Jul 31, 2011

नेत्याच भुतखरच कधी - कधी खुप चिड येते
आणि डोक गरगरायला लागत,
राजकारण डोक्यात घुसल्यावर
खरच कितीही आत गेल तरी...
नेत्याचा मन कळत नाही,
नेत्याच भुत मानगुटीवर बसल्यावर.
..
आसच एकदा एका रात्री
नेत्याच भुत मानगुटीवर बसल,
मी वळून माग पाहिल्यावर,
निर्लज्यपणे ओळखीच हसल.
..
थोडा वेळाने माझा कल पाहून,
त्याने आपल पुराण सुरु केल
मीच कसा श्रेष्ट आहे ?
हे स्व:स्तुती करून खर केल.
..
मी त्याला त्याच्यातले दोष..
सांगत होतो,
आणि ते नपटणारे दाखले देउन,
माझ म्हणन खोडत होत.
वरचेवर जबरदस्ती करून,
माझ मत मोडत होत.
..
शेवटी त्याला सांगुन सांगुन,
रोजच्या प्रमाणे मी गप्प जालो.
त्याच पांचट नेतेपुरान एकुन,
मी पुरता ठप्प झालो.
..
आता माझ्यावर विजय मिळ्वुन,
नेत्याच भुत भटकू लागलं
मी मौन व्रत धारण केल्यावर,
ते वेताळ प्रमाणे ...
विधानसभेवर लटकू लागल.

- रमेश ठोंबरे

पत्रास कारण कि,दिनांक : आपण भेटलो तोच

प्रती,
प्राणप्रिये - प्राणेश्वरी,
दिलात माझ्या तुझी छबी,
या इथे खालून-वरी, डावीकडे.

पत्रास कारण कि,
तू भेटलीस ... हसलीस ... आणि माझं जगच बदललं
तेंव्हाच पहिल्यांदा डाव्या बाजूला काही तरी हललं.
जरा अजबच वाटलं ...
आत काहीतरी असल्याची जाणीव झाली
आणि दुसर्याच क्षणाला हरवल्याची ....!
असो ...
पण तुझी ती नजर .... लाजरी म्हणू कि चोरटी ...?
लाजरी म्हणावी तर एवढी अधीर कश्याला ....
अन चोरटी म्हणावी तर भिडलीच कधी ....?
लाजेने तुझ्या गालावर पडणारी खळी
किती खट्याळ .... माहितेय तुला .... ?
..... कशी माहित असणार ... ?
कधी पाहिलंस स्वतःकडे .... माझ्या डोळ्यांनी ...?
नाही ना ... ? पाहू हि नकोस ... गर्व होईल तुला ... तुझ्याच रूपाचा ...!
तुझे लांब काळे केश ....
कमी फास लावतात ...?
म्हणून वरून ह्या बटा ...असा हा चोरटा वार करतात ...
तू काल जवळ आलीस ....
तू ?
नाही मीच ....
काल मीच जवळ आलो तुझ्या .... आणि किती शहारलीस तू ...?
शहारलीस कि मोहरलीस ?
.... तुझ्या ओठावरची लाली
अलगद चोरली गालांची .... तुझ्याच ...
तू निघालीस तेंव्हा किती गुलाबी दिसत होते ...?
पाहिलेस का कधी ... नकोस पाहू ... ?
लाजेने गोरे मोरे होतील ...
हरउन बसतील ...शराबी लाली ....
तुझे शब्द ... किती हळवे ...
तुझे बोल ... किती लाघवी ... ?
अरे पण तू बोललीसच कधी ... ?
...
पण बोल आता ...
पत्रातून तरी ...
मी एकतोय ...
...
...
काय म्हणालीस ... ?
पत्रास कारण कि .... ?

- तुझाच
..
..
..
- रमेश ठोंबरे
ता.क. : तू आता तरी बोलशील ... पत्रातून ..... याच आशेवर ....

~ लिहू नको ~तिच्या रुपाची जुनी कहाणी लिहू नको,
नव्या 'रदिफी' गजल पुराणी लिहू नको.


तिची नशा रे उनाड आहे खरी खुरी,
उगीच 'मीरा' 'प्रेम-दिवाणी' लिहू नको.


तिच्या दिलाशी हजार नावे इथे तिथे,
तुझीच गाणी, तुझीच राणी लिहू नको.


तुला दिसे ते खरेच आहे पहा जरा,
उगाच वेड्या 'मृगा'स पाणी लिहू नको.


तिची अदा रे सदाच न्यारी, अजिंक्य ती,
अश्या रूपाच्या हजार 'खाणी' लिहू नको .


तिला कळाया खरेच घ्यावा जन्म नवा,
अजाणताही स्वतःस 'ज्ञानी' लिहू नको.


इथे कळाले तुला 'रमेशा' किती असे ?
इथेच झाली रसाळ 'वाणी' लिहू नको.
- रमेश ठोंबरे

~ कसला सराव झाला ! ~


घुसला उरात भाला, असला बनाव झाला.
हरल्या दिलात माझ्या, कसला लिलाव झाला


दिसते मलाच सारे, जग हे असे फुकाचे,
फुटक्याच भावनांचा, लटकाच भाव झाला.


छळतात आज जेंव्हा, परके जरा जरासे,
म्हणतात सोयरेही, हलकाच घाव झाला.


मिळणार आज थोडे, सुख हे कणाकणाने,
कळताच दु:ख व्हावे, असला स्वभाव झाला.


