Apr 27, 2020

स्पर्श




लॉकडाऊन आलेल्या शहरातील
माझ्या घराच्या खिडकीतून
मी पाहतो आहे
स्वच्छ, निरभ्र आकाश !

आकाशात स्वच्छंद उडणाऱ्या
पक्ष्यांच्या रांगा ....

अजून काय करावं
या रिकाम्या दिवसात
म्हणून मग मी ठेवतो
पक्षांसाठी,
दाना पाणी
घराच्या बाल्कनीत ..

तसे उतरतात पक्षी
एक एक करून
दाणे टिपतात ...
पाणी पितात ...
आणि निघून जातात
एक एक करून

पक्षी कधीच
स्पर्श सुद्धा करत
नाहीत माणसांना ...
आणि त्यांच्यातील एखाद्यानं
चुकून स्पर्श केलाच
तर ठेचून मारतात चोचीनं
आपल्याच स्वकियाला.

कदाचित त्यांना माहीत असावं
माणूस
आधीही विखारीच होता
आणि
आता तर विषारी सुद्धा झालाय !



- रमेश ठोंबरे
#लॉकडाऊन_आलेल्या_शहरातून_१

Apr 26, 2020

~ घेतले आहेस जर वाचून तू ~


घेतले आहेस जर वाचून तू
घेत का नाहीस मग समजून तू ?

वाईटांचे होत गेले चांगले
काय झाले चांगले वागून तू !

सोडले आहे तुला पाण्यात मी
बुडव अथवा ने, तुज वाहून तू

काय आहे राहिले सांगायचे ?
सांग ते नाहीस का जाणून तू ?

सांग आम्ही काय मग समजायचे ?
घेतले जर दार ही लावून तू

वेगळा आहेस पण जाणून घे
वेगळा नाहीस तिज वाचून तू !

'मी विटेवर फार पडलो एकटा'
घे तिच्याशी आज हे बोलून तू

गरज आहे माणसाची आजही
ये पुन्हा हे देवपण टाकून तू !

-  रमेश ठोंबरे

Apr 22, 2020

|| एका सुक्षमाने ||



वाढले अंतर
वाढला दुरावा
समतेचा दावा
फोल केला ||

माणसाचा कर
माणसाचे घर
माणसाचा श्वास
नासविला ||

ऐसे कैसे आले
अमंगळा उत
अ-स्पृश्याचे भूत
मातीयले ||

एका सुक्षमाने
गिळीले आकाश
गिळीला प्रकाश
विश्वाचा या ||

- रमेश ठोंबरे