Aug 29, 2011

मोठी माणसं (ग्रामीण कथा)


पहाटचे चार वाजले असतेल. सगळं गाव शांत झोपलेलं व्हत. सगळीकड शांतता व्हती. अचानक, एकाएकी शिरपाच्या घराजवळचा हापसा खटा-खटा वाजू लागतो त्या आवाजात पहाटची शांतता भंग होते.

हाप्स्याचा आवाज कानी पडताच दररोज सकाळ होईस्तोर झोपणारा शिरपा आज खडबडून जागा व्हतो. आपल्या बायकोच्या नावानं बोंब मारीत शिरपा कश्या - बश्या कपड्याच्या घड्या घालतो. शिरपाच्या घड्या घालणं झालं तरी आणखी शिरपाची बायको उठलेली दिसत नाही. तसा शिरपाच तिच्या अंगावरचं गोदाड ओढून बाजूला फेकतो, तशी रकमा वैतागून शिरपावर खेकसते, ' काय लावलंय हे ? झोपू द्या कि थोडा येळ?"

'आग उठ कि तांबडं फुटलंय'
'तांबडं फुटलंय ? काय याड लागलय का म्हते मी ? ', खोपटा बाहीर डोकावत रकमा म्हणते व पुन्हा गोदाड घेऊन झोपू लागते.

'आता उठतीस का घालू कंबरडात लाथ ? ' शीरपाचा पार चढतो.
'आता ग बया, लैच ताव आलाय कि ? काय इशेष काम हाय व्हयं एवढ्या लकवर?' - रकमा
'राती सांगितलेलं इसरलीस व्हयं लगेच. आग मालकाच्या पोरीचं लगीन नाही व्हयं आज?' - शिरपा पुन्हा एकदा आठवण करून देतो.

रकमा आता उठून कपड्याच्या घड्या घालत घालत  म्हणते, 'मालकाच्या पोरीचच हाय नव्ह लगीन, तुमचं तर नाय न ? मग उगच काय नाचाय्लात रातर पसून ?'
'आग मालकाच्या घरचं काम म्हणजे आपल्याच घरचं काम, तसं मालकाच्या घरचं लगीन म्हणजे आपलंच ...'
'आपलंच लगीन म्हणा कि .......?' शीरपाचं बोलन संपायच्या आत रकमा बोलते.
"तसं नाही ग ... पर ..….  बर जाउदी, आत्ता ते नाही कळायचं तुला' .. जा घागर घेऊन ये उगच नसत्या चौकश्या करू नगस' शिरपा.
'घागर ... अन हित्क्या पहाटच पाणी आणायचं का काय म्हते मी ?' - रकमा
'मग आज काही धा-ईस घागरीन भागणार नाय,  धा-ईस टीपाड लागत्याल, लई लोक येणार हाय म्हनं लग्नाला' - शिरपा तोर्यात बोलतो. रकमा घागर काढून देते.
'घरी दोन चार खेपा आणा आदी !' रकमा बजावते
'दोन चार खेपा ! एक घागर बी मिळणार नाय ..... मालकाच्या घरी लगीन हाय तवा सार पाणी तिकडं' असं ऐटीत सांगत, रकमाच बजावणं धुडकावून लावत शिरपा घागरी उचलतो आणि निघून जातो. रकमा बिचारी नवर्याच्या त्या भोळ्या निरागस आणि निस्वार्थी आनंदाकड पाहताच राहते.