मजला कशास चिंता, सुटल्या क्षणा-क्षणांची,
समयास बांधण्याचा, नुकताच डाव झाला.


हरलो न काल काही, हरलो न आज काही
हरणार ना उद्याला, (कसला सराव झाला !)


-रमेश ठोंबरे
(दि. १८ मार्च. २०११)

कल्याणी - ललगालगा लगागा ललगालगा लगागा

माझी बायको तुझा नवरा ....!


माझी बायको तुझा नवरा ....!
असंच काही तरी चालू असतं
टी.व्ही.वरच्या 'डेली सोप' मध्ये
हे असलं सुद्धा सौज्वळ दिसतं.

पूर्व जन्माची प्रेयसी येथे
लग्नानंतर अवतरत असते.
अन तो वाद मिटवता मिटवता
अक्खी पुरुष जात हरत असते.

कधी कधी वावरत असतात इथे
एका बायकोचे दोन नवरे.
कधी कधी बनत असतात
सगळेच भिरभिरणारे भवरे.

तासन तास बायका बघत बसतात
आपल्याच घरात त्यांचे झगडे.
इतक्या श्रीमंती थाटात सुद्धा
अर्धे निर्धे शरीर उघडे.

इथल्या नवऱ्याना सुद्धा असतात
नेहमीच दोन-दोन सुंदर बायका.
इथे नायक कमीच पण ...
मिरवत असतात शंभर नायका

इथली आई सुद्धा 'संतूर' मधली
एवरग्रीन जवान दिसते.
तिची मुलगी म्हणजे तिच्यापेक्षा
एक वर्षाने लहान असते.

डेली सोप चा कारखाना रोज
घर घरात दिसत आहे.
पाहणारा मात्र निराश होऊन
आपल्याच नशिबावर हसत आहे.

- रमेश ठोंबरे

आपण हिला पाहिलत का ?आपण हिला पाहिलत का ?

"उंची तशी मध्यम, वय आहे सोळा वरुन चलाख दिसते, पण स्वाभाव आहे भोळा. केस काळे काळे नी मृगनयनी डोळे दात पांढरे शुभ्र नी ओठ - ओठी जुळे. रंग गोरा पान, नी उडालेले भान. नाक चंपाकळी नी उंचीपुरी मान. तशी हुशार आहे, पण आपल्याच नादात असते सुंदर काही दिसल की भान हरवून बसते. ती तशी लाजाळूच, जपून वाट काटते पण वयात आता आलीय म्हणून काळजी वाटते. आपण हिला पाहिलत का ? पाहिल असेल तर लवकर कळवा, कळवण्यासाठी पत्ता ऐका कविता तिचं नाव आहे. कवी तिचा पालक आणि कविमन तिचं गाव आहे. ती हरवल्या पासून, मी ही हरवून गेलोय. ती ही मला शोधत असेल, आणि मीही तिला शोधतोय. सापडण्याची शक्यता ... एखाद्या मासिकाच्या कार्यालयात, किंवा जाहिरातींनी भरलेल्या.. दैनीकाच्या कोप-यात. वरील ठिकाणी सापडली तर, आणून देना-याला .. बक्षीस मिळनार नाही, आणि माझ्या वहितंच सापडली तर सापडलेली आपल्याला कळणार नाही" .. .. .. वरील जाहिरात प्रकाशित झाल्यावर एक दिवसात कविता मिळाली. एक नाही, पन्नास जणांनी आणून दिली चौकशी अंती समजल, त्याच दैनिकाच्या कोप-यात ती सापडली जिथं ती हरवल्याची ... जाहिरात प्रकाशित झाली होती ! - रमेश ठोंबरे

|| मुकुट मस्तकी ||

मुकुट मस्तकी
पाहूनिया थेट
होयील कि भेट
कैवल्याची ||१|

चंदन तो टिळा
शोभतसे भाळी
ब्रह्मानंदी टाळी
लागलेली ||२||

पितांबर शोभे
परिधान खास
भक्तांचा तो ध्यास
मनी आहे ||३||

सावळे ते ध्यान
कर कटे वरी
चिंता नित्य करी
सकलाची ||४||

वीट पुंडलीके
पावन ती केली
चरणी लागली
सावळ्याच्या ||५|| |

लागली समाधी
देवाचीच आता
आठवण होता
ज्ञानियांची ||६ ||

- रमेश ठोंबरे

Jul 30, 2011

२) --------- मन ---------


झाडावरती चढून मन
दूर दूर फिरत होतं,
उंच उंच जाऊन सुद्धा
जमिनीवरच ठरत होतं.

कधी जाऊन उन्हामध्ये
कोवळे चटके घेत होतं,
कधी येऊन सावलीत
मन माझा होत होतं.

असंच मन कधी कधी
वेगळं-वेगळं वागत असतं
हातात सर्व असतानाही
सगळं-सगळं मागत असतं.

कधी-कधी खट्टू होतं
कधी-कधी लट्टू होतं,
कधी ओझं डावलूनही
ओझ्याखाल्च तट्टू होतं.

तेव्हा मन गात नाही
मला सोडून जात नाही,
तेव्हाच ते माझा असतं.
त्यालाच त्याचं ओझं असतं.

- रमेश ठोंबरे
२६ ऑक्टोबर ०९

१) ---- ढापलेल गाणं ----

सगळी गाणी ढापली आहेत
तरी सुद्धा आपली आहेत ... !
तुमचं आमचं गाणं आहे ....
ओठावरच लेणं आहे.

