Dec 31, 2014

युवक लढला पाहिजे


युवक लढला पाहिजे
देश घडला पाहजे

उत्तराचे सोड तू
प्रश्न भिडला पाहिजे

देह हा निमित्य ना !
जीव जडला पाहिजे

हास्य ओठी थांबले
मेघ रडला पाहिजे

ही नशा ती काय रे
कैफ चढला पाहिजे

- रमेश ठोंबरे

Nov 27, 2014

दोघांमध्ये वाटून घेवू


दोघांमध्ये वाटून घेवू ताटामधली भाकर,  
भरल्यापोटी नंतर बोलू जागतीक प्रश्नावर

मातीमधल्या बिजापोटी, गहाण असते छप्पर,  
घर-दाराहून प्रिय असावे शेतकऱ्याला वावर !

कोण कुणाचे वाटून घेतो, सुख-दु:खाचे लेणे,  
देणे घेणे म्हणजे केवळ जंगम किंवा स्थावर.

झळा लागता दुष्काळाच्या, लटकून गेल्या माना,
पीक लटकले शेतावरती, शेतकरी झाडावर !  

मी कोणाचा नसतो आणिक जगही माझे नसते,  
वाढत जातो जेंव्हा 'माझा' 'माझ्या मधला' वावर  

- रमेश ठोंबरे

Oct 16, 2014

माझा एक कवी मित्र आहे ….

माझा एक कवी मित्र आहे …. त्याच्या अधून मधून भेटी होत असतात… एखाद्या छोटेखानी कार्यक्रमात कविता ऐकण्या ऐकवण्याचा प्रसंग बर्याचदा येतो, मित्राला कविता म्हण म्हटले कि मित्र थोडासा पुढं सरसावून, शून्यात नजर टाकून त्याची एक गेय कविता तर्रनुम मध्ये सदर करतो, गावाकडच चित्र उभं करणारी कविता असते, कधी दुष्काळ, कधी सुगीचे दिवस, कधी रुसलेले बैल, कधी शेतकर्याची आत्महत्या, असल्या साहित्यातील अतोनात सक्सेसफुल एवजाची तंतोतंत सरमिसळ असतानाही मित्राच्या चेहऱ्यावरचे निरागस भाव शेवटपर्यंत जरा सुद्धा बदलत नाहीत आणि याचं समेवर एकदाचं त्याचं काव्यगान संपतं ! मित्र सर्व श्रोत्यांवर एकवार आपली तीच निरागस नजर फिरवत, त्यांच्या उपस्थितीतीची दाखल घेतो आणि, बसल्या जागेवर पुन्हा थोडं मागं सरकतो.    

पण सांगायचा आणि महत्वाचा विषय हा कि, मित्राची कविता संपल्यावर मला नेहमीच एक प्रश्न पडतो कि "हा प्रत्येक वेळेस जी कविता ऐकवतो ती तीच-ती  कविता असते कि वेगळी कविता असते ? 

Oct 11, 2014

ट्यागीरामांसाठी एक दु:खद बातमी
मित्रानो ट्यागीरामांकडून होणारी छळवणूक हि आता नेहमीचीच आणि तितकीच त्रासदायक गोष्ट झालेली आहे.  कुठली पोस्ट, कुणाला आणि किती वेळेस ट्याग करावी याचे काहीच धरबंद या लोकांना नसते, मुळात 'आपल्या हातात दिलेली हि 'सोय' आपण माकडाच्या हातात 'कोलीत' आल्या सारखी वापरतो आणि इतरांची गैरसोय करतोय' अशी पुसटसी शंका हि या लोकांच्या मनात डोकावते कि नाही याबद्दल माझ्या मनात उत्सुकता वजा शंका नेहमीच असते .

असो, तर या महाभागांच्या कुटील कारस्थानामुळे फेस्बुकावरील बरेच रहिवासी धास्तावलेले आहेत याची मला स्वानुभवातून खात्री झालेली होतीच, त्यामुळेच काही दिवसांपूर्वी एका मध्यरात्री असंच एक तात्कालिक कारण घडलं आणि इतक्या दिवस खदखदत असलेल्या वैचारिक उद्वेगाला मी मूर्त रूप दिलं. लगेच आतापर्यंत 'ट्याग' या सोयीचा 'सोयी' प्रमाणे गैरवापर करणाऱ्या सर्व ट्यागीरामांचा एक धावता आढावा मन:पट्टालावर घेतला, संगणकाचा कि-बोर्ड जवळ ओढला आणि उशीर झाला तर राग शांत होईल आणि पुन्हा हे काम मागे पडेल या भीतीपोटी जितक्या लवकर आणि जोरात बडवता येईल तितक्या लवकर बडवला आणि कार्य हातावेगळ केलं. हे शुभ कार्य होतं ट्यागीरामां कडून होणाऱ्या छळवणूकिची इत्यंभूत माहिती मार्क झुकरबाबाला जमेल तितकी जास्तीत जास्त पुराव्यानिशी सादर करण्याचं.

कुठल्याश्या अतिशय उत्स्फूर्त आणि झपाटलेल्या शक्तीनिशी मी सगळी माहित, पुरावे, ट्यागीरामांचे प्रोफाइल्स, त्यांनी ट्यागलेल्या नावांच्या याद्या, आपल्याला जबरदस्तीने वाचायला भाग पाडलेल्या आणि त्यांनी स्वतःहि एकदातरी वाचल्या असतील कि नसतील इतपत शंका येण्याइतक्या आणि काव्याच्या आसपास हि नजाणार्या कविता. सोबत जड बोजड 'मोबाइल धारक फेसबुककराच्या ब्याटरीचा आणि नेट प्याकचा जीव घेणारे, चित्र विचित्र फोटो' असला काय काय डाटा जोडून त्या सोबत एक निषेध वजा निवेदन तय्यार केले.  त्यात आपण दिलेली हि 'ट्याग'ची सोय म्हणजे आमच्या साठी 'माकडाच्या हातातले कोलीत' ठरली आहे आणि याची धास्ती माझ्यासारख्या कितीतरी सभ्य आणि निरुपद्रवी लोकांनी घेतली आहे, तेंव्हा आपण हे कोलीत वेळीच काढून घ्यावे आणि आमची गैरसोय टाळावी' अश्या आशयाची एक पोस्ट मी फेसबुक ला टाकली, त्यात 'मार्क झुकरबर्ग'  आणि त्यांच्या सोबत, माझ्या आणि त्यांच्या मित्र यादीतील 'कॉमन फ्रेंडस'ना पहिले आणि शेवटचे ट्याग करून टाकले !

हा हा म्हणता या पोस्ट ने 'मार्क'च्या भिंतीवर धुमाकूळ घातला आणि भरीत भर म्हणून आधीच ट्यागीरामांच्या उपद्व्यापामुळे त्रासलेल्या कित्त्येक समदु:खी  लोकांनी त्या पोस्टवर 'ट्याग-सुख' घेतलं. या सगळ्या उठठेवीचा परिणाम असा झाला कि, झुकर बर्ग बाबाला या निवेदनाची दाखल घ्यावी लागली. आतल्या गोटातील खात्रीलायक बातमी अशी कि, माझ्या या निवेदनावर त्यांनी तातडीचा आणि सकारात्मक घेतला आहे.

तर माझ्या मित्रानो, आता निर्धास्त जगा, ट्यागीरामांच्या जाचातून लवकरात लवकर कोणत्याही क्षणी आपली सुटका होणार आहे, ट्याग ची सुविधा बंद करण्यात आल्याची घोषणा झुकरबर्ग बाबा कडून कुठल्याही क्षणी होवू शकते !

