटवावे,
कळेना दिलाची कशी वात होते |
उगा काय सांगू किती याद येते,
प्रियेच्या विना ती कुठे रात जाते ? || १४ ||

नको रे मना तू असा धीर सोडू ,
मनी मोहरावे प्रियेच्याच साठी |
हवे ते मिळावे, मिळे ते हरावे,
जगावे मरावे प्रियेच्याच साठी || १५ ||रमेश

(Ramesh Thombre


२३. || देवा तुझ्या दारी ||


देवा तुझ्या दारी
प्रियेसाठी आलो
भक्त तुझा झालो
पाव आता || १ ||

प्रियेसाठी आज
भजतो मी तुला
सापडला मला
भाव आता || २ ||

भोगिले रे तिने
माझ्यासाठी खूप
असे काय सुख
दाव आता || ३ ||

तिची वेदना रे
साहवेना खरी
लाव तू किनारी
नाव आता || ४ ||

झाले कष्ट मोठे
परीक्षा हि व्याली
फार वेळ झाली
धाव आता || ५ ||

- रमेश ठोंबरे
दि. २० डिसे. २००९

सविनय कायदेभंग


अमक्या अमक्या कारणासाठी
तमक्या तमक्या संघटनेकडून
आज शहर बंदचं आवाहन ....

वेळ सकाळी १० ची
अर्धवट उघडी दुकाने ...
सामसूम रस्ते ...
हातात लाठ्या काठ्या घेऊन
फिरणाऱ्या टोळभैरवांच्या टोळ्या.
अन वातावरण निर्मितीसाठी ...
रस्त्यावर जुनाट टायरांच्या होळ्या !

वेळ : दुपारी साधारण १ ची ...
सामसूम रस्त्यावर
'प्रवाश्यांच्या सेवेसाठी'
नजर चुकवत धावणारी बस,
अन नजर ठेऊन बसलेल्या टोळीने ...
बरोबर पकडलेली नस !
पुढच्या १० मिनिटात ....
पेटलेली बस ....
पुन्हा सगळे रस्ते ओस !

विजयाचा चित्कार ...
मर्दुमकीचा फुत्कार
अन सरकारचा उद्धार !

वेळ दुपारी २ ची ...
नजर चुकवून उघडलेल्या दुकानाची होळी,
पसार झालेली टोळी,
आणि निरपराध्यांवर गोळी !

जाणता-अजाणता,
वेठीस धरलेली जनता,
भावनांचा उद्रेक... अन पेटलेलं वातावरण.
का ..? कशासाठी ..? सगळं काही विनाकारण !

वेळ : सायंकाळी ६ ची
चार खांदेकऱ्यांसह ...

खादी कपड्यातील बगळे हात जोडून रस्त्यावर.
टगेगीरीच्या जोरावर ...
घडवून आणलेल्या कडकडीत बंदच
श्रेय लाटण्यासाठी !
म्हणे ... बंदला उस्फूर्त प्रतिसाद दिल्याबद्दल
धन्यवाद !

बंदच होता हा ...,
पण आजचा नव्हे ....!

आजचा बंद म्हणजे काय बंद होता ?
कोणीतरी धमकावण्या आधीच सर्व रस्ते, दुकाने बंद आहेत.
शिस्तबद्ध फेऱ्यांमधून निषेध आणि वंदे मातरम च्या घोषणा आहेत.
ने-आण करणारी वाहने बिनदिक्कत धावत आहेत.
पोलिसांच्या लाठ्या मूक साक्षीदार बनल्या आहेत ...
अन बंदुकींच्या गोळ्या आतल्या आत शमल्या आहेत.
सगळा बंद फिका फिका,
अन आजचा बंद म्हणजे
'बंद' या संकल्पनेलाच धोका !
.
..
...
....
.....
बापू ...,
एक विचारू ?
या लोकांना सत्याग्रह तर पटला नाही ना ?
आजचा बंद म्हणजे यांना सविनय कायदेभंग तर वाटला नाही ना !

- रमेश ठोंबरे
(Ramesh Thombre)

हा Thread डिलीट करा.


