Feb 24, 2012

~ .............. ~

मराठी कविता समूहाच्या  "अशी जगावी गजल - भाग १४" या सदाबहार उपक्रमातील माझा सहभाग


देवही मज ज्ञात असावा 
ध्यास असा दिन रात असावा 

पडता पडता उठलो आहे 
डोई 'त्याचा' हात असावा   
 
बाळ कुपोषित रडते आहे    
नेता कोणी खात असावा   

आज अचानक भिडले डोळे 
प्रेम नव्हे आघात असावा !

देव बहीरा ऐकत आहे    
मुकाच कोणी गात असावा  

म्हणे रमेशा जरी हरवला  
फक्त तिच्या हृदयात असावा

- रमेश ठोंबरे   

 

Feb 23, 2012

फार फार बरं वाटलं

माझ्या ऑफिसपासून घराच अंतर तसं कमीच आहे गाडीवर वेगात असलं कि जाणवत हि नाही पण कालच पायी जाण्याचा योग आला तेंव्हा रोजचाच रस्ता नवीन वाटलं, अनोळखी दोस्तांच्या ओळखी झाल्या, तेवड्याच वेळात मोबईलवर उतरलेले हे अनुभव !     


फार फार बरं वाटलं

दररोज जातो गाडीवरून
काल असाच चालत गेलो
फार फार बरं वाटलं
चालणं सुद्धा खरं वाटलं.

चालता चालता करणार काय ?
आपलाच रस्ता आपलेच पाय  !
म्हणून जरा निवांत झालो
कमी स्पीडने सावकाश गेलो.
घड्याळाला हरूण आलो,
पण हरणं सुद्धा जाम पटलं ....  
फार फार बरं वाटलं
चालणं सुद्धा खरं वाटलं.

रस्त्यात दिसला तोच खड्डा,
रोज त्याला वळून जातो.
तो सुद्धा आपला वाटला,
आज त्याला भाळून गेलो.
खड्याकडे पाहताना ....
उगाच मन आतून दाटलं        
पण... फार फार बरं वाटलं
चालणं सुद्धा खरं वाटलं.

रस्त्यात एक भेळवाला,
रोज आशेनं पाहत असतो ...
आज त्याला खरं केलं, 
त्याचं देणं त्याला दिलं.
किती किती हलकं झालं
डोक्यावरचं वजन घटलं.
फार फार बरं वाटलं      
चालणं सुद्धा खरं वाटलं.

रस्त्यामधला एक चौक,    
नेहमी गोल फिरत असतो
आज थोडा सुस्त दिसला,
रोजच्यापेक्षा मस्त दिसला
एक हिरवी सुंदर गाडी ...
तिचं बोनट त्याला खेटलं  
फार फार बरं वाटलं      
चालणं सुद्धा खरं वाटलं.

रस्त्यावरचं एक वळण
उगाच वाकड्यात शिरत  होतं
मी आपला सरळच पण ..
मलाही त्यातलाच धरत होतं.
मी तिकडं केलो नाही.
इतकी सुद्धा प्यालो नाही     
जरी होतं मन पेटलं,
फार फार बरं वाटलं
चालणं सुद्धा खरं वाटलं.

चालून पाय थकले नाहीत
रस्ता सुद्धा चुकले नाहीत
सरळ सरळ घरी आले
इतके सुद्धा हुकले नाहीत
स्वतःच स्व:ताशी बोलणं वाटलं
फार फार बरं वाटलं
चालणं कुठ चालणं वाटलं
स्वतःच स्व:ताशी बोलणं वाटलं !

- रमेश ठोंबरे
(ढापलेली गाणी)


  
 