ट्यागीरामांनाही या गोष्टीची कुणकुण लागली आहे त्यांनी या निर्णयाच्या विरोधात पुन्हा  झुकरबर्गला निषेधाच्या पोस्टा 'ट्याग' करून आपला निषेध नोंदवण्यास सुरवात केली आहे ……. त्यामुळे तर आपला विजय निच्चीत आहे !  

Oct 5, 2014

सूडडोईवर भाकरीचं गाठोडं,
अन पोटात भुकेचा जाळ घेवून
ती तुडवत राहिली नशिबाची वाट आयुष्यभर !

तिला दिसल्या नाहीत कधीच तिच्या
रखरखत्या हातावरच्या भविष्य रेषा,
तिनं पहिल्या नाहीत कधीच
कुंकवाखालच्या ललाट रेषा !
तिनं कधीच दोष दिला नाही तिच्या नशिबाला,
अन तिचं नशीब लिहिणाऱ्यालाही

ती विसरत गेली तिचा भूतकाळ
ती ढकलत राहिली तिचं वर्तमान,
तिनं कधीच चिंता केली नाही भविष्याची

ती विसरून गेली … स्वतःच जगणं ….
ती विसरून गेली … विरोध
ती विसरून गेली … विद्रोह

ती फक्त ….
तुडवत राहिली नशिबाची वाट आयुष्यभर
अन उगवत राहिली सूड,
निर्ढावलेल्या समाजावर, विनातक्रार !

- रमेश ठोंबरे
       

Sep 17, 2014

* भूतकाळी राजकारणातून ….

लहानपणी शाळेत जावून पाटीवर 'अ' गिरवायच्या दिवसांत, त्यानं म्हशीच्या पाटीशी सलगी केली, तरुणपणात आडल्या नडलेल्यासाठी अंगमेहनत करून  'नारायणाची' भूमिका वठवली … पुढं पक्ष कार्यकर्त्याच्या माध्यमातून नारायणाचा  'नारायणराव' झाला,  सहकाराला हाताशी धरून अक्खा जिल्ला पिंजून काढला, जनसंपर्क आणि ओठावरच्या साखरेनं त्याला एकदिवस 'साखर सम्राट केलं'. पुढं याच आडणी डोक्यानं समाजकारण आणि राजकारणाच समीकरण असं फिट्ट केलं कि, 'काला अक्षर भैस बराबर' वाला हा नेता शिक्षण सम्राट झाला. आई बापाच्या नावानं शिक्षण संस्था काढल्या, जील्यातले शिकले सवरलेले पोरं मास्तर म्हणून चिकटवले. म्हशी मागचे पोरं फावल्या वेळत साळत जावू लागले. या समाजकारणा सोबत कारखान्दारीच राजकारण होतच, गडी आता 'अवजड' नेता झाला.  कधी काळी 'पोरवयात हे धूड म्हशीवर बसून गावभर फिरायचं' असं कुणी जुन्या खोडांन सांगितलं तर आजचे तरणे पोरं 'खोडाकड' सौन्श्यान बघायचे अन निघून जायचे.

तर सांगायचा मुद्दा हा कि, या नेत्याचं जील्याच्या राजकारणात 'दोन्ही अंगानं वजन व्हतं', निवडणुकांच्या काळात यांच्या सभांनी आणि भाषणांनी जिल्ला ढवळून निघायचा, लोकं सभेला गर्दी करायचे, भाषण ऐकण्यासाठी लोकं अर्धा-अर्धा तास आधीच हजर असायचे, 'पिंजारलेल्या झुबकेदार मिशांमधून वळण घेत, वाट काढत, शब्द लोकांच्या कानावर आदळत, तेंव्हा पहिले पंधरा मिनिट तर त्या उच्चारांच्या वेगाशी आणि शब्दफेकिशी जुळवून घेण्यातच कानाची वाट लागायची. पुढं केंव्हातरी शब्दांची आणि कानाची वेवलेन्थ जुळायची म्हणे. (भरगच्च थेटरात दादा कोंडकेंचा पिच्चर पहिल्यांदाच पाहताना म्हणजे ऐकताना मला असा अनुभव आला होता)  निवडणुकांच्या दिवसांत रात्रीतून बाजी पटतवून टाकण्याच्या यांच्या खेळाला पुढं लोक 'हाबडा' म्हणून ओळखू लागले. बरीचं वर्षं अश्या 'हाबाड्याचा' धास्तीवजा अनुभव जिल्यातील भल्या भल्या स्त्री-पुरुष नेते मंडळीन घेतला.          

पण आता दिवस बदलले, वयोमान आणि आकारमानाचा विचार करता एक एक इंच भूमी लढवण्यासाठी स्वतः यांनाच हाबाड्याची गरज पडते, साखर सम्राटाला 'साखर्या रोग' झाला, या शिक्षण सम्राटाला पूर्वी अक्षर वाचता तर येत नव्हतं पण ते निदान दिसायचं, आता अक्षर दिसत हि नाही, 'गडी'वर विसावलेलं हे धूड आज कित्तेक वर्षांपासून टाकल्या जाग्यावर पडून आहे, कूस बदलायची तर दोन आडदांडांची मदत घ्यावी लागते. सर्वांगाला खाज सुटलेली आहे, दिवसभर जमंल तसं आणि जमंल तिथं खाजवणं हा राष्ट्रीय कार्यक्रम (त्यांच्याच भाषेत सांगायचं तर, सहकारी कार्यक्रम) चाललेला असतो.  त्यासाठी दोन स्पेशल माणसं  २४ x ७  या हिशोबान ठेवलेली आहेत. पूर्वीच्या शस्त्रधार्यासारखे ते  हातात तुराट्याचा झाडू घेवून हजरच असत्यात, हिकडं खाजव, तिकडं खाजव, चालुंदे तेच्या मारी ! 

Sep 5, 2014

शर्यत

  
 .
तू शर्यत लावायचास ….
अन रिचवत जायचास पेल्या मागून पेले,
त्याच सोबत तू रिचवायचास,
तुझ्या आतले कितीतरी दु:खं
तुझ्याही नकळत.
.
.
.
आता मला चांगलंच अंगवळणी पडलंय
तुझं हे शर्यत लावत जाणं,
अन हरल्या मनानं
असं दु:खांला जिंकून घेणं


- रमेश ठोंबरे     

Aug 28, 2014

खेळणं


.
मी सकाळी चुलीसमोर
भाकरी थापण्यात मग्न.
तेंव्हा माझ्या लेकीनं मागितलं माझ्याकडं खेळणं
अन मी लगेच दिले तिच्या हातावर
रसरसते दोन निखारे !
तिनेही घेतले तितक्याच सहजतेन
अन खेळत गेली मजेत.
जशी उजव्या हातावरून डाव्या हातावर
उडवत जावी राख.
.
हातावर नव्हता फोड
नव्हता साधा व्रण हि
धगधगत्या निखाऱ्याने
भाजले नाहीत तिचे हात
.
.
.
तिचा वंशाच असावा ….
अभेद्य गड सर करून
अग्निदिव्य पार करणाऱ्या हिरकणीचा !


अनुवाद : रमेश ठोंबरे


.....................................................
मूळ हिंदी कविता

.
खिलौना
.
मैं सुबह चौके में थी
तब मेरी बेटी ने मुझसे खिलौना माँगा
मैंने उसे अंगारे दिए
दो धधकते हुए अंगारे
उसने उन्हें पकड़ा हाथों में
और खेलती रही मजे से
उन अंगारों के साथ
उनकी राख फूंक - फूंककर।
.
न उसके हाथ जले
न वह चीखी-चिल्लाई
उसके हाथों पर
जरा-सा फफोला तक नहीं था।
.
वह अभिमन्यू की तरह
गर्भ में ही सीख गई थी
अंगारों से खेलना
अग्निपथ पर चलना।

- अलकनंदा साने

Aug 25, 2014

फिलिंग 'काम'मय #दादाकोंडके

फिलिंग 'काम'मय #दादाकोंडके

#सनीलियोन, सोबत #काम करताना खूप मज आली. सनी खूप हार्डवर्किंग अभिनेत्री आहे. ती १६ तास न थकता काम करते. ती दिवसभर काम करताना उत्साही असते. तिच्या कडे बघून इतरानाही काम करण्याची इच्छा होते - इति. जय भानुशाली (अजून लहान आहेस!)