शिरपा घागरी घेऊन सरळ हप्स्यावर जातो. तिथ दामू वारीक पाणी हापसत असतो.
घागरी हप्स्यावर ठेऊन शिरपा उभा राहतो.
'काय शिर्प्या आज हित्क्या बिगीन ?' - दाम्याला दमच निघत नाही.
'व्हय, जरा लवकरच आलोय' शिरपा आटोपत घेतो.
'काही इशेष ?' माहित असूनहि सवयी प्रमान चौकशी केल्यावाचून दाम्याला चैन पडत नाही.
'लगीन हाय नव्ह मालकाच्या घरी !'
'मंग तू एकटाच पाणी टाकणार व्हय ?'
'व्हय '
'जादा पैसं दिलं अस्तेल मालकानं.'
'जादा नाय बा, जादा काय म्हून पगार देतोय कि महिन्याला एकशे-ईस रुपये' शिरपा छातीठोक सांगतो.
'मंग पांगरुन तरी करील कि ? लेकीच लगीन हाय तेच्या ... आन तू बी जुना गडी तेंचा खर कि नाय ?' दाम्या खिजवतो.
'पांगरुन ? आन ते कश्या पाई मी काय पाव्हना हाय तेंचा पर तसा माझा मालक लई मोठ्या मनाचा. मला कन्दि बी इसरत नाही बग रातीच बाजाउन सांगितलं मला म्हनला, ' उद्या रानातल काम बंद उद्या त्वा फकस्त घरचं काम बघायच.' शिरपा छाती फुगउन सांगतो.
' व्हय, व्हय, पर पांगरुन करायला पाहिजेत बग नाहीतर पगार काय काम केल्यावर कोणबी देतायाच कि... आर सरपंचाचा बाप मेलता तवा हज्यामतीला गेल्तो म्या सरपंचान काय झ्याक पांगरुन केले म्हणतोस मला,' दाम्या पुन्हा पुन्हा शिर्पाला कपड्यांविषयी सांगून त्याच्या मनात आश्या जागृत करतो. तसा शिरपाचा हि चेहरा टवटवू लागतो. त्याला आशा वाटू लागते.

शिरपा दुपार पस्तोर पाटलाच्या घरी पाणी भरतो आणि पाणी भरून झाल्यावर दुपारी घरी येतो. रकमा घरात सयपाक करीत असते. आल्या आल्या शिरपाला विचारते, 'आत्ता आलात व्हयं, सकाळधरन जेवान नाय का काय नाय, वाट बगून डोळ शिन्ल, घरी पाणी बी नाय टाकलं. म्याच आणल पाणी आन हेव उशीर झाला सयपाकाला, चला जेवान करून घ्या आता.'
'जेवान आन हितं ? येड लागलंय व्हयं तुला ? आग मी तिथच जेवीन कि आज, मालकाच्या घरी लगीन हाय माझ्या. घरी जेवलो तर मालक काय म्हणील !' शिरपा फुशारीन सांगतो.
'आसं व्हयं. मग सकाळी जेव्लाच आसाल माल्काच्यात ? तवाच तर पोट येवढं वरी आलंय.' शिरपाच्या खपाट्या पोटाकड आणि उतरलेल्या चेहर्याकड बघत रकमा विचारते.
'ह्या, आता दुपारीच जेवान हाय, आत्ताच तर कुठ पाणी झालंय, जरा पाणी देतीस का पियाला ?' घाम पुसत शिरपा हुकुम सडतो.
'का माल्कान नाही दिलं पाणी, मालकाच्या घरी तर. धा-ईस टिपाड भरलात नव्ह तुमी ?' रकमा.
'आत्ता तिथ कुमाला येळ हाय ?'
समदीकड नुसती गडबड चालली हाय बग, नुसता गोंधळ च हाय समदा, काय लोक बी आलंय भरमसाट, तरी वराड राह्यलाय आणखी यायचं. मालक तर सारखा येरजार्या घालतंय, हिकडून तिकडं अन तिकडून हिकडं., रक्मान दिलेला पाण्याचा तांब्या तोंडाला लावतो.
'पार म्या म्हणते थोडसं खावा पोटाला तिथ लई उशीर व्हईल., रकमा समजावते.
'नग-नग,' आस म्हणून शिरपा उठतो आणि पुन्हा काही आठवल्यागत खाली बसतो.
' ये रकमा, तेव दाम्या म्हणीत व्हता मालक पान्घूरण बी करल आपल्याला.' दाम्याच बोलणं शिरपा चांगलाच मनावर घेतो.
'याड तर नाही लागलं तुमाला, तुमी काय जावई हाय व्हयं पाटलाच ? म्हण पान्घूरण करल ?' आसं म्हणत रकमा शिर्पाकड पाहून हसू लागते, शिरपा हिरमुसतो त्याचा चेहरा पार सुकून जातो. ....
तो पुन्हा उभा राहतो आणि पुन्हा रकमावर खेकसून मालकाच्या मोठ्या मनाचं गुणगान करीत वाड्याकड निघतो.
दररोज हिथ-तीथ थांबणार शिरपा आज झर झर पावलं टाकीत सरळ वाड्याची वाट धरतो.
शिरपाचा हा उत्साह पाहून गावातील लोक विचारित " काय शिरप्या लई पळतुयास आर जरा टेक कि मर्दा तंबाकू देतो."
पण शिरपा न थांबता पुढ बघून सगळ्याना एकच उत्तर देत होता, "नग - नग ... जरा गडबडीत हाय.... मालकाच्या घरी लगीन हाय नव्ह आज ."

