Dec 25, 2011

१)


रात्री एकटच झोपल्यावर हळूच
छातीवर फुंकर घालणारी बोचरी थंडी ...
अन सकाळी उठल्यावर ...
इस्त्रीच्या शिल्लक राहिलेल्या एकमेव
शर्टची तुटलेली गुंडी.

आठ दिवसांपासून एकाच जागी
झोपलेलं अस्ताव्यस्त अंथरूण ...
अन तिथेच बेडवर कोपऱ्यात
उघडं पडलेलं मळकट पांघरूण
 

किचनओट्याशेजारील मोरीत
पडलेली खरकटी भांडी ...
अन कधीकाळी ताजी असलेली
फ्रीझमधील सडलेली भाजी.

वर्तमानपत्रांपासून दूर पडलेल्या
रंगीत साप्ताहिक पुरवण्या ...
अन कपाटातील एकावर-एक पडलेल्या
पुस्तकातील अगणित कहाण्या.

झोपेच्या प्रयत्नात हजारदा
बदललेली कुशी ...
अन शेजारीच पडलेली
आणखी एक उशी.

बाथरूम मधील
ओल्या कुबट कपड्यांचा वास ...
अन पोटात ढकलताना
नरड्यात अडकलेल्या अन्नाचा घास.

हे सगळे मला पदो-पदी जाणीव करून देतात ...
...
...
...
...
...
तू घरात नसल्याची !

- रमेश ठोंबरे
(तू नसताना ...)

Dec 21, 2011

सच का सामना

  Life OK या नवीन TV Channel वर पुन्हा एकदा सुरु झाला आहे 'सच का सामना', मागे काही भागांच्या प्रसरणानंतर काही करणास्तव बंद झालेला हा कार्यक्रम पुन्हा एकदा सुरु झाला आहे. मला हा कार्यक्रम त्या वेळी हि भयंकर आवडला आणि आजही आवडतो. मला सर्वात जास्त आवडली ती या कार्यक्रमाची Idea. या कार्यक्रमाचा format हि कमालीचा आहे. हा original आहे कि कुठल्या विदेशी कार्यक्रमावरून बेतलेला माहित नाही पण या कार्यक्रमाचे रसायन अगदीच भन्नाट आहे. जे कोणी लोक या कार्यक्रमात येण्याचे धाडस करतात ते खरोखरच असामान्य आहेत अस मला वाटत. या बोटावरची थुंकी या बोटावर करून जीवनात यश मिळवायचं आणि त्याच वेळी इथपर्यंत पोचताना अवलंबलेल्या भ्रष्ट कामांची कबुली द्यायची. हे करताना बर्याचदा नैतिक, सामाजिक, कौटुंबिक नात्यांचा आणि प्रतिष्ठेचा बळी द्यावा लागतो. कार्यक्रम पाहताना पहिल्या प्रश्नापासून ... शेवटपर्यंत प्रत्येक प्रश्नात पाहणारा प्रेक्षक गुंतत जातो हेच या कार्यक्रमाच्या format च यश आहे. बर्याचदा आपण स्वतःला त्या खुर्चीत असल्याचा अनुभव करतो. एका यशस्वी माणसाचे आयुष्य किती गुंतागुंतीच असू शकतं याचा प्रत्येय हा कार्यक्रम पाहताना प्रश्नो-प्रश्नी येतो. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आपण केलेल्या आणि आपल्या घरातील कोणालाच अगदी पती / पत्नीलाही माहित नसणाऱ्या चुकांवरच प्रश्नकर्ता कसा काय बोट ठेवतो ... हे हि विचार करण्यासारखे आहे. प्रत्येक सहभागी चा भूतकाळ पिंजून काढल्याचे कसब य कार्यक्रमात दिसून येते. खरोखर वर वर सरळ साधा दिसणारा मानूस अश्या कितीतरी गोष्टी आपल्या अत्यंत जवळच्या म्हणवणाऱ्या आणि दूरच्या हि लोकांपासून लपवत असतो. एखादा माणूस जीवनात यश मिळवण्यासाठी किंवा हवे हे मिळवण्यासाठी लहानपणापासूनच कसा भ्रष्ट बनत जातो ... नकळत तो कसा भ्रष्टाचारी बनतो ? असं काही पाहिलं आणि अनुभवलं कि वाटतं ... खरच आपण एक 'खुली किताब' आहोत ?