Aug 18, 2014

स्वप्नातला भारतबापू,
काल गेलो होतो नेहमीप्रमाणं एका सरकारी कार्यालयात, 
तेंव्हा स्वागताला उभ्या प्युनला पाहून
चुकल्या चुकल्यासारखं वाटलं. 
त्याचं नेहमीचं बेरकी हास्य आज निरागस झालं होतं. 
त्यानं ओळखीनं माझं हसून स्वागत केलं होतं. 

आत गेलो तर अजबच … 
अगदी बरोबर १० वाजताच सगळे कर्मचारी 
आपापल्या टेबलवर हजार होते. 
नेहमी फाईल मध्ये तोंड लपवणारे सगळे 
स्वतःहून समोर येत होते. 
"आपल्याच सेवेत हजर आहोत" 
असा संदेश त्यांचे चेहरे देत होते. 

'चौकशीच्या' खिडकीवरचे वातावरण पाहून तर गहिवर आला, 
नेहमी हिडीस फिडीस करणाऱ्या चेहऱ्याने जेंव्हा कहर केला !
म्हणाला "मी आपली काय सेवा करू शकतो ?
एखाद काम सांगितलत तर मी नक्किच लकी ठरू शकतो !"

ज्याला त्याला चढलेलं स्फुरण होतं, 
कार्यालयात अगदी चैतन्याचं वातावरण होतं. 

हवा तो कर्मचारी त्याच्याच जाग्यावर असणं, 
त्याची नजर आपल्यावर असणं, 
चुटकीसरशी फाईलच सापडणं,
लंच ब्रेकच्या आधी तिच्यावर संस्कार, सोपस्कार होणं,
मोठ्या साहेबाचं अप्रुवल येणं, 
बड्या साहेबाची सही होणं,
त्याने हसत मुखानं अगदी घरच्या सारखी चौकशी करणं, 
जाताना 'या' म्हणून निरोप देणं !

अगदीच गहिवर आला बापू, 
सगळंच कसं स्वप्नवत ! 

बापू आत्मविश्वासानं म्हणाले, 
"अरे त्यात काय एवढं …. हेच तर माझं स्वप्न होतं, 
आज स्वप्नातला भारत सत्यात आलाय" 

तर मित्र म्हणाला … 
असं काही नाही बापू, 
"कालपासून देशात भ्रष्टाचार 'लीगल' झालाय !" 


- रमेश ठोंबरे 

Aug 16, 2014

परवा माझा एक मित्र

परवा माझा एक मित्र टू व्हीलर मोटार सायकल वर चालला असताना त्याला समोरून कोणी तरी उडवले (अपघात हे नेहमी समोरच्याच्या चुकीनेच होत असतात, त्यामुळे दोष कुणाचा होता हा मुद्धा गौण आहे) त्या अपघातात त्याचा पाय मोडला आणि तो दवाखान्यात दाखल झाला. मित्राच्या मित्रा कडून मला हि बातमी समजली…. त्यामुळे आता त्याला पाहायला जाणं भाग होतं …. दररोजच्या धावपळीतून वेळ काडून त्याला दररोज पाहायला जाणं म्हंजे दिव्य काम, पण मित्राच्या प्रेमापोटी आणि नाराजी खातर ते करन भाग होतं. शेवटी मित्र म्हणजे आपल्या बायकोपेक्षाही जीवाभावाचा प्राणी असतो, मी जेंव्हा जेंव्हा त्याला पाहायचो तेंव्हा तेंव्हा तो गहिवरून जायचा आणि त्याच्या डोळ्यात पाणी यायचं.

पहिल्या दिवशी मित्र पालथा पडलेला आन पाय कुठंतरी बांधलेला, दुसर्या दिवशी व्यवस्थित प्लास्टर मधला पाय, तिसर्या दिवशी पायासोबत थोडा हसरा चेहरा, चौथ्या दिवशी सोबत विचारपूस करणारी सुंदर नर्स, कितीतरी फोटो काडून मित्र WhatsApp वर टाकत होता आणि मी इकडून कधी स्मायल्या आणि क्राया टाकत होतो, लगेच मित्र तिकडून गहीवर्ल्याची सेल्फी का काय म्हणतात ती टाकून आपल्या भावना पोचवत होता. किती प्रगती झालीय नाही माणसाची ? नाहीतर …. मला दररोज ४ किलोमीटरची परिक्रमा दिवसातून दोन वेळेस करावी लागली असती.

आता मित्र दवाखान्यात बराच रमलाय स्वतःच्या पायावरून त्याचं लक्ष नर्सच्या पायावर केंद्रित झालंय, तो आता नर्सचे भारी भारी फोटो टाकत असतो, मी हळूच जावून पाहतो पण कुठल्याच भावना व्यक्त नकरता वापस येतो.

काल मात्र मित्राचा डायरेक्ट फोन आला … म्हनला …. "दवाखान्यातल खावून खावून तोंडाला चवच राह्यली नाही …जरा चमचमीत काही तरी घेवून ये …." दुसऱ्या सेकंदाला मी पटकन google.com वर जावून "घरी बनवलेले खाण्याचे चमचमीत पदार्थ" चा search मारला. 

Aug 7, 2014

तुझी सावली होऊन राहावं आयुष्यभर

'तुझी सावली होऊन'* राहावं आयुष्यभर
हेच तर स्वप्न होतं माझं
पण आताशा
हे स्वप्नच लादलं जातंय माझ्यावर
असंच वाटत राहत अधूनमधून …

पूर्वी तुझी सावली पडायची
योग्य दिशेला आणि योग्य उंचीची
आताशा
ओढाताण होते माझी
तुझ्या सोबत अडजस्ट होताना !

मध्यानिलाही आताशा सावली पडते लांबलचक
अन सुर्य अस्ताला जाताना घुटमळते पायात.
कधी कधी दिवसा उजेडात  …
मीच मला शोधत फिरते
आणि रात्रीच्या गर्भ अंधारात
थैमान घालतात सावल्या
एकीच्या दोन आणि
दोन्हीच्या अगणित होवून !

मी पाहिलं होतं स्वप्न
विश्वासाचं, विश्वासानं
तुझ्या सावलीच्या रुपात

माझीच मला होतेय सध्या दिशाभूल
तुझ्या वेगाचाहि येत नाही अंदाज
म्हणून ….
आताशा तुझ्या सोबत असले तरी
तुझी सावली होऊन राहणं
जमेलच असं वाटत नाही !


- रमेश ठोंबरे
('आमकस' च्या लिहा ओळीवरून* कविता या उपक्रमातील दुसरी कविता)

  

Aug 4, 2014

माझ्या अस्तित्वाच ध्योतक


"तुझी सावली होऊन* राहीन मी
आयुष्यभर तुझ्या सोबत"

- दु:ख हळूच कानात कुजबुजलं !


मी म्हणालो हरकत नाही ….
कोणाचीतरी सोबत असणार आहे
शेवटपर्यंत
हे काय कमी आहे ?

दु:खात भले भले सोबत विसरतात
तसे आपण हि विसरून जातो
दु:खाचं चिरंतर देणं.

खर तर …
दु:खातच माणसाला दिसत राहत
भोवताल अगदी सुस्पष्ट

अन दु:खातच माणसं विसरत नाहीत
आपला देह मातीचा असल्याची गोष्ट !

