Apr 29, 2017

ऋतू तुझ्या शहराचे


कधीकाळी मोठ्या उत्साहात
माझ्या गावची शिव ओलांडताना
भरलं माप लाथाडून मी
तुझ्या शहरात प्रवेश केला तेंव्हा.....
कितीतरी कहाण्या सांगितल्या गेल्या होत्या मला,
अभावातून समृद्धीकडे नेण्याच्या.
तुझ्या शहरातील गुलाबी हवेत खरच जादू होती
दुःख विसरायला लावणारी
मीही विसरून गेलो अभावातलं समृद्ध जगणं,
अन शोधू लागलो बकाल वाटा.
तुझ्या गुळगुळीत गालासारख्या
चचकीत रस्त्यांवर मला लागली नाही कधीच
रक्त बंबाळ करणारी ठेच
अन मीही विसरून गेलो माझं अस्तित्व,
तुझ्या शहराशी एकरूप होण्यासाठी.
या शहरांन झिडकारलं नाहीच पण
आपलंसही केलं नाही कधी
या शहरांन जगण्याची सोय तर केली पण
प्रत्येक श्वासाची किंमत
मोजावी लागली पदोपदी.
तुझ्या शहराचे ऋतुच निराळे
सदाबहार.... तरीही उदासवाणे
जगणं विसरून जगायला लावणारे !
- रमेश ठोंबरे