हा Thread डिलीट करा
हा फारच भयानक आहे,
असत्याच्या जगात
हा सत्याचा तारक आहे.
..
काल भेटला ऑफिसात,
म्हणे हे काय करताय,
टेबलावारून घ्यायचे काम
टेबलाखालून घेताय,
अन काल आलेल्या फाइलला
आज पहिला नंबर देताय ?

मी म्हणालो अरे दादा
अशीच आता रित आहे,
असत्याचा या जगात
सत्याची कुठे जीत आहे ?
..
परवा भेटला सभेत
म्हणे हा नेता खोटा आहे,
अन जुन्य्याच जहिर्नाम्याचा
आज पुन्हा रेटा आहे.

याच्या सत्य वचनाने
त्याची सभा सावरली
अन आमदारकी नंतर येणारी,
ख़ासदारकी ही आवरली.
..
काल दिसला मोर्चात
म्हणे भ्रष्टाचार वाढला आहे,
भ्रष्टाचारी संपवन्यासाठीच
हा मोर्चा काढला आहे.

समोरून आला पोलिसफाटा
म्हणे अहिंसा जिंदाबाद !
लाठ्या मागुन लाठ्या पड़ता
मोर्चा झाला अवघा बाद.
..
म्हणुन म्हणतो...
'तो' Thread डिलीट केलात..
जो सत्य वचन करीत होता,
सत्याच्या अग्रहासाठी ..
स्वतः उपोषण करीत होता.

आता हा Thread डिलीट करा.
हाही त्याचाच अनुयायी आहे.
असत्य आणि हिंसेला
तसाच कष्टदाई आहे !

हा Thread डिलीट करा
हा महाभयानक आहे,
असत्याच्या जगात हा,
देशहितास मारक आहे !

- रमेश ठोंबरे
Ramesh Thombre

Aug 17, 2011

GODFATHER

आईला आज भाव नाही
बापाच्या नावापुढ़ राव नाही.
मम्मीला खरच मुर्दा बनवलय,
अनं डैडीलाही डेड़ केलय.
आज नकोत्याला भाव दिलाय,
वर चढवणा-याला बाप केलाय.
कारण काय तर म्हणे ...
वाशिल्याचा जमाना आलाय.
झुकाना-या समोर झुकायची
अन वेळ प्रसंगी ...
गाढवाचे पाय धरायची,
प्रत्येकाची तयारी आहे...
कारण आशीर्वाद देणा-यापेक्षा,
वाहून नेणा-याशी ,
प्रत्येकाची यारी आहे.
आई बापाची आज नाही ..
राहिली कुणाला कदर.
कारण ज्याला त्याला हवाय..
टेकन देणारा 'Godfather'

- रमेश ठोंबरे
Ramesh Thombre

|| मुर्खांची लक्षणे ||

मुर्खांची लक्षणे
सांगतो तुम्हासी
अवधान थोडे
असू ध्यावे || १ ||

व्यसनांचा संग
बाटलीत दंग
दिसेना उमंग
जीवनात || २ ||

जुगारी दंगला
सोडुनिया कर्म
जगण्याचे मर्म
विसरला || ३ ||

आई- बाप सोडी
मिळताची धन
बावरले मन
शत लोभी || ४ ||

बायकांत गेला
तोची एक 'मेला'
त्याचा अंत झाला
एडसाने || ५ ||

तो हि एक मूर्ख
म्हणूनिया सोडू
त्याला हात जोडू
शेवटाले || ६ ||

- रमेश ठोंबरे

Aug 15, 2011

५) एक उनाड दिवस जगून पहा !

रोजच तुम्ही काम करता
घड्याळाच्या आकड्यांना हरता
आज ऑफिस दुरून पहा,
एकदा दांडी मारून पहा.

रोज जाता लोकलने
तेच स्टेशन ....
तीच लोकल
त्याच रुळावर तोच वेग
चिमणीवरचा तोच मेघ.
एकदा स्टेशन चुकउन पहा
एकदा लोकल हुकउन पहा.
एक उनाड दिवस जगून पहा !

रोजच चालतो वरण भात
रोजच असतात हातात हात
आज जोडी बदलून पहा
आज 'गोडी' बदलून पहा !