म्हणून मी म्हणालो
"दु:खा,
तुझं सावली होऊन राहणंच
माझ्यासाठी वरदान आहे
नव्हे,
माझ्या अस्तित्वाच ध्योतक आहे ! "

- रमेश ठोंबरेJul 31, 2014

--- निष्कर्ष ---


काळ इतका सोकावलाय कि,
वाटतं, एक दिवस …
उलथा पालथ होईल साऱ्या विश्वाची,
काहीच खुणा उरणार नाहीत अस्तित्वाच्या.
भूगर्भात नाहीशी होईल संपूर्ण मानवजात,
हजारो, लाखो, करोडो … आणखी कितीतरी वर्षासाठी.

पुढे कधीकाळी पुन्हा होईल उत्खनन,
त्यावेळी अस्तित्वात असलेल्या पुरातत्व विभागाकडून,
हडप्पा आणि मोहन्जोधडो च्या धर्तीवर.

मानवाच्या शरीराचे अवशेष नष्ट झालेले असतील
तेंव्हा सापडतील फक्त खोल खोल इमारतींची,
अस्ताव्यस्त शहरं.
पुतळ्यांचे खोल खोल चौथरे,
त्याखाली आणखी खोल विस्तीर्ण चौक ….
चौकापासून पळत सुटलेले अतिक्रमित रस्ते …
आणि चौथऱ्यापासून विलग होऊन बाजूलाच पडलेले,
हात, पाय अन काठी तुटलेले …
निराधार, निराश्रित, असहाय्य दगडांचे कितीतरी पुतळे.

तेंव्हा संशोधनाचा एक भाग म्हणून ….
आपल्याच पूर्वजांचे अस्तित्वाच्या खुणा शोधण्यासाठी,
जमा केले जातील सगळ्या पुतळ्यांचे जीर्ण अवशेष,
आणि अभ्यासपूर्वक काढले जातील काही निष्कर्ष !

"इ.स.न. अमुक अमुक वर्षांपूर्वी,
पाषाण युगात वावरत होती उंचच उंच,
दगडाचं काळीज घेवून फिरणारी दगडाची माणसं,
ज्यांनी निसर्गाशी स्पर्धा करून …
गिळंकृत केला निसर्ग आणि,
ओढवून घेतला पाषाण युगाचा अंत !"

- रमेश ठोंबरे

Jul 30, 2014

दिवसभराच्या रिमझिमत्या पावसानं

दिवसभराच्या रिमझिमत्या पावसानं
हे शहर सुस्तावलकी,
मला आठवते गावाकडची ….
पहिल्या पावसातली लगबग.

शहरातले रस्ते पावसात निर्जन झालेले असतात
अन गावाकडचे रस्ते
ओसंडून वाहत असतात,
पहिल्या पावसाने सुखावलेल्या उत्साही मनासकट !

शहरातल्या रस्त्यांवर उडत राहतात
नव्या कोऱ्या कडक इस्त्रीला डागाळणारे शिंतोडे
अन गावच्या चिकनमातीत रुतत जातात
गुडघ्यापर्यंत पाय विनातक्रार.

शहराला कौतुक  ….
डांबरी रस्ते भिजवणाऱ्या स्वच्छ पावसाचं
अन गावाला आस
बांध फोडून वाहणाऱ्या मातीमिश्रीत गढूळ पाण्याची.

शहरातल्या नाल्यात
गुदमरतो पाण्याचा जीव
अन गावच्या नदीत मोकळे होतात
निपचित पडलेले अगणित श्वास

दिवसभराच्या रिमझिमत्या पावसानं
गोठ्लेल्या मनाला फुटू लागतात घुमारे
अन विद्रोही मन भटकत राहत एकटच माळरानावर ….
द्विधेत असलेल्या शरीराशिवाय
निस्संकोच   !

- रमेश ठोंबरे
 
   

Jul 22, 2014

बरकत व्हती हिरीच्या पाण्याला


गावकीच्या हिरीवर सारं गाव पाणी भरायचं
आन हिरीचं पाणी आजूबाजूच्या साऱ्या पिकाला पुरायचं
कुई कुई आवाज काढत दिवसभर मोट चालायची ….
पाटापाटानं निघालेलं पाणी शेवटच्या ताटापस्तोर पोचायचं.
खाली बायका सकाळ-संध्याकाळ पोहऱ्यानं पाणी भरायच्या,
हिरीच्या पाण्याचं घागरभरून कौतुक करायच्या.  

आजी म्हणायची,
"बरकत हाय मोटंच्या पाण्याला,
ह्या हिरीन कधी दावला नाही तळ,
आजपर्यंत कधी मोट झाली नाही उपडी
आन हिरीवर गेलेला पोहरा कधी आला नाय रिता.
बरकत हाय हिरीच्या पाण्याला !"

आजी गेली त्या वरसाची गोष्ट ….
हिरीवर मोटंच्या जागी मोटार आली,
आन एका मोटरीच्या पुढं कितीतरी मोटारी झाल्या.
पाटाच पाणी तोंड लपवून पाईपामधून सुसाट पळू लागलं,
बायकांना घरबसल्या नळाच पाणी मिळू लागलं !

थारोळ्यावर मोट उपडी झाली,
पोहरा घरच्या वळचणीला पडला,
परंपरेन आधुनिकतेवर तळतळाट ठेवला
अन गावकीच्या विहिरीनं
कधी नाही तो तळ दावला !

पुढं दरवर्षी हिरीवरच्या मोटारीचा कर्नकर्शक आवाज ऐकला कि,
आजी ढगातून कन्हायची  ….

"बरकत व्हती मोटंच्या पाण्याला,
ह्या हिरीन कधी दावला नव्हता तळ,
कधी मोट झाली नाही उपडी आन
हिरीवर गेलेला पोहरा कधी आला नव्हता रिता.
बरकत व्हती हिरीच्या पाण्याला !"

- रमेश ठोंबरे

Jul 17, 2014

ओटी


अर्धा पावसाला संपला तरी
जमीन पुरती ओली झाली नव्हती,
पुढं पाऊस येईल याची हि खात्री नव्हतीच,
तरीही बापाची सकाळ पासून लगबग सुरु होती
मोठ्या उत्साहानं तिफनीची पूजा करत होता,
अर्धओल्या मनात भविष्याची हिरवी स्वप्न पेरत होता.

हळदी कुंकवाच ताट घेवून उभ्या
आईला मी विचारलं,
"घरात खायला दाना नाही,
पाऊस पडण्याची कसलीच आशा नाही…
मग आहे त्यावर पाणी सोडून …
कशाला हे येड्यागत भिकेचे डोहाळे ?"

आई माझ्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली,
"तुला नाही कळणार पोरा,
या येडेपणा मागचं शहाणपण,
शेतकऱ्याला पाहवत नसतं
त्याच्या काळ्या आईचं रितेपण !

पायाला माती लागल्याबिगर तुला
समजणार नाही धरतीच स्थान …

आरं नेहमीच फळाची आशा करून नाही चालत,
कधी कधी मानावं लागतं,
धरतीची ओटी भरण्यात हि समाधान !"

- रमेश ठोंबरे
(माझ्या आई साठी … )

 


     
   

Jul 14, 2014

- दुष्काळ -ही रखरखलेली धरती
हे डोंगर ओके बोके
हा तहाणलेला वारा
हे भरकटलेले झोके

हे ढोर कधीचे फिरते
शोधात भुकेच्या पोटी
हा थवा इथे पक्षांचा …
भिजवीत कोरड्या चोची

दुष्काळ पसरला आहे
पण बोलत नाही कोणी
आवाज नदीचा गेला
अन झिरपून गेले पाणी

हे पाझरलेले मडके
का असे अचानक फुटले ?
या उजाड सायंकाळी
हे बंध कुणाचे तुटले ?