कधी सूर कधी ताल
शीर्षक सुद्धा ढापल आहे,
कधी शब्द, कधी स्तब्द
एक कडवं आपलं आहे ... !

प्रेरणा सुद्धा ढापली आहे
जश्याच तशी चोपली आहे,
कारण कवी आपला आहे
म्हणून तसाच ढापला आहे.

तुम्ही उगाच घाबरू नका
फक्त Inspiration घेतली आहे
हे काही 'बाईट' नाही
इतक सुद्धा 'वाईट' नाही.

जस गाणं हवा असत
दु:खात थोडं जगण्यासाठी
तशी प्रेरणा हवी असते
शब्द सुख भोगन्यासाठी

म्हणून गाणं ढापल आहे
तरी सुद्धा आपल आहे ... !

तुमच आमच होउन जायील
कवीची आठवण देऊन जायील.


- रमेश ठोंबरे
२६ ऑक्टोबर ०९

ढापलेली गाणी

या धाग्यावरील सर्व गाणी ढापलेली आहेत. कधी ताल, कधी सूर, कधी लय, कधी शीर्षक तर कधी अख्खे गाणे हि.
काही गाणी नुकतीच जन्माला आली आहेत, काहींच्या प्रसव वेदना सुरु आहेत, तर काही अवघडलेल्या अवस्थेत आहेत.

काही आपल्या प्रतिक्रियातून जन्म घेतील... ती अर्थात आपलीही असतील॥, त्यांना पुन्हा जग ढापलेली (न-जायज) म्हणेल !त्याची आपल्याला परवा नाही ! आपल्याला बस inspiration महत्वाच्या आहेत .....
प्रसव वेदना मी सोसलेल्या आहेत तेव्हा त्याच्यावर 'माझाही' अधिकार आहे !

Inspiration आहेच पण कोणाची (कोणाकोणाची) ? ते हि आपणच ठरवा .... अहो धागाच आपला आहे ... !


कविता ..........


शब्द शब्द चेतन्यासाठी ...
ठिणगीसम पडावी कविता.
लेक सासरी जाताना थोडी ...
हुंद्क्यातून अडावी कविता.

तिच्या गुलाबी ओठांवर,
एक नशीली सुचावी कविता.
सोबत तिची सुटली तरीही ...
सोबत 'तीच' असावी कविता.

उध्वस्त मनाच्या गाभार्यातून,
अभंगासम गावी कविता.
शुश्क मनाचे बीज रुजाया ...
मल्हारासम यावी कविता.

नव्या नवेल्या जन्मावर ..
पहिली वहिली लिहावी कविता
सरनावरच्या मरनावरही ...
शेवटचीच, एक हवी कविता.

थिजल्या हरल्या क्षणी पुन्हा,
राखेतून उडावी कविता.
साथ सुटता शब्दांची मग,
धुसमुसून रडावी कविता.

- रमेश ठोंबरे
( कवितेच्या प्रेमात ....!)

|| होळीच्या ओव्या ||

आला फागुन महिना, आला होळीचा ग सन
झाला रंगाचा आठव, गेलं आनंदून मन

होळी सजवा सजवा, सडा सारवण दारी
फांदी चिरगुट बांधा, काढा रांगोळी साजरी

होळी पेटली पेटली, तिला दाखवा निवध,
घडा वाईटाचा भरे, झाला 'होलिके'चा वध.

तिला निवध तो काय, गोड पुरणाचीपोळी,
एक भाजला नारळ, ओंबी गव्हाळी गव्हाळी.

आता जळेल गारवा, उन डोक्यावर येई,
आणा शिव्या-शाप ओठी, पोट मोकळे ते होई

होळी पेटली पेटली, आला भैरवांचा टोळ
तमो गुण सारे जाळा, होळी दुर्गुणांचा काळ


- रमेश ठोंबरे
(अक्षरछंद)

धुंद कुंद हा मुकुंदधुंद कुंद हा मुकुंद रंग लावितो
गौर वर्ण राधिकेच अंग जाळितो

आज शाम, छेडणार जाणिता तिने
वाट तीच चालण्यास चित्त भाळितो

मेघशाम, रंग लाल, फेकतो कसा
राहतो मनात आणि स्पर्श टाळितो

रंगता तुझाच रंग चिंब सावळ्या
कोण रंग सांग तो मला खुनावितो

प्रेम रंग पाहिला तुझ्या मिठीत मी
आज कोणती उमंग खास दावितो ?

कृष्ण सावळा कसा कुणास शोधतो ?
सांग काय शाम तू मनात पाळितो ?


- रमेश ठोंबरे
(गाल गाल गाल गाल गाल गालगा)

कल्लोळ ते कविता


त्याच्या मनात कल्लोळ ..
कधी शब्दांचा, कधी भावनांचा, कधी यमकांचा
कधी रुपकं आणि अलंकार हि घालत असतात गोंधळ .
हो.....,
कागदावर उतरेपर्यंत ...
कल्लोळच असतो नुसता.

कधी शब्द अधीर होऊन कागदावर अलगद उतरतात.
कधी फरफटत... ओढत नाविलाजास्तव पसरतात.
कधी शब्द उठाव करतात ...
कधी आंदोलन आणि कधी सत्याग्रह हि !
सगळं हवं असतं त्यांना जश्याच्या तसं ...
व्यक्त होताना कुठलीच आडकाठी नको असते,
ते हट्ट धरतात आणि
पुरा हि करून घेतात त्याच्याकडून.
तेंव्हा त्यांना अर्वाच्य आणि
'असाहित्यीक' म्हणून हिणवले जातं
तिथे शब्द कमी पडतात ...
पण भावनांचा विजय होतो !

