Jun 22, 2016

कवितेविषयी बोलावं असे काय असतो आपण ?

कवितेविषयी बोलावं असे काय असतो आपण ?
खरं तर मीच बोलत असतो कवितेसोबत माझ्या विषयी ....
आणि तिचा मोठेपणा म्हणून ती ऐकत असते माझा शब्द न शब्द
मला बोलायचं असतं,
झाडांशी फुलांशी, इथल्या डोंगरदऱ्यांशी
मला बोलायचं असतं
उन्हाशी, सावलीशी, मावळत चाललेल्या दिवसाशी
रुसून गेलेल्या पावसाशी !
मला बोलायचं असतं
माझ्या गावासोबत, गावातल्या माणसांसोबत,
ह्यांच्यासोबत, त्यांच्यासोबत, तुमच्यासोबत.

पण बऱ्याचदा पोटातून आले तरी शब्द फुटत नाहीत ओठातून
ते सांडत राहतात लेखणीतून,
झरत राहतात ओळींमधून
कागदाच्या पानांवर एक कविता बनून !

कधी मी सांगत असतो इथल्या पावसाची गोष्ट
कधी मी सांगत असतो इथल्या उन्हाची गोष्ट
कधी इतिहासाची अन कधी मनाची गोष्ट !

कागद संपतात पण गोष्टी संपत नाहीत
तेंव्हा मी लिहितो,
झाडं लावायची अन झाडं जगवायची गोष्ट,
अशाच कितीतरी झाडांची कत्तल केलेल्या कागदांमधून.

वागण्यात अन लिहिण्यात किती वेगळे असतो आपण !

ओठातून न फुटणारे शब्द आता
लेखणीतूनही अबोल होतात !

काही गोष्टी मी सांगत नाही कुणालाच
आई-वडील, मित्र अन प्रेयसीलाही ... !
त्याही सांगतो फक्त कवितेला
मी सांगत असतो भान विसरून
अन ती ऐकत असते कान पसरून
ती आईच असते तेंव्हा
प्रेयसी सुद्धा होते !
तेंव्हा तरी काय असतो आपण !

मी कवितेसाठी श्वास होईल,
मी कवितेसाठी जीव देईल !
अरे कव्या,
तू फक्त एक झाड लावलंस तरी खूप होईल
साल, किती बोलतो आपण !
कवितेविषयी बोलावं असे काय असतो आपण ?

- रमेश ठोंबरे