Jun 18, 2013

// पाऊस //



प्राणप्रियेच्या अधरांवरुनी झरतो पाऊस
मिठीत माझ्या तिला पाहुनी जळतो पाऊस

धुमसत असतो, तांडव करतो, छत्रीवरूनी 
जरी रोखला, तिच्या बटांशी, उरतो पाऊस

लाली चढते, गालावरती, संभ्रमात मी !
त्यावर म्हणते 'तू नसताना छळतो पाऊस'

ओळखतो मी पावसास या तसे चांगले, 
डोळ्यांमधुनी तिच्या बरसता कळतो पाऊस !

'आता पुरे हे पाऊसभिजणे', मी म्हणतो 
पाऊस 'लेवून' ती निघते, चढतो पाऊस !

सुखात माझ्या तोच सोबती असतो म्हणुनी 
ती नसताना माझ्या सोबत रडतो पाऊस !

- रमेश ठोंबरे 

Jun 16, 2013

रमा म्हणे -२



रमा म्हणे क्रोध
नाशाचे कारण 
त्याचे निवारण 
व्हावे आधी ॥  

- रमेश ठोंबरे