कधी शब्द तट्टू होतात.
भावना खट्टू होतात ....
शब्द भाव खातात....
आणि
भावना उचंबळून येतात,
कधी लय बिघडते ...
कधी मात्रा कमी पडते.
तेंव्हा शब्द मोजून, ठोकून ओळीत बसवले जातात ....
तेंव्हा ... भावना कमी पडतात...
अन शब्दांचा विजय होतो !

कधी इतकं सहज होत सगळं कि,
आभाळ भरून यावं
अलगद थंड हवा सुटावी ....
आणि धरतीच्या कोर्या कागदावर
पावसाच्या रूपाने एक हिरवं चित्र साकार व्हावं,
अगदी तसं होतं.

अगदी तसे उतरतात ...
...... शब्द आणि भावना
हातात हात धरून...
...
....
.......
तेंव्हा संपतो कल्लोळ
आणि त्याची होते कविता ....!- रमेश ठोंबरे
दि. ८ फेब्रु. २०११

खून झालाय कवितेचा


खून झालाय कवितेचा, या इथेच, गजलेच्या कोंदणात,
अल्लड होती, अवखळ होती, या इथेच खेळत होती.

कधी अडकली कळलेच नाही, आखीव रेखीव बंधनात,
खून झालाय कवितेचा, या इथेच, गजलेच्या कोंदणात.

........


इसापनीती, गांधीगिरी, भर-भरून बोलत होती,
कोणीच सोबत नसलं तरी, एकटी एकटी चालत होती.

हरली कशी, फिरली कशी, अस्वस्थ, मनातल्या मनात,
खून झालाय कवितेचा, या इथेच, गजलेच्या कोंदणात.

........


प्रिये सोबत गात होती, सख्या सोबत न्हात होती,
माशालीतली ज्वाला, कधी, समईतली वात होती.

तीळ तीळ तुटतेय, 'शमा' बनून, काचेच्या आवरणात,
खून झालाय कवितेचा, या इथेच, गजलेच्या कोंदणात.

........


छोट्यान्सोबत रांगत होती, तत्वज्ञान सांगत होती,
तालासुराचं वेड तिला, शहाण्यासारखी वागत होती.

अर्थ तिला गावत नाही, जरी लय तिच्या कानात
खून झालाय कवितेचा, या इथेच, गजलेच्या कोंदणात.

........


उंची तिची बरीच होती, खोली तिची खरीच होती,
उथळ थोडी वाटली तरी, जगण्यासाठी पुरीच होती.

आज थोडी खट्टू झालीय, फिरते उदास वनात,
खून झालाय कवितेचा, या इथेच, गजलेच्या कोंदणात.


- रमेश ठोंबरे

कविता माझी सुंदर होती


कविता माझी सुंदर होती
झाडावरचे बंदर होती !


कधी धरेला बिलगून गेली
कधी मुक्त ते अंबर होती


मुला फुलांच्या जगात रमली
नाद नशिले घुंगर होती


गाव आताशा विसरून गेली
गल्लीत नाशिले 'मंजर' होती.


दूर दूर ती दिसते आता
कधी दिलाच्या 'अंदर' होती


रक्त ओकते भयाण होते,
दु:खावरची फुंकर होती.


चुकते रस्ता, हुकते गल्ली
कधी घराचा 'नंबर' होती.


अवघडलेली दिसते आता,
मृगनयनीची कंबर होती.


पाहिलेत का तिला तुम्ही हो,
मजसाठी ती 'वंडर' होती !


शब्द शोधते रस्तोरस्ती,
शब्दांचे एक 'लंगर' होती


वयस्कांसम बोल बोलली,
१८ च्या हि 'अंडर' होती !


आज वागते हरल्यावाणी,
गत-काळी, सिकंदर होती.


आठवात मी जातो मागे,
आठवणींचे झुंबर होती.


आज कशी हि अडगळ झाली ?
अल्लड आणि 'यंगर' होती.
- रमेश ठोंबरे
कविता कालची आणि आजची

'ती' कालची आणि आजची


खरच किती साधी, सरळ, अल्लड होती तेंव्हा ती
घरा समोरील भल्या थोरल्या पिंपळ वृक्षावरून उडी मारून
लहान चिमुकल्यांच्या मोठ मोठ्या दप्तरातून बाहेर डोकावत
कधी चिऊ-काऊ च्या गोंगाटातून
गजबजलेल्या गल्ली बोळातून ...
बेमालूम, गुणगुणत यायची माझ्या घरात....
माझ्या टेबलावरच्या कोर्या कागदावर ....
नकळत, सहज उतरायची ....ती


आता जेंव्हा काळ बदलला आहे ...
संदर्भ बदलले आहेत ...
छोट्या छोट्या गल्यांचे मोठ मोठे रस्ते झाले आहेत
सुपर शॉप च्या जमान्यात 'वाणी' उठून गेले आहेत
आता तिच्यात आणि माझ्यात ...
मोजता न येणार अंतर आहे ..
तिथे आज 'ओळख विसरवणार' भयाण अंधकार आहे
मातेच्या कुशीत, जगण्याचा हाहाकार आहे
धर्म , धर्म राहिलेला नाही .!
धर्माचे राजकारण झाले आहे ...
आणि धर्माच्या नावाखाली घोषणांचा बाजार मांडला आहे