Feb 22, 2012

तेंव्हा मला चीड येते


असत्य सत्यावर विजय मिळवत,
आणि हिंसा अहिंसेच्या मानगुटीवर बसते ... ...
एक एका आदर्शाची पायमल्ली होते ...
तेंव्हा मला चीड येते.
.
.
काळ्या मातीसाठी शेतकरी जीवाचं रान करतो ...
वरुण राजाच्या आगमनाची ....
बळीराजा चातकासारखी वाट पाहतो ....
अन राजा मुरलेल्या राजकारण्यासारखा वागतो ....
बळीराजाशी वरुणराजा राजकारण खेळतो ....
पाणी हवं तेंव्हा तोंड काळ करतो ...
अन नको तेंव्हा भोकाड पसरतो
तेंव्हा मला चीड येते.
.
.
कोणी तरी गाव गुंड ...
सुतकी कापडं घालतो ...
सुतकी चेह्रेयावर कावेबाज हसू पेरतो ...
जनतेचा विश्वास संपादन करून ...
उभ्या आयुश्यावर गोमुत्र शिंपडतो ...
हिरव्या गांधी नोटांची बरसात करतो ...
आणि तुमच्या आमच्या साक्षीने,
पाच वर्षासाठी पुन्हा ... देश विकत घेतो ..
तेंव्हा मला चीड येते.
.
.
हजार वेळा निषेद केला जातो ...
हजारदा वीर-चक्र प्रदान केले जातात ...
हजोरोंचे बळी घेणारे हात ...
कायद्यापासून मोकळे सुटतात ...
साक्ष, खरं, खोटं पुन्हा पुन्हा ...
गाढलेले मढे उकरले जातात ...
ज्यांच्या बळावर खटला ...
वर्ष ... दोन वर्षे ... दहा वर्षे ...
वर्षा मागून वर्षे चालवले जातात ....
जनतेच्या पैश्यावर अतिरेकी पोसले जातात,
आणि पुन्हा त्यांना सोडण्याची वेळ येते ....
तेंव्हा मला चीड येते.
.
.
.
सर्वांगीण विकासासाठी बाप मुलाला शाळेत घालतो ...
स्वतः रोजंदारी करून कुटुंब पोसतो ...
लेकराची शाळा दुरून पाहतो ...
तेंव्हा ... स्वप्नात हरवतो ...
लेक साहेब आणि स्वतः साहेबाचा बाप बनतो ...
लेक शिकला सार्थक झाले असे वाटण्याचे दिवस ...
पण लेकाच्या हातातील पुंगळीची,
शिक्षणाच्या बाजारात विक्री केली जाते ... ?
तेव्हा मला चीड येते.
.
.
समाजात काही तरी ...
समाजविरोधी घडत ...
समाजसुधारक ... जनतेचे कैवारी ...
महिला जाग्रुती ... नारी संगठना ...
कामगार नेते ...
सर्व स्थरातून निषेध नोंदवले जातात ...
वर्तमानपत्रांचे रकानेच्या रकाने भरले जातात ...
चौका-चौकात मोर्चे निघतात,
पुतळे जाळले जातात ...
तेंव्हा मला चीड येते.
.
.
तेंव्हा मला चीड येते.
.
.
आणि
.
.
आणि जेंव्हा जेंव्हा मला चीड येते ..
तेंव्हा मी सत्याग्रह करतो ...
निषेद करतो ...
आवाज उठवतो ...
एक कविता करतो !
वांझोटी कविता .... !

आणि पुन्हा मला चीड येते
माझ्याच वांझोट्या कवितेची
आणि नपुंसक कवित्वाची !
.
.
- रमेश ठोंबरे
Mob. : 9823195889

Feb 21, 2012

इथं असंच होतं


कोणालाच - कोणाची चिंता नसते ...
जो तो आपलीच कातडी वाचवण्याच्या प्रयत्नात असतो.
कधी कंपूशाहीत सामील होण्यासाठी ...
कधी सत्तेत येण्यासाठी ....
तर सत्तेत आल्यानंतर सत्ता टिकवण्यासाठी.

वारे तापते ...
सभांचे, भाषणांचे, आश्वासनांचे,
आरोप-प्रत्यारोप, शिव्याच्या लाखोळ्यांचे
आणि गटारगंगेतील राजकारणाचे  !            

वाभाडे काढले जातात, 
पाय ओढले जातात.
कधी तत्वांचे, कधी आदर्शांचे
कधी देशाचे, तर कधी लोकशाहीचेही.

काही जेलमध्ये जातात,
काही बाहेरसुद्धा येतात.
पुन्हा नवे डाव मांडतात ...
कालचे कावळे,
आज पुन्हा बगळे होतात ....
धुतल्या तांदळासारखे ...
उजळ माथ्याने फिरू लागतात.

तुम्हा-आम्हाला काहीतरी चुकल्यासारखं वाटत,
'पूर्व-पश्चिम' हुकल्यासारखं वाटत.
कधी वाटत ...      
आपणच झोल आहोत
हे सगळं समजून घेण्यासाठी ...
आणि समजलेच तर पचवून घेण्यासाठी,
फोल आहोत !
...
...
...
इथं
जे नको आहे तेच होतं.
घोड्यावर पैसा लावला कि ...
गाढव निवडून येतं.
चुकून घोडं निवडून आलंच ...
तर त्याचं सुद्धा गाढव होतं
इथ असंच होतं

कारण ...
इथं असंच चालतं !
  
- रमेश ठोंबरे

येता जाता

थंडी मजला छळते आहे येता जाता
ऊब एकटी जळते आहे येता जाता

अश्लिलतेचे थेर चालती गल्लो गल्ली
संसदही मग चळते आहे येता जाता

देशी म्हणता इंग्लिश दिसली समोर जेंव्हा
नीयत त्यांची ढळते आहे येता जाता  

देवाला का कधी कुणी हो विसरत असतो 
दुखरे पाऊल वळते आहे येता जात  

हाव तुपाची जेंव्हा जेंव्हा भारी पडते
तेल हि मग ते गळते आहे येता जाता

"गुंड असावे" प्रमाण झाले 'नेत्या'साठी
जनतेला हे कळते आहे येता जाता 

जरी रमेशा खराच आहे गांधीवादी
का रे पित्त खवळते आहे येता जाता


- रमेश ठोंबरे
http://rameshthombre.blogspot.com/