Jun 13, 2015

चैतन्य


रस्त्याच्या दुतर्फा ……
काळ्या ढेकळांनी व्यापलेली रानं ,
नजरेच्या सरळ रेषेत नागीनिसारख्या फुत्कारत
सळसळणाऱ्या उन्हाच्या झळा ….
थेट कानात घुसून मस्तकापर्यंत डंख मारत असताना ….
वाऱ्यानं उडणाऱ्या डोक्यावरचा पदर सावरत
त्याच रणरणत्या उन्हात
ती काड्या-कुड्या वेचून रान स्वच्छ करते आहे.
काही अंतरावर त्याच लिंबाच्या
झाडाच्या खालच्या फांदीला बांधलेल्या …
झोळीत शेतकऱ्याचा वारसदार निवांत झोपला आहे.
बुंध्याला बसलेलं कुत्रं जिभ बाहेर काढून
ल्ह्या ल्ह्या करत झोळीवर नजर ठेवून आहे.
तिचं मन भूतकाळात
पण नजर मात्र …
पुन्हा पुन्हा त्याच झाडाच्या वरच्या फांदीवर जाते
अन नेमका तेंव्हाच तिच्या माथ्यावरचा पदर
तिचं उजाड कपाळ पुन्हा पुन्हा उजाड करत जातो.
काही अंतरावर
नुक्तच मिसरूड फुटलेला तिचा धाकटा दीर ….
उद्याच्या आशेवर नव्या जोमानं ….
उद्या पाऊस येणारच या विश्वासान ….
उजाड शेताची मशागत करतो आहे.
किती चैतन्य विखुरलय पुन्हा एकदा
या उन्हात, काळ्या रानात …
अन त्याच्या मनात !
एवढंच !
- रमेश ठोंबरे

May 18, 2015

मीच तिच्यावर निर्भर असतो




मीच 'तिच्यावर' निर्भर असतो
ती हसल्यावर क्षणभर हसतो

मौनामध्ये असतो तेंव्हा
मी माझ्याशी बोलत बसतो

ती माझी जर झाली नसती
मी माझाही झालो नसतो

तिचे नि माझे जरा निराळे
ती डसली की मी डसतो !

मला फसवणे अवघड नसते
ती फसली की मी फसतो

आशय आणि अर्थासाठी
मी गझलेची 'जमीन' कसतो

- रमेश ठोंबरे

Apr 15, 2015

कवीनं लिहू नयेत कविता

कवीनं लिहू नयेत कविता
गलिच्छ राजकारणावर …
अन नासवू नयेत आपले शब्द !

कवीनं लिहावं
उमलणाऱ्या कळीवर
गालावरच्या खळीवर !
फुलावर  पानावर … काळ्या रानावर.
खूपच दाटून आलं तर  
येणाऱ्या, नयेणाऱ्या पावसावर
एखाद्या निस्तेज दिवसावर.

कवीनं लिहावं स्वतःवर
स्वतःच्या हातावर.
खोलवर मातीत शिरून
मातीची कूस उजवनाऱ्या
नांगराच्या दातावर

खूपच भरून आलं तर ….
खोदत बसावा भूतकाळ,
ओढत राहावं वर्तमान ….
अन नोंदवून ठेवावं आपणच न पाहिलेलं भविष्य
आपल्या नंतरच्या पिढ्यांसाठी मार्गदर्शक म्हणून.

कवीनं लिहावं ….
वैष्णवांच्या दिंडीवर
माणसांच्या झुंडीवर
अन खूपच असह्यच झालं तर
बुधवार पेठेतल्या रंडीवर.
.
.  
भांडवलदारांच्या सुबत्तेवरही लिहू शकतो कवी
अंगठा बहाद्दरांच्या गुणवत्तेवरही लिहू शकतो कवी
इतकंच काय तर …
सध्य-परीस्थीती अन वर्तमानाचं भान म्हणून …
शेतकऱ्याच्या आत्महत्तेवरही लिहू शकतो कवी !
.
.
मतदानाच कर्तव्य म्हणून
एकदा बटन दाबून निर्धास्त व्हावं कवीनं
होवू द्यावेत देशाचे हाल …
पाहत राहावा जाती धर्माच्या नावाने चाललेला
स्वार्थाचा बाजार.
विसरून जावी शब्दांची भाषा,
विसरून जावा शब्दांनी युद्धे जिंकल्याचा इतिहास !
.
.
कवीनं जपावं आपल्या शब्दांना …
अभिजात मराठीच्या कोंदणात…,
अन झुलत राहावं शासन पुरस्कृत
साहित्य संमेलनाच्या मांडवाखालून.
पण ….
कवीनं लिहू नयेत कविता
गलिच्छ राजकारणावर …
अन नासवू नयेत आपले शब्द !



- रमेश ठोंबरे