हे पिंडदान कोणाचे ?
वरदान कुणाला ठरले ?
ही काक गर्जना झाली
आभाळ ढगांनी भरले
.
.
.
पाऊस कधीचा पडतो …
धगधगत्या सरणावरती
हे प्रेत कुणाचे जळते
अवसेच्या भयाण राती ?

- रमेश ठोंबरे 

Jul 9, 2014

ओझं


हि कसली भूक आहे या शहरांची 
गिळंकृत करू पाहत आहे सगळा निसर्ग

हि कसली स्पर्धा सुरु आहेत इथल्या इमारतींची ?
उंचच उंच वाढत आहेत 
आभाळाच्या पोटात शिरत आहेत 
अन अजगरासारख्या पसरत आहेत
मोठ मोठे डोंगर पोटात घेत ! 

हा कसला विकास आहे … निरर्थक !
भकास, बकाल आणि निराधार होत आहेत
इथली स्वयंपूर्ण खेडी,
शहरांच्या छत्रछायेत !

आपला गुणधर्मच विसरलेले
हे कसले या शहरातले वांझोटे ऋतू

आणि हे कसलं
अशाश्वत ओझं
डोक्यावर घेवून फिरतो आहे मी …
या शाश्वत जगात
वर्षोनुवर्ष !

- रमेश ठोंबरे 

Jun 15, 2014

फक्त एवढे कराल का ?असाल सेवक जनतेचे तर फक्त एवढे कराल का 
सत्तेसाठी सोडून थोडे सत्यासाठी लढाल का ?


बांधावरती भाव लावता शेतकऱ्याच्या कष्टाचा 
शेतामध्ये उतरून थोडा नांगर हाती धराल का ?


जुनेच खड्डे, जुनीच रोपे, वृक्षारोपण खेळ जुना 
या वर्षीचे वृक्ष लावण्या नवीन जागा पहाल का ?


साक्षर करण्या जनता, तुम्हा शिक्षण खाते दिलेच तर
इयत्ता चौथी पास कराया बाकावरती बसाल का ?


सत्ता पडता झोळीमध्ये विसरून जाता जनतेला
बाप कधी जर समोर आला ओळख देवून हसाल का ?


आवडतो जर फक्त तुम्हाला, फोटो, ब्यानर अन सत्कार !
हार घालतो हजार आम्ही, फोटो पुरते उराल का ?


- रमेश ठोंबरे 

Jun 11, 2014

….

….
मी बंधिस्त केलंय माझं मन
मी शिवून घेतलेत माझे ओठ
मी करकचून बांधलेत माझे हात पाय !
मी नष्ट केलीय माझ्या अभद्र लेखणीतील …
आग ओकणारी शाई
आणि मोडून टाकलीय तिची धारदार निब !
हे सगळं करणं खरच गरजेचं होतं
कारण … हे बंधमुक्त राहिले असते तर
माझ्या मनानं पुकारलं असतं बंड
माझ्या हातपायांनी उभारली असतील आंदोलनं
रक्ताळलेल्या ओठांनी ओलांडले असते
सभ्यतेचे तथाकथित निकष
आणि लेखणीने मोडले असते अभद्रतेचे विक्रम !
म्हणून मी आता व्यक्त होणंच टाळतोय
या सभ्यतेच्या जगात …
निदान आता तरी अबाधित राहील माझं अभिव्यक्ती स्वातंत्र्य !
- रमेश ठोंबरे
www.rameshthombre.com

Jun 5, 2014

आपण माणूसपण जपणारी माणसं आहोत

आपण 
सूर्याचे त्याच्या प्रत्येक किरणासाठी, 
मातीचे तिच्या प्रत्येक सृजनासाठी, 
आणि निसर्गाचे त्याच्या अमर्याद दर्यादिलीसाठी
आभार मानणारी माणसं आहोत.

आपण अंधपणे स्वीकारत नाही आपलं भविष्य,
आपण कधीच विसरत नाही आपला भूतकाळ
आपण जमिनीवर पाय रोवून वर्तमानात जगणारी माणसं आहोत !

सुखात हुरळून जात नसतो आपण
अन दु:खात खचून जाण हि माहित नसतं आपल्याला
आपण संकटाना छातीवर घेणारी माणसं आहोत !

आपण
जीवाला जीव देणारी
आपल्या सभोतालावर प्रेम करणारी,
घामाच्या प्रत्येक थेंबाच महत्व जाणणारी
अन हवेच्या झुळकेच ऋण सांगणारी माणसं आहोत !

आपण विसरून चालणार नाही त्याला दिलेला शब्द
कारण आपण शब्दाला जगणारी माणसं आहोत.
आपण विसरून चालणार नाही आपलं माणूसपण
कारण आपण माणूस म्हणून जन्माला आलेली माणसं आहोत.
आपण माणूसपण जपणारी माणसं आहोत

- रमेश ठोंबरे 

May 20, 2014

हे… नववारी साडी न पोलकं

हे…  नववारी साडी न पोलकं
त्यात टपोरी टग्यांच टोळकं
मला माहित हाय हे सार
हे गाव लई मुलखाच बेरकं …. धृ


या गावाची रीत लय न्यारी
हात धरत्यात भरल्या दुपारी
नाही माहित होणार काही
कधी घेतील तुमची सुपारी
…. हे गाव लई मुलखाच बेरकं … १  


काय सांगू  ह्या गावाची गोष्ट
हे गाव लई खरच फास्ट    
याच भरलंय खरच पाप
याला लागलाय दुहीचा शाप
…. हे गाव लई मुलखाच बेरकं … २  


माझी इमेज हाय लय गोरी
करा खुशाल हवी ती चोरी
आता कश्याला करताय लेट
आज रातीला होवू दया भेट
…. हे गाव लई मुलखाच बेरकं … ३ 


मला भेटाया पाव्हणं थेट
जरा लावा कि इंटरनेट
पेन Drive लावून पुढं
करा व्हीडीओं डावूनलोड
…. हे गाव लई मुलखाच बेरकं … ४  
May 17, 2014

शेतकऱ्याच्या छातीवरचा घाम गझल

शेतकऱ्याच्या छातीवरचा घाम गझल
भगवंताच्या भव्य ललाटी 'नाम' गझल

व्याकूळ राधा शोधत फिरते चहुकडे
राधेच्या हृदयात हरवला 'शाम' गझल

शब्द पाळूनी पित्यास केले धन्य जरी
पुत्र शोभतो कौशल्लेचा 'राम' गझल

रोज उचलतो ओझे आम्ही बळे बळे
आवडते जर असेल तर ते काम गझल

भरली मैफ़ल सोडून जाणे सभ्य कसे ?
आयुष्याला ओतून बनतो 'जाम' गझल

मुक्त बनुनी स्वैर जाहले काव्य जरी
रदिफ़, काफिया, अलामतीवर ठाम गझल

- रमेश ठोंबरे

May 16, 2014

शोध - २


मी बंद करून घेतलंय स्वतःला
घनदाट काळोखाच्या खोलीत …
मी नाकारलंय इथल्या सूर्याला,
त्याच्या सुर्यकिरणांसहित
मला ऐकायच्या नाहीत स्वकीयांच्या हाका,
मला ऐकायच्या नाहीत परकियांच्या धमक्या.
मला नकोय,
झऱ्याच्या पाण्याचा खळखळ आवाज,
झाडांच्या पानगळीची सळसळ,
उघड्या अंगावर तापणाऱ्या उन्हाचा चटका,
थंडगार वार्याची अनाहूत झुळूक.
मी नाकारलंय या सगळ्यांना,
मी विसरू पाहतोय या जगाचं अस्तित्व,
स्वतःचा शोध घेण्यापुरत.