आता हे अंतर तिला सहज राहिलं नाही ...
त्यासाठी तिला चालावं लागतं ...
गाणं नसतं ओठावर .... पोचण्याचा ध्यास असतो फक्त ..
इतकं अंतर आणि इतकी शहरं ओलांडून ...
आज ती जेंव्हा माझ्या घरी येते ....
तेंव्हा अगदीच अर्धमेली झालेली असते ....
तिच्या येण्याची वाट पाहणारा मी आणि माझा टेबल ....
कधी तिच्या कडे तर कधी कोर्या कागदाकडे पाहत असतो ...
तेंव्हा पुन्हा उठून .... टेबलाकडे नजर हि टाकता निघून जाते.
आणि गावातल्या .... थिजलेल्या शरीराच्या ....
फुटलेल्या डोळ्यांच्या... भिजलेल्या पापण्यांवर ...
त्यातीलच एक अश्रू बनून झोपी जाते.मूळ हिंदी रचना - निदा फ़ाजली
भावानुवाद - रमेश ठोंबरे

घे घे विकेट ....तू खेळ क्रिकेट !


घे घे विकेट ....तू खेळ क्रिकेट !
घे घे विकेट ....तू खेळ क्रिकेट ! ..............(कोरस)


नकोस पाहू जे जे घडले
अन कोण ते उगाच भिडले
तुझ्या लढ्याला नकोत सीमा
बघ शर्थीचे दार उघडेल....
घे घे विकेट ....तू खेळ क्रिकेट !
घे घे विकेट ....तू खेळ क्रिकेट ! ..............(कोरस)


तुझी जिद्द रे तुफान आहे,
अन स्वप्नांचे दुकान आहे.
शक्ती ठाऊक तुझीची तुजला,
जग हे सारे अजाण आहे.
घे घे विकेट ....तू खेळ क्रिकेट !
घे घे विकेट ....तू खेळ क्रिकेट ! ..............(कोरस)


कर अशी रे धमाल आता
दाव जगाला कमाल आता
तुझ्याचसाठी यश हे झुरते
वाट पाहतो गुलाल आहे !
घे घे विकेट ....तू खेळ क्रिकेट !
घे घे विकेट ....तू खेळ क्रिकेट ! ..............(कोरस)


एका मागून एका डाव रे
यष्टी वरती बसे घाव रे ...
यश हे सारे तुझेच आहे
नकोस देऊ कुणा वाव रे
घे घे विकेट ....तू खेळ क्रिकेट !
घे घे विकेट ....तू खेळ क्रिकेट ! ..............(कोरस)


झुगारले तू अपयश सारे
यत्न तुझे रे फळास आले
क्रिकेट होते स्वप्नं तुझे अन
स्वप्नं तुझे ते वास्तव झाले !
घे घे विकेट ....तू खेळ क्रिकेट !
घे घे विकेट ....तू खेळ क्रिकेट ! ..............(कोरस)


- रमेश ठोंबरे

~ आज जरा तू बरस सखे ~


आज जरा तू बरस सखे
आठवणींचा कळस सखे


जरी उन्हाळा सभोवती
फुलून येतो पळस सखे


दैव जाणिले तव ठाई,
कुणास घालू नवस सखे


झुरतो आहे रोज इथे
तुही कधी मग तरस सखे


कसली देऊ तुज उपमा ?
अलंकार तू सरस सखे.


बरसण्यास मज तूच हवी
स्वप्नांचा बघ विरस सखे !


- रमेश ठोंबरे

२) प्रियेचे श्लोक

२) प्रियेचे श्लोक

भुजंगप्रयात - लगागा लगागा लगागा लगागा

प्रिया जाणण्या पापबुद्धी नको रे |
प्रिया मानण्या शास्त्रशुद्धी नको रे ||
प्रिया पाहण्या नेत्र कामास येते ।
तिला पाहता काय साक्षात होते ? ||६||

मना सज्जना हीत माझें प्रिया रे |
तिच्या पाउली जन्म माझा नवा रे ||
प्रिया भेटण्या जीव बालिश होतो |
दिला जाळता कोण कामास येतो ? ||७||

दिलाचे बहाणे प्रियेला कळावे |
प्रियेच्या वियोगे दिलाने जळावे ||
असे काय होते तिला पाहताना |
जिथे सावरावे तिथे मी ढळावे ? ||८||

प्रियेला पहावे, प्रियेला स्मरावे |
प्रियेच्या विचारी मनाने रमावे ||
जसा दोर मांजा पतंगास उडवी |
तसे सुत माझे प्रियेशी जमावे ||९||

प्रिया सोबतीचा मला भास होतो |
प्रिया दूर जाता किती त्रास होतो ||
नका दूर लोटू उगा दुख: आता |
प्रियेचा सहारा तिथे खास होतो || १० ||

- रमेश ठोंबरे..