आस शिरपा आज दिवसभर धावपळीत होता त्याला हि त्यातच आनंद वाटत होता. सांगायच्या आधी काम उचलायचा. आता उन उतरलं होतं. सगळे लोक नवरदेवाच्या वर्हाडाची वाट पाहत होते तेवढ्यात वर्हाड आल्याची बातमी समजते. सगळे लोक वेशिकड धावतात. वाजत - गाजत वर्हाड गावात येत. शिरपा आता उगच घाबरून गेल्यासारखा इकड-तिकडं पळत होतां. कधी मालकाच्या मग तर कधी वर्हाडाच्या मागं. शिरपाचा उत्साह ओसंडून वाहत होतां. सगळे आपापल्या कामात दंग होते. शिरपाही प्रत्येक कामात पुढच होतां.

थोड्या वेळाने वर्हाड शाळेकड रवाना झालं. लग्नाच्या आधी आहेर चढवण्याचा कार्यक्रम सुरु झाला. बऱ्याच पाहुण्यांना आहेर चढत होते. शिरपा सर्वांच्या पुढ जाऊन उभा होता. आहेराचे ताट पुढ देत होता. देता देता हळूच ताटातील कपड्यान्कड त्याची नजर झेप घेत होती. कधी हळूच एखादी घडी चाचपून पाहत होता. त्या भारी भारी कपड्यात तो स्वतः चे कपडे शोधत होता. एकामागून एक ताट येत होते... रिकामे होऊन जात होते. आहेराच्या कार्यक्रमान बराच वेळ घेतला त्यामुळे हा कार्यक्रम आटोपता घेतला आणि सर्वच लोक लग्न लावण्यासाठी मंडपात गोळा झाले. थोडस निराश होऊन शिरपान अक्षदाच टोपलं उचललं आणि अक्षदा वाटू लागला. अक्षदा वाटत वाटत शिर्पाच्या मनात पुन्हा - पुन्हा प्रश्न उभे राहत होते .... माझ्या पांघरूनाच काय झालं आसल ? ... मालक इसरला तर नसलं ... ? तशी गडबड होतीच कि मना .... !

इकड अक्षदा वाटायच्या कधी संपल्या .... मंगलअस्टक कधी झाल्या आणि लग्न कधी लागलं हे हि शिरपाला समजलं नाही. जेव्हा फटके आणि आद्ल्यांचे आवाज झाले तेव्हा शिरपा शुद्धीवर आला. तोप्ल्यातले चिमुटभर दाने हातात घेतले आणि नवरा - नवरीकड फेकले.


