Apr 15, 2015

कवीनं लिहू नयेत कविता

कवीनं लिहू नयेत कविता
गलिच्छ राजकारणावर …
अन नासवू नयेत आपले शब्द !

कवीनं लिहावं
उमलणाऱ्या कळीवर
गालावरच्या खळीवर !
फुलावर  पानावर … काळ्या रानावर.
खूपच दाटून आलं तर  
येणाऱ्या, नयेणाऱ्या पावसावर
एखाद्या निस्तेज दिवसावर.

कवीनं लिहावं स्वतःवर
स्वतःच्या हातावर.
खोलवर मातीत शिरून
मातीची कूस उजवनाऱ्या
नांगराच्या दातावर

खूपच भरून आलं तर ….
खोदत बसावा भूतकाळ,
ओढत राहावं वर्तमान ….
अन नोंदवून ठेवावं आपणच न पाहिलेलं भविष्य
आपल्या नंतरच्या पिढ्यांसाठी मार्गदर्शक म्हणून.

कवीनं लिहावं ….
वैष्णवांच्या दिंडीवर
माणसांच्या झुंडीवर
अन खूपच असह्यच झालं तर
बुधवार पेठेतल्या रंडीवर.
.
.  
भांडवलदारांच्या सुबत्तेवरही लिहू शकतो कवी
अंगठा बहाद्दरांच्या गुणवत्तेवरही लिहू शकतो कवी
इतकंच काय तर …
सध्य-परीस्थीती अन वर्तमानाचं भान म्हणून …
शेतकऱ्याच्या आत्महत्तेवरही लिहू शकतो कवी !
.
.
मतदानाच कर्तव्य म्हणून
एकदा बटन दाबून निर्धास्त व्हावं कवीनं
होवू द्यावेत देशाचे हाल …
पाहत राहावा जाती धर्माच्या नावाने चाललेला
स्वार्थाचा बाजार.
विसरून जावी शब्दांची भाषा,
विसरून जावा शब्दांनी युद्धे जिंकल्याचा इतिहास !
.
.
कवीनं जपावं आपल्या शब्दांना …
अभिजात मराठीच्या कोंदणात…,
अन झुलत राहावं शासन पुरस्कृत
साहित्य संमेलनाच्या मांडवाखालून.
पण ….
कवीनं लिहू नयेत कविता
गलिच्छ राजकारणावर …
अन नासवू नयेत आपले शब्द !- रमेश ठोंबरे