- रमेश ठोंबरे

Dec 18, 2011

प्रिया भक्ती सार -2


|| २ ||
कॉलेजची वारी
नित्य असू द्यावी
हातामध्ये चावी
बाइक ची || १ ||

प्रियेचा स्वभाव
तन आणि मन
घ्यावे निरखून
आपणची || २ ||

पहा तपासून
तिची प्रेम खोली
आणि गोड बोली
नित्य नेमे || ३ ||

प्रिया नाम मुखी
असावे सर्वदा
आणि दिल फिदा
तिच्यावरी || ४ ||

करू नका लगट
प्रिये सवे कधी
काय कर्म आधी ?
पुढे ऐका || ५ ||

- रमेश ठोंबरे

Dec 16, 2011

प्रिया भक्ती सार - 1

|| १ ||
प्रिया भक्ती सार
सांगतो तुम्हासी
अवधान थोडे
असु द्यावे || १ ||

प्रिया मंत्र जपा
होवूनि निवांत
सुटेलकी भ्रांत
आयुष्याची || २ ||

प्रिया भक्ती माना
जीवनाचे ध्येय
हवे कुणा श्रेय
भक्ती मध्ये || ३ ||

करा तिच्यासाठी
जे जे वांचे मन
मिळेल कि धन
प्रिया रुपी || ४ ||

आणखी सांगतो
काय काय युक्ती
तूर्त एक भक्ती
असू द्यावी || ५ ||

- रमेश ठोंबरे
(प्रियेचे अभंग)

Dec 14, 2011

'सोशल' फटका
सोसलं तेवढं करत जा रे, सोशल सोशल करू नको
सोशल असते सत्यामध्ये, व्हर्चुअली तू झुरू नको  

नेटिंग, सेटिंग, च्याटिंग गडबड करू नको
उगी रहावे, काम करावे, निष्फळ बडबड करू नको 

फेसबुकावर मित्र हजारो, शेजार्याला विसरू नको, 
सोशल होतील बोल इथे, शब्दांमधुनी घसरू नको.

मिठी मारुनी, चित्र काढुनी, अल्बम सगळा टाकू नको
सोशल वरती उघडे केले, आता पिसारा झाकू नको !

झक मारितो झकरबर्गही, नियंत्रण ना असे इथे,
रस्त्यावरती येते सगळे, घरासारखा पसरू नको !

ह्यकर्स असती इथे तिथे, तू त्यांना थारा देऊ नको,
झापड बांधून डोळ्यावरती, नको तिथे तू जाऊ नको.

तुझ्याच हाती तुझी सुरक्षा, पासवर्ड तो लिहू नको,
आठवड्याला बदलत जा रे, जुना-पुराना ठेऊ नको.

ओळख नाही शीतभराची, फ्रेंड रिक्वेस्ट धाडू नको.
मित्राच्या मित्राचा मित्र म्हणुनी, उगाच नाते जोडू नको
   
फाईट करुनी लाईक करतो, उगा स्माईली फेकू नको,        
सत्य असावे ओठावरती, सत्य म्हणुनी ठोकू नको.   

पोरींच्या नावे पोरे भेटती, फोटूस त्यांच्या भाळू नको,
सल्ला देतो तुला 'रमेशा', 'फटका' म्हणुनी टाळू नको.

- रमेश ठोंबरे   

Dec 12, 2011

36 || शेवटचा अभंग ||


शेवटचा अभंग
प्रियेच्या चरणी
म्हणतील ज्ञानी
असे का हो ? || १ ||

जिच्या साठी केला
आहे हा प्रवास
तिचा तो अभ्यास
घेत आहे || २ ||

शृंगाराच्या पुढे
अस्तो एक रस
परी तो हव्यास
इथे नाही || ३ ||

सुटतील बंध
जेव्हा योवनाचे
पडदे लाजेचे
पडलेले || ४ ||

समजून घ्यावी
भावना मतीची
वेळ ती रतीची
आज आहे || ५ ||

- रमेश ठोंबरे

सिंहाचा आजार


एकदा सिंहराजे आजारी पडले, |
सर्वच प्राणी तेव्हा उगीच रडले.
डोळ्यात कुणाच्याच अश्रू नव्हते,
पण उगीच म्हणत वाईट फार घडले ||

जिराफ होता सिनेमा अक्टर,
बसायला त्याला होते ट्याक्टर |
तो हि धावत पळत आला,
म्हणाला मी तर आहे डॉक्टर ||

जिराफाने धरली सिंहाची नाडी,
म्हणाला धुक - धुक आहे थोडी |
राजे काही लवकर मरत नाहीत,
कारण हि तर आहे त्यांची खोडी ||

म्हणे, सिंह आता म्हातारा झाला,
शिकार सापडत नाही त्याला |
सर्व प्राणी आयतेच होतील गोळा,
म्हणूनच त्याने हा पोबारा केला ||

माकड हळूच सिन्हाकड गेलं,
म्हणे जीराफाना हे बर् नाही केलं |
युक्ती आपली फसली सारी,
त्यानं गुपित सारं उघड केलं ||

ससा म्हणाला गोंधळ झाला,
दिवस माझा फुकट गेला |
एवढा आजार होउन सुद्धा,
सिंह बिचारा का नाही मेला ? ||