लग्न पार पडलं सगळे लोक जेवायला बसले शिपाकड कुणाच हि लक्ष नव्हत... तो बिचारा सकाळ पासून उपाशीच होता. पाव्हणे जेवायला बसले होते. वाढेकरी वाढत होते. चापात्याच टोपलं आजून जाग्यावरच होत, त्याच्यासाठी वाढणारा कुणी दिसत नव्हता. शिरपा पुढ आला आन त्यानं टोपलं उचललं. वाढायला सुरवात करणार तेवढ्यात कुणीतरी त्याच्या गालात आवाज केला. त्या इसमाचे पाचीच्या पाची बोटं शिरपाच्या गालावर उमटले.

" चल चल बाजूला हो ... बघतोस काय ... ? आर काही इचार तरी करायचास जातीचा ..... थोडीशी मोकळीक दिली कि लगेच डोक्यावरच चढलास कि .... लोकं खेटर घालतील कि आमाला .... चल हो बाजूला" आस म्हणत त्या इसमानं शिरपला बाजूला ओढलं. शिरपाच्या हातातलं टोपलं खाली पडल तश्या आणखी दोन लाथा शिरपाच्या पेकाटात पडल्या. आधीच सकाळ पासूनचा उपाशी त्यात हा पोटात आणि पाटीत मार. शिरपा पार अर्धमेला झाला. टाकल्या जागेवर बसून राहिला. डोक्यात पुन्हा विचारांचं काहूर माजलं ..... काय झालं आणि कश्यासाठी झालं ..... ? .... ? माझं पाणी चाललं ... मग भाकर वाढली तर कुठ बिघडलं .... ?
....... पर नाही माझच चुकलं, आता पास्तूर आस कधी झालंय का .... ? मग म्याच का उचललं आसल ते टोपलं .... ? मालक माझा हाय म्हणून ... ? पण हे लोकं, हे काय म्हणले असते मला. ... ? माझ्या मालकाला ... ? हो खरच माझंच चुकलं.

पंगती मागून पंगती उठत होत्या .... शिरपाचा मालक पाहुण्यांना आग्रहाने धरून आणून जेऊ घालत होता. पाहुण्यांचे जेवण झाले. गावातल्या लोकांचे झाले ... घरच्यांचे झाले. ..... दरच्यांचे झाले ... एवढंच काय वाढनार्यांचे झाले.... शिरपाच्या वस्तीतले महार-मांग आले वाढण घेऊन गेले .... पण शिरपा आजून उपाशीच होता. त्याच्याकड कुणाचच लक्ष नव्हत. त्याची नजर त्याच्या मालकाला शोधात होती. पण कश्याचा मालक शेवटपर्यंत शिर्पाकड कुणाचंच लक्ष गेलं नाही त्याला कुणीच जेव म्हणलं नाही. शिरपा निराश होऊन तीथच बसून राहिला. शेवटची पंगत उठली आणि कुणीतरी शिरपाला पाहिलं आणि आवाज दिला, " ये शिरप्या आर हिकडं ये. "
शिरपा तो आनंदानं उठला. दहा हत्तीच बळ त्याच्या अंगात आलं. तो धावत पळत त्या बोलाव्नाराकड गेला, " काय झालं आण्णा, कुणी बोलीव्लय .... मालकांनी ?" - शिरपा.

"मालकांनी .... ? काय जेवायचं हाय व्हय आणखीन एकदा, म्हनं कुणी बोलीव्लय मालकांनी ? .... ते पात्र कुणी उचलायचे ....? म्या का तुझ्या बा न !.... जा उचल ते पात्र " आण्णा नावाच्या इसमाने फर्मावलं आणि तो निघून गेला.
....
शिरपाचा धीर सुटला. पोटाला पीळ देऊन त्यानं कशी तरी पात्र उचलली आणि अंधारात वाट काढीत काढीत सरळ घरचा रस्ता धरला. पोटात कावले बोंब मारीत होते. पायात तर चालायला त्राण कसलं ते नव्हतंच.
उठत बसत कसा तरी शिरपा घरी आला. खोपटाच दर ढकललं. मनात विचार केला, आता सरळ रकमाला उठवावं आन शिळ पाकं काय आसल ते खाऊन घ्यावं ... शिरपा रकमा जवळ आला. पण पुन्हा थांबला.... मनात आलं रक्माला काय सांगायचं .... ? मालकानं एवढ्या मोठ्या लग्नात जेवयला सुद्धा घातलं नाही म्हणून. .... नाही नाही यानं तर मालकाची बदनामीच होयील... आज पाणी पिऊनच झोपलेलं बरं.
असा विचार करून शिरपा माठा जवळ आला.... हळूच माठ उघडून पाणी घेतलं. ढसा ढसा दोन तांबे पाणी पिऊन शिरपा अडवा झाला.