मग Picture वेगळा दिसेल
तुमचाच सिनेमा सगळा असेल !
.... तेव्हा Entry मारून पहा
थोडी Country मारून पहा !
एक उनाड दिवस जगून पहा !

रोज असते तेच गाव
रोज सांगता तेच नाव
एकदा भलत्याच गावी जाउन पहा
अन भलत्याच सारखं वागून पहा !
एक उनाड दिवस जगून पहा !

रोज तुमची तीच ओळख
रोज तुमचा तोच कट्टा
रोज तुमचे तेच मित्र
रोज तुमच्या जुन्याच थट्टा
तुमचा चेहरा बाजूला ठेऊन
एकदा ओळख विसरून पहा !
रोज असता साळसूद तुम्ही
आज थोडे घसरून पहा .
एक उनाड दिवस जगून पहा !

हा भेटो किंवा तो भेटो
रोज तुमचा तोच फोटो !
रोज तुमची तीच style
रोज तुमच तेच Profile.
एकदा Moto बदलून पहा.
एकदा फोटो बदलून पहा.
एक उनाड दिवस जगून पहा !

- रमेश ठोंबरे (Ramesh Thombre)
२८ ऑक्टोबर ०९

४) ----- वेड्याच गाणं ------

तो तसा पागल आहे
डोळ्यावर त्याच्या गॉगल आहे
कधी कधी हसत नाही
रिकामाही बसत नाही.

हातात घेऊन एक काठी
वन-वन फिरत असतो
शांत सावलीत कधी बसून
उन्हा सारखा झुरत असतो.

त्याची कहाणी कळत नाही,
धागा सुद्धा मिळत नाही.

जाता जाता तो एकदा
सिनेमाला जाऊन आला.
येता येता तशीच एक
मैत्रीण सोबत घेऊन आला.

ती हि तशीच पागल असते
मधून मधून उगीच हसते .
हसनारीही पागल आहे
दिसणाराही पागल आहे !

दोघांची आता यारी आहे
ती त्याची प्यारी आहे .
दोघे खूप फिरत असतात,
चौपाटीवर चरत असतात.

तरीही तो पागल असतो
डोळ्यावर त्याच्या गॉगल असतो
कधी कधी रुसत नाही
मान लटकून बसत नाही.

आता त्याची ओळख पटली,
तशी खून सुद्धा थोडी पटली.

तो तिलाच पाहत होता
म्हणून वेड्या सारखा राहात होता

दोघे आता भेटल्यावर
रोज नव गाणं गातात,
गाणं आता संपल्यावर
पुन्हा दोघे एक होतात.

- रमेश ठोंबरे (Ramesh Thombre)
२६ ऑक्टोबर ०९

|| पाडव्याच्या ओव्या ||


आज पाडवा पाडवा,
नीट बोल रे गाढवा,
अशी गोडी या सणाची,
दोड बोलून वाढवा.


सन पाडव्याचा खास,
नव संकल्पाचा ध्यास,
सन पहिला पहिला,
नव नव्याचा सुवास.


गुढी दारावरी मोठी,
बघा सजलेली काठी,
कडू लिंबाचे तोरण,
तिला साखरेची गाठी.


साज गुढीचा उभारा,
मनी गजानना स्मरा,
माता पित्याचे चरण,
आज मनोभावे धरा.


आला पाडवा पाडवा,
नवी आशा हि नव्याची,
आज पाडव्याच्या दिनी,
गुढी उभारा नव्याची.


- रमेश ठोंबरे (Ramesh Thombre)
अष्टाक्षरी - अक्षरछंद

Aug 10, 2011

३) --------- दु:खाचं गाणं --------

तुम्ही म्हणता जगामध्ये
दु:ख आहे भरलेलं
आणि कुणी - कुणीतर
स्वप्नात सुद्धा हरलेलं.

हरलं तर हरू द्या,
भरलं तर भरू द्या !
दु:खा साठी झुरू नका
हरण्यावरती मरू नका.

तुम्ही तुमचे चालत रहा,
ओठातलं गाणं बोलत रहा.