म्हणून मी बंद करून घेतलंय स्वतःला
घनदाट काळोखाच्या खोलीत …
पण … पण काळोख पिच्छा सोडतच नाही !
- रमेश ठोंबरे

May 7, 2014

- आभाळ फाटल्याची गोष्ट -


मी माझ्या आज्या पंज्याकडून 
अन त्यांनी त्यांच्या सात पिढ्यानकडून ऐकलीय
आभाळ फाटल्याची गोष्ट 
दावणीला बांधलेलं माणसाचं जगणं …. 
खुंटीला अडकवून ठेवलेलं भविष्य, 
अन रांगेत उभे असलेले अगणित, अनपेक्षित भोग.

हे सगळं सोबत घेवून जगत राहिलेत माझे पूर्वज 
संकल्प पूर्तीच्या स्वप्नाच्या बळावर
त्यांनी वेळोवेळी केलेले कितीतरी संकल्प
अधुरेच आहेत वर्षानुवर्षापासून ….

मी कधी भूतकाळात शिरलो कि,
तपासून पाहतो माझ्या पूर्वजांच जगणं
अधुऱ्या संकल्पांच्या डायरीची फडफडणारी असंख्य पानं
मी जवळ गेलो कि जखडून टाकतात मला त्यांच्या भूतकाळात,
मला जाणवू लागतं त्याचं उपेक्षित जग
त्यांच्या मनातली तगमग.

अन ते पुन्हा सांगू लागतात,
कधी ओलावा आटल्याची गोष्ट
तर कधी 'आभाळ फाटल्याची गोष्ट'

- रमेश ठोंबरे 

9823195889

Apr 21, 2014

जगण्याची तगमग


दिस उदास उदास, उभा पेटलेला माळ
भुई वाटते उजाड, जसं रांडवेच भाळ
उन तापून तापून, झालं शिवार भकास 
दूर डोंगराच्या आड, कोणी पेटविला जाळ ?

अनवाणी पावलाची, कोण चढते डोंगर
पोर चाले झपाझप, डोई फुटकी घागर
उन तापल्या देहाला, थेंब पाण्याचा पाझर
धापापल्या काळजाची, लाज राखतो पदर

कोण्या गावचं पाखरू, कोण्या झाडावर आलं
थेंबभर पाण्यासाठी, असं परदेशी झालं
चिमण्यांची चिव-चिव, कावळ्याची काव-काव
चोच कोरडी उपाशी, गाणं विसरून गेलं

पोट खपाटीला गेलं, एक हपापल श्वान
चतकोर भुकेसाठी, त्यान 'एक केलं रान'
धाव धावून थकलं, माणसांच्या जागलीत
जीभ बाहेर तोंडाच्या, देहा लटकली मान

झळा उन्हाच्या पेटल्या, जशी पेटलेली आग
दिस कलत चालला, तरी ओसरेना धग
धनी वावराचा राबे, उन्हा तान्हात, रानात
दिसागानिक वाढते, जगण्याची तगमग !

- रमेश ठोंबरे
9823195889

Apr 20, 2014

~~.....~~


क्षणा क्षणाच्या आनंदाला मुकलो आहे
स्वप्नांमागे धावून आता थकलो आहे

'उर्मी सोबत पंखांना या धार पाहिजे'
जाळ्यामध्ये अडकून हेही शिकलो आहे !

पुस्तकातले गणित माझे पक्के होते
वास्तवातली गोळाबेरीज चुकलो आहे

गांधीजींना मानत असतो कणखरतेने
म्हणून बहुदा, हिंसेपुढती टिकलो आहे

'ताठ असावा कणा' सांगते काव्य मराठी
त्या काव्याशी पुन्हा पुन्हा मी झुकलो आहे.

- रमेश ठोंबरे
9823195889 

Apr 19, 2014


क्षणा क्षणाच्या आनंदाला मुकलो आहे
स्वप्नांमागे धावून आता थकलो आहे

'उर्मी सोबत पंखांना या धार पाहिजे'
जाळ्यामध्ये अडकून हेही शिकलो आहे !

पुस्तकातले गणित माझे पक्के होते
वास्तवातली गोळाबेरीज चुकलो आहे

गांधीजींना मानत असतो कणखरतेने
म्हणून बहुदा, हिंसेपुढती टिकलो आहे

'ताठ असावा कणा' सांगते काव्य मराठी
त्या काव्याशी पुन्हा पुन्हा मी झुकलो आहे.

- रमेश ठोंबरे 

Apr 2, 2014

>>>

>>>

गाठण्यास लक्ष 
उभारली गुढी 
हातामध्ये घडी
बांधलेली ।।१।। 

जपतात सारे 
नमो नमो मंत्र 
धनुष्याचे तंत्र 
विसरले ।।२।।

महायुती साठी
समतेचा पूर
इंजिनाचा धूर
दूर दूर ।।३।।

शब्द बाण ओठी
घेवूनी चौकात
काढिती औकात
स्वकीयांची ।।४।।

'आप'ल्या हातात
घेवूनीया झाडू
कॉर्पोरेट लाडू
बोलू लागे ।।५।।

टाकतात धाडी
खादितले टोळ
बोलेरोची धूळ
खेडो पाडी ।।६।।

उघडूच नये
अपेक्षांची मुठ
धोंड्या परी विठ
मऊ म्हणा ।।७।।

परिवर्तन हे
घडायास हवे
पक्षी यावे नवे
घरट्यात ।।८।।

- रमेश ठोंबरे 

Mar 20, 2014

....


परीक्षा नळीतला का होतो कलर गुलाबी ?
श्वासातुनी प्रियेच्या भिनते जहर गुलाबी 

स्वतः शिकारीच येथे झालेत जायबंदी 
येथील पाखरांची आहे नजर गुलाबी

पाठीत वार त्याने हे जानुनीच केला
प्रेमात पोळलेले असते जिगर गुलाबी

मी बोलतोय त्याची खात्री मलाच नसते
ओठावरून जेंव्हा फिरते अधर गुलाबी

येथे वसंत फुलतो, र्हदयात बारमाही
शहरातल्या ऋतूंचा असतो बहर गुलाबी

तो वारला तरी पण आशा जिवंत होती
सरनावरीच त्याच्या आली खबर गुलाबी

- रमेश ठोंबरे
9823195889

Mar 19, 2014

सायेब

"सायेब,
येळात येळ काढून, 
मोडक्या तोडक्या बैलगाडीत बसून… 
अख्या पानंदीचा चिखुल तुडवीत,
तुम्ही माझ्या वावरात आलात…
कालपस्तोर, पोटाला चिमटी काढून अन
डोळ्यात तेल घालून जोपलेल्या माझ्या
मोसंबीच्या झाडांना वावरात आडवं बघून
मटकन खाली बसलात.
चिकण्या मातीच्या चिखलानं तुमचं बुड माखून गेलं"

"सायेब
पांढऱ्या शुभ्र खादीला जवा मातीचं रंग आलं,
तुमचं माझं दु:खं सायेब एक झालं"

"डोळ्यादेखत होत्याचं नव्हतं झालं,
सायेब, गारपिटीन सारं जगणं झोडपून नेलं
सायेब माझं दु:खं तुम्हींच चांगलं मांडू शकाल ,
माझ्या वतीनं तुम्ही तुम्ह्च्या सायबाला भांडू शकाल."

पुढलं एका, लोकहो !
"म्या जवा वाकल्याल्या झाडाच्या मोसंबीला हात घातलं,
तवा ढुंगण झाडत सायेब पटकन चिखलातनं उटलं."
म्हणलं, "नगं नगं पांडबा, मला काहीचं नसू दे !,
पुढच्या महिन्यात इलेक्शन, 'तवा लक्ष असू दे !', "

- रमेश ठोंबरे
9823195889

Mar 14, 2014

असं दु:ख अवकाळीअसं दु:ख अवकाळी
त्याले वखुत कळना
भर उनाळ्यात देवा
त्याले सुटलाय पान्हा

आस पावसाची होती
तवां उडाला फुफाटा 
झाले अनवाणी पाय 
साऱ्या भेगाळल्या वाटा

बीज रुजायाचे तवा
नाही थेंब ओला दिला
हाता तोंडाशी आलेला
घास पावसानं नेला

असं फाटलं आभाळ
जसं फाटलेलं ऊर 
कसं कोणत्या दु:खाच 
सांग मातलं काहूर ?

