Jul 15, 2013

दिशा


मी माझा आहे ….
माझ्यावर फक्त माझाच हक्क आहे
वागण्यातला बिनधास्तपणा …. माझ्यासाठी
जगण्यातली बेफिकिरी ….माझ्यासाठी !

कोणावाचून माझं काही अडत नाही.
मला कोणाचीच गरज नाही,
मी मला हवं तसं जगणार ….
हवं तसं वागणार
मी बोलेन तीच भाषा
मी ठरवेन तीच दिशा !

माझं तत्व खरच न्यारं आहे
माझं स्वत्व मला प्यारं आहे
म्हणून मी असच वागतो
मी फक्त माझ्यासाठीच जगतो !

कालपर्यंत हे सगळं असंच होतं !
अगदी तंतोतंत !

पण काल मी बाहेर पडताना
तू माझं बोट तुझ्या चिमुकल्या
हातात घेतलस आणि म्हणालास
"पप्पा लवकर घरी या …
मी तुमची वाट बघतोय !"

मी बाहेर पडल्यापासून
घरी कोणीतरी माझी वाट बघतंय ….
हे तुझ्या डोळ्यात दिसलं
आणि माझ्या जगण्याची …
दिशाच बदलून गेली !

- रमेश ठोंबरे

No comments:

Post a Comment