Jul 17, 2014

ओटी


अर्धा पावसाला संपला तरी
जमीन पुरती ओली झाली नव्हती,
पुढं पाऊस येईल याची हि खात्री नव्हतीच,
तरीही बापाची सकाळ पासून लगबग सुरु होती
मोठ्या उत्साहानं तिफनीची पूजा करत होता,
अर्धओल्या मनात भविष्याची हिरवी स्वप्न पेरत होता.

हळदी कुंकवाच ताट घेवून उभ्या
आईला मी विचारलं,
"घरात खायला दाना नाही,
पाऊस पडण्याची कसलीच आशा नाही…
मग आहे त्यावर पाणी सोडून …
कशाला हे येड्यागत भिकेचे डोहाळे ?"

आई माझ्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली,
"तुला नाही कळणार पोरा,
या येडेपणा मागचं शहाणपण,
शेतकऱ्याला पाहवत नसतं
त्याच्या काळ्या आईचं रितेपण !

पायाला माती लागल्याबिगर तुला
समजणार नाही धरतीच स्थान …

आरं नेहमीच फळाची आशा करून नाही चालत,
कधी कधी मानावं लागतं,
धरतीची ओटी भरण्यात हि समाधान !"

- रमेश ठोंबरे
(माझ्या आई साठी … )

 


     
   

Jul 14, 2014

- दुष्काळ -



ही रखरखलेली धरती
हे डोंगर ओके बोके
हा तहाणलेला वारा
हे भरकटलेले झोके

हे ढोर कधीचे फिरते
शोधात भुकेच्या पोटी
हा थवा इथे पक्षांचा …
भिजवीत कोरड्या चोची

दुष्काळ पसरला आहे
पण बोलत नाही कोणी
आवाज नदीचा गेला
अन झिरपून गेले पाणी

हे पाझरलेले मडके
का असे अचानक फुटले ?
या उजाड सायंकाळी
हे बंध कुणाचे तुटले ?

हे पिंडदान कोणाचे ?
वरदान कुणाला ठरले ?
ही काक गर्जना झाली
आभाळ ढगांनी भरले
.
.
.
पाऊस कधीचा पडतो …
धगधगत्या सरणावरती
हे प्रेत कुणाचे जळते
अवसेच्या भयाण राती ?

- रमेश ठोंबरे 

Jul 9, 2014

ओझं


हि कसली भूक आहे या शहरांची 
गिळंकृत करू पाहत आहे सगळा निसर्ग

हि कसली स्पर्धा सुरु आहेत इथल्या इमारतींची ?
उंचच उंच वाढत आहेत 
आभाळाच्या पोटात शिरत आहेत 
अन अजगरासारख्या पसरत आहेत
मोठ मोठे डोंगर पोटात घेत ! 

हा कसला विकास आहे … निरर्थक !
भकास, बकाल आणि निराधार होत आहेत
इथली स्वयंपूर्ण खेडी,
शहरांच्या छत्रछायेत !

आपला गुणधर्मच विसरलेले
हे कसले या शहरातले वांझोटे ऋतू

आणि हे कसलं
अशाश्वत ओझं
डोक्यावर घेवून फिरतो आहे मी …
या शाश्वत जगात
वर्षोनुवर्ष !

- रमेश ठोंबरे