- रमेश ठोंबरे

Dec 9, 2011

गाढवाचं लग्न


आज तर होतं गाढवाचं लग्न,
सारच जंगल होतं त्यात मग्न.
जिराफ होता जंगलचा पंच
मंडप दिला त्यानं फारच उंच.
बसायला गाड्या मऊ होत्या भारी.
गाढव म्हणे - उकीरड्याची राखच बरी.
नवरी शोभे गाढवाला छान,
नवऱ्या इतकीच लांब तिची मान,
उंटाने धरला मध्ये अंतरपाठ..
पण मंगलअस्टकाच नव्हती त्याला पाठ.
गाढवाला होती गडबड झाली,
अंतरपाठच खाली वर सारी.
उंटाने लांबण लावली फार,
गाढव बिचारे झाले बेजार .
आता गाढवानेच घेतली तान,
आवाज म्हणे माझाही छान.
उंट शेवटी गोंधळून गेला,
अंतरपाठ त्यानं बाजूला केला.
वाजू लागला ढोलक ताश्या,
सावध प्राणी सावध माश्या.
लग्न संपताच जेवणाची घाई
सिंह लांबूनच पाहुन्याना पाही.
जेवणाचा सगळा गोंधळ झाला,
म्हणे सस्याचा वाघान फराळ केला.
अर्ध्यातच उटली पहिली पंगत,
वाघाच्या जेवणाला आली होती रंगत.
सिंहानेही धरले जेव्हा एक हरीण,
माकड म्हणाले, " तो मलाही मारीन"
सर्व इकडेच लागले नादी,
गाढव बिचारे उकिरडा शोधी.

- रमेश ठोंबरे.

Dec 7, 2011

35 || वेड लावी मला ||


वेड लावी मला
प्रिये तुझे अंग
कंचुकी हि तंग
त्यावरी ग || १ ||

उन्मादी तारुण्य
लावण्याचा घाट
उन्मादक थाट
शोभतो ग || २ ||

नाशिले नयन
सोडतात बाण
शोधतात प्राण
प्रेतात ग || ३ ||

आग आग होते
मग या जीवाची
तेंव्हा खरी गोची
भक्तीत ग || ४ ||

पाहताच तुला
जातो माझा तोल
दावे मग फोल
सज्जनाचे || ५ ||

- रमेश ठोंबरे

Dec 6, 2011

कोणी म्हणे ...... १ ..................४)


कोणी म्हणे झालो
इथे मी पावन |
गर्वाचे दहन
झाले कि हो ||

कोणी  म्हणे आज
गिरविला पाठ |
कवितेची गाठ
पहिलीच ||

कोणी  म्हणे सार्थ
पहिला मी पार्थ |
सोडुनिया स्वार्थ
उपदेशी ||

कोणी म्हणे नाही
नेम मज दुजा |
याहून तो चोजा
कोण संग ||

कोणी  म्हणे येथं
पहिली म्या गाय |
काव्याची ती माय
रोज भेटे ||


- म.क.
(रमेश ठोंबरे)

घनघोर केसांमधी ....

सखे कळले न मला कधी ओलांडला शिव
..............घनघोर केसांमधी माझा अडलेला जीव ! || धृ ||

काळेभोर डोळे तुझे, झुके पापणी कम्माल
योवनाचा घाट न्यारा, मस्त मोरनीची चाल
बाण नजरेचा चाले, जरी झुकलेली मान
पाठ्म्होरा बांधा तुझा,  करी काळजाचे हाल !

वाट पाहून मी आहे ...कधी करशील घाव
कधी लावशील सखे, माझ्या नावासंग नाव    ||१ ||
.............. घनघोर केसांमधी माझा अडलेला जीव !

कातलेली तुझी काया, जसा गव्हाळ कातळ
माझ्या मनामंदी वाहे झरा प्रेमाचा खळाळ
मन झालं ग अधीर, तुझ्या अंगावर खेळ
कसा गावनार त्याला सखे अंतरीचा तळ
        
लाट भरतीची आली... बघ सोडली मी नाव ...
दूर राहिला किनारा .. तुझा सापडेना गाव || २ || 
.............. घनघोर केसांमधी माझा अडलेला जीव !

- रमेश ठोंबरे

Dec 5, 2011

ईतकं सुद्धा अवघड नसतं


थकलेल्याला साथ देणं
चुकलेल्याला हात देणं
ईतकं सुद्धा अवघड नसतं
दिव्यासाठी वात देणं

मित्रत्वाला साद देणं
शत्रुत्वाला दाद देणं
ईतकं सुद्धा अवघड नसतं
चर्चेसाठी वाद देणं

असलेल्याचा भास होणं
नसलेल्याची आस होणं
ईतकं सुद्धा अवघड नसतं
वासरासाठी कास होणं

पांगळ्याचा पाय होणं
आंधळ्याची माय होणं
ईतकं सुद्धा अवघड नसतं
दुधावरची साय होणं

भटकल्यावर दिशा देणं
सटकल्यावर नशा देणं
ईतकं सुद्धा अवघड नसतं
'PJ' वरती हशा देणं

गोड मुलीला फुल देणं
दोड मुलीला हूल देणं
ईतकं सुद्धा अवघड नसतं
सजलेल्या झूल देणं

- रमेश ठोंबरे