Mar 18, 2012

बाकी सगळं खोटं आहे !



प्रेम बीम झूट आहे,
सगळी सगळी लुट आहे.
सगळं सगळं लुटून
शेवटी ताटातूट आहे.

बजेट बिजेट थेर आहे
उगी जीवाला घोर आहे
भांडणारा हि चोर आणि
मांडणारा हि चोर आहे

नेत्याकडून विश्वास नाही,
तिकडून कुठलीच आस नाही.
एक पंचवार्षिक संपली कि
बाकी काहीच खास नाही.

शिक्षणाच्या आयचा घो
शिकून सवरून कपडे धो !
अंगठेबहाद्दर संस्था चालक
नुसता करतो यस -नो !

माझं-माझं कसलं काय ?
खाली मुंडकं वर पाय ! 
कालपर्यंत सुंदर होतं
आज काहीच दिसत नाय. 

निरस मन थोटं आहे, 
दु:ख किती मोठं आहे ...
'एक ओळ कवितेची'   
बाकी सगळं खोटं आहे !  


- रमेश ठोंबरे


  

Mar 16, 2012

- गांधीगिरी -


आयुष्यभर तुम्ही केलीत ...
म्हणून आम्ही हि करतो कधी कधी.
अन आयुष्यभर दादागिरी करणारे हि ...
करतात कधी कधी ...
............................. गांधीगिरी !

तुम्ही सर्वांसाठी केलीत ...
म्हणून आम्ही हि करतो कधी कधी
अन नेहमीच सर्वाना वेठीस घरणारे हि ...
करतात कधी कधी
............................. गांधीगिरी !

तुम्ही उघड उघड केलीत ....
म्हणून आम्ही हि उघडच करतो ....
अन कित्येक संसार उघड्यावर आणणारे हि
करतात कधी कधी
............................. गांधीगिरी !

तुम्ही केलीत ती केलीत...
म्हणून आम्हाला हि करावी लागली ...
अन ज्यांना करायची नव्हती कधीच ....ते हि
करतात कधी कधी
............................. गांधीगिरी !

गांधीगिरी ....
कधी भीती,
कधी मुरलेली राजनीती.
कधी ढोंग,
कधी समाजसेवेचा कोंभ.

कधी भास,
कधी टाकलेला फास.
कधी माज,
कधी लोपलेला आवाज.
....
गांधीगिरी ...
...................
..................
तुम्हाला समजली....
पण आम्हाला कधी समजणार ....?
गांधीगिरी ...!

- रमेश ठोंबरे


Mar 14, 2012

माझ्या विठूच्या भूमीत



माझ्या विठूच्या भूमीत
गड्या नाद पावलाचे,
कड्या-कपाऱ्यां मधुन
गुण गाती विठ्ठलाचे ||

माझ्या विठूच्या भूमीत
हळदी कुंकवाची रास,
कधी हारांची आरास.
कधी फ़ुलांचे सुवास ||

माझ्या विठूच्या भूमीत
चंद्रभागेची पुन्याइ ,
पाप धुउन लेकराची
नाव लावते किनारी ||

माझ्या विठूच्या भूमीत
नित्य भक्तीचाच वारा,
कधी चंदनाचा लेप
दही दुधाच्या रे धारा ||

माझ्या विठूच्या भूमीत
येते लेकच माहेरा,
ओलावल्या लोचनांनी
भेटे भक्तीच्या सागरा ||

माझ्या विठूच्या भूमीत
टाळ फुला सम फ़ुले,
भोळा भाबडा मृदंग
मग शब्दागत बोले ||

माझ्या विठूच्या भूमीत
गडे भक्तीचाच भात,
वाढी आईच्या मायेने
विठू भाक्तीचेच हात ||

माझ्या विठूच्या भूमीत
चंद्रभागे पुण्य नांदे,
भक्त विठूचेच जरी
पुंडलिका आधी वंदे ||

- रमेश ठोंबरे
प्रेरणा - बा. भ. बोरकर (माझ्या गोव्याच्या भूमीत)