अरे आभाळाच्या देवा
कसा झालास दगड
जिनं वावहून गेलं
आता आवर पाझर

माझ्या आभाळाच्या देवा
आता थांबव आबाळ
पुन्हा रुजाया राहू दे .
माझ्या पायामध्ये बळ

- रमेश ठोंबरे 

Feb 28, 2014

…. शोध ….


मी शोधत असतो भूतकाळातले संदर्भ 
मी तपासात असतो वर्तमानातील नोंदी 
मला खुणावतात उत्खनन न होऊ शकलेल्या 
कित्तेक वर्षापासून भूगर्भात आपलं,
अस्तित्व हरवून आणि रहस्य दडवून असलेल्या वास्तू
माझ्याकडे आशेनं पाहतात विद्रोह मांडू न शकलेल्या
माझ्याच घरातील कित्तेक अबोल वस्तू.

तसा मीही शोधतच असतो विसंगतीना सामोरं जाणारं उपेक्षित जग
कित्तेक वर्षांपासून पेटून उठण्यासाठी बेमालूमपणे
धुमसत राहणाऱ्या काळजातली धग.

मला काढावी वाटतात जळमटं,
मला तोडाव्या वाटतात बेड्या,
मला फोडाव्या वाटतात भिंती विद्रोहाला बंदिस्त करू पाहणाऱ्या.

मी शोधत असतो टेकू लावण्यासाठी प्रथ्वी बाहेरची एक जागा,
जिथं उभं राहून मी हलवू शकेल हे निद्रस्त जग.

हे सगळं शोधत असतानाच मी हरवून जातो स्वतः ला,
कारण मला माहित आहे, मी स्वतः हरवलो की,
सुरु होतो पुन्हा नव्याने शोध !
मी शोधू लागतो भूतकाळातले संदर्भ
मी तपासू लागतो वर्तमानातील नोंदी !

- रमेश ठोंबरे 

Feb 23, 2014

मी स्वार्थी आहेमी स्वार्थी आहे,
कारण मी सहभागी केलं नाही कोणालाही माझ्या दु:खात.
मी लोटून दिलंय स्वतःला
काळ्या कभिन्न कोठडीत …
दु:ख आणि वेदनांनसोबत.
कारण मला माहित आहे,
हे सारं जग एकदिवस मला पाठ दाखवणार आहे
तेंव्हा माझ्या पाठीशी असतील
फक्त माझी दु:ख आणि माझ्या वेदना !

माझी दु:ख माझी आहेत
माझ्या वेदना माझ्या आहेत
त्यांनी शेवटपर्यंत माझी पाठराखण करावी
हाच माझा स्वार्थ !
म्हणूनच
उर बडवून मांडला नाही मी कधीच
माझ्या दु:खांचा बाजार,
अन कधी साजरा केला नाही वेदनांचा उत्सव हि !

- रमेश ठोंबरे 

Feb 7, 2014

--- निष्कर्ष ---काळ इतका सोकावलाय कि, 
वाटतं, एक दिवस … 
उलथा पालथ होईल साऱ्या विश्वाची, 
काहीच खुणा उरणार नाहीत अस्तित्वाच्या. 
भूगर्भात नाहीशी होईल संपूर्ण मानवजात,
हजारो, लाखो, करोडो … आणखी कितीतरी वर्षासाठी.

पुढे कधीकाळी पुन्हा होईल उत्खनन,
त्यावेळी अस्तित्वात असलेल्या पुरातत्व विभागाकडून,
हडप्पा आणि मोहन्जोधडो च्या धर्तीवर.

मानवाच्या शरीराचे अवशेष नष्ट झालेले असतील
तेंव्हा सापडतील फक्त खोल खोल इमारतींची,
अस्ताव्यस्त शहरं.
पुतळ्यांचे खोल खोल चौथरे,
त्याखाली आणखी खोल विस्तीर्ण चौक ….
चौकापासून पळत सुटलेले अतिक्रमित रस्ते …
आणि चौथऱ्यापासून विलग होऊन बाजूलाच पडलेले,
हात, पाय अन काठी तुटलेले …
निराधार, निराश्रित, असहाय्य दगडांचे कितीतरी पुतळे.

तेंव्हा संशोधनाचा एक भाग म्हणून ….
आपल्याच पूर्वजांचे अस्तित्वाच्या खुणा शोधण्यासाठी,
जमा केले जातील सगळ्या पुतळ्यांचे जीर्ण अवशेष,
आणि अभ्यासपूर्वक काढले जातील काही निष्कर्ष !

"इ.स.न. अमुक अमुक वर्षांपूर्वी,
पाषाण युगात वावरत होती उंचच उंच,
दगडाचं काळीज घेवून फिरणारी दगडाची माणसं,
ज्यांनी निसर्गाशी स्पर्धा करून …
गिळंकृत केला निसर्ग आणि,
ओढवून घेतला पाषाण युगाचा अंत !"

- रमेश ठोंबरे 

Jan 29, 2014

गांधी म्हणजे ...गांधी म्हणजे तुमच्या आमच्या बापांचा बाप,
गांधी म्हणजे हिंसेवर ओढलेला चाप.

गांधी म्हणजे संयम आणि कणखरतेचा कणा,
गांधी म्हणजे जगत्गुरु तुकोबाची वीणा.

गांधी म्हणजे लोकशाहीत शांततेचा दूत,
गांधी म्हणजे स्वावलंबी चरख्यावरच सूत.

गांधी म्हणजे त्याग आणि सहिष्णुतेची मूर्ति,
गांधी म्हणजे सत्य आणि सत्याग्रहाची स्फूर्ति.

गांधी म्हणजे शांती आणि क्रांतीचा आधारस्तंभ
गांधी म्हणजे तिरंग्यातील तो़च शुभ्र रंग.

गांधी म्हणजे नेहमीच एक विचार 'नेक'
गांधी म्हणजे कधी कधी ग्यांनबाची मेख.

गांधी म्हणजे आहे एक अजब कोड़,
सोड्वायच तर सोडाच, आताशी कळलय थोड़.

गांधी म्हणजे काळाच्या भाळावरचा ठसा,*
तुम्ही आम्ही कोण कुठले, काळही पुसणार कसा ?

गांधी म्हणजे गांधीच.. त्यांना तोलणार कसं
स्वातंत्र्याचे भाष्य.. गांधीशिवाय बोलणार कसं ?

- रमेश ठोंबरे
दि. २४ मे २००९
(महात्मा गांधी पुण्यतिथी निमित्त एक जुनीच रचना)

Jan 27, 2014

प्रिय बापू

प्रिय बापू,

स.न.वि.वि. 

बापू बऱ्याच दिवसापासून विचार करतोय 
तुम्हाला पत्र लिहिण्याचा … 
समोर कागदांची भेंडोळी अन शाई भरलेलं पेन घेवून बसलोय खरा … 
पण मेंदू मात्र रिकामाच आहे. 
कदाचित मन भरून आलं कि होत असाव असं. 
परवा नेल्सन मंडेला तुमच्याकडे पोहचल्याचं कळल … 
वाटलं पत्र लिहून ठेवलं असतं तर बरं झालं असतं 
मंडेलांसोबत पाठवता तरी आलं असतं तुमच्याकड. 
यात दोन फायदे होते. 
एकतर तुमच्याच अनुयायाच्या हस्ते ते तुम्हाला मिळालं असतं 
आणि दुसरा फायदा असा कि . . . 
ते तुम्हाला खात्रीनं मिळाल असतं. 
काय आहे बापू …. 
मोठ मोठ्या शहरात हरवत चालली आहेत माणसं,
सध्या मोठ मोठ्या माणसांचेहि पत्ते सापडत नाहीत… 
खुद्द पोस्टमनला सुद्धा. 
तुमच्याकडहि असंच असणार म्हणून शंका आली. 