१) प्रियेचे श्लोक


भुजंगप्रयात - लगागा लगागा लगागा लगागा


प्रियारंभ आरंभ या जीवनाचा |
प्रियासंग हा ध्यास या पामराचा ||
नमू या प्रियेला उगाळून वाचा |
मनी ध्यास घ्या रे प्रिया ग्रंथ वाचा || १||

प्रभाते प्रभाते प्रिया नाम घ्यावे |
प्रियेच्या जपाने असे धुंद व्हावे ||
मनी जे वसे ते प्रिया संग दावे |
प्रियेचा विना हे असे फोल दावे ||२||

प्रिया हट्ट तो हट्ट मोडू नको रे |
प्रिया नाम सन्मान खोडू नको रे ||
प्रिया काळजा जोड, तोडू नको रे |
सदाचार हा थोर सोडू नको रे ||३||

प्रिया वंद्य ते सर्व भावे करावे |
प्रिया निंद्य ते सर्व सोडून ध्यावे ||
तिच्या नामघोषी मुखाने झिजावे |
तिच्या दर्शनाने उगी का विझावे ? ||४||

प्रिया हात हाती जपावा सजावा ।
जगाचा पसारा जरा दूर ठेवा ||
प्रियेच्या सुखाचा मनी ध्यास घ्यावा |
तिने टाळताची कुठे जीव ध्यावा ? ||५||

- रमेश ठोंबरे

५ || निमंत्रण तुम्हा ||

निमंत्रण तुम्हा
आहे गटारीचे
पहिल्या धारीचे
पिण्यासाठी ||१||

कोवळी कोंबडी
स्वागता तय्यार
उशीर तो फार
नको नको ||२||

इथेच नजीक
गटार हि वाहे
सौजन्याच आहे
मनपाचे ||३||

आले का सगळे
सजून धजून
कश्याला बुजून
बसले गा ||४||

नका धरू भीती
आज हो मनाची
बिशाद कुणाची
आडविन्या ||५||

खम्ब्यावर खांब
खुशाल रिचवा
कोंबडी पचवा
उधारीची ||६||

आज तुम्ही लोक
करा मनमानी
तुम्हीच हो धनी
गटारीचे ||७||

गटार हि गंगा
प्रसन्न होईल
पुन्हा ती येईल
लवकरी ||८||

- रमेश ठोंबरे

४ ) || गटारीच्या नावे ||

गटारीच्या नावे
फोडू नको खडे
जातील गे तडे
तव मुखा ||१ ||

एक दिसासाठी
झालो मी दारुडा
उगी त्या भारुडा
आळविसी ||२||

प्रिये मी ती दारू
नाही रोज घेत
पिउनि हि येत
रोज रोज ||३||

आजच्या या दिनी
घेऊ दे कि थोडी
येईल ग गोडी
कोंबडीला ||४||

खाऊन पिउन
काढेन मी झोप
यात काय पाप
संग मला ||५||

तुला हवी तू घे
बियर या दारू
मिळूनच मारू
पेग पेग ||६||

नको अशी पाहू
रागे रागे फार
चढेलच ठार
नजरेची ||७||

श्रावणात साऱ्या
उपास करेल
भक्त हि ठरेल
पुन्हा तुझा ||८||

- रमेश ठोंबरे

३) || झिंगले हे मन ||


झिंगले हे मन
झिंगले हे तन
होता आठवण
गटारीची ||१||

गटारी गटारी
खेळुयात दोघे
नको पाहू मागे
पुण्या कर्मा ||२||

गटारीची हौस
पुरउ कि आता
देऊयात लाथा
एकमेका ||३||

खाऊन पिऊन
करू आता दंगा
नाच हि तो नंगा
पुरा नसे ||४||

गटारीसाठीच
केला आज थाट
पहिली म्या वाट
गटारीची ||५||

गटार हि गंगा
आली बघ दरी
पाऊल माघारी
ओढू नको ||६||

आजचा हा दिस
आपला रे भासे
पुन्हा कोण पुसे
दारुड्याला ? ||७||

आजचा सोहळा
आनंदे पाहीन
फुले हि वाहीन
गटारीला ||८||

- रमेश ठोंबरे

२ || नेम गटारीचा ||


नेम गटारीचा
खाणे आणि पिणे
आणि ते लोळणे
गटारीत ||१||

याहून न येते
गटारीची मजा
पुन्हा पुन्हा भजा
गटारीला ||२||

गटारी गटारी
फोदियला टाहो
तुम्हालाची लाहो
पुण्या त्याचे ||३||

गटारी सारखा
नाही योग खास
लागलीची प्यास
मदिरेची ||४||

आणि एक करा
चकणाहि न्यावा
तय्यारच ठेवा
पुरचुंडी ||५||

संपली बाटली
पाहू नका मागे
पुन्हा फोडू लागे
खंबा नवा ||६||

गटारीची हौस
पुरवावी आज
मागू नये व्याज
श्रावणात ||७||

गटारी गटारी
संपताची आज
भेटू पुन्हा खास
गटारीला ||८||

- रमेश ठोंबरे

|| गटारी स्पेशल ||

गटारी सोहळा
पहिला म्या डोळा
दूसरा तो पोळा
मानवाचा ||१||

सजले धजले
पिण्यासाठी आले
हरउन गेले
चित्त-भान ||२||

आजचा बहाणा
आहे बघा खास
लागला हव्यास
गटारीचा ||३||

पूर्वसंध्या न्यारी
श्रावणाची खरी
आजी मला प्यारी
बाटलीहो ||४||

खाण्यास हि टांग
हवी म्हणे आज
उद्या कसा माज
पुरवावा ||५||

कोंबडी कवळी
यथा सांग केली
साजारीच झाली
गटारी हि ||६||

पुरवीली हौस
वाढवीली मौज
दोस्तांचीही फौज
टपलेली ||७||

आजचा हा दिनु
यावा म्हणे नित्य
दारू एक सत्य
जीवनाचे ||८||

- रमेश ठोंबरे

७) गुगली (योगासनाचा योग)

Jul 22, 2011

२०. || प्रिये विन जग ||


प्रिये विन जग
आहे निरंकार
वाळवंट ठार
भासतसे || १ ||

एक नाम प्रिया
एक नाम भक्त
दोघे हि विरक्त
प्रेम भक्ती || २ ||

प्रिया नाम घेता
हरावीच चिंता
मिळावी ती कांता
सत-जन्मी || ३ ||

प्रिया चरण रज
सांडीयली जेथे
वसवावे तेथे
प्रेम-तीर्थ || ४ ||

हेची दान देवा
मागतो तूम्हासी
प्रियाराधनेसी
एक व्हावे || ५ ||

- रमेश ठोंबरे

१९. || गाठण्यास साली ||


गाठण्यास साली
झालो मी अतुर
लागे हूर-हूर
मनी माझ्या || १ ||

दिसेल सावली
लावण्यखणीची
मनात हि इच्छा
चाळवली || २||

चाल हि वाकडी
नजर तिरकी
डोळ्यात फिरकी
पडलेली || ३ ||

वाढलेला घेर
कर्दमाचा गोळा
रुपावरी बोळा
फिरलेला || ४ ||

पटलीच खात्री
पुन्हा सौंदर्याची
प्रिया हीच साची
एकमेव || ५ ||

- रमेश ठोंबरे

१८ || प्रियेची ती माता ||


प्रियेची ती माता
शोधीत निघालो
शंकासुरा भ्यालो
मनातल्या || १ ||

सुंदर वदन
गहीराले डोळे
केस लांब काळे
पाठीवरी || २ ||

चालहि साजस
चंद्र-कोर भाळी
सांगे थोर कुळी
लावण्याची || ३ ||

दृष्टा-दृष्ट होता
झाली पाठमोरी
घरंदाज खरी
नारी असे || ४ ||

प्रियेच्या मातेची
झाली मग जाण
सापडली खाण
सौंदर्याची || ५ ||

- रमेश ठोंबरे

१७) || नको प्रिये राणी ||


नको प्रिये राणी
अंत असा पाहू
वेळ हा सर्वथा
जाऊ पाहे || १ ||

आधीच आलीस
उशिरा तू फार
आणखी मी धीर
धरू कैसा || २ ||

नको आता अशी
बोलताच राहू
संधी पुन्हा देऊ
काळोखाला || ३ ||

निघशील पुन्हा
उशीर म्हणोनी
साथीला न कोणी
तुज विना || ४ ||

होईल अंधार
जाशील निघोनी
पुन्हा तीच गाणी
विरहाची || ५ ||

- रमेश ठोंबरे

14. || अवकाळीच तो ||अवकाळीच तो
प्रियेसाठी आला
छेडूनिया गेला
चिंब चिंब || १ ||

प्रियेच्या तनुचा
दिवाना दिवाना
घातला धिंगाणा
पुन्हा पुन्हा ||२||

झाला तो अधीर
मुक्त बरसला
ऋतु विसरला
ओला ओला ||३||

रस्त्यात प्रियेला
एकटी गाठतो
येउनी भेटतो
सवे सवे ||४||

मला टाळण्याचा
शोधतो बहाणा
अवकाळी राणा
दूर दूर ||५||


- रमेश ठोंबरे

धन्य धन्य हिंसा !


धन्य धन्य हिंसा !

धन्य धन्य हिंसा
होवोनीया  लाल,
फोडियला गाल
अहिंसेचा ||१||

अहिन्सेला इथे
हिंसेने उत्तर,
फेडिले धोतर
सत्याचेच  ||२||

शांतीच्या या घरी
अशांतिच झाली
वेशीला लक्तरे
देशाच्या हो ||३||

हिंसेला आवडे
भलतेच कोडे
पुराणाचे वड़े
पुराणात ||४||

थोरांच्या राज्यात
चोरांचा बाज़ार
सत्याचा आग्रह
कोण धरे ||५||

अहिंसेने आता
टाकियेला आत्मा
पाहुनी महात्मा
'धन्य' झाला ||६||

- रमेश ठोंबरे

Jul 14, 2011

~ मला वेड केसातल्या पावसाचे ~


तुझ्या मुग्ध ओठातल्या पावसाचे
मला वेड केसातल्या पावसाचे


तुझ्या आठवांनी खरा धन्य होतो
किती कर्ज श्वासातल्या पावसाचे


तुझे प्रेम माझ्यावरी खास आहे
असे चित्र भासातल्या पावसाचे


झुरावे, मरावे मला आकळेना
पुढे काय पेचातल्या पावसाचे


कुणी मैत्र बोले, कुणी प्रेम बोले
खरे काय दोघातल्या पावसाचे


रमेशा, जलाची तुला काय भीती
असो थेंब प्रेमातल्या पावसाचे !


- रमेश ठोंबरे

निषेध


निषेध


आम्हाला वेळोवेळी डीवचल जातय
कधी आमच्या भागात केली जाते घूसखोरी
तर कधी पळवल जात आमच विमान.
कधी उडवल्या जातात आमच्या सैनिकांच्या छावण्या
तर कधी केला जातो बुद्ध मुर्तिंचा अवमान.
पण आम्ही शांत आहोत.
आमचा देश शांत आहे !

तलवारीनं केलं केल जातय शिरकाण
अन तोफानी घेतले जातात हजारो निरापराध्यांचे प्राण .
मारतानाही केला जातो अमानुष विचार
अन हिंसेलाही लाजवतील असे भयानक अत्त्याचार.
तरीही आम्ही शांत आहोत...
आमचा देश शांत आहे !
आमचा देश अहिंसक आहे !

पाकिस्तान कुरापती काढतो आहे
चीन ही कधी कधी लढतो आहे ..
आणि आता तर ..
ज्यांचे नावही नकाश्यावर लवकर सापडणार नाही ..
असे ही करत आहेत उघड - उघड हल्ले.
आम्ही त्याना उत्तर देतो..
पाठवतो एखाद प्रेमपत्र.
आमचा प्रेमाचा संदेश
आमच्या देशाचा प्रेमाचा संदेश  !

एवढ सगळ झाल्यावर
आम्ही धरतो आग्रह सत्याचा,
आम्हालाच गिळंकृत करू पाहना-या..
महासत्ताक दलालांकडे ..
त्यांच्या समोर मांडतो सगळ सत्य...
अन करतो सत्याग्रह.

डीवचतानाही शांत राहतो.
हिंसेत ही अहिंसा पाळतो.
द्वेष करणाऱ्यांना प्रेम-पत्र देतो
आणि नेहमी सत्याचा आग्रह धरतो.
अन झाल्या प्रकाराबद्दल खुपच संताप आला तर ...
पत्रकार परिषद् बोलावून
भिंतीवर निरागस हास्य करत लटकणाऱ्या
महात्म्याच्या साक्षीने
व्यक्त करतो तीव्र निषेध !

- रमेश ठोंबरे 

शोकांतिका


आपण वर्तमानात जगतो,
भूतकाळ फार लवकर विसरतो
कारण, रोजच नवीन विचार... रोजच नवीन वाद आहे !
कधी मुंबई, कधी दिल्ली तर कधी हैदराबाद आहे !

रोज नवा दहाशतवाद, रोज नवीन बळी आहेत
पुन्हा तीच गोळी अन मानवतेची होळी आहे !
शहिदांच्या पार्थिवावर वीरचक्र अर्पण केले जातात,
त्यांच्या विधवांना आश्वासने दिली जातात,
मिडिया समोर ढोल बडवले जातात,
अन वर्तमानपत्रांचे रकाने भरले जातात ...

कोण अफजल गुरु, कोण अजमल कसाब....?
कोण होते दहाशतवादी कोणाला विचारणार जाब !

कोण हेमंत करकरे, अन कोण विजय साळसकर ?
कितीदिवस आठवतील ह्या शहिदांची नावं..
अन आठवली तरी, बनून राहतील फक्त नावच...
२६/११ च्या आतंकवादी हल्ल्यातील !

दर वर्षी दर दिवस घेतल्या जातील शोकसभा,
जळणाऱ्या मेनबत्त्यानाच फक्त अश्रू ढाळण्याची मुभा ?

काल झालेली हि एकांकिका नव्हती !
तीन-चार दिवस चाललेली Live commentary तर नव्हतीच नव्हती !
हि होती शोकांतिका लोकशाहीची, देश्याच्या राजकारणाची !

आपण या शोकांतिकेचे नेहमीच प्रेक्षक ठरणार आहात ..!
सांगा, हि थांबवण्यासाठी आपण काय करणार आहात ?

- रमेश ठोंबरे

Jul 12, 2011

|| तन हे मृदंग ||


तन हे मृदंग,
मन हे पंढरी |
टाळ नाद करी
विठ्ठलाचा ||१||

विठ्ठल -विठ्ठल,
लागलीची गोडी |
सोडीयली होडी,
चान्द्रभागी ||२||

आजचा हि दिन,
नाही मज रिता |
अडलो पुरता,
प्रपंचात ||३||

आठवण येता,
सैर-भैर मन |
शोधीतसे धन
सावळ्याचे ||४||

भेटीसाठी मन,
आतुरले खूप |
पाहिले ते रूप,
देव्हा-यात ||५||

- रमेश ठोंबरे

Jul 8, 2011

|| नाम महिमा ||


हरी नाम घ्या रे
मनाने निर्मल
येईलकी बळ
साधनेला ||१ ||

हरी नाम शांत
हरी नाम गोड
हरी नाम जोड
अध्यात्माची || २||

हरी मुखे म्हणा,
पुण्या होई खास
मोजता का श्वास
घेतलेला ||३||

हरी हरी केले
लाऊन समाधी
उरली न व्याधी
आता काही ||४||

नामाचा महिमा,
सांगतो रमेश
नाम व्हावा श्वास
शेवटाचा ||५||

- रमेश ठोंबरे

|| सावळे हे रूप ||


सावळे हे रूप
वेड मज लावी
आता भेट व्हावी
सावळ्याची || १ ||

भेटीसाठी जीव
कासावीस झाला
करीतसे धावा
विठ्ठलाचा || २ ||

दर्शन ते व्हावे
ध्यास मनी आहे
नीज रूप पाहे
पांडुरंगे || ३ ||

प्रेम हे अमाप
भक्तावरी तुझे
हवे काय दुजे
माउलीगे || ४ ||

विठू विठू बोलू
आनंदाने डोलू
भेटेल कृपाळू
मायबाप || ५ ||


- रमेश ठोंबरे