Dec 31, 2014

युवक लढला पाहिजे


युवक लढला पाहिजे
देश घडला पाहजे

उत्तराचे सोड तू
प्रश्न भिडला पाहिजे

देह हा निमित्य ना !
जीव जडला पाहिजे

हास्य ओठी थांबले
मेघ रडला पाहिजे

ही नशा ती काय रे
कैफ चढला पाहिजे

- रमेश ठोंबरे

Nov 27, 2014

दोघांमध्ये वाटून घेवू


दोघांमध्ये वाटून घेवू ताटामधली भाकर,  
भरल्यापोटी नंतर बोलू जागतीक प्रश्नावर

मातीमधल्या बिजापोटी, गहाण असते छप्पर,  
घर-दाराहून प्रिय असावे शेतकऱ्याला वावर !

कोण कुणाचे वाटून घेतो, सुख-दु:खाचे लेणे,  
देणे घेणे म्हणजे केवळ जंगम किंवा स्थावर.

झळा लागता दुष्काळाच्या, लटकून गेल्या माना,
पीक लटकले शेतावरती, शेतकरी झाडावर !  

मी कोणाचा नसतो आणिक जगही माझे नसते,  
वाढत जातो जेंव्हा 'माझा' 'माझ्या मधला' वावर  

- रमेश ठोंबरे

Oct 16, 2014

माझा एक कवी मित्र आहे ….

माझा एक कवी मित्र आहे …. त्याच्या अधून मधून भेटी होत असतात… एखाद्या छोटेखानी कार्यक्रमात कविता ऐकण्या ऐकवण्याचा प्रसंग बर्याचदा येतो, मित्राला कविता म्हण म्हटले कि मित्र थोडासा पुढं सरसावून, शून्यात नजर टाकून त्याची एक गेय कविता तर्रनुम मध्ये सदर करतो, गावाकडच चित्र उभं करणारी कविता असते, कधी दुष्काळ, कधी सुगीचे दिवस, कधी रुसलेले बैल, कधी शेतकर्याची आत्महत्या, असल्या साहित्यातील अतोनात सक्सेसफुल एवजाची तंतोतंत सरमिसळ असतानाही मित्राच्या चेहऱ्यावरचे निरागस भाव शेवटपर्यंत जरा सुद्धा बदलत नाहीत आणि याचं समेवर एकदाचं त्याचं काव्यगान संपतं ! मित्र सर्व श्रोत्यांवर एकवार आपली तीच निरागस नजर फिरवत, त्यांच्या उपस्थितीतीची दाखल घेतो आणि, बसल्या जागेवर पुन्हा थोडं मागं सरकतो.    

पण सांगायचा आणि महत्वाचा विषय हा कि, मित्राची कविता संपल्यावर मला नेहमीच एक प्रश्न पडतो कि "हा प्रत्येक वेळेस जी कविता ऐकवतो ती तीच-ती  कविता असते कि वेगळी कविता असते ?