असो… 
देशात कुठं काही भलं बुरं घडलं कि… 
चिंता वाटायला लागते भविष्याची. 
लिहावं वाटतं एक पत्र 
सांगाव वाटतं देशाचं वर्तमान …. 
कारण हा देश तुमचा आहे, 
हे 'एक रुपया चांदी का, 
देश हमारा गांधी का !' 
म्हणण्याच्या वयापासून रुजलय मनावर. 
म्हणून जे घडतंय ते तुमच्याशी 'शेअर' करावं 
असं वाटतं बर्याचदा. 

माहित आहे मला, 
तुम्हाला हे सगळं वर्तमान समजत असेलच. 
पण संवादही व्ह्यायलाच हवेत ना ? 
म्हणून लिहायचं म्हणतोय एक पत्र !
जे विचार आहेत मनात ते येतील निदान कागदावर तरी !

विचारावरून आठवल बापू, 
गांधी विचारांना विरोध होता तेंव्हाही आणि 
विरोध होतोय आजही … 
तेंव्हाचा विचारपूर्वक असायचा … आजचा निरर्थक आहे 
आज गांधी विचारांना विरोध म्हणजे 
आधुनिकतेच लक्षण मानलं जातं, 
अन गांधी म्हणजे आजच्या तरुण पिढीसाठी 
कॉलेज कट्ट्यावरचा चेष्टेचा विषय झालाय, 
एवढाच काय तो फरक !

आज कधी चेष्टा तर फ्यशन म्हणून होत असते गांधीगिरी. 
हातात जळत्या मेणबत्त्या घेवून दिला जातो शांतीचा संदेश !
आत्मक्लेश आणि सत्याग्रह राहिला नाही आता. 
उपोषण तेवढं सुरु असतं अधून मधून …
शहरात अजीर्ण म्हणून आणि 
खेड्यात दोन वेळचं खायला मिळत नाही म्हणून.

तुम्ही म्हणाला होतात 'खेड्याकडे चला' 
खेडी बदलण्याचं तुमचं स्वप्नं ! 
पण आजची खेडी बिघडलीयत बापू …
तांबड फुटायच्या आत शेतावर निघणारा शेतकरी …. 
उन डोक्यावर येईपर्यंत हुंदडत असतो गावभर, 
अन दुपारनंतर शहरातल्या रस्त्यावर !
काय हरवलाय ? माहित नाही 
काय शोधतोय ? माहित नाही. 
शेतकऱ्यांच्या पोरांची …. 
ना खेड्याची … ना शहराची … अशी गत झालीय,
दिवसभर कुठल्यातरी झेंड्याच्या आधारावर 
कुठल्यातरी टोळी सोबत फिरत असतात … 
वर्तमान हरवल्यासारखी !

राजकारण नावाच वार सहज घुसतं डोक्यात,
जे आयुष्य मातीत गेलं तरी समजत नाही यांना. 
राजकारण करणारे राजकारण करत राहतात
देश विकून पुन्हा वरमानेन चरत राहतात. 
अन हि पोर सैरभैर फिरत असतात,
रस्ता चुकलेल्या वासरासारखी. 

राजकारण राजकारण करत असताना 
समाज … समाजकारण विसरलाय बापू, 
सत्य, अहिंसा आणि प्रेम !
हे पुस्तकातले शब्द … 
आता पुस्तकातून हि बाद होतात कि काय 
याचीच भीती वाटतेय बापू !

माणूस स्वार्थी झालाय,
समाजात राहून समाजापासून दूर पळतोय माणूस !
देशात राहून देशाला विकतोय माणूस, 
माणूस असून माणसाला फसवतोय मानून !
म्हणून चिंता वाटते मला तुमच्या देशाची, 
हो तुमच्याच देशाची … 
कारण कदाचित आजची आम्ही हा देश तुमचाच मानतो, 
आमच्या नाकर्तेपणाच खापर तुमच्या नावे फोडण्यासाठी !

पण अगदीच आणि सगळाच निराशाजनक आहे असं हि म्हणता येणार नाही, 
कारण … काही लोकांचं काम पाहिल कि, 
वाटतं याच लोकांच्या बळावर … 
करतो आहे देश थोडीफार प्रगती !
सगळा देश स्वार्थाला कवटाळून बसला असताना …. 
सगळी सगळी भौतिक सुखं नाकारून अन 
दुर्गम आणि दुर्लक्षित भागाला आपली कर्मभूमी मानून 
आयुष्य खर्ची घालतात ही लोक समाजसेवेसाठी …
तेंव्हा करावा वाटतो यांच्या कार्याला 
निदान एक नपुंसक सलाम तरी !
तशी त्यांना आशा नसतेच कशाची …. 
"आलात तर तुमच्या सोबत 
नाही आलात तर तुमच्या शिवाय" 
या एकाच जिद्दीवर सुरु असतो यांचा प्रवास …
जगाच्या रहाटगाडग्यापासून दूर, 
माणुसकी विसरलेल्या माणसांपासून अलिप्त !
हे बोलतात फक्त कृतीतून, 
ते हि स्वतःशीच, आत्ममग्न ! 

कृतीशिवाय सगळंच फोल… 
हे सांगितलत तुम्ही तुमच्या कृतीतून 
त्याचा वारसा पुढे चालवत आहेत हे लोक
अन हे माहित असताना हि 
शब्दांचे खेळ करणारा … 
माझ्यासारखा फुटकळ कवी लिहितो गांधीवादावर फक्त कविता !
सांगतो सत्य आणि असत्याच्या गोष्टी … 
सांगतो हिंसा आणि अहिंसेच्या कथा. 
निर्दयतेचा उद्रेक होतो आणि अशांतीच अराजक माजत तेंव्हा 
मांडतो पानो पानी शांती आणि करुणेच्या व्यथा. 

ज्याप्रमाणे कोणी नेता आपला भूतकाळ गुंडाळून …
चारित्र्यावर गोमुत्र शिंपडून, 
डोक्यावर गांधी टोपी घालून … 
बोलू लागतो 'गांधीवादाची भाषा' 
तुमच्या शिकवणीची, 
तुमच्या तीन माकडांच्या शिकवणीची आठवण म्हणून !

मग आम्हीहि पांढर्या शुभ्र खादीतील नेता पहिला कि,
त्याच्या भूतकाळावर बोलणं सोडून देतो,
आणि भविष्याचा वेध घेतो. 
जे दिसतं त्याला सत्य समजून स्वीकारतो आणि … 
जे कानावर पडतं ते पवित्र करून घेतो !
कारण तुमच्या माकडांची शिकवण थोडी सकारात्मक 
करून घेतली आहे आम्ही आमच्याच सोयीसाठी …!

'सकारात्मकता' हा तर तुमच्या जीवन शैलीचा एक भाग, 
म्हणून काही नाही तर निदान लिहील एक पत्र … 
आणि तेवढ्याच अधिकारांन लिहिली शेवटी …
कुठे काही असह्य घडलं कि, अन तुमची आठवण आली कि, 
तुमच्या गांधीवादावर फक्त कविता लिहिणारा … 

तुमचा,
फुटकळ कवी

- रमेश ठोंबरे 

ता.क. : डोक्यात विचारांची नव्याने जंत्री आहेच ….
शब्दांची जमवाजमव झाली कि, लिहितोच एक पत्र