Mar 5, 2012

मराठी


माझ्या मराठीला नका दावणीला बांधू
जग भ्रमंतीचा तिला घेउद्या आनंदू.

माझ्या मराठीचं नका दु:ख आता सांगू
फुकाचेच लख्तरे नका वेशीला ते टांगू.

ज्ञानियाची भाषा आणि रसाळ हि बोली,
हिच्या अस्तित्वाची उगा मोजतात खोली.

राकट, काटक अन लावण्याची भाषा,
मराठीच आहे माझ्या जगण्याची आशा.

मराठी मराठी भाषा मराठी बोलेन,
भविष्याच्या मुखी शब्द मराठी घालेन.

माझ्या मराठीचा रस चाखतात लोक,
भाषे मंदी भाषा गोड मराठीच एक !

माझ्या मराठीला नाही शब्दाचं बंधन
अलंकार अन वर वृतांच गोंदण !

तरेल मराठी पुन्हा उरेल मराठी,
जगामंदी श्रेष्ठ अशी ठरेल मराठी !


- रमेश ठोंबरे

Feb 24, 2012

~ .............. ~

मराठी कविता समूहाच्या  "अशी जगावी गजल - भाग १४" या सदाबहार उपक्रमातील माझा सहभाग


देवही मज ज्ञात असावा 
ध्यास असा दिन रात असावा 

पडता पडता उठलो आहे 
डोई 'त्याचा' हात असावा   
 
बाळ कुपोषित रडते आहे    
नेता कोणी खात असावा   

आज अचानक भिडले डोळे 
प्रेम नव्हे आघात असावा !

देव बहीरा ऐकत आहे    
मुकाच कोणी गात असावा  

म्हणे रमेशा जरी हरवला  
फक्त तिच्या हृदयात असावा

- रमेश ठोंबरे   

 

Feb 23, 2012

फार फार बरं वाटलं

माझ्या ऑफिसपासून घराच अंतर तसं कमीच आहे गाडीवर वेगात असलं कि जाणवत हि नाही पण कालच पायी जाण्याचा योग आला तेंव्हा रोजचाच रस्ता नवीन वाटलं, अनोळखी दोस्तांच्या ओळखी झाल्या, तेवड्याच वेळात मोबईलवर उतरलेले हे अनुभव !     


फार फार बरं वाटलं

दररोज जातो गाडीवरून
काल असाच चालत गेलो
फार फार बरं वाटलं
चालणं सुद्धा खरं वाटलं.

चालता चालता करणार काय ?
आपलाच रस्ता आपलेच पाय  !
म्हणून जरा निवांत झालो
कमी स्पीडने सावकाश गेलो.
घड्याळाला हरूण आलो,
पण हरणं सुद्धा जाम पटलं ....  
फार फार बरं वाटलं
चालणं सुद्धा खरं वाटलं.

रस्त्यात दिसला तोच खड्डा,
रोज त्याला वळून जातो.
तो सुद्धा आपला वाटला,
आज त्याला भाळून गेलो.
खड्याकडे पाहताना ....
उगाच मन आतून दाटलं        
पण... फार फार बरं वाटलं
चालणं सुद्धा खरं वाटलं.

रस्त्यात एक भेळवाला,
रोज आशेनं पाहत असतो ...
आज त्याला खरं केलं, 
त्याचं देणं त्याला दिलं.
किती किती हलकं झालं
डोक्यावरचं वजन घटलं.
फार फार बरं वाटलं      
चालणं सुद्धा खरं वाटलं.

रस्त्यामधला एक चौक,    
नेहमी गोल फिरत असतो
आज थोडा सुस्त दिसला,
रोजच्यापेक्षा मस्त दिसला
एक हिरवी सुंदर गाडी ...
तिचं बोनट त्याला खेटलं  
फार फार बरं वाटलं      
चालणं सुद्धा खरं वाटलं.

रस्त्यावरचं एक वळण
उगाच वाकड्यात शिरत  होतं
मी आपला सरळच पण ..
मलाही त्यातलाच धरत होतं.
मी तिकडं केलो नाही.
इतकी सुद्धा प्यालो नाही     
जरी होतं मन पेटलं,
फार फार बरं वाटलं
चालणं सुद्धा खरं वाटलं.

चालून पाय थकले नाहीत
रस्ता सुद्धा चुकले नाहीत
सरळ सरळ घरी आले
इतके सुद्धा हुकले नाहीत
स्वतःच स्व:ताशी बोलणं वाटलं
फार फार बरं वाटलं
चालणं कुठ चालणं वाटलं
स्वतःच स्व:ताशी बोलणं वाटलं !

- रमेश ठोंबरे
(ढापलेली गाणी)