अर्धी रात्र उलटून चालली होती. शिरपाला डोळा लागत नव्हता. भूकेन त्याचं शरीर तळमळत होतं तर ... मन निराश होवून बंड करून उठत होतं .... नाही नाही ते विचार मनात येत होते. ज्या मालकासाठी आपण एवढं केलं त्यानं आपल्याला साध जेवायला सुद्धा विचारलं नाही. आशीच असतात का हि मोठी माणसं, लहानांची त्यानं काहीच किंमत नसते .... ? मनात विचार येत होते प्रत्येक प्रसंग डोळ्यासमोर उभा राहत होतां... पण शिरपाच अंतर्मन त्याला वेगळंच सांगत होतं, ते म्हणत होतं, "हीच का तुझी स्वामिभक्ती .... वर्षानुवर्ष ज्याची चाकरी केलीस, ज्याची भाकरी खाल्लीस ... त्याच्यावरच उलटलास ... ? ते हि एकाच दिवसात ... फक्त स्वार्थासाठी बदनाम करतोस त्याला ...? नाही शिरपा नाही तू चुकतो आहेस ... विचार कर विचार ....

अंतर्मनाने सल्ला दिला. शिरपाला तो पटला मनाची भूक भागली ... पण पोटाची भूक ... पोटाचं काय ... ? पोटाची भूक भागवायलाच हवी होती. शिरपा पुन्हा उठला. हळूच भाकरीची दुरडी काढली. भाकर काढून घेतली आणि पाणी घ्याला उठला. पाणी घेतलं आणि बसतानाच भरलेला तांब्या हातातून खाली पडला. रकमा धडपडून जागी झाली. पाहते तर नवरा मांजरावणी डोळे मिटून भाकरीचा घास मोडत होतां. शिरपाची अवस्था पाहूनच रकमान सगळा प्रकार ओळखला काही हि न बोलताच ती उठली शिरपाच्या भाकरीवर पिठलं वाढलं आन शेजारी येऊन बसली. शिरपा खाली मान घालून जेवत होतां.
...
"तुमी लइच मनाला लावून घेतलेलं दिसतंय ... आव कितीबी केलं तरी मला तेव मला आन नोकर तेव नोकरच बगा" - रकमा शिरपाला समजावते.
"आग तसं नाही ग ...... मालक नाही तसं ... पर बाकीची लोक .... मालक तर लई गडबडीत होत बग ... नाहीतर मला आस उपाशी पाठवलं असत व्हय त्यांनी " - शिरपा मालका विरुद्ध काहीही ऐकायला तयार नव्हता.
" बर ते जाउद्या ! तुम्ही जेवा आता .. " - रकमा
शिरपा पुन्हा पुढ बघून जेऊ लागतो ... तेवढ्यात खोपाटाच्या बाहेरून आवाज येतो - "शिरपा ... शिरपा !"
"एवढ्या राती कोण आसल ...? "
"दाम्या तर नसलं ? लई गुदगुल्या होत असत्यात त्याला ... उघड दार जा ... " - शिरपा
रकमा खोपाटाच दार उघडते, हातातला कंदील वर धरते आणि दंगच होते ..... दारात पाटील उभे असतात .... शिरपाचे मालक ...
"मालक तुमी ? इतक्या राती आन आमच्या घरी ... ? " - रकमा
"मालक ... ' शिरपाला हि आश्चर्य वाटत ताट लपउन तो बाहेर येतो. दारात खरच पाटलाला पाहून तोही दंग होतो ... मनातून थोडा घाबरतो हि ... 'उगाच हात लावला म्या भाकरीच्या तोप्ल्याला... '
शिरपा फक्त 'आ' वासून माल्काकड पाहत राहतो.
"आर घरात घेशील का नाय ? " - पाटील
" आ ! व्हय व्हय... या मधी या मालक "
पाटील खोपाटात येतात ... भाकरीची दुरडी आणि शेजारी दडवलेल ताट पाहून सर्व प्रकार पाटलाच्या ध्यानात येतो.
" हे र काय शिरपा, लेका माझ्या घरी सगळं गाव जेऊन गेला आन तू उपाशी .... आर म्या जेव म्हणलं नाही म्हणून काय झालं ... घरच्या माणसाला काय जेवायच सांगावं लागतं व्हय ?" - पाटील शिरपाच्या जवळ जाऊन म्हणतात. शिरपाच्या डोळ्यात पाणी येतं