एक दिवस असा येईल,
दु:ख सुद्धा गाणं होईल.
तेव्हा त्याला गात जा,
हळूच कवेत घेत जा.

मग त्याला सांगून टाका
मी तुला भीत नाही.
फक्त-फक्त सुख म्हणजेच
माझ्या साठी गीत नाही.

मी आनंदात गाणं गातो
दु:खात सुद्धा तसाच न्हातो.

..... पुन्हा म्हणाल ?
जगामध्ये दु:ख आहे भरलेलं
आणि कुणी - कुणीतर
स्वप्नात सुद्धा हरलेलं.

मी म्हणेल .... !

हरलं तर हरू द्या,
भरलं तर भरू द्या !

तुम्ही तुमचे चालत रहा,
ओठातलं गाणं बोलत रहा.

- रमेश ठोंबरे
२७ ऑक्टोबर ०९

हा Thread डिलीट करा.
हा Thread डिलीट करा
हा फारच भयानक आहे,
असत्याच्या जगात
हा सत्याचा तारक आहे.
..
काल भेटला ऑफिसात,
म्हणे हे काय करताय,
टेबलावारून घ्यायचे काम
टेबलाखालून घेताय,
अन काल आलेल्या फाइलला
आज पहिला नंबर देताय ?

मी म्हणालो अरे दादा
अशीच आता रित आहे,
असत्याचा या जगात
सत्याची कुठे जीत आहे ?
..
परवा भेटला सभेत
म्हणे हा नेता खोटा आहे,
अन जुन्य्याच जहिर्नाम्याचा
आज पुन्हा रेटा आहे.

याच्या सत्य वचनाने
त्याची सभा सावरली
अन आमदारकी नंतर येणारी,
ख़ासदारकी ही आवरली.
..
काल दिसला मोर्चात
म्हणे भ्रष्टाचार वाढला आहे,
भ्रष्टाचारी संपवन्यासाठीच
हा मोर्चा काढला आहे.

समोरून आला पोलिसफाटा
म्हणे अहिंसा जिंदाबाद !
लाठ्या मागुन लाठ्या पड़ता
मोर्चा झाला अवघा बाद.
..
म्हणुन म्हणतो...
'तो' Thread डिलीट केलात..
जो सत्य वचन करीत होता,
सत्याच्या अग्रहासाठी ..
स्वतः उपोषण करीत होता.

आता हा Thread डिलीट करा.
हाही त्याचाच अनुयायी आहे.
असत्य आणि हिंसेला
तसाच कष्टदाई आहे !

हा Thread डिलीट करा
हा महाभयानक आहे,
असत्याच्या जगात हा,
देशहितास मारक आहे !

- रमेश ठोंबरे

Aug 2, 2011

२१ || प्रियेचा तो बंधू ||

प्रियेचा तो बंधू
गुत्त्यावर दिस्तो
झिंगलेला अस्तो
रात दिनी || १ ||

बाप अडबंग
लेक खांब लांब
पिळलेला सुंब
भासतसे || २ ||

अडलेला शब्द
अडलेली वाचा
मदिराच त्याच्या
जळी तळी || ३ ||

बापास मी भ्यालो
लेका पुढे गेलो
अर्ध मेला झालो
दर्पानेच || ४ ||

एक-एक रत्न
अजब ते भारी
पुन्याईच खरी
घराण्याची || ५ ||

- रमेश ठोंबरे

२१. || सोन्याहून सोनसळी ||

सोन्याहून सोनसळी
फुलाहून गोड कळी
कधी अफुचीच गोळी
प्रिया माझी || १ ||

मन नाही थाऱ्यावर
कोकीळाच तारेवर
चांदनीच धरेवर
प्रिया माझी || २ ||

नवतिचे रोप आहे
रोज नवे रूप दावी
रोज नवे वेड लावी
प्रिया माझी || ३ ||

सावलीच उन्हातली
परतली झाडाखाली
आणि पुन्हा वेडावली
प्रीया माझी || ४ ||

फैलावता हात दोन्ही
मिठीत न विसावली
का, न कधी लाडावली ?
प्रिया माझी || ५ ||

- रमेश ठोंबरे