Sep 1, 2021

~ या जगण्याचे सोने झाले असते ~

वेदनेत जर हसता आले असते

या जगण्याचे सोने झाले असते


अर्ध्यावर्ती थांबून गेलो असतो

मला कुणी जर थांब म्हणाले असते


गोष्टीमध्ये नावच आले नसते

कासव जर हरण्याला भ्याले असते


महत्व प्रत्येकाचे असते कारण

हे नसते तर तेही आले नसते


जर मदतीला गुलाब, गजरे नसते

भांडण खटके रोज उडाले असते


जरी आपले दुःख सारखे असते

तरी निराळे अपुले प्याले असते


- रमेश ठोंबरे