"मालक चुकलो मी ... ओळखलं नाही मी तुम्हाला ... " शिरपा पाटलाचे पाय धरतो.
" आर आर उठ तू चुकला नाहीस ... चुकलो तो मीच .... लगीन घाईत मी एवढ मोठं काम पार पडलं पार माझ्या घरचाच माणूस उपाशी राहिला कि .... शिरपा मला माफ कर ... चुकलं माझं". पाटील शिरपा पुढं वाकतात. हे पाहून शिरपाला काय बोलाव हेच समजत नाही... ज्या माणसाच्या समोर भले भले माना झुकावतात तो आपल्या समोर आपल्याला माफी मागतोय ? नाही नाही हे शक्य नाही. क्षणभर शिरपा गोंधळून जातो आणि नंतर पाटलाच्या पायावर पडून रडू लागतो.
रकमा हे सर्व पाहून शरमिंदी होते. पाटील शिरपाला उठवतात आणि म्हणतात ..., " शिरपा झालं ते विसरून जा .... उद्या तुम्ही दोघ जोडीनं वाड्यावर या तुमचा आहेर वाट बघतोय तुमची"
"आहेर .... आमचा आहेर " - रकमा
"व्हय पोरी ... आग शिरपा म्हणजे मला घरचाच आहे ...... घरचं पाहिलं कार्य होतं तवा त्याला त्याचं मान नगं व्हय मिळायला... शिरपा येतो आता मी ... आन हो जेऊनच जायच बरका उद्या ..... " - येवढं बोलून पाटील खोपाटा बाहेर पडतात. अंधारात ते दिसेनासे होतात. शिरपा त्यांची पाठमोऱ्या कोलोखात गढून गेलेल्या आकृतीला पाहताच राहतो आणि सहज त्याच्या तोंडून शब्द निघून जातात ... " मोठी माणसं .... खरच मोठी असत्यात .... धानन अन मनान बी .... देवान धन द्यावं तर मन बी आसाच मोठं द्यावं !

- रमेश ठोंबरे 

4 comments:

  1. सुंदर!
    कथा वाचली नाही, पाहिली.. अनुभवली!!
    प्रत्येक प्रसंग डोळ्यासमोर आला. शेवट तर खासच आहे.. "समथिंग डिफरंट" असा..

    वाह ! रमेश... वाह!

    ReplyDelete
  2. mast re kharch shewat mast hota ..

    ReplyDelete
  3. Last line virodhabasi aahe. Shirpa garib asun manane itka motha.
    Khup sundar ending changli keli halli writers different mhanun kahi hee ending kartat pan tu kathe chya sadhya bholya avatara pramane ending dile aahe. Congrats khup chhan vatle katha vachun...
    Regards.
    Dr. Awargaonkar Amarnath

    ReplyDelete
  4. Sundar warnan kele aahe, sarw dokyanpudhe ubhe rahile.

    ReplyDelete