Sep 12, 2010

बापू, परत रिस्क घ्याल का ?

बापू, परत रिस्क घ्याल का ?

आज परत आठवण झाली म्हणून ...
सकाळीच बापुना भेटलो,
स्टूलावर्ती चढून मग फोटोलाच खेटलो.

तेवड्यात बापू बोलले -
म्हणाले थांब, असा बंदिस्त करू नकोस,
कोमेजलेल्या फुलांचा हार लगेच समोर धरू नकोस !
पाहू दे जरा फोटूच्या बाहेरचा देश.
अन माझ्या देशाचा बदललेला गणवेश !
फोटो मधून पाहण्यात म्हणे खरच मजा नाही
महात्मा बनून राहण्यासारखी दुसरी सजा नाही !
पुन्हा पहायचा आहे म्हणे मला माझा देश,
जसा असेल तसा, अन जसा दिसेल तसा.

लढण्यातली मजा मला खरच हवी असते,
कारण इथली प्रत्येक सकाळ नवी असते.
उंच उंच चबुत-यावरूनहि लपवता न येणारं थिटेपण.
वर्ष-वर्ष फोटोत लटकण्याच हवाय कुणाला मोठेपण,
उपोषणाची सवय मला..., पुरतं अजीर्ण झाल आहे,
एकाच जागी उभं राहून शरीरहि जीर्ण झाल आहे.
बघ आता तूच एखादा सत्याग्रह कर,
अन माझ्या पुनर्जन्माची सरकारकड मागणी धर.

मी म्हणालो,
'बापू, वेड लागलंय का तुम्हाला .... ,
आत्ता कश्याला परत येता ,

माहित आहे का तुम्हाला .... ?
आता लढणं सोपं पण जगणं अवघड झालं आहे,
लोकशाहीत सरकारनं फक्त मरण स्वस्त केल आहे.
तेव्हा परकीयांशी लढलात आता स्वकियांशी लढावे लागेल,
तेव्हा उपोषणावर भागल पण आता शस्त्रच काढावे लागेल.

मला सांगा बापू,
आस असतानाही तुम्ही परत रिस्क घ्याल का ?
बापू म्हणाले - माझं सोड मी तय्यार आहे,
पण तुम्ही येवू द्याल का ?

- रमेश ठोंबरे
